गीत रामायणा वरील विवेचन - 13 - आनंद सांगू किती सखे ग Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 13 - आनंद सांगू किती सखे ग

एव्हाना राजा दशरथ यांच्याकडे श्रीराम व देवी सीता यांचा स्वयंवर सोहळा संपन्न झाला हा निरोप जातो. राजा दशरथ व त्यांच्या तिन्ही राण्यांना व भरत शत्रुघ्न यांना मिथिलापुरीत येण्याचे राजा जनक आमंत्रण देतात.

कुलगुरू वसिष्ठ व विश्वामित्र यांच्या मार्गदर्शनानुसार असे ठरते की राजा जनकाच्या उर्वरित तिन्ही कन्यांचे
(मुळात राजा जनकाच्या दोनच कन्या होत्या एक सीता जी भूमीतून उत्पन्न झाली होती व दुसरी उर्मिला आणि जनक राजाचा जो चुलत भाऊ होता कुशध्वज त्याच्या दोन कन्या होत्या मांडवी व श्रुतकीर्ती. परंतु भावाच्या मुली म्हणजे आपल्याच मुलीप्रमाणे असतात ह्या न्यायाने पुराणात मांडवी व श्रुतकीर्ती सुद्धा जनक राजाच्या पुत्री म्हणून ओळखल्या जातात. आणि राजा जनक सत्तेवर असल्याने व मोठा भाऊ असल्याने कुशध्वज चा उल्लेख न होता राजा जनकाचाच उल्लेख होताना दिसतो.)
विवाह राजा दशरथा च्या उर्वरित तिन्ही पुत्रांशी लावून द्यावा.

राजा जनक आपल्या इतर कन्यांना सुद्धा योग्य वर मिळाले म्हणून आनंदित असतात त्याचप्रमाणे राजा दशरथ सुद्धा आपल्या पुत्रांना चांगल्या कुळातील वधू मिळल्या म्हणून प्रसन्न असतात.

सगळी मिथिला नागरी सजवल्या जाते. प्रजाजन आपापल्या घरासमोर रांगोळ्या काढतात. दारावर तोरणं, पताका लावून घरे सुशोभित करतात.

श्रीरामांचा देवी सीतेशी, लक्ष्मणाचा उर्मिलेशी, भरत याचा श्रुतकीर्ती शी, शत्रुघ्नचा मांडवीशी असे एकाच मंडपात चार विवाह सोहळे संपन्न होतात. तो भव्य विवाह सोहळा बघून सगळ्यांचे डोळे दिपून जातात.

विवाहा पश्चात राजा दशरथ व त्यांच्या तिन्ही राण्या आपल्या चार पुत्र व चार स्नुषा(सून) समवेत अयोध्या नगरीत परततात.

अयोध्या नगरीत सुद्धा उत्साहाचे वातावरण असते घरा घरांच्या अंगणात मंगल चिन्ह रेखलेले असतात. दारांवर तोरणे लावलेले असतात. सगळी प्रजा हर्षोल्हासात असते.

राजवाड्याजवळ येताच सगळ्यांचे मंगल वाद्याने स्वागत होते. नवविवाहित जोडप्यांना ओवाळून त्यांचा राज प्रसादात प्रवेश होतो.

संपूर्ण राजप्रासाद आनंदाने उत्साहाने चैतन्याने भरून जातो.
असेच काही मास लोटतात, चारही जोडप्यांचे आनंदाने संसार सुरू असतात.

राजा दशरथास वाटते की आता श्रीरामाला ह्या सिंहासनावर बसवून आपण ह्या राजकीय जबाबदारी तुन मुक्त झालं पाहिजे. आता सर्व मोहत्याग करून आपण वानप्रस्थाश्रमीस जायला पाहिजे. तीर्थयात्रा केली पाहिजे. ते आपला विचार आपल्या कुलगुरूंना बोलून दाखवतात. त्यांना सुद्धा त्यांचा विचार पटतो. ते त्यांना श्रीरामाच्या अभिषेकासाठी अनुमोदन देतात.

पाहता पाहता श्रीरामास राज्याभिषेक होणार सर्वत्र ही बातमी पोचते.

