गीत रामायणा वरील विवेचन - 28 - सूड घे त्याचा,लंकापती Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 28 - सूड घे त्याचा,लंकापती

प्रतिशोधाच्या अग्नीत जळत शूर्पणखा तिच्या खर व दूषण ह्या भावांकडे राम लक्ष्मणाची तक्रार घेऊन जाते.
बहिणीची अशी अवस्था पाहून खर दूषण चवताळून उठतात. ते चौदा हजार सैन्यासह श्रीरामांना सामोरे जातात.

"कुठेय तो राम? आमच्या भगिनीची अशी अवस्था करणारा! माझ्या पुढ्यात तर ये! चांगली अद्दल घडवतो तुला!",खर-दूषण म्हणाले.

"दादा! बाहेर कोणा दैत्यांचा आवाज येतोय! मी आत्ता जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतो.",लक्ष्मण तावातावाने म्हणतात.

"लक्ष्मणा! त्यांनी मला संबोधले आहे ह्याचा अर्थ त्यांना माझ्याशी युद्ध करायचे आहे. त्यामुळे तू इथेच थांब मी बघून येतो.",असे म्हणून श्रीराम पर्णकुटी च्या बाहेर येतात.

खर-दूषण युद्धयाच्या पवित्र्यातच असतात.
"तूच का राम! तुला काय वाटलं? तू आमच्या बहिणीशी दुरव्यवहार करशील आणि तिच्या वतीने कोणीही तुला जाब विचारणार नाही! आता बघ शूर्पणखेचे हे दोन भाऊ कशी तुझी दुरवस्था करतात.",असे म्हणून त्यांनी शस्त्रांचा श्रीरामावर वर्षाव केला. श्रीरामांनीही त्यांचे सगळे शस्त्र उलटवून लावले.

खर-दूषण ची शक्ती जेव्हा कमी पडू लागली तेव्हा त्यांनी त्यांच्या सेनेला श्रीरामांशी लढण्याची आज्ञा केली.

श्रीरामांनी पाहिलं की आता काहीतरी युक्ती केल्याशिवाय उपयोग नाही तेव्हा त्यांनी चित्रकूट पर्वतावर असताना काही ऋषींना राक्षसाच्या त्रासापासून वाचवले होते तेव्हा त्या ऋषींनी त्यांना दिव्य शस्त्र प्रदान केले होते त्यात एक शस्त्र असे होते जे शत्रूवर सोडल्यास शत्रूची मती गुंग होतसे व शत्रू आपापसात भांडून नाश पावत असत. ते शस्त्र श्रीरामांनी त्या चौदा सहस्त्र सैन्यावर सोडलं ज्यामुळे त्यांना भूल पडून ते आपापसातच लढून मरून गेले. उरलेल्या खर-दूषणला श्रीरामांनी क्षणार्धात संपवले.

आपल्या भावांचा व सैन्याचा असा फन्ना उडालेला बघताच तीव्र क्रोधाने शूर्पणखा लंकेत रावणाच्या दरबारात जाते व क्रोधीत होऊन रावणाला म्हणते,

"हे लंकापती बघ तुझ्या बहिणीची काय अवस्था झाली आहे? ही अवस्था त्या दशरथाच्या राम लक्ष्मण ह्या दोन पुत्रांनी केली आहे. त्यांचा तू सूड घे.
इथे एका ठिकाणी बसून काय राज्य करतो? जरा दरबाराच्या बाहेर जाऊन बघ! श्रीरामाने संपूर्ण दंडकारण्य जिंकून घेतले आहे. तू नुसता सत्तांध झालेला आहेस. सत्ता उपभोगण्या पलीकडे तुला तुझे कर्तव्य दिसत नाहीत का?

तुझे वीस डोळे चांगले उघडून बघ! बघ माझी काय दशा केलीय त्या रामाने! त्याने त्याच्या पराक्रमाने दाही दिशा दणाणून सोडल्या आहेत. तुझे गुप्तचर रात्रंदिवस करतात तरी काय? ते तुला ह्या वार्ता देत नाहीत काय? तुझे भाऊ खर-दूषण त्या रामाने मारले. एवढेच नाहीतर त्यांची चौदा हजार सैन्य त्याने यमसदनी धाडले. ही तुझी नाचक्की आहे. तिकडे त्याच्या पराक्रमाचे मात्र सर्वत्र गुणगान सुरू आहे. तुला ह्याचे काहीच कसे वाटत नाही?

तू इथे दरबारात आराम करत बस. तो हळूहळू तुझी सत्ता काबीज करतो की नाही बघ! आठव तुझे गतकाळातील पराक्रम. कसे तू सुदर्शन चक्र तुझ्या छातीवर झेलले होते.
कैलास पर्वताला सुद्धा तू उचलले होते. देवांना पळता भुई थोडी केली होतीस तू. आता तुझा तो पराक्रम गेला कुठे?

