गीत रामायणा वरील विवेचन - 21 - बोलले मज इतुके राम Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 21 - बोलले मज इतुके राम

लक्ष्मणाने काष्ठ शाखा पाने गोळा करून एक उत्तम पर्ण कुटी बांधली. एका शुभ मुहूर्तावर तेथील जवळ राहणाऱ्या आश्रमातील ऋषींच्या साक्षीने श्रीरामांनी त्या पर्ण कुटीची वास्तू शांती करून घेतली व ते तिघेही त्या कुटीत प्रवेशले.

इकडे मंत्री सुमंत आता अयोध्येत राजप्रसादात पोचले होते. राजा दशरथांना कसे सांगावे की मी श्रीरामांना घेऊन येऊ शकलो नाही ह्या विचारात ते असताना त्यांना राजा दशरथा चा निरोप येतो. मोठ्या जड अंतकरणाने ते दशरथ राजाला सामोरे जातात.

"ये सुमंता! आसनस्थ हो! श्रीरामांना घेऊन तू आलेला दिसत नाही. तेथे काय घडलं? श्रीरामाला गंगा स्नान करून परत आयोध्येस आण असे मी तुला सांगितले होते त्याचे काय झाले? रामाने येण्यास नकार दिला का? काय बोलला माझा श्रीराम? सांग सुमंता सांग.",राजा दशरथ अधीरतेने म्हणाले.

मंत्री सुमंत खाली मान घालून सांगू लागले," राजन आपला संदेश मी श्रीरामांना सांगितला पण ते चौदा वर्षे वनवास भोगल्याशिवाय आयोध्येस येण्यास तयार नाहीत. वचन अर्धवट सोडून येण्यापेक्षा पूर्ण करून येणे केव्हाही श्रेयस्कर असे त्यांना वाटते."

"तो असेच म्हणेल असे मला वाटलेच होते पण एक वेडी आशा होती की कदाचित राम येईल. पुन्हा त्याला डोळे भरून पाहता येईल पण खरा रघुवंशी आहे तो! वचन पूर्ण करेलच. आणखी काय बोलला तो?",दशरथ राजा

"त्यांनी मला प्रणाम केला व म्हणाले,
"मंत्री सुमंत आपण आता येथून आयोध्येस जा व पिताश्रींना आमचे कुशल मंगल सांगा. आमची काळजी करू नका आम्ही सुखरूप आहोत असे सांगा व माझ्यावतीने त्यांच्या चरणांना स्पर्श करा. पित्याच्या नमस्कार करताच शत तीर्थे फिरून आल्याचे पुण्य प्राप्त होते. त्यानंतर अंतःपुरात देवी कौसल्या व देवी सुमित्रा ह्या माझ्या दोन्ही माता माझ्या व लक्ष्मणाच्या वियोगाने व्याकुळ झाल्या असतील. त्यांच्या व्याकुळ मनाला धीराचे चार शब्द ऐकवून शांत करण्याचे काम आपणाला करायचे आहे. त्यांनाही आम्ही तिघे येथे अगदी व्यवस्थित राहतो आहोत, आमची चिंता करण्याची गरज नाही ह्याची कल्पना द्या म्हणजे त्यांना जरा तरी बरे वाटेल. त्यानंतर माता कौसल्येला सांगा की रोज अग्नी देवाची पूजा करत जा त्यानिमित्ताने मुनिवरांचे मंत्रोच्चार सतत कानावर पडतील व मन मस्तिष्क शांत राहील. नैराश्य येणार नाही."

(येथे श्रीरामांना अग्निहोत्र करा असे सांगायचे आहे. अग्निहोत्र म्हणजे अखंड चालणारा यज्ञ. ह्यात घृत म्हणजेच तूप व सुगंधी काष्ठे समिधा म्हणून घातल्या जातात सोबतच अखंड मंत्रघोष सुरू असतो. त्यामुळे वातावरण पवित्र होते. तसेच अग्नी ही देवता स्वर्गातील देव व पृथ्वीवरील मानव ह्यांच्यातील दुवा आहे त्यामुळे मानव यज्ञ करून आपली प्रार्थना किंवा मागणी देवापर्यंत पोचवतात.)

पुढे श्रीराम सांगतात,"माता कौसल्ये ला हे सुद्धा माझ्या वतीने सांगा की आपण मोठ्या आहात आपला मानही तिन्ही राण्यांमध्ये मोठा आहे परंतु आता ह्या कठीण प्रसंगी कोणा बद्दलही अढी न ठेवता सगळ्यांशी पूर्वीप्रमाणेच मिळून मिसळून, आनंदाने सलोख्याने वागा. तसेच जास्तीत जास्त वेळ पिताश्रींची सेवा करण्यात व त्यांच्या सोबत राहण्यात घालवा कारण पिताश्री आधीच अपराधी भावनेने हवालदिल शोक विव्हल झालेले आहेत. तू जर त्यांचा राग करशील तर त्यांचे जगणे मुश्किल होईल. तुझ्या प्रेमाशिवाय त्यांच्या जीवाला बरे वाटणार नाही. आई राजधर्म काय सांगतो की जो राज्यपदी बसेल त्याचे गुण वय बघू नये त्याची आज्ञा पालन करणे व त्यास राजाचा मान देणे हेच आपले कर्तव्य आहे. म्हणून भरताचा राग न करता त्याला यथायोग्य मान दे."

