पुरस्कार देतांना Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुरस्कार देतांना

*पुरस्काराचे स्वरुप चिल्लर करु नये*

दिसतं तसं नसतं ; म्हणूनच जग फसतं

आज दिखाव्याचं जग आहे. आजच्या काळात दिखाव्याला फारच महत्त्व आहे. या काळात जे दिसतं. ते वास्तविक दृष्ट्या सत्य नसतं व जे सत्य नसतं, ते सत्य असल्याचा दिखावा केला जातो.
मानसन्मानातही तसंच आहे. मानसन्मानामध्ये ज्या लोकांचा मानसन्मान व्हायला नको, त्यांचा मानसन्मान होतो व त्यांना मानसन्मान मिळतं आणि ज्यांचा मानसन्मान व्हायला हवा, त्यांचा मानसन्मान आजच्या काळात होत नाही. असं हे जग आहे. खरं सांगायचं झाल्यास आजचं जग हे दिसतं तसं नसतं, अशाच स्वरुपाचं आहे.
आज त्यांच्यातीलच उत्तूंग गुणवत्ता दाखविणाऱ्या व्यक्तीचा सत्कार होत नाही. उलट सत्कार होतो एखाद्या नेत्याचा. जो सतत निवडून आला व मंत्री बनला. परंतु एक विचार केल्यास काय करतो तो? कोणती अंगमेहनत करतात ते? तरीही त्याचा मानसन्मान होत असतो. इथं सत्कार होतो वल्डकप जिंकणाऱ्यांचा. त्यांना तर डोक्यावरच बसवलं जातं या देशात. तसा विचार केल्यास ते कोणती अशी मेहनत करतात बरं? त्यांच्या मेहनतीच्या भरवशावर देशाला पोषता येतं का? याचंही उत्तर नाही असंच येतं. तसाच मानसन्मान मिळतो एखाद्या सेलिब्रेटींना. परंतु त्या सेलिब्रेटींचा तरी सन्मान कशाला करावा? असं कोणतं चांगलं काम करीत असतात ते? ते तर स्वार्थ साधत साधत भरपूर पैसा कमवीत असतात व स्वतःची मालमत्ता वाढवत असतात.
कोणी कोणी शिक्षकांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्याचा सन्मान सोहळा करतात. तसं पाहिल्यास हा सोहळा व्हायलाच हवा असं म्हणतात. कारण हा शिक्षकच लोकांना मार्ग दाखवतो. दिशा ठरविण्यासाठी प्रयत्न करतो. तो नसेल तर कोणालाच शेती करता येणार नाही. तो नसेल तर कोणत्याच मजूराला एखाद्या वस्तूंचं उत्पादन करता येणार नाही. अन् तोच नसेल तर सेलिब्रेटीही घडणार नाही. अन् तोच नसेल तर कोणी क्रिकेट वा कोणताच खेळ कोणालाच खेळता येणार नाही. तसं पाहिल्यास इथे आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळतात. परंतु कोणाला? जे त्या पुरस्काराचे लायक नसतात. ज्यांचं काहीही कार्य नसतं. याबाबत एक प्रसंग सांगतो. एक शिक्षक एकदा एका सामाजीक कार्य करणाऱ्या संस्थाध्यक्षाला म्हणाला,
"मला आपल्या संस्थेअंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमाचं सहभाग प्रमाणपत्र द्यावं. वाटल्यास पैसे घ्यावेत."
त्या शिक्षकानं म्हटलेले शब्द. तशी ती सामाजीक संस्था तसं सहभाग प्रमाणपत्र देणार नव्हती. परंतु फुकटचे पैसे मिळतात म्हणून त्या संस्थेनं त्याला कार्यक्रम नसतांनाही मागील तारखेचे बरेच प्रमाणपत्र दिले. ज्यात त्याचा सहभाग नव्हता. शेवटी न राहवून त्याला उत्सुकतेनं विचारलं,
"हे प्रमाणपत्र कशासाठी हवेत?"
माझा तो प्रश्न. त्यावर तो म्हणाला,
"मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवायचाय."
त्याचं ते म्हणणं बरोबर ठरलं. कारण काही दिवसानं त्याला खरोखरच आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अलिकडं असंच आहे. दिसतं तसं राहात नाही. प्रत्यक्ष शहानिशा करुन पुरस्कार मिळत नाही. कारण कोणत्याही पुरस्कार देणाऱ्या संस्था वा शासनही त्या व्यक्तीच्या घरापर्यंत येत नाहीत. त्यातच सर्व बनावट कागदपत्रानं सगळं तयार करता येतं. एवढंच नाही तर बनावट मागील तारखेच्या वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणंही तयार करता येतात. हे सगळं कशासाठी? तर फक्त खोटा सन्मान मिळविण्यासाठी. ज्या सन्मानात मानमरातब असतो. तो इतरांसाठी. स्वतःसाठी तो मानमरातब नसतो. कारण तो सन्मान खोट्यातून मिळविल्यानं आपण स्वतः आपल्याच नजरेतून उतरुन गेलेले असतो.
सन्मान प्रकारात साहित्यीक माणसांचाही सन्मान होतो. जो व्हायला नको. परंतु लोकांना वाटतं की साहित्यीक माणसांचा सन्मान केल्यानं त्याच्या हातून बरंच नवीन साहित्य निर्माण होत असतं. ठीक आहे. नवीन साहित्याची निर्मीती साहित्यीकांकडून होते. परंतु महत्वाचं म्हणजे त्याचं लिहिणं हे जगासाठी नसतं. जगाला फक्त वाचनाचा आनंद मिळतो. अन् त्याला त्यातून पैसा मिळत असून तो पैसा त्याच्या स्वतःसाठी असतो. ज्यातून समाजाला पोषले जात नाही वा समाजाचा विकास होत नाही.
मानसन्मान........ मानसन्मानाचा विचार केल्यास मानसन्मान हा शेतकरी वर्गाचा व्हायला हवा. समजा एखाद्या शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतीचं उत्पादन निघालं तर मानसन्मान व्हायलाच हवा किंवा त्यानं एखादा नवीन प्रयोग आपल्या शेतात केला तरही त्याचा मानसन्मान व्हायला हवा. कारण तो शेतकरी जगाला आपल्या मेहनतीच्या भरवशावर पोषतो. तसाच मानसन्मान हा एखाद्या कामगारांचा व्हायला हवा की जो आपल्या मेहनतीच्या भरवशावर आपल्या देशाला पोषतो. बदल्यात हे घटक पैसे घेतात. परंतु पाहिजे तेवढे घेत नाहीत. कारण ते देशाचे सेवक आहेत व फक्त सेवाशुल्क घेतात. उत्पादन शुल्क घेत नाहीत. हे प्रत्यक्षदर्शी दिसतं.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आज पुरस्काराचं पीक अतिशय जोमात आलेलं दिसतंय. जशा दररोज वर्तमानपत्रात अपघाताच्या बातम्या येतात. तशाच आजच्या काळात पुरस्काराच्याही बातम्या येवू लागल्या आहेत. तसं पाहिल्यास आजच्या काळात पुरस्काराचे स्वरुप चिल्लर वाटायला लागले आहे. देशात बरेचसे असे पुरस्कारार्थी आहेत की त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की यांना कशाला पुरस्कार दिले असावेत? कारण तसं पडताळून पाहिल्यास त्या व्यक्तीवरुनही महान कार्य करणारे देशात असतात. ज्यांनी कधीच पुरस्काराची अपेक्षा केलेली नसते. फक्त कार्य करणे हा त्यांचा स्वभाव असतो व ते तेवढं कार्य करीत असतात. तसाच गीतेतील एक संदेश पदोपदी वसवतात की फळाची अपेक्षा करु नये. फक्त कार्य करीत राहावे.
विशेष सांगायचं झाल्यास आज सर्वच क्षेत्रातील पुरस्कार बंद करावे. कारण त्या सर्व पुरस्कारार्थींचं कार्य हे त्यांच्या स्वतःचा विकास करण्यासाठी असतं. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी असतं. यात जास्त पैसे व श्रम वाया जात असतात. तसंच जे श्रम वाया जातात, जो पैसा वाया जातो. तोच पैसा व श्रम देशकार्य करण्याच्या कामी लावावे. जेणेकरुन देशाचा विकास होईल व देश आत्मनिर्भर बनू शकेल. अन् पुरस्कार द्यायचाच झाला तर तो शेतकरी व मजूरांनाच द्यावा की जे या देशाचे खरे आधारस्तंभ असतात. तसेच ते सृष्टीचेही आधारस्तंभ असतात. सृष्टीनिर्मातेही असतात. तसं पाहिल्यास शिक्षकांनाही पुरस्कार देवू नयेत. कारण शिक्षक व मायबाप हे लोकांसाठी देव असतात व कोणतेच मायबाप जसे पुरस्कार घेत नाहीत. तसाच पुरस्कार शिक्षकानंही घेवू नये. कारण तसा पुरस्कार घेतल्यानं शिक्षकांचा विद्यार्थ्यांप्रतीचा जो दर्जा असतो. तो खालावतो व त्याला मुल्य उरत नाही.
महत्वपुर्ण बाब ही की पुरस्कार म्हणजे मनोरंजन नाही की कोणालाही देवून मनोरंजन करुन घेतात येईल. त्याचं एक मुल्य आहे. विशेष असं मोल आहे त्यात. त्यात कोणालाही तो देवून चिल्लरपण आणता कामा नये. असं जर वारंवार घडत गेलं तर त्याला मुल्यच राहणार नाही व तो चिल्लर प्रतिचा होईल यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०