गीत रामायणा वरील विवेचन - 6 - राम जन्मला ग सखी राम जन्मला Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 6 - राम जन्मला ग सखी राम जन्मला

हाती घेतलेले पायसाचे पात्र राजा दशरथ देवी कौसल्ये च्या हातात देऊन म्हणतात,

"कौसल्या देवी ह्या पायसाचे तीन समान वाटे करून आपण तीनही राण्यांनी प्राशन करावे."

त्यानुसार कौसल्या देवी तीन समान वाटे करतात स्वतः घेतात व राणी सुमित्रा व राणी कैकयी ला देतात.

सुमित्रा राणींना वाटते की आपल्याला कमी पायस दिलं आहे त्यामुळे त्या रुसतात आणि पायसाचे फुलपात्र बाजूला ठेवतात. राजा दशरथ, कौसल्या देवी,कैकयीदेवी त्यांना समजवतात पण त्या मान्य करण्यास तयार नसतात. तेवढ्यात एक वानरी येऊन सुमित्रा राणीच्या जवळचं फुलपात्र उचलून घेऊन जाते व स्वतः प्राशन करते ते बघून राणी सुमित्रा आणखी विलाप करू लागतात. त्यांचा विलाप बघून देवी कौसल्या आणि देवी कैकयी आपापल्या जवळच्या पायसाचे दोन सम भाग करतात व राणी सुमित्रेला देतात. आता राणी सुमित्रेला दोन पायसाचे भाग मिळतात. राणी कौसल्या व राणी कैकयी यांना एकेकच भाग मिळतो त्यामुळे कालांतराने कौसल्या देवीला एक पुत्र श्रीराम, कैकयीला एक पुत्र भरत व सुमित्रा देवींना पायसाचे दोन भाग मिळाल्याने लक्षणं व शत्रुघ्न असे दोन जुळे पुत्र होतात.

आणि सुमित्रा देवी च्या वाटचे पायस जी वानरी प्राशन करते तिचे नाव अंजनी असते जिला कालांतराने त्या पायसाच्या प्रसादामुळे पुत्र हनुमानाची प्राप्ती होते.

(खालील गीतात ही कथा नाही परंतु गीताचे विवेचन करण्या आधी वरील कथा सांगणे आवश्यक होते.)

( ह्या कथेत कैकयी सोबत पायसाची घटना झाली होती असे मला लहानपणी ऐकलेल्या कथेवरून वाटते व कैकयी चे भरत व शत्रुघ्न दोन जुळे पुत्र होते असे मला माहित आहे. म्हणताना ही आपण भरत शत्रूघन म्हणतो आणि श्रीरामाच्या राज्याभिषेकावेळेस भरत व शत्रूघन आपल्या आजोळी म्हणजे मामाच्या घरी गेले होते ह्याचाच अर्थ भरत व शत्रूघन चा मामा एक होता म्हणजेच कैकयी हीच दोघांची आई होती. पण इंटरनेट वर वाचल्यावर कळले की सुमित्रा देवी ही शत्रूघन ची आई होती.

नक्की काय आहे त्याबद्दल सध्या गोंधळ आहे. तरीसुद्धा इंटरनेट वर बघून वरील कथेत सुमित्रा देवी शत्रूघन ची आई आहे असे मी नमूद केले आहे.
आणि काल एका वाचक लेखिकेचे मत सुद्धा इंटरनेट वरील मताशी साधर्म्य साधणारे होते. सध्यातरी सुमित्रा शत्रुघ्न ची आई होती असे म्हणावे लागेल पण माझ्या माहितीनुसार कैकयीच शत्रुघ्न ची आई होती. )

चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील नवमीला दुपारी बारा वाजता श्रीरामप्रभू पृथ्वीवर जन्म घेतात. चैत्र मास असल्याने सगळीकडे उष्ण वातावरण असते. कौसल्या देवी हळूहळू आपले डोळे उघडून बघतात. त्यांच्या जवळच श्रीराम प्रभू अर्भकावस्थेत निजलेले असतात. त्यांना बघून कौसल्या देवीचे नेत्र आनंदतिरेकाने झरू लागतात.
राजवाड्यात,अयोध्येत सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत असतो. सगळीकडे दुन्दूभी चा आवाज घुमत असतो वाजंत्री वाजत असतात.
गोठ्यात असलेल्या गायी ढोरे वासरे सगळ्यांना आनंद होतो. आनंदाने गायींना पान्हा फुटतो. कोमेजलेल्या कळ्या पुन्हा उत्साहाने उमलतात. वारा सगळ्या निसर्गाला राम जन्मला राम जन्मला अशी बातमी देत सुटतो. निसर्गाला प्राणीमात्रांना सगळ्यांना राम जन्माची बातमी कळते आणि त्यांना आनंद होतो.

ग्रामात सगळ्या प्रजेला हाहा म्हणता ही बातमी कळते सगळेजण हर्षोल्हासाने राजवाड्याकडे धाव घेतात.
रस्त्यांवरून ठिकठिकाणी युवतींचा समूह राम जन्मला असे सांगत गात फिरत असतात.

प्रजा फुलांचा वर्षाव करू लागली. वरून देव पुष्पवृष्टी करू लागले. वाद्यांचा आवाज वाढू लागला. सगळे जण आज आनंदाने बेभान झाले होते. वाद्यांचा तो आवाज ऐकून क्षणभर आम्र वृक्षावर बसलेल्या कोकिळा सुद्धा बावरल्या. आनंदाने पृथ्वी डोलू लागली कारण आनंदाने शेष नाग ही डोलू लागला होता.
कारण राम जन्मला होता. सगळ्यांच्या उत्साहाला पारावर नव्हता. दशरथ राजा हर्षित झाला होता. देवी कौसल्या देवी कृतार्थ झाल्या होत्या. सुमित्रा देवी आणि कैकयी सुद्धा आनंदित झाल्या होत्या. सगळे सजीव ,देव ग्रह तारे गंधर्व सगळे सगळे राम जन्मला हे गीत गात होते. आकाश पृथ्वी पाताळ ह्या तिन्ही लोकांत आनंदी आनंद झाला होता.

चैत्रमास, त्यात शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती!

दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला ग सखी राम जन्मला।।धृ।।

कौसल्याराणि हळू उघडि लोचने
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शने
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला
राम जन्मला ग सखी राम जन्मला।।१॥

राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणी
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला
राम जन्मला ग सखी राम जन्मला॥२॥

पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या
'काय काय' करित पुन्हा उमलल्या खुळ्या
उच्चरवे वायु त्यास हंसुन बोलला
राम जन्मला ग सखी राम जन्मला॥३॥

वार्ता ही सुखद जधी पोचली जनी
गेहांतुन राजपथी धावले कुणी
युवतींचा संघ कुणी गात चालला
राम जन्मला ग सखी राम जन्मला॥४॥

पुष्पांजलि फेकि कुणी, कोणी भूषणे
हास्याने लोपविले शब्द, भाषणे
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
राम जन्मला ग सखी राम जन्मला॥५॥

वीणारव नूपुरांत पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
राम जन्मला ग सखी राम जन्मला॥६॥

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला
राम जन्मला ग सखी राम जन्मला॥७॥

बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनी
सूर, रंग, ताल यात मग्‍न मेदिनी
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला
राम जन्मला ग सखी राम जन्मला॥८॥
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★