गीत रामायणा वरील विवेचन - 29 - मज आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 29 - मज आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा

शूर्पणखा रावणाच्या मनात सीतेबद्दल मोह निर्माण करण्यात यशस्वी ठरली. सीतेचे हरण करण्यासाठी रावणाने मारीच राक्षस जो रावणाचा मामाच होता त्याची मदत घेण्याचे ठरवले.


विश्वामित्रांच्या यज्ञाच्या वेळेस जो पराक्रम श्रीराम लक्ष्मणांनी दाखवला होता तो मारीच विसरला नव्हता त्यामुळे त्याने रावणाला रामाशी युद्ध करण्याऐवजी हा विचार सोडून द्यावा असे सुचवले.


"मारीच! शूर्पणखेचा अवमान तो आपला अवमान त्यासाठी मला रामाला अद्दल घडवायची आहे. तसेच रामाची पत्नी सीता तिच्या स्वयंवरच्या वेळेस तो धनुष्य माझ्या छातीवर पडला असता सगळे माझ्यावर तेव्हा हसले होते त्याचाही मला वचपा काढायचा आहे. ",रावण


"रावण! मला वाटते तू महान राजा आहे असे परस्त्री मागे वेळ घालवणे तुला शोभत नाही. तसेच सीता ही प्रत्यक्ष श्रीरामांची भार्या आहे. तिचा नाद तू सोडून द्यावा असे मला वाटते.उगीच शूर्पणखेचे ऐकून स्वतःचा नाश करून घेऊ नये असे मला वाटते.",मारीच


"मारीच! मी तुझा सल्ला मागायला आलो नसून तुला आज्ञा करायला आलो आहे.",रावण उन्मत्तपणे म्हणाला.


ह्यावर मारीच चा नाईलाज झाला. रावण व मारीच ह्यांनी एक कारस्थान रचले. त्यात असे ठरले की मारीच मायावी रूप धारण करू शकत असल्याने त्याने एका सुवर्ण मृगाचे रूप धारण करावे व मुद्दामहून सीतेला दिसेल असे वनात बागडावे जेणेकरून तिला त्याचा मोह निर्माण होईल व ती रामाला त्या सोनेरी हरणाला आणण्यास सांगेल व राम त्या सोनेरी मृगाला जेव्हा पकडायला येईल तेव्हा त्याने पळावे व रामाला दूर न्यावे लक्ष्मण रामाच्या मागे जाईलच आणि तेव्हा सीता कुटीत एकटी असताना रावणाने संन्याशाचे रूप घेऊन ती भिक्षा द्यायला आली की तिचा हात पकडून तिला पळवून आणावे. त्यानुसार मारीचने एक सुंदर सुवर्ण मृगाचे रूप घेतले व तो रामांच्या पर्णकुटी जवळ हिंडू फिरू लागला.


अपेक्षेप्रमाणे जानकी देवींनी त्याला त्या फुलं तोडत असताना पाहिले आणि त्या मंत्रमुग्ध झाल्या. एखाद्या बालिके प्रमाणे त्या धावत पर्णकुटीत आल्या व श्रीरामांना म्हणू लागल्या,


"हे नाथ! आत्ता मी काय बघितले माहीत आहे का? एक अनुपम सुंदर सुवर्ण मृग! मी सहज फुलं तोडताना पाहिलं आणि बघतच राहिली. काय त्याचे ते देदीप्यमान तेज आहे. त्याच्या शिंगांवर रत्ने मढवलेली आहेत. त्याचे सर्वांग लखलखीत सोन्याचे आहे. त्याचे शेपूट तर इंद्रच्या बाणा प्रमाणे आहे.


तो बघा जिथून बागडून गेला तिथे त्याचे सोन्याचे पावलं उमटले आहेत. त्या खांबावर त्याने शिंग घासले तो खांब सुद्धा सुवर्णा सारखा भासतोय. त्या हरणाने मला वेड लावले आहे. त्याची अवखळ चाल, त्याच्या डोळ्यातील तो धुंद भाव, असा मृग मी कधीच बघितला नाही. स्वामी मज तो मृग आणून द्याल का?",जानकी देवी लडिवाळ पणे म्हणाल्या.


त्यावर श्रीराम म्हणाले,"सीते! ते हरीण एका जागेवर का थांबून राहते? ते तर गेले असेल लांब! आणि वनवासात असताना आपल्याला कशाला हवंय ते हरीण?"


"ते साधं हरीण असते तर मी हट्ट केला असता का? ते हरीण काही औरच आहे. ते मृग अद्वितीय आहे. आपण माझ्या स्वयंवरात एवढे मोठे शिवधनुष्य तोडले होते तेव्हा हे हरीण पकडणे आपल्यासाठी अत्यंत किरकोळ काम आहे. आता घाई करा आणि त्या हरणाला आणा. मी आपल्या पाठीशी बाण आणि भाते बांधून देते.",सीता देवी आग्रहाने म्हणाल्या.


"हो पण मी हरणाच्या मागे गेलो आणि मला वेळ लागला तोवर तुझे ह्या कुