भाग्य दिले तू मला - भाग २ Siddharth द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग २

तेरे शहर मे आये है गालिब
तुझको अपणा बनाने वासते
जी जायेंगे या मर जायेंगे
तुम याद रखोगे हमेशा हसते - हसते

स्वप्न .. आयुष्यात स्वप्न प्रत्येकच व्यक्ती पाहतो पण ते पूर्ण करण्याची हिंमत मात्र काहीच लोकांकडे असते . स्वराने घरची परिस्थिती, आई - वडिलांचे कष्ट सर्व अगदी जवळून बघितलं होत. छोट्या - छोट्या गोष्टींसाठी किती आणि काय करावं लागतं ह्याची जाणीव तिला लहान असतानापासूनच झाली होती. त्यांचे कष्ट करून झिजलेले हात ती सतत बघत आली होती आणि त्यांना त्या परिस्थितीतुन बाहेर काढण्याचा निर्धारच तिने केला. १० वी ला असताना कुणीतरी तिला आय.आय .टी. बद्दल सांगितले होते तेव्हापासून प्रत्येक क्षण आणि क्षण ती आपला त्यासाठी देऊ लागली. त्या २-३ वर्षात तिने आपल्या जिवाच रान केलं. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. सतत इच्छा होत असतानासुद्धा बाहेरच्या वातावरणापासून स्वतःला दूर ठेवल आणि त्याचा फायदा तिला शेवटी झालाच. १२ वीला पास होऊन जे.ई.ई. मध्ये उत्तम मार्क्स मिळाले आणि आय आय टी दिल्ली तीच कर्मस्थान बनल. तिथे नंबर लागन म्हणजे तिच्या मेहनतीला फळ आलं होतं आणि एकदा व्यक्ती आय.आय.टी. ला लागली की जॉब पक्की असते हे तिच्या घरच्यांना माहीत होतं त्यामुळे तेही फारच खुश होते. आता स्वराच्या आयुष्याला नव्याने पंख लाभले होते जे तिला दूरवर नेऊन सोडणार होते आणि तीही त्या विचारातच हरवली असायची. ती इतक्या मोठ्या शहरात स्वतःच एक नवं-कोर स्वप्नं घेऊन जाणार होती. आता ते शहर तिला किती भावत हेच बघायच होत.

दिल्लीला नंबर लागल्याने स्वरा आणि तिचे बाबा आज दिल्लीला पोहोचले होते. ट्रेन नंतर टॅक्सीचा प्रवास करून ते कॉलेजसमोर पोहोचले आणि दुरूनच ते भव्य दिव्य कॉलेज त्यांना दिसू लागलंं. आजपर्यंत तिने हे कॉलेज फक्त आपल्या स्वप्नांतच बघितलं होत पण आता ती ते स्वतःच्या डोळ्याने बघत होती. कॉलेजकडे बघत असताना तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. जणू ती त्या कॉलेजला सांगत होती की आजपर्यंत तुझ्या नावाने बरेच लोक ओळखले गेले आहेत पण आता माझ्या नावाने तू ओळखला जाणार आहेस. तिने ती बिल्डिंग आपल्या डोळ्यात घट्ट साठवून घेतली आणि आपल्या इच्छा, आकांक्षा स्वप्न घेऊन आतमध्ये जाऊ लागली.

कॉलेज सुरू होऊन एक दोन दिवस झाले होते. स्वरा दोन दिवस उशिरा आली होती. काही मुलांनी पहिल्याच दिवशी कॉलेज जॉईन केलं होतं म्हणून कॉलेज मध्ये बरीच गर्दी जाणवत होती. ती त्या गर्दीला न्याहाळातच रस्ता सर करू लागली. तीच्या लक्षात आलं की आजूबाजूला सूट बूट घालून मूल मुली इकडे तिकडे फिरत होती. त्यांच्याकडे बघता-बघताच स्वराने स्वतःकडे लक्ष दिलं आणि आतापर्यंत हाय असलेला कॉन्फिडन्स अचानक लो झाला. सलवार लावून आलेल्या एका गावातल्या मुलीकडे अगदी सर्वच पाहू लागले होते. हळूच त्यांच्या चेहऱ्यावर तिला बघून हसू अवतरलं होत. बहुतेक ही इथे कशी आली असा प्रश्न त्यांना पडला असावा. सर्व मूल तिला अस पाहत आहे याच तिला वाईट वाटल होत पण तिने तेही हसून पचवल. बाबांना ते कळालं तर त्यांना बर वाटणार नाही म्हणून ती सर्वांकडे दुर्लक्ष करत चालू लागली.

बाबांना रात्रीच्या ट्रेनने पुन्हा परत जायचं असल्याने ती फास्ट फास्ट चालू लागली होती. कॉलेज कॅम्पस फारच मोठं होत. कॅम्पसच्या समोरच्या भागात वेगवेगळ्या सेक्शनच्या बिल्डिंगस तर सर्व ओलांडून गेल्यावर कोपर्याला त्यांचं हॉस्टेल होत. बराच वेळ रस्ता सर केल्यावर ते हॉस्टेलला पोहोचले. हॉस्टेलला पोहोचताच स्वराने रूम बद्दल चौकशी केली आणि तिला रूम नंबर 26 मिळाली असल्याचीं माहिती मिळाली. बाबांना बाहेरच ठेवून ती सामान हॉस्टेलमध्ये ठेवण्यासाठी जाऊ लागली . एक एक रूम करत ती रूम नंबर 26 वर पोहोचली. तिने सामान ठेवण्यासाठी आत डोकावून पाहिलं तेव्हा तिथे तिला दोन मुली दिसल्या. दोघीही अगदी श्रीमंत घरातून आल्या आहेत असं त्यांच्या पेहरावावरून जाणवत होतं. रूम पार्टनर म्हणून तिने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिचा पेहराव पाहता त्यांनी तिच्याशी बोलणं टाळलं होत. स्वराला त्याच वाईट वाटलं होत पण बाहेर बाबा तिची वाट पाहत असल्याने ती आपले सर्व विचार बाजूला ठेवून पुन्हा बाबांकडे परतली.

कॉलेजला येऊनही बराच वेळ झाला होता. दोघांनीही सकाळपासूनच काहीही खाल्लं नसल्याने दोघांच्याही पोटात कावळे ओरडू लागले होते. स्वरा सुद्धा जरा थकल्यासारखी वाटत होती म्हणून ते सरळ तिथून हॉटेलवर पोहोचले. हॉटेलवर जेवण करून झालं तोपर्यंत दुपार उलटून गेली होती. ट्रेन लागायला आणखी काही वेळ होता. स्वराला हॉस्टेलला जायला उशीर होऊ नये आणि पहिल्याच दिवशी ओरडा खावा लागू नये म्हणून बाबांनी तिला रेलवे स्टेशनवर यायला नकार दिला होता. तिला हॉटेलवरूनच परत जायला सांगितले होते पण ती हट्ट करून रेल्वे स्टेशनवर पोहोचलीच.

अजूनही ट्रेन लागायला वेळ होता. त्यामुळे तिथेच गप्पा मारत ते बसले. तिकीट आधीच रिजर्व असल्याने त्याबद्दल काही चिंता नव्हती. कितीतरी वेळ ते बोलत होते पण मनातून हवे ते शब्द बाहेर येत नव्हते. काही क्षण आणखी गेले . आता काहीच क्षणात ट्रेन निघणार होती. तिच्या बाबांच्या मनात काहीतरी सुरू होत ते त्यांनी कितीतरी वेळेपासून मनात लपवून ठेवलं होतं पण आता तिला एकट सोडून जाताना त्यांना राहवलं नाही आणि ते भावुक होत म्हणाले, " बाळा आज पहिल्यांदाच तुला बाहेर एकट सोडतो आहे त्यामुळे मनातून खुप घाबरलो आहे. खर सांगू तर तुला एवढ्या दूर येऊ देण्याची अजिबात इच्छा नव्हती पण तुझ स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून मी मनाला समजावल आहे. आता आमच्या दोघांचे दिवस कसे जातील माहिती नाही. तुझ्याविना आमचं घर एकटच पडणार आहे. असो आता आम्ही इथे तुझी काळजी घ्यायला नसू तेव्हा स्वतःची काळजी घे आणि केव्हाही पैशाची गरज वाटली तर फोन कर. अजून तुझा बाप जिवंत आहे हे विसरू नको. कॉल करत राहा स्वरा. काळजी घे स्वतःची. चल मी येतो. "

ट्रेनचा हॉर्न वाजला आणि स्वराने बाबाना घट्ट मिठी मारली. ते सोडून जात आहे बघून तिच्या डोळ्यात आपोआप अश्रू आले. तीही आई-बाबांविना कधीच एकट राहिली नव्हती म्हणून तिला स्वतःला आवरण शक्य होत नव्हतं शेवटी बाबांनी तिला समजावून शांत केलं. तीही समजूतदार होती त्यामुळे सहजच शांत झाली आणि काही पैसे हातात देऊन त्यांनी दिल्ली सोडली. ते ट्रेनमधून जाताना दिसत होते आणि तिच्या अश्रूंनी पुन्हा एकदा वाट मोकळी केली. ते जात होते पण स्वराला का माहिती नाही त्यांना शेवटच भेटतोय असच वाटत होतं त्यामुळे तिच्या अश्रूंनी अजूनच आपली मनमांनी सुरू केली.

ते गेले आणि स्वरा पुन्हा हॉस्टेलवर पोहोचली. एका रूममध्ये चार लोकांची राहण्याची व्यवस्था होती. स्वराने आपलं सर्व सामान बॅगमधून बाहेर काढल आणि योग्य जागी सजवलं होत. आता ती एकटीच बेडवर पडून समोरच दृश्य बघू लागली. समोर तिचे दोन्ही पार्टनर एकमेकांशी बोलत होते पण स्वराशी एक शब्द देखील ते बोलले नाही. स्वराच त्या दोघींकडे लक्ष होत पण त्या जाणूनच तिला टाळू लागल्या. त्यांचं तस वागणं तिला फार काही आवडल नव्हतं पण पुढचे काही वर्षे इथेच राहायचं असल्याने तिला कुणासोबतही वाजवूनं घ्यायच नव्हतं म्हणून ती शांत राहून सर्व ऐकत होती. स्वरा सकाळपासून थकली असल्याने ती बेडवर बसता बसताच झोपू लागली. तिला झोप येत होती पण समोरच्या पार्टनर खूप जोरा-जोराने ओरडत असल्याने तिची झोप उडाली होती. कितीतरी वेळ त्या बोलणं बंद करतील ह्या आशेने ती बेडवर रखडत पडली होती पण त्या दोघी रात्रीपर्यंत बोलत असल्याने तिला झोप सुद्धा लागली नव्हती. एक तर थकवा आणि दुसर त्यांचं वागणं ह्यात स्वराची पहिल्याच दिवशी भरपूर चिडचिड होऊ लागली. स्वरा वाट पाहत राहिली आणि शेवटी रात्री २ ला त्या झोपल्या तेव्हा स्वराही समाधानाने झोपी गेली.

आज तिचा कॉलेजमध्ये पहिला दिवस होता. रात्री झोपायला उशिरा झाल्याने तिला सकाळी कॉलेजला यायला देखील उशीर झाला होता. ती क्लासला पोहोचली तेव्हा समोरच्या सर्व सीट बुक झाल्या होत्या आणि नाईलाजाने तिला कोपरा पकडून बसावं लागलं. काहीच क्षणात सर आत आले. सर्वानी उभ राहून त्यांना गुड मॉर्निंग विश केलं. आज कॉलेजचा पहिला दिवस असल्याने ते काहीच शिकविणार नव्हते तर त्याऐवजी त्यांनी सर्वाना त्यांची माहिती विचारायला सुरुवात केली. सर्व जवळपास इंग्लिश मिडीयमला शिकत असल्याने फाड फाड इंग्लिश बोलून गेले होते. सर्वानी त्यांना आपल्याला काय बनायचं आहे तेही सांगितलं होतं. प्रत्येक व्यक्ती त्यावेळी काहीतरी खास होता. जणू शेरास सव्वाशेर! स्वराला इंग्लिश समजत होती, लिहिता येत होतं पण तिला फाड फाड इंग्लिश बोलता येत नव्हती. हळूहळू इन्ट्रो द्यायला तिचा नंबर येऊ लागला आणि ती अधिकच घाबरली. तिचा पूर्ण कॉन्फिडन्स लो झाला होता आणि चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसू लागले. हळूहळू करतच सर्वांची माहिती विचारून झाली होती आणि आता नंबर होता तो स्वराचा. स्वरा आधीच घाबरली होती त्यामुळे इंग्लिशमध्ये इन्ट्रो देताना ती मधातच अडखळू लागली. तिला बऱ्यापैकी इंग्लिश येत असतानाही फक्त घाबरल्याने तिची अशी ही अवस्था झाली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी तीच क्लासमध्ये हसू झालं. सर्व मूल तिला बघून हसत होती म्हणून तीला फारच गिल्टी वाटू लागल होतं आणि ती न राहवता हिंदीत म्हणाली, " सॉरी सर मुझे परफेक्ट इंग्लिश नही आती. क्या मै हिंदी मे बात कर सकती हु?"

ही कुठून गवार आली म्हणून तर सर्व आणखीच जोरजोराने हसू लागले. सरांनी तिला हिंदीमध्ये।बोलायची परवानगी दिली आणि ती आपल्याबद्दल माहिती सांगून खाली बसली. ती बसली आणि काही क्षणात सर्वांच हसन बंद झालं. क्लासमधील वातावरण कस एकदम प्रफुल्लित वाटत होतं. सर सुद्धा मुलांना बघून हसत होते. आज मुलांना काहीच शिकवायच नव्हतं पण मुलांची टेस्ट घ्यावी म्हणून सरांनी एक प्रश्न फडयावर दिला. त्यांनी प्रश्न पूर्ण केला आणि उत्तर जाणून घेण्यासाठी ते विद्यार्थ्यांकडे वळाले. त्यांची नजर अशा विद्यार्थ्यांला शोधत होती जी त्या प्रश्नच उत्तर देऊ शकेल पण क्लास भर नजर फिरवून त्यांना एकही हात वर दिसला नाही. ते पहिल्याच दिवशी फार निराश झाले होते. नजर फिरविता - फिरविता त्यांचं लक्ष स्वराकडे गेलं. स्वराच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स होता. ह्याचाच अर्थ तिला उत्तर येतय हे समजायला त्यांना फार वेळ लागला नाही. जरी तिला प्रश्नाचं उत्तर येत होतं पण आताच सर्वांसमोर हसू झाल्याने ती सांगायची हिम्मत करू शकली नाही आणि सरांनीही ते अचूक हेरल. स्वराला बघून सरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता आणि सर स्वराकडे पाहत म्हणाले, " स्वरा इंग्लिश इज नॉट इंपॉरटंट फॉर मी. आय नो दॅट यु हॅव एन परफेक्ट आन्सर सो टेल मी वीदाउट फिअर. आय एम एक्सपेकटिंग अ परफेक्ट आन्सर नॉट ऐन परफेक्ट इंग्लिश. सो गो अहेड आय एम विथ यु. लेट्स स्टार्ट. "

सरांचं वाक्य एकल आणि स्वरा आपल्या तुटक्या फुटक्या इंग्लिश मध्ये उत्तर देऊन गेली. सुमारे दोन मिनिटं ती आपलं उत्तर देत होती. आतापर्यंत हसत असणारे तिच्या इंग्लिशकडे न लक्ष देता संपूर्ण लक्ष उत्तरावर देऊ लागले. उत्तर सांगून झालं तेव्हा सर्व लोक तिच्याकडे पाहून थक्क होते तर सरांच्या चेहऱ्यावर उत्तर ऐकताच आनंद पसरला होता. तिचं उत्तर सांगून झालं त्याच वेळी बेल वाजली. स्वराच संपूर्ण लक्ष आता सरांकडे होत आणि सरांच्या तोंडून फक्त दोन शब्द निघाले, " गुड स्वरा !! " हा गुड शब्द म्हणजे तिच्या प्रवासाची सुरुवात होती आणि यशाकडे टाकलेलं एक पाऊल होत. क्लास सोडून सर्व बाहेर निघाले होते पण स्वरा आताही त्या गुड शब्दात हरवली होती.

क्लासमधून सर्व बाहेर आले होते तर स्वरा एकटीच क्लासमध्ये होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता. सुरुवातीला आपल्यावर हसणाऱ्याकडे आता आपल्यावर कमेंट पास करायला शब्द नाहीत हा विचार करूनच तिचा आनंद द्विगुणीत झाला होता त्यामुळे ती उड्या मारतच बाहेर येऊ लागली. तिला आनंदात कशाचंच भान नव्हतं. तिने क्लासच दार पार केल होत तरीही तिच्या मूडमध्ये काहीच फरक पडला नव्हता. ती उड्या मारत येतानाच तीच बाजूला असलेल्या एका मुलाकडे लक्ष गेलं आणि तिला आपल्यावरच हसू आलं. तो तिथे एकटाच उभा होता आणि तिच्या अल्लड स्वभावावर हसू लागला. तिलाही ते जाणवलं आणि आता तिला त्याच्याशी नजर मिळविण देखील कठीण होऊ लागलं. ती समोर जात होती तर तो मुलगा आताही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून हसत होता. तिला स्वतःच्याच मुर्खपणावर हसू येत होतं आणि ते लाजेचे भाग अगदीच तिचा चेहरा सुंदर बनवत होते. तिने पुन्हा एकदा मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि तो आताही तसाच तिच्याकडे पाहत असल्याने ती स्वतावरच लाजून धूम ठोकत पळाली.

स्वराच्या आयुष्यातील आज फारच सुंदर दिवस होता. आज पहिलाच दिवस असल्याने ती संपूर्ण कॉलेज डोळ्याखालून काढत होती. इतकं भव्यदिव्य कॉलेज तिने याआधी कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे आज ते सर्व आणखीच खास वाटत होतं. कॉलेजची प्रत्येक गोष्ट खास होती. अगदी इतर लोक करतात त्याप्रमाणे मूल कंटाळले की क्लास बंक करायला मागे बघत नसत. तर कुणी सिनियर आपल्या प्रेयसीला घेऊन बागेत बसलेला तिला दिसायचा. कुठे कुणीतरी ग्रुप बनवून टवाळक्या करत होते तर कुठे काय नि कुठे काय पण अभ्यासाच्या वेळी मात्र सर्वच मन लावून अभ्यास करायचे. स्वराला कधी वाटलंच नव्हतं की इथे पण असच काहितरी आपल्याला पाहायला मिळेल परंतु इथे पण सर्व असच घडत हे पाहून तीच मन अगदी गार्डन गार्डन झालं होत. ही सुरुवात होती तिच्या आयुष्यातील काही सुंदर क्षणांची.

संपूर्ण कॉलेज फिरून सायंकाळी जेव्हा पुन्हा ती होस्टेलवर पोहोचली तेव्हा मात्र तिचा तोच आनंद कुठेतरी हरवला. आपल्या रूममध्ये प्रवेश करण्यापूर्वीच तीच मन उदास झालं होतं. तरीही उदास मनाने कसाबसा तिने प्रवेश केला. तिने समोर रूममध्ये बघितलं तर तिला कुणीच दिसले नाही. आज तिचं नशीब चांगलं होत . सुदैवाने आज तिच्या दोन्ही रूम पार्टनर रूम मध्ये नव्हत्या त्यामुळे तिचा चेहरा आणखी एकदा खुलुन निघाला. विशेष म्हणजे आज समोर त्यांची चौथी रूम पार्टनर आली होती. स्वरा रूममध्ये आली तेव्हापासून त्या मुलीकडे बघत होती. तिला वाटत होतं की कमीत कमी हिने तरी आपल्याशी प्रेमाने बोलावं. नाही तर आपल इथे जगन कठीण होऊन बसेल म्हणून क्षणभर तिने देवाला प्रार्थना सुद्धा केली. ती कितीतरी वेळ तिच्याकडे बघत राहिली पण कालच्या तिच्या रूम पार्टनरच्या वागणुकीने ती स्वतःहून तिच्याशी बोलण्याची हिम्मत मात्र ती करू शकली नाही.

स्वरा तिला बघत राहिली पण समोरच्या मुलीनेही दुसऱ्या मुलींसारखं काहीच उत्तर दिलं नाही म्हणून काहीच क्षणात फ्रेश होऊन ती आपल्या बेडवर पडली. ती बेडवर तर पडली होती पण तिचं अर्ध लक्ष आपल्या मोबाइलवर होत तर अर्ध लक्ष त्या मुलीच्या कामाकडे . काहीच क्षण झाले असतील. त्या मुलीचे सर्व काम आवरले आणि ती स्वराच्या जवळ येत म्हणाली, " सॉरी स्वरा सामान सेट करत होते म्हणून बोलायला जमल नाही. बाय द वे मी पूजा. मीही तुझ्यासरखीच महाराष्ट्रीयन आहे. मी हॉस्टेल मध्ये येताना तुझं नाव आधीच वाचलं होतं त्यामुळे ते सहज लक्षात आलं की तू सुद्धा महाराष्ट्रीयन आहेस. आपलंच कुणीतरी इथे आहे ह्या विचाराने मलाही आनंद झाला बघ."

ती आपला हात समोर करत स्वराशी स्वतःची ओळख करून देऊ लागली तर स्वरा पटकन हात समोर करत म्हणाली, " नाइस टू मीट यु डिअर !! मला छान वाटलं इथे आपलच कुणीतरी असल्याचं. खर तर मी कालच आले पण बाकीच्या दोन्ही रूम पार्टनर माझ्याशी बोलल्याच नाहीत म्हणून प्रार्थना करत होते की तू तरी बोलावं. आता थोडं रिलॅक्स वाटत आहे बघ मला. ये ना बस उभी का आहेस? "

पूजा अगदी क्युट स्माईल देत तिच्या जवळ जाऊन बसली. पूजा सांगलीची. अगदी मिडल क्लास घरातली मेहनत करून समोर आलेली मुलगी. पूजा स्वराच्या जवळ बसली आणि दोघात गप्पा सुरु झाल्या. त्यांना काहीच क्षणात एकमेकांचा स्वभाव इतका पटला होता की त्यांची खूप छान गट्टी जमली. आपल्याच राज्यातील मैत्रीण मिळाल्याने स्वरा फारच खुश होती. पूजालाही त्या दोन रूम पार्टनरकडून तोच अनुभव आला होता म्हणून पूजा , स्वरा आणखीच जवळच्या झाल्या. पूजाच्या येण्याने कॉलेजमधील आयुष्यातील थोडी कमी भरून निघणार होती हे पक्क. कालचा दिवस तिला नकोसा झाला होता पण आजच्या दिवसाने तिच्या आयुष्यात नवीन रंग भरले होते. त्यामुळे तिच्या कॉलेज जीवनाची सुरुवात थोडी चांगलीच झाली होती.

