Geet Ramayana Varil Vivechan - 4 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन- 4 - लाडके कौसल्ये राणी

राजा दशरथांच्या मनातही देवी कौसल्ये प्रमाणे पुत्र नसल्याचे शल्य खुपत असते. त्या निराशेतून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राजा दशरथ मृगयेला(शिकारीला) जातात.
इकडे एक श्रावण नावाचा कुमार मजल दरमजल करत आपल्या वृद्ध अंध माता पित्यांना कावड मध्ये बसवून त्यांच्या इच्छेनुसार तीर्थाटन करीत असतो. एका पारड्यात पिता एका पारड्यात माता अशी कावड खांद्यावर घेऊन तो एकेका तिर्थस्थळी माता पित्यांना नेत असतो. असाच तो यात्रा करत करत शरयू नदीच्या तीरावर येऊन थांबतो,कावड खाली ठेवतो. त्याच्या पित्याला तहान लागली असल्यामुळे तो जवळील जलाशयातून पाणी आणावयास जातो. तिथेच एका वृक्षावर राजा दशरथ शिकारीची वाट बघत असतो.
राजा दशरथ आवाजावरून न बघता त्या दिशेने अचूक बाण सोडून शिकार करण्यास तरबेज असतो.

इकडे श्रवणकुमार आपल्या जवळच्या तांब्याने पाणी घेत असतो त्यामुळे पाण्याचा जो आवाज होतो तो ऐकून राजा दशरथास वाटते की एखादा वाघ पाणी पिण्यास आला असावा. जराही विचार न करता राजा दशरथ आवाजाच्या दिशेने बाण सोडतो आणि "मेलो मेलो!"असा मनुष्याचा आवाज येताच राजा दशरथ त्वरित झाडावरून उतरून खाली आवाजाच्या दिशेने येतो. समोरचं दृश्य बघताच राजा दशरथास फार पश्चाताप होतो. श्रावण कुमारच्या हृदयात बाण लागलेला असतो. राजा दशरथ श्रावण कुमाराचे डोके आपल्या मांडीवर घेतो आणि म्हणतो,
"हे कुमार माझ्या हातून नकळत का होईना हे पातक झाले आहे. मी व्याघ्र समजून तुझ्यावर बाण सोडतोय ह्याची मला यकश्चित कल्पना नव्हती. मला माफ कर"

"हे राजा जे नशिबात होतं ते घडलं आता खेद करून उपयोग नाही. मरताना माझी फक्त एक शेवटची इच्छा पूर्ण कर! हे जल माझ्या वृद्ध माता पित्यांना दे. ते केव्हाचे तहानलेले माझी आठवण काढत बसले असतील. त्वरित तिथे जा",असे म्हणून श्रवण कुमारने प्राण सोडले.

मोठ्या दुःखा ने कष्टीमनाने राजा दशरथ ते जलपात्र घेऊन जवळच एका वृक्षा खाली बसलेल्या एका वृद्ध जोडप्या जवळ जातो.

"आला का श्रावण बाळ! दे पाणी दे! कधीचा तृष्णेने जीव व्याकुळ होतो आहे आमचा",श्रवनकुमारचे आईवडील म्हणतात.

राजा दशरथ त्यांना पाणी देतो पण त्याच्या हाताला स्पर्श होताच श्रावण कुमारच्या वडिलांना कळते की हा आपला पुत्र नाही, ते म्हणतात,
"कोण आहे तू? आणि आमचा श्रवण बाळ कुठेय?"

राजा दशरथाला आता ह्या वृद्ध जोडप्याला काय सांगावे काही शब्द सुचत नाही. माझ्या चुकीमुळे तुमच्या मुलाचा बळी गेला हे कसे सांगावे ह्या विचारात राजा दशरथ स्तब्ध उभा राहतो.

"अरे सांग! कुठे आहे आमचा पुत्र? "

"आधी आपण जल प्राशन करून घ्यावे",राजा दशरथला वाटते की केव्हांचे तहानलेले हे वृद्ध जीव आहेत आधी ह्यांनी पाणी प्यावे नंतर त्यांना खरे काय घडले ते सांगावे.

पण वृद्ध मतापित्याला ते मान्य नव्हते

"आधी आमचा मुलगा कुठे आहे ते सांग त्याशिवाय आम्ही हे जल ग्रहण करू शकत नाही. त्वरित सांग कुठेय आमचा पुत्र? कुठेय तो आमचा कनवाळू पुत्र श्रावण? बोल! असा शांत राहू नको, तुझी शांतता आमचं हृदय भेदते आहे",वृद्ध पिता

शेवटी राजाला सगळे खरे काय घडले ते सांगावे लागते. ते ऐकताच श्रावण बाळाच्या वृद्ध माता पित्याला तीव्र धक्का बसतो. ते आक्रोश करू लागतात.
"अरे चांडाळा! आई वडिलांची सेवा करणारं ते निष्कपट लेकरू! त्याचा तू बळी घेतला! तुझ्या शिकारीच्या नादाने एका निर्दोष जीवाला तू मारलं! आता आम्ही अंध वृद्ध थकलेले जीव जाणार कुठे? आमचा पुत्रच जिवंत नसेल तर आम्ही तरी जगून काय उपयोग!",श्रावण बाळाचे पिता