आठव जेव्हा तू कुबेराला हरवून त्याचे पुष्पक विमान आणले होते. आठव तू जेव्हा तक्षक राजाची सुंदर कन्या वरली होतीस. मृत्यूला सुद्धा घाबरवणारा शूर योद्धा तू ! आज काय झाले ते शौर्य?
तुझ्या पराक्रमाची आज ह्या घडीला गरज आहे.

तो राम अत्यंत युद्ध निपुण आहे. त्याच्या हातांच्या हालचाली बाण फेकताना अश्या जलद गतीने होतात की त्याच्या हातून विद्युल्लता वेगाने पुढे जाताना दिसतात. त्याचे युद्ध कौशल्य बघूनभल्याभल्यांची मती गुंग होते. तो रूपाने सावळ्या वर्णाचा असून अतिशय सुरेख आणि रेखीव आहे. जणू पृथ्वीवर मदनाने च अवतार घेतलाय असे त्याला बघून वाटते. त्याची जी भार्या आहे जनक कन्या सीता ती रतीपेक्षाही सुंदर आहे. अशी मोहक स्त्री तुलाच जास्त शोभून दिसेल. तुझ्यासाठी त्या सीतेला घेऊन येण्यासाठीच मी त्या कुटीत गेली होती पण त्या दुष्टांनी माझे नाक कापून माझा अपमान केला. एवढेच नाहीतर ती सीता माझ्या अवस्थेवर हसली. त्यामुळे तू त्वरित तिथे जा आणि त्या दोन्ही बांधवांचा वध करून सीतेला पळवून आण. त्यांनी फक्त माझाच अपमान केला नसून तुझा अपमान करून तुझ्या सत्तेला आव्हान दिलेलं आहे.

{ह्यात शूर्पणखेचे राजकारण आपल्याला दिसून येते. जेव्हा तिला हवं तेव्हा ती जानकी देवींना कृश कुरूप ठरवते आणि हवं तेव्हा रतीहूनही सुंदर,मोहक ठरवते. तसेच वास्तवात शूर्पणखा श्रीरामांवर भाळल्यामुळे कुटीत जाते व तिची तर सीता देवींना जीवे मारण्याची इच्छा असते पण रावणापुढे ती अशी मखलाशी करते की तुझ्यासाठी सीतेला आणायला मी गेली होती. आणखी एक बाब अशी की शूर्पणखा म्हणते की माझ्या अवस्थेवर सीता हसली पण माझ्यामते जरी शूर्पणखा राक्षसीं होती तरी सीता देवी ह्या सामान्य स्त्री सारख्या दुसऱ्या स्त्रीच्या फजितीवर हसणाऱ्यांपैकी नक्कीच नसाव्यात पण एखाद्याचा अपमान झाला की त्याला जसे सगळे जग आपल्याकडे बघून हसतेय असे वाटते त्याप्रमाणेच शूर्पणखा चा अपमान झाल्याने तिला सीता आपल्याकडे बघून हसली असे वाटले असावे.}

(रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात. तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
गीतकार ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे अठ्ठावीसावे गीत:-

विरूप झाली शूर्पणखा,
ही दाशरथीची कृति
सूड घे त्याचा लंकापति

कसले करिसी राज्य रावणा,
कसले जनपालन?
श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंडका-वन
सत्तांधा, तुज नाही तरीही कर्तव्याची स्मृति

वीस लोचने उघडुनि बघ या शूर्पणखेची दशा
श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा
तुझे गुप्तचर येउन नच का वार्ता सांगति?

जनस्थानि त्या कहर उडाला, मेले खरदूषण
सहस्र चौदा राक्षस मेले हे का तुज भूषण?
देवासम तो सुपूज्य ठरला जनस्थानिंचा यति

तुझ्याच राज्यी तुझ्याहुनीही पूज्य जाहला नर
सचिवासंगे बैस येथ तू स्वस्थ जोडुनी कर
जाळुन टाकिल तव सिंहासन उद्या तयाची द्युति

सुदर्शनासह व्यर्थ झेलले छातीवर तू शर
व्यर्थ मर्दिले देव, उचलिले सामर्थ्ये डोंगर
तूंच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापति?

तूच काय रे कुबेर जिंकुन पुष्पक नेले घरी?
तूच काय तो, हरिली ज्याने तक्षकनृपसुंदरी?
तूच काय तो भय मृत्यूचे लव नाही ज्याप्रति?

ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा
बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता
शस्त्रनिपुणता बघून त्याची गुंग होतसे मति

तो रूपाने रेखीव, श्यामल, भूमीवरती स्मर
त्याच्यासंगे जनककन्यका रतीहुनी सुंदर
तुलाच साजुन दिसेल ऐसी मोहक ती युवति

तिला पळवुनी घेउन यावे तुजसाठी सत्वर
याचसाठि मी गेले होते त्यांच्या कुटिरावर
श्रवणनासिका तोडुन त्यांनी विटंबिले मज किती!

जा, सत्वर जा, ठार मार ते बंधू दोघेजण
हसली मज ती जनककन्यका, येइ तिज घेउन
माझ्यासम ते तव सत्तेची विटंबिती आकृति
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★