श्रीराम भरता साठी सुद्धा मंत्री सुमंत जवळ संदेश देतात,"भरताला ही माझा संदेश द्या की भरत तो राज्यपदी विराजमान हो अयोध्येतील जनतेशी प्रेमाने न्यायाने वाग. अखंड सुख उपभोग पण त्यात वाहवत जाऊ नको. मनातून निष्कमच रहा कारण राजाचे तसेच राहणे आवश्यक आहे. राजा जर प्रजेकडे लक्ष देण्याचे सोडून वैयक्तिक सुखात रममाण होऊ लागला तर तो राजाचे कर्तव्य करू शकणार नाही. राजासाठी स्वतःच्या स्वार्था आधी स्वतःच्या सुखा आधी जनतेचे कल्याण जास्त महत्वाचे असले पाहिजे. भरताला अजून हे ही सांगा की तू सुदैवी आहे की तुला पिताश्रींचे सान्निध्य लाभते आहे. त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन कर. वृद्धपणी त्यांना समाधान वाटेल असेच त्यांच्याशी वर्तन ठेव. एक नितीसंपन्न राजा बनून रघुवंशाचे नाव उज्वल कर.",एवढे सांगून मंत्री सुमंतास श्रीराम म्हणतात,

"मंत्री सुमंत! आपण हुशार आहात. आपल्याला तर सगळीच परिस्थिती ज्ञात आहे तेव्हा आणखी काय सांगू! माता कौसल्ये चे मातृहृदय पुत्रवियोगाने पिळवटून निघत असेल ह्याची मला पुरेपुर जाणीव आहे. परंतु आपण तिला समजवावे की आता चौदा वर्षे भरत हाच तुझा श्रीराम आहे. जी माया तुझी माझ्याविषयी आहे तीच माया तू भरतावर कर म्हणजे पुत्रवियोगाचे तुझे दुःख जरा तरी कमी होईल.",एवढे बोलत असता श्रीरामांचा कंठ भरून येतो. त्यांचे कमळासारखे नेत्र अश्रूंनी भरून जातात. साश्रु नयनांनी श्रीराम सुमंताला निरोप देतात. मंत्री सुमंत सुद्धा सद् गदीत होतात. त्यांच्या दृष्टीसमोरून गंगातीरी उभे असलेले साश्रु नयनांनी निरोप देत असलेले श्रीराम, देवी जानकी व लक्ष्मणकुमार ह्यांचे चित्र हलत नाही. ते त्यांच्या मनःपटलावर कायमचे कोरल्या जाते.

(रामायणात पुढे काय होईल ते जाणून घेऊ उद्याच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)

★★★★★★★★★★★★★★★★

ग.दि. माडगूळकर रचित गीतरामायण मधील एकविसावे गीत:-

शेवटी करिता नम्र प्रणाम
बोलले इतुके मज श्रीराम-

"अयोध्येस तू परत सुमंता
कुशल आमुचें कथुनी ताता
पदवंदन करि माझ्याकरिता
तातचरण ते वंदनीय रे, शततीर्थांचे धाम"

"अंतःपुरि त्या दोघी माता
अतीव दुःखी असतिल सूता
धीर देई त्या धरुनी शांतता
सौख्य आमुचे सांगुन त्यांच्या शोका देई विराम"

"सांग माउली कौसल्येसी
सुखात सीता सुत वनवासी
पूजित जा तू नित्‌ अग्नीशी
तुझिया श्रवणी सदा असावा मुनिवरघोषित साम"

"वडीलपणाची जाणिव सोडुनि
सवतीशी करि वर्तन जननी
मग्न पतीच्या रहा पूजनी
तव हृदयाविन त्या जिवासी अन्य नसे विश्राम"

"राजधर्म तू आठव आई
अभिषिक्ताते गुण वय नाही
दे भरतासी मान प्रत्यही
पढव सुमंता, विनयाने हे, सांगुन माझे नाम"

"सांग जाउनी कुमार भरता
हो युवराजा, स्वीकर सत्ता
प्रजाजनांवर ठेवी ममता
भोग सुखाचा अखंड घेई, मनि राही निष्काम"

"छत्र शिरावर तुझ्या पित्याचे
पाळच वत्सा, वचन तयांचे
सार्थक कर त्या वृद्धपणाचे
राज्य नीतिने करुन वाढवी रघुवंशाचे नाम"

"काय सांगणे तुज धीमंता,उदारधी तू सर्व जाणता
पुत्रवियोगिनि माझी माता
तुझ्या वर्तने तिला भासवी भरत तोच श्रीराम"
बोलत बोलत ते गहिवरले
कमलनयनि त्या आसू भरले
करुण दृश्य ते अजुन न सरले -गंगातीरी-सौमित्रीसह-उभे जानकी-राम
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★