अगदी पहिल्या दिवसापासूनच पूजा आणि स्वराची गट्टी जमली. कॉलेजला जाण असो की रात्री हॉस्टेलला सोबत जेवण करन असो की एकमेकांना अभ्यासात मदत करणं त्या नेहमीच सोबत राहू लागल्या. स्वराची नवीन शहरात राहण्याची चिंता मिटली होती. पूजाशी काहीच दिवसात स्वराची चांगली गट्टी झाल्याने, स्वरा नेहमीच पूजाबद्दल आईबाबांना भरभरून सांगत असे त्यामुळे तिच्या आई-बाबांची काळजी देखील मिटली. आता आपली मुलगी नवीन शहरातसुद्धा लवकर जुळवून घेईल म्हणून ते निशिंत झाले होते. आता फक्त त्यांची एकच इच्छा होती की मुलीने लवकर मोठ्या जॉबवर लागावे आणि स्वतःचे सर्व स्वप्न पूर्ण करावे.

कॉलेज सुरू होऊन फक्त काही दिवस झाले होते . सुरुवातीला एकमेकांशी अनोळखी वाटणारे सर्व मित्र आता ओळखीचे झाले. काहींनी आपल्या स्टेटसनुसार मित्रांचा ग्रुप बनवला होता तर काही हवे त्या ग्रुपचा भाग बनून आपला प्रत्येक दिवस आनंदात घालवू लागले. स्वराने कॉम्प्युटर शाखेला प्रवेश घेतला होता. इतर शाखेमध्ये मुली अगदी कमी प्रमाणात असायच्या पण कॉम्पुटर शाखेमध्ये मुलींचाच जास्त भरणा असायचा त्यामुळे कायम शाखेत वर्दळ असायची. जिथे मुली असतील तिथे मूल नसतील हे तरी शक्य आहे का? खाली क्लासमध्ये मुलांचा घोडका शाखेसमोर येऊन उभा असायचा आणि प्रत्येक मुलीला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न होऊ लागायचे.

स्वरा जरी गावात राहत असली तरीही दिसायला अगदी सुंदर. तिची ती सिम्प्लिसिटी तिला आणखीच खास बनवून जात होती. तिचे बोलके पण घारदार डोळे, लांबलचक केस तिला मॉडर्न मुलींपासून वेगळं ठेवत होते आणि म्हणूनच मूल सतत तिच्याकडे पाहत असायची. मुली कितीही मॉडर्न ड्रेस घालून फिरत असल्या तरीही मुलांना सिम्पल राहणाऱ्या मुलीच जास्त आवडतात हे त्या वाक्यावरून सहज समजलं होत. स्वराने जेमतेम अठरा पूर्ण केले होते त्यामुळे तरुनपणीचा तो अल्लडपणा तिला आणखीच खास बनवत होता. तिचा चंचल स्वभाव तिच्या सुंदरतेत आणखी भर घाली. स्वभाव असा की पहिल्यांदा कुणाशी बोलली तर अगदी त्याच मन जिंकून घेईल म्हणून काहीच दिवसात तिथे तिचे छान मित्र बनले. तिचा गोड गोड आवाज सर्वाना तिच्याशी बोलायला भाग पाडत होता आणि सुरवातीला तिच्यावर हसणारे आता सतत तिच्याशी बोलु लागले. मूल तर तिच्याशी फक्त बोलायची संधी शोधत असत पण ती सर्वाना फ्रेंडली वागवत होती. त्याच्यावर तिने कुणालाच जवळ येऊ दिले नव्हते.

ह्या सर्वात तिच्या आयुष्यात एक गोष्ट खास घडत होती. एक व्यक्ती मात्र तिच्यावर लपून नजर ठेवत होता . तीच ते अल्लड हसन असो की अगदी बिनधास्त बोलणं त्याच्या नजरेतून काहीच सुटत नव्हतं. ती जिथे जिथे जात असे तिथे तिथे तो कायम तिच्या मागे असायचा. इतकं सर्व असताना देखील तो तिच्याशी बोलण्याची हिम्मत करू शकला नव्हता. स्वरा मात्र आपल्याच जगात व्यस्त होती . स्वरा जिथे-जिथे जाई तिथे तिथे तो तिला क्षणभर पाहण्यासाठी जात असे. हळूहळू ही गोष्ट स्वराला समजायला वेळ लागला नाही. त्याच तस पाहणं तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं पण हा फक्त योगायोग असेल म्हणून तिने त्यावर जास्त जास्त लक्ष दिलं नव्हतं पण अलीकडे रोज असच घडत असल्याने तिने त्याची मज्जा घ्यायच मनावर घेतलं.

आज सुद्धा ती बागेत पूजा सोबत काहीतरी चर्चा करत बसली होती. तिला माहीत होतं की तो आपल्या मागे नक्की येईल. त्यामुळे तीच अर्ध लक्ष पूजावर होत तर तर अर्ध लक्ष त्याच्या येण्याकडे होत. अगदी 10 मिनिटे झाले असतील आणि अपेक्षेप्रमाणे तो आला. स्वराच्या लक्षात यायला जास्त वेळ लागला नाही पण आज त्याची मज्जा घ्यायची असल्याने तिने थोडा वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तो एका झाडाच्या मागे उभा राहून तिच्यावर बारीक नजर ठेवून होता. हे आजच नाही तर रोज सुरू होत. स्वराचा मूड आज खूपच छान होता. स्वरा त्याची मज्जा घेता यावी म्हणून कधी मागे तर कधी पुढे होत होती. तो तिला कायम बघायला येत असे पण तिच्या अशा हरकतीने तिला बघण्यात व्यत्यय येऊ लागला. तिला पाहणे म्हणजे त्याच्यासाठी दिवसाची सुंदर सुरुवात पण आज तिच्या अशा वागण्यानें तो नाराज झाला आणि तिला बघायला तोही मागे पुढे पाहू लागला. त्याला माहिती नव्हत की स्वरा त्याच्याकडे लक्ष देऊन आहे म्हणून तो बिनधास्त बघत होता तर स्वराला मात्र त्याच अस वागणं बघून हसून आवरत नव्हतं. पूजाला मात्र स्वराच अस हसन विचित्र वाटू लागलं. ती खूप वेळ तिला बघत राहिली आणि शेवटी न राहवून तिने विचारलच, " स्वरा तुला इतकं हसायला काय झालंय? आपण इथे काम करतोय आणि तुला काहीतरी वेगळंच सुचतय. नक्की काय सुरू आहे तुझं? "

पूजाने प्रश्न केला होता तरीही स्वराने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पण तीच हसू काही थांबल नव्हतं. आता पूजाला तिचा खूपच राग येत होता ). ती विनाकारण हसते आहे म्हणून पूजाला राहवलं नाही आणि ती स्वरावर चिडत म्हणाली, " स्वरा तू ना आता मला राग आणत आहेस. आपण ना एक तर चर्चा करूया किंवा मग तू हसत तरी राहा. "

स्वराने पुन्हा एकदा पूजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पण ह्यावेळी तिच्यावर रागावण्याऐवजी पूजा हसतच म्हणाली, " ठीक आहे नको काम करू पण तुझ्या हसण्याच कारण तरी कळू दे? तू एवढं हसत आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. सांग सांग काय झालं? "

स्वरा आतापर्यंत स्वतःच्याच धुंदीत होती. पूजालाही त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे हे ऐकताच ती आपलंहसू आवरत म्हणाली, " सांगण्यात काय मज्जा ना पूजा !!..थांब गंमतच दाखवते तुला ! "

पूजा समोर काही बोलणार तेवढयात स्वरा तिचा हात पकडत त्याच्याकडे जाऊ लागली. स्वरा त्याच्याकडे येत आहे हे लक्षात येताच त्याला भीती वाटू लागली आणि स्वरा अगदी जवळ येताना दिसताच तो तिला घाबरून पळू लागला. तो पळत होता आणि स्वरा त्याच्याकडे पाहून आणखी मोठ्याने हसू लागली. तो तिला घाबरून अस पळाला होता की आज राजधानी एक्सप्रेस सुद्धा त्याच्यासमोर काहीच नव्हती. धावता धावताच त्याने एकदा मागे वळून पाहिले. त्याला बघताच तिच्या डोक्याची घंटी वाजली आणि तिच्या लक्षात आलं की हा तोच मुलगा आहे जो पहिल्याच दिवशी आपल्यावर हसत होता. त्याला अस पळताना बघून तिला आपला बदला पूर्ण झाल्याचा क्षणभर आनंद मिळाला. त्यामुळे स्वराच हसन आताही बंद झालं नव्हतं. तो पळता - पळता काहीच क्षणात समोरून नाहीसा झाला पण त्याला धूम ठोकून पळताना आज स्वरा स्वतःला सावरू शकली नव्हती. पूजाला काही कळलं तर नव्हतं पण त्याला अस पळताना पाहून पूजाला देखील हसू आवरलं नाही. आता दोघीही मोठ्याने हसू लागल्या. काही वेळ तसाच हसण्यात गेला. दोघीही पोटधरून हसत होत्या आणि पूजा स्वतःच हसू आवरत म्हणाली, " मॅडम पण हे होत तरी काय? काही कळेल का मला? "