"आपण मला आपला पुत्र माना मी आपल्याला माझ्या सवे घेऊन जाण्यास तयार आहे",राजा

"आमच्या पुत्राच्या मारेकऱ्याला आम्ही आमचा पुत्र कसं काय मानू शकू? आमच्या पुत्राशिवाय एकेक क्षण जगणे म्हणजे आम्हाला ती शिक्षा वाटते त्यापेक्षा आम्ही इथेच प्राणत्याग करतो. पण मरण्यापूर्वी माझी वाणी ऐक! ज्याप्रमाणे आज आमच्या पुत्रवियोगाने आम्ही तडफडत मरतो आहोत त्याचप्रमाणे तुझाही मृत्यू तुझ्या पुत्रवियोगानेच होईल. तू ही पुत्रवियोगाने तरफडून मरण पावशील",असं ओंजळीत पाणी घेऊन श्राप देऊन श्रावण बाळाचे पिता हातातील पाणी जमिनीवर सोडतात आणि दोघेही प्राणत्याग करतात.

त्यांचे क्रियाकर्म आटोपून राजा जेव्हा आपल्या निवासस्थानी येतो तेव्हा तो चिंतेत असतो. त्यावर मंत्री सुमंत राजाला कारण विचारतात तेव्हा राजा सगळं सांगतो. आणि आपल्या कुलगुरू वसिष्ठ ऋषींना ह्याचे प्रायश्चित्त विचारतो त्यावर ऋषी वसिष्ठ म्हणतात की

"राजा त्या वृद्ध जिवाने कळवळून दिलेला श्राप व्यर्थ जाणार नाही पण ह्यात तुला एक गोष्ट लक्षात येतेय का? आत्तापर्यंत तो पुत्र नसल्याने कष्टी होता पण ह्या श्रापामुळे तुला पुत्र प्राप्ती होणार हे निश्चित झालेलं आहे. कारण पुत्र असल्याशिवाय का पुत्रवियोग होईल? आता तुझ्या पातकासाठी प्रायश्चित्त म्हणून तू दान धर्म करणे आवश्यक आहे त्यासाठी तो अश्वमेध यज्ञ, पुत्रकामेष्टी यज्ञ कर, भरपूर दान धर्म कर. अग्निदेव प्रसन्न होऊन तुला प्रसाद देतील त्यातून तुझे मनोरथ पूर्ण होईल."

श्रापामुळे कष्टी झालेला राजा पुत्रप्राप्ती होणार म्हणून उल्हसित होतो. व ही बातमी आपल्या प्रिय राणी कौसल्येला सांगावयास येतो.

कौसल्या देवी उदास असतात त्यांना उदास बघून राजा दशरथ त्यांची समजूत काढण्यासाठी म्हणतात:-

हे देवी अशी उदास होऊ नको,प्रिये आधी डोळ्यातील पाणी पूस बघू! वसंत आल्यावर जशी झाडांना नवी पालवी फुटते तशी माझ्या मनात सुद्धा आशेची पालवी उमलू पाहतेय. माझं अंतर्मन मला सांगतेय की अश्वमेध यज्ञ करणे आवश्यक आहे. त्यानिमित्ताने आपल्या वास्तू मध्ये पवित्र वेदोच्चारण होईल. काही पुण्य गाठीशी बांधल्या जाईल. त्यासाठी मंत्री सुमंत यांना मी आज्ञा दिली होती की वसिष्ठ ऋषी, कश्यप ऋषी तसेच जाबालींना आमंत्रित कर. ते आले की योग्य काय ते सांगतील. त्यानुसार ते सगळे आले आणि त्यांनी अश्वमेध यज्ञ करण्यास परवानगी दिली आहे व माझे मनोरथ पूर्ण होईल असा आशीर्वाद ही दिला आहे. त्यामुळे आता निराशा सोड आपण शरयू तीरी यज्ञ करू,भरपूर दान करू मग नक्कीच आपल्याला आपलं इप्सित प्राप्त होईल.

उदास का तू? आवर वेडे, नयनातिल पाणी
लाडके, कौसल्ये राणी।।धृ।।

वसंत आला, तरूतरूवर आली नव पालवी
मनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी
कानी माझ्या घुमू लागली सादाविण वाणी
लाडके कौसल्ये राणी ।।१।।

ती वाणी मज म्हणे, "दशरथा, अश्वमेध तू करी
चार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरी"
विचार माझा मला जागवी, आले हे ध्यानी
लाडके कौसल्ये राणी ।।२।।

निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली -
"वसिष्ठ, काश्यप, जाबालींना घेउन ये या स्थली
इष्ट काय ते मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी"
लाडके कौसल्ये राणी ।।३।।

आले गुरुजन, मनांतले मी सारे त्या कथिले
मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीने मथिले
नवनीतासम तोंच बोलले स्‍निग्धमधुर कोणी
लाडके कौसल्ये राणी ।।४।।

"तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे", मनोदेवता वदे,
"याच मुहूर्ती सोड अश्व तू, सत्वर तो जाउ दे"
"मान्य" - म्हणालों - "गुर्वाज्ञा" मी, कर जुळले दोन्ही
लाडके कौसल्ये राणी ।।५।।

अंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतो स्वतः
त्याच्या करवी करणे आहे इष्टीसह सांगता
धूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनी
लाडके कौसल्ये राणी ।।६।।

शरयूतीरी यज्ञ करू गे, मुक्त करांनी दान करू
शेवटचा हा यत्‍न करू गे, अंती अवभृत स्नान करू
ईप्सित ते तो देइल अग्नी , अनंत हातांनी
लाडके कौसल्ये राणी ।।७।।
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED