पुनर्वसन आधीच का नाही? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुनर्वसन आधीच का नाही?

पुनर्वसन आधीच का नाही?

पाऊस. पावसावर अनेक लोकांनी कथा लिहिल्या आहेत. काहींनी भरपूर कविताही. काहींच्या कादंब-याही आहेत तर काहींच्या कादंब-यात पावसाचे काही भाग. कारण पाऊस हा जिव्हाळ्याचा विषय आहे. तो जर नसेल तर मनुष्यजीवन व्यर्थ आहे.
पाऊस येतो. उन्हाळ्यातील दाहकता घेवून जातो. उन्हाळ्यातील जी उष्मा अंगाची लाही लाही करीत असते. त्या लिहीला समाप्त करण्याची शक्ती या पावसाळ्यात आहे. खरं तर पावसाळा रम्य आहे.
पाऊस भारतात साधारणतः जुन ते सप्टेंबर या काळात पडतो. समुद्रातील दोन प्रकारचे वारे असतात. पहिले म्हणजे खारे वारे व दुसरे मतलई वारे.
समुद्रकिनारी वाहणारे हे दोन्ही वारे स्थानिक वारे असून समुद्राकडून जमिनीकडे वाहणार्‍या अशा वार्‍यांना खारे वारे म्हणतात. यालाच सागरी वारे असेही नाव आहे तर जमिनीकडून समुद्राकडे वाहणार्‍या वार्‍यांना मतलई वारे म्हणतात. सर्वसाधारणपणे हे वारे आळीपाळीने वाहतात.
दिवसा सुर्य आसमंतात असतो. त्यावेळेस तापमान असते. तसंच सुर्यकिरण लांबरुंद पडत असते. त्या सूर्यकिरणांमुळे जमीन तापते. त्यानंतर म्हणजेच सूर्योदयानंतर अनेक तासांनी म्हणजे दुपारनंतर दोन तासांनी जमिनीचे तापमान जास्तीत जास्त होते. त्या वेळी जमिनीलगतची हवा तापून हलकी होते आणि ती वर जाते. यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. याउलट किना-याबाहेर समुद्रपृष्ठ जास्त तापलेले नसते. यामुळे तेथील हवेचा दाब जमिनीवरील हवेच्या दाबापेक्षा बराच जास्त असतो. वारा नेहमी जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाकडे वाहत असतो. यामुळे साधारणपणे दुपारी दोन वाजल्यानंतर वारा समुद्रावरील जास्त दाबाकडून जमिनीवरील कमी दाबाकडे वाहू लागतो. अशा रितीने समुद्रपृष्ठ व जमीन यांच्या तापमानांतील फरकामुळे खारा वारा निर्माण होतो. हा वारा गार असल्याने आल्हाददायक असतो. सायंकाळनंतर या वार्‍याची गती बरीच कमी होते. समुद्र शांत असताना उन्हाळ्याच्या दिवसात खारा वारा वाहतो. अनेक उष्ण कटिबंधीय समुद्र किनाऱ्यावर जवळजवळ रोज हा वारा वाहताना आढळतो. मध्यम अक्षांश असलेल्या समुद्र किनार्‍यांवर उबदार हवामान असताना हा वारा नियमितपणे वाहतो तर प्रसंगी आर्क्टिक किनार्‍यावरही हा वारा वाहताना आढळतो. मोठी सरोवरे, रुंद नद्या व नदीमुखाजवळच्या खाड्या यांच्या किनार्‍यांवरही या प्रकारचे वारे वाहतात. त्यांना सरोवरी वा नदी वारा म्हणतात.
जमिनीवरुन उष्णतेचे उत्सर्जन होऊन गेल्याने पहाटे जमीन थंड झालेली असते व तिच्यावरील हवेचा दाब वाढलेला असतो. त्यामानाने समुद्रपृष्ठावरील हवेचा दाब कमी असतो. यामुळे जमिनीवरील जास्त दाबाकडून समुद्रावरील कमी दाबाकडे वारा वाहू लागतो. त्याला मतलई वारा म्हणतात. एवढ्या लहान क्षेत्रावरील वार्‍यांवर कोरिऑलिस परिणामाचा प्रभाव पडत नाही. मतलई वार्‍यांमुळे १ किमी. उंचीपर्यंतच्या हवेच्या अभिसरणावर परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे खार्‍या वार्‍याच्या विरुद्ध दिशेत वाहणारा मतलई वारा अधिक दुर्बल असून तो रात्री वाहतो.