स्वराही थोडी हसतच उत्तरली, " काही नाही थोडीशी गंमत !! तो खूप दिवस झालेत माझ्या मागे येत होता . मला बघायचा पण कधीच जवळ आला नाही म्हणून म्हटलं त्याचेही जवळून दर्शन घ्यावे तर बघ ना कसा पळाला. बिचारा !! "

त्याच्याबद्दल बोलताना स्वराला स्वतःच हसू आवरत नव्हतं आणि त्याच वेळी पूजा तिची खेचत म्हणाली, " ए स्वरा आणखी असे किती असतील ग कॉलेजला?"

तिच्या बोलण्याने क्षणभर तीच हसू गायबच झालं. ती तिच्यावर अलगद चिडत म्हणाली, " किती असतील म्हणजे? तुला म्हणायचं तरी काय? "

स्वरा रागावल्यावर खूपच क्युट दिसायची. त्यामुळे तिची गंमत घेण्याची संधी आज पूजा सोडणार नव्हती आणि तोंडावर हात ठेवत ती हळूच हसत म्हणाली, " बघ ना हा बिचारा पळून गेला तर मॅडमचा चेहरा कसा खुलला म्हणून म्हणाले !! अस सहसा होत नाही ना कधी !! इथल्या मुलांचं काही खर नाही बा आता तर. जीवच जाईल सर्वांचा. काय ही कातीलाना स्माईल. हाय..!! वेडच लावणार आहे मुलांना. काय माहीत आता किती लोकांना आणखी असच पळाव लागणार आहे. "

पूजा तिच्यावर हसत होती तर स्वरा गाल फुगवत म्हणाली, " ए शहाणे तू माझी खेचत आहेस का? "

पूजा दोन पाय मागे घेत पळू लागली आणि धावतच म्हणाली, " हो मग आमची स्वरा आहेच इतकी क्युट की मज्जा घेतल्याशिवाय करमत नाही. काय ही स्माईल मी जर मुलगा असते ना तर केव्हाच लाइन मारली असती तुझ्यावर. "

तीच उत्तर ऐकून स्वराचे गाल आणखीच लाल झाले आणि ती चेहऱ्यावर रुसवा आणत म्हणाली , " हो ना शेम्बडे ! थांबच तू . दाखवतेच आता मी तुला गंमत कशी करतात ते? "

पूजा समोर समोर तर आता स्वरा देखील तिच्या मागे धावू लागली. पूजा स्वराला चिडवत चिडवत समोर धावत होती तर स्वरा तिला धपाटा घालायला मागे धावत होती. स्वराला धावताना स्वतःवर भान राहील नाही आणि ती पुढे जाऊन एका मुलाला धडकली. तिचा खांदा फार जोराने त्या मुलाला धडकला आणि तो तिच्याकडे पाहून शिव्या देणारच तेवढ्यात स्वरा समोर जाऊन थांबत त्या मुलाला म्हणाली, " सॉरी हा !! " स्वराला शिव्या देण्यासाठी उघडणार तोंड आता तिच्याकडे पाहत राहील. त्यानेही पुढच्याच क्षणी तिला उदार मनाने माफ केल. त्याने तिला एक गोड स्माईल दिली आणि स्वरा पुन्हा पूजाच्या मागे धावू लागली. पूजाही धावता धावता थकली आणि मधातच उभी राहिली. स्वराने तिला भर रस्त्यातच पकडले आणि धपाटे घातले. स्वरा तिला धपाटे घालतच राहिली. पूजाने कान पकडून सॉरी म्हटल्यावरच तिने मारलं थांबविल. इकडे त्या दोघी आपल्या मस्तीत गुंग होत्या तर इकडे तो तरुण ज्याला ती धडकली होती तिच्याकडे बघतच होता ₹. तीच त्याच्यावरून क्षणभर दुर्लक्ष झाल नव्हतं ₹. तिचा बालिशपणा, तिचा गोड आवाज त्याला पहिल्याच क्षणी भुरळ घालून गेला होता. त्याची नजर होती की तिच्यावरून हटत नव्हती.

कॉलेजचा पहिला दिवस
हजार आठवणी देणारा
नकळत मागे वळून बघताना
स्वतःच्याच प्रेमात पाडणारा .

क्रमशा ...