भरत ने श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर प्रस्थापित केल्या व स्वतः अयोध्येच्या बाहेर एका आश्रमात राहून अयोध्येचा कारभार अलिप्तपणे बघू लागले. बघता बघता दहा वर्षे निघून गेली. भरताने दहा वर्षे अगदी उत्तमरीत्या राज्यकारभार निर्लेपपणे बघितला आणि यापुढेही त्यांचे व्रत सुरूच राहिले. इकडे श्रीरामांनी चित्रकूट सोडला व नाशिक जवळच्या पंचवटी क्षेत्री गोदावरी नदीच्या तीरी पर्णकुटी बांधली व तिथे राहू लागले. ह्या दहा वर्षांच्या काळात अनेक ऋषींचे पावन सान्निध्य श्रीरामांना लाभले व ऋषींना सुद्धा श्रीरामांकडून राक्षसांचा उपद्रव दूर करण्यास वेळोवेळी मदत मिळत गेली. एके दिवशी गोदावरी नदीच्या तीरी असलेल्या पर्णकुटीत श्रीराम ध्यानस्थ बसलेले असताना त्यांच्या जवळ एक षोडश वर्षीय सुंदर मोहक तरुण स्त्री येते. तिची चाहूल लागताच श्रीराम डोळे उघडून बघतात तेव्हा ती त्यांच्या समीप येऊन विचारते,
"हे श्यामल वर्णीय सुंदर युवका! तू कुठल्या देशाचा राजकुमार आहे? तुझे अलौकिक राजबिंडे रूप बघून मी स्वतःला तुला अर्पण केलं आहे. तू माझा स्वीकार कर. तूला राजकुमार म्हणावे तर तुझ्या गळ्यात योग्याप्रमाणे रुद्राक्षमाला आहे आणि योगी म्हणावे तर तू दिसतो राज कुमारासारखा तसेच तुझ्या अवती भवती ही स्त्री व हा पुरुष असा तुझा परिवार ही दिसतो जो सामान्यतः योगी माणसाजवळ नसतो. ह्या वनात तू का आलाय हे काही कळत नाही? आणि माझ्याकडे बघून असा विनोदाने का हसतो आहेस? तुला माहीत नाही का की तुझी ही पर्णकुटी ज्या ठिकाणी आहे तो संपूर्ण प्रदेश माझ्या ताब्यात आहे ते.",त्यावर श्रीराम तिला म्हणतात,
"हे स्रीये! तू कोण आहेस? मला तुझा परिचय नाही! ",त्यावर ती ललना म्हणते,
"माझे नाव शूर्पणखा आहे. मी दैत्यराज रावणाची भगिनी आहे. हे वन माझ्या अधिकाराखाली आहे. इथे मी वेगवेगळे रूप धारण करून वाटेल तेव्हा हिंडत असते.",त्यावर श्रीराम म्हणतात,
"मी दशरथ राजांचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम आहे . हा माझा अनुज लक्ष्मण व ही माझी भार्या सीता आहे.",त्यावर शूर्पणखा म्हणते,
" तुला बघताच माझ्या मनात तुला प्राप्त करण्याची लालसा निर्माण झाली आहे म्हणून मी तुला मोहित करण्यासाठी असे सोळा वर्षाच्या मधुर भाषण करणाऱ्या तरुणीचे रूप धारण केलेले आहे. तुला बघताच मला प्रत्यक्ष मदन अवतरल्या सारखे वाटते आहे. तुझ्या ओठांचे अमृत एकांतात प्राशन करण्याची इच्छा मला स्वस्थ बसू देत नाही. मला राजा दशरथ कोण आहे हे माहीत नाही पण त्याचा हा ज्येष्ठ पुत्र पाहून मी संमोहित झाली आहे. हे प्राणनाथ रामा आपण माझ्याशी विवाह करा म्हणजे ह्या वनात आपण सुखाने संसार करू.",त्यावर श्रीराम तिला म्हणतात,
"मी विवाहित आहे व एकपत्नीव्रता आहे. म्हणजे एक पत्नी असताना मी दुसऱ्या स्त्रीशी विवाह करू शकत नाही.",त्यावर शूर्पणखा म्हणते,
"ही तुझी पत्नी सीता आहे काय! पण तुला सांगते ही एवढी कृश अशक्त कुरूप पत्नी तुला बिलकुल शोभत नाही. (ह्यात सीता देवी सलग दहा वर्षे वनात राहिल्यामुळे व सातत्याने कंदमुळं खाऊन राहिल्यामुळे कृश झालेल्या असाव्यात.) तिचा मी क्षणात वध करून तिला आपल्या मार्गातून दूर करते. त्यानंतर माझ्यासोबतच आजीवन राहून तू तुझे एकपत्नीव्रत पाळू शकतो. आता मात्र मला तिष्ठत ठेवू नको तुझ्या मिलनाची ओढ मला लागली आहे",असे म्हणून शूर्पणखा देवी जानकी वर वार करण्यास पुढे जाते तेवढ्यात श्रीराम, जवळ येत असलेल्या आणि हातात तलवार असलेल्या लक्ष्मणाला खुणेने शूर्पणखेला नियंत्रित करण्यास सांगतात आणि लगेच डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर तिला सीता देवींपासून दूर करण्यासाठी लक्ष्मण तिच्यावर वार करतात जो तिच्या नाकाला लागतो व तिचे नाक छाटल्या जाते.
ह्या आघाताने ती क्रोधीत होऊन शिव्या श्राप देऊन प्रतिशोधाच्या अग्नीत तडफडत तिथून निघून जाते.
(रामायणात पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात. जय श्रीराम🙏🚩)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
गीतकार ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील सत्तावीसावे गीत:-
कोण तू कुठला राजकुमार?
देह वाहिला तुला श्यामला,
कर माझा स्वीकार
तुझ्या स्वरूपी राजलक्षणे
रुद्राक्षांची श्रवणि भूषणे
योगी म्हणु तर तुझ्या भोवती वावरतो परिवार
काय कारणे वनि या येसी?
असा विनोदे काय हाससी?ज्ञात नाहि का?
येथ आमुचा अनिर्बंध अधिकार
शूर्पणखा मी रावणभगिनी
याच वनाची समज स्वामिनी
अगणित रूपे घेउन करिते वनोवनी संचार
तुजसाठि मी झाले तरुणी
षोडषवर्षा मधुरभाषिणी
तुला पाहता मनात मन्मथ जागुन दे हुंकार
तव अधरांची लालस कांती
पिऊ वाटते मज एकांती
स्मरता स्मर का अवतरसी तू अनंग तो साकार?
मला न ठावा राजा दशरथ
मनांत भरला त्याचा परि सुत
प्राणनाथ हो माझा रामा, करु सौख्ये संसार
तुला न शोभे ही अर्धांगी
दूर लोट ती कुरुप कृशांगी
समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणि करिते संहार
माझ्यासंगे राहुनि अविरत
पाळ तुझे तू एकपत्नी व्रत
अलिंगनाची आस उफाळे तनूमनी अनिवार
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★