मतलई वार्‍याची दिशा अगदी भिन्न म्हणजे समुद्रकिनार्‍याला लंब ते समांतर दिशेत असू शकते. जमीन व सागरी पृष्ठ यांच्या तापमानांतील फरक, स्थानाचे अक्षांश व वर्षातील हंगाम यांच्यावर मतलई वार्‍यांची निर्मिती व जोर अवलंबून असतात.
खार्‍या व मतलई वार्‍यांचे अनेक वातावरणीय परिणाम होतात. त्यांच्यामुळे किनारी क्षेत्रविभागातील वार्‍यांची दिशा व गती यांत बदल होऊ शकतात. कमी उंचीवरील स्तराकार व कपासी प्रकारच्या ढगांवर यांचा परिणाम होतो. विशेषत: उष्ण कटिबंधात खार्‍या वार्‍याने गडगडाटी वादळनिर्मितीला चालना मिळते. सागरी वार्‍याच्या गडगडाटी वादळांमुळे किमान काही टक्के पर्जन्यवृष्टीला मदत होते व इतर अनेक किनारी प्रदेशांत त्यांची अधिक मदत होते. हे अनेक शहरातील पर्जन्यमानावरुन लक्षात येते.
महत्वाचं म्हणजेच पाऊस येणे हा खारे वारे व मतलई वा-यांचा एक भाग. आपल्या भारतात हे वारे विशिष्ट मोसमात वाहात असतात. म्हणून विशिष्ट मोसमातच आपल्याकडे पाऊस पडतो. त्यानुसार आपल्याकडे जुन ते सप्टेंबर याच काळात पावसाळा असा वेगळाच ऋतू आपण मानतो. इतर देशात तसं नाही. विषुववृत्तीय प्रदेशात रोजच रात्रीला पाऊस पडत असतो.
आपल्याकडे येणारा पाऊस हा जुन महिण्यातच सुरु होतो. तो कधी उशिरा तर कधी लवकर सुरु होतो. तो कधी रौद्र रुप घेतो तर कधी शांतपणे कोसळतो. त्यातच काही भागात तो कोसळतांना काही नद्यांनाही पूर येतो व त्या नद्या दुथडी भरुन वाहात असतात तर काही भागात सुका दुष्काळही दिसतो. याच पावसाच्या रौद्र रुपानं दरडीच्या दरडी कोसळतात. त्यात मनुष्य हानी व वित्तहानी होते. जनावरांची मृत्यूमुखी पडतात. ज्यांचा काहीही दोष नसतो.
अलीकडील काळात ही दरड कोसळण्यापुर्वी अलीकडील तंत्रज्ञानाचा आधार घेवून सतर्कतेचा इशारा दिला जातो. तीनचार दिवसापासून गावं खाली करा म्हटलं जातं. त्यांना सुरक्षीत ठिकाणी हलवलं जातं. परंतु तो फक्त इशारा असतो. बंधन नाही की जबरदस्तीनं प्रशासन लोकांना हलवेल आणि बंधन घातलंच आणि सर्वांना जबरदस्तीनं खाली केलं तर त्याचा दोष पुन्हा प्रशासनालाच देतात लोक. शेवटी लोकं प्रशासनाचं ऐकत नाही व दरडी कोसळतातच. त्यात ठरल्यानुसार जिवीतहानी व वित्तहानी ठरलेलीच. मग प्रशासनालाही त्रास आणि बाकीच्या लोकांनाही. त्यानंतर प्रशासनीक कार्य व राहतकार्य जोमानं सुरु होते. मलबा उपसली जातो व लोकांची या मलब्यातून सुटका केली जाते. त्यात काही वाचतात तर काहींचे परीवारासकट निधन झालेलं असतं. हे पुराच्या वेळेस व भुकंपाच्या वेळेसही घडतं. पुराच्या वेळेसही इशारा दिला जातो. परंतु लोकं ऐकतील तेव्हा ना. लोकं ऐकतच नाही. मग पूर वाढतो व त्या भरल्या पुरातून जीवावर उदार होवून काही लोकं अशा न ऐकणा-या लोकांना वाचवत असतात. काही मात्र अक्षरशः वाहात गेलेले असतात. मग अनर्थ होतो. त्यानंतर मदत मागीतली जाते सरकारला व सरकारही तशी मदत देते आपल्या तिजोरीवरचा आर्थीक त्रास सहन करुन. यात सरकारचंही काय जातं? तो जनतेचाच पैसा असतो. भुकंपातही तेच घडतं. याला सरकारची मुजोरी म्हणावी की जनतेची. ते मात्र कळायला मार्ग नाही. यात लोकं म्हणतील की आम्हाला राहायला जागा नाही. एवढं सामान कुठं हलवू. ते सामान सोडून जावं वाटत नाही. ठीक आहे. परंतु यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की 'सर सलामत तर पगडी हजार' 'प्राण जर वाचला तर सारं सामान घेता येवू शकतं' परंतु लोकं ऐकतील तेव्हा ना.
निसर्ग चक्राचे असे वागणे. त्यातच दरवेळेस पावसाळ्यात पाऊस येणे. पूर येणे, दरडी कोसळणे, वा भुकंप येणे. या सर्व गोष्टी निसर्गाच्याच. पुर्वी आपल्याला कळत नव्हत्या या गोष्टी. या सर्व गोष्टी देव घडवून आणतो असं आपलं म्हणणं होतं. परंतु आज तसं नाही. आज आधीच आपल्याला माहीत होतं की काय होणार. त्यामुळंच इशारे दिले जातात की घर खाली करा आणि ते इशारे ऐकायला हवेत. याबाबत मी माझ्या तरुणपणातील प्रसंग सांगतो. आमच्या गावाशेजारच्या पुराची गोष्ट. त्या कुटूंबाचं घर नदीच्या किनाऱ्यावरच होतं. जेव्हा नदीला पूर यायचा. तेव्हा इशारे व्हायचे. दवंडी व्हायची की घर खाली करा. पूर वाढणार. तसे काही लोकं घर खाली करायचे. परंतु काही महाभाग घर खाली करीत नव्हते. अशाच एका कुटुंबात दोन लहानशी मुलं होती. त्या कुटूंबाचं स्लॅबचं घर होतं. तशी त्या मुलांवर दया दाखवून गावातील चार जणं त्यांच्या घरी गेले. सुचना आणि याचनाही केली की तुम्ही येथून बाहेर निघा. परंतु ती मंडळी त्यांनाच उलटसुलट बोलली व हाकलून लावलं. तरीही ते ऐकले नाहीत व त्यांच्या दोन्ही मुलांना जबरदस्तीनं दया दाखवून त्यांनी कडेवर पकडून आणलं. त्यानंतर दुस-या दिवशी माहीतच पडलं की त्या घरची स्री पुरात वाहून गेली व तो पुरुष कशाला तरी पकडून जीवंत राहिला. पुढं त्यानं दुसरं लग्नही केलं व मुलांची आबाळ झाली. जर त्यानं त्यावेळेस त्या गावातील वाचविण्यासाठी गेलेल्या त्या तरुणांचं ऐकलं असतं तर.......तर कदाचीत चित्र वेगळंच राहिलं असतं. पुढं प्रशासनानं त्यांना पैसा दिलाही. परंतु गेलेला जीव परत आला का? त्या मुलांना आई मिळाली का? त्यांना तर अनाथाचं जीवन व्यथीत करावं लागलं ना.
चूक निसर्गाची आणि चूक आपलीही. हा निसर्ग.......निसर्गापुढं सर्वांनी हार मानावी नव्हे तर मानायलाच हवी. कारण तो निसर्ग आहे व त्याला कुणाची भीती नाही वा त्याचेवर कोणाचे बंधन नाही. निसर्ग आपलं कृत्य करतोच आणि अशाच निसर्गाच्या कृत्याचा फायदा घेणारे काही महाभाग आपलाही फायदा करुन घेतात. असेच मला काही फोन येतात. प्रसंग सांगतात. म्हणतात की मदत करा. मी मात्र मदत करीत नाही. कारण मला माहीत आहे की मदत जर करायची असेल तर सरकारला करावी. सरकार अशा प्रसंगात कर्मचारी वर्गाचं वेतन कापतंच. तसंच मदतीबाबत सांगायचं झाल्यास सरकारनं जर म्हटलं की अमूक अकाऊंट मध्ये पैसा टाका तर नक्कीच टाकावा. कारण तो पैसा सत्करणी लागतो. परंतु अशा काही महाभागांना मदत करुच नये. तो पैसा सत्कारणी लागत नाही. असे बरेचसे महाभाग आहेत की या नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेवून आपली पोळी शेकत असतात. गोळा झालेल्या पाच रुपयातून दोन रुपये लावतात व बाकी तीन रुपये स्वतःच्या पाकीटात पाकीट मनी म्हणून टाकतात. ही वास्तविकता आहे. तसं पाहता कोणावर विश्वास ठेवायचा.
विशेष सांगायचं म्हणजे दरवर्षी पावसाळा लागताच निसर्गात पूर, भुकंप, दरडी कोसळणे या गोष्टी होणारच. त्यातच सतर्कतेचे इशारेही मिळणारच. ते इशारे आपण ऐकायला हवे. निसर्गाला कमजोर समजू नये. माळीणलाही दुर्घटना झाली होती आणि आता इर्शाळवाडीला दरड कोसळली. इशा-यानुसार काही लोकांनी आपला मुक्काम सुरक्षीत ठिकाणी हलवला. ते वाचले. परंतु काही मात्र ऐकले नाहीत असे म्हणतात. ते सापडले दरडीत. तसं गाव थोडं उंचावर. शोधकार्य पोहोचायला वेळ लागलाच. तरीही प्रशासनानं कंबर कसून बचावकार्य तेजीनं केलं. स्वतः मुख्यमंत्री गेले. तरीही तब्बल सत्तावीस मरण पावले. सत्तावन बेपत्ता असल्याचं दिसलं. बचावकार्य सुरुच आहे. आकडे वाढतच आहेत. आता प्रश्न निर्माण झालाय त्यांच्या पुनर्वसनाचा. ते पुनर्वसन सरकार करणारच. त्यासाठी पैसा लावणारच. परंतु निसर्ग जसा चूक करतो. तीच चूक आपणही करतो. सरकार जे पुनर्वसन आता करणार आहे. तेच पुनर्वसन तसं पाहता आधीच केलं असतं तर........तर हे सत्तावीस गावकरी मरण पावले नसते वा सत्तावन गावकरी बेपत्ता आढळले नसते.
खरं सांगायचं म्हणजे पुनर्वसन व्हायला हवं. परंतु ते पुनर्वसन धोके झाल्यावर नको. आधीच व्हावं. आज बरीचशी कुटूंब अशी आहेत की त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. अशी बरीचशी कुटूंब आहेत की जी आजही अशा दरड कोसळण्याच्या ठिकाणी वास्तव्यास राहतात. तशीच काही कुटूंब नदीच्या काठावर. खरं तर त्यांनी दरड कोसळण्याची वा पूर येण्याची वाट पाहू नये तर वेळीच आपली उपाययोजना करायला हवी. सरकारनंही त्यांना मदत करावी. त्यांचं स्थानांतरण करावं. संभाव्य धोके होण्यापुर्वी. कारण असे धोके झालेच तर शेवटी नाईलाजानं पुनर्वसन करावंच लागतं. अन् ते पुनर्वसन साप गेल्यानंतर लाठी मारण्यागत होतं. यात शंका नाही.
महत्वाची वास्तविकता मांडायची म्हणजे. सरकारनं पुनर्वसनासाठी आधीच पाऊल उचलावे. पुनर्वसन लवकरात लवकर करावे. नाहीतरी पुनर्वसन करावंच लागतं ना. मग ते पुनर्वसन संभाव्य धोके होण्यापुर्वी का नको? हे पुनर्वसन नक्कीच परवडतं कारण यात फक्त पुनर्वसनासाठीच पैसा लागणार. परंतु संभाव्य धोके झाल्यास बचावकार्यालाही पैसा लागतो आणि पुनर्वसनालाही. जे कार्य परवडणारे नाही. कारण त्याचा ताण सरकारच्या तिजोरीवर जास्त पडतो. जो जनतेचा पैसा असतो. ही वास्तविकता आहे हे विसरुन चालणार नाही. तशीच लोकांनाही एक विनंती आहे की अशी संभाव्य आपत्ती कोसळण्यापुर्वी सुरक्षीत राहा. सुरक्षीत ठिकाणी अधिवास करा नव्हे तर मुक्काम हलवा. जेणेकरुन आपत्ती आल्यास पश्चातापाची पाळी येणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
(लेखक माळीण ते गोसेखुर्द या कादंबरीचे लेखक आहेत.)