देवी जानकीच्या तिन्ही भगिनी व सख्या आनंदाने सांगत येतात की उद्या श्रीराम राजा होतील, ते राजा झाल्यावर आपोआपच तुला राज्ञी पद मिळेल. सिंहासनावर श्रीराम बसतील त्यांच्या डाव्या बाजूस तू विराजमान होशील.
राज्याभिषेक सोहळ्यास गुरुजन मुनीजन येतील, सात नद्यांचे पाणी तुम्हा दोघांवर शिंपडतील. राजा जनक व राजा दशरथ दोघांच्याही कुळांचा उद्धार होईल. ढगांच्या गडगडण्यापेक्षाही मोठ्या आवाजात नौबती वाजंत्री वाजेल.

श्रीरामांसह तुलाही भरभरून मान मिळेल. पुत्र न होताही संपूर्ण प्रजेची तू माता व श्रीराम पिता होतील. तू संपूर्ण आयोध्येची स्वामींनी होशील. असे भाग्य सहजासहजी कोणाला लाभत नाही. तुम्हा दोघांच्या राज्यात सगळीकडे भरभराट होईल. स्वर्गाप्रमाणे समृद्ध ही अयोध्या होईल. श्रीरामांसह तुझी कीर्ती सर्वत्र पसरेल. हे बघून आम्हाला फार फार आनंद होतो आहे.

तू महाराणी होशील. मग तू आम्हाला काहीहि आज्ञा देऊ शकशील. आम्ही सदैव तुझी आज्ञा झेलायला तत्पर राहू.

ह्यावर देवी सीता आपल्या भगिनीला विनोद करू नका असे म्हणतात तेव्हा त्यांच्या भगिनी त्यावर म्हणतात की आम्ही विनोद करत नसून खरे सांगतो आहोत. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशीच आमची इच्छा आहे. तुझ्या भाग्याला इतर कोणाचीच नव्हे तर आमची सुद्धा दृष्ट लागो नाही.

तेवढ्यात देवी जानकीच्या ओळखीचा पदरव(कोणी येत असल्याचा आवाज) होतो. देवी जानकीच्या भगिनी म्हणतात की श्रीराम आलेले दिसतात तेव्हा आता आम्ही आमच्या दालनात जातो. श्रीराम आले म्हणताच देवी जानकीच्या चेहऱ्यावर लज्जेची लाली पसरते. देवी जानकीची थट्टा मस्करी करत त्यांच्या भगिनी व सख्या आपापल्या दालनात निघून जातात.

(रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात.
जय श्रीराम🙏 जय सीतामाई🙏)

**************************************
आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती
सीतावल्लभ उद्या व्हायचे राम आयोध्यापति

सिंहासनि श्रीराघव बसता
वामांगी तू बसशील सीता
जरा गर्विता, जरा लज्जिता
राजभूषणा भूषवील ही, कमनिय तव आकृति

गुरुजन मुनिजन समीप येतिल
सप्त नद्यांची जले शिंपतिल
उभय कुळे मग कृतार्थ होतिल
मेघाहुनिही उच्चरवांनी, झडतिल गे नौबति

भर्त्यासम तुज जनी मान्यता
राज्ञीपद गे तुला लाभता
पुत्राविण तू होशील माता
अखिल प्रजेच्या मातृपदाची, करणे तुज स्वीकृति

तुझ्याच अंकित होइल धरणी
कन्या होइल मातृस्वामिनी
भाग्य भोगिले असलें कोणी?
फळाफुलांनी बहरुनि राहिल, सदा माउली क्षिति

पतीतपावन रामासंगे
पतितपावना तूही सुभगे
पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे
त्रिलोकांमधे भरुन राहु दे, तुझ्या यशाची द्युति

महाराणि तू, आम्ही दासी
लीन सारख्या तव चरणासी
कधी कोणती आज्ञा देसी
तुझिया चरणी मग्‍न राहु दे, सदा आमुची मति

विनोद नच हा, हीच अपेक्षा
तव भाग्याला नुरोत कक्षा
देवदेवता करोत रक्षा
दृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्याप्रति

ओळखिचे बघ आले पदरव
सावलीत गे दिसले सौष्ठव
तुला भेटण्या येती राघव
बालिश नयनी तुझ्या येइ का, लज्जेला जागृति?
★★★★★★★★★★★★★★★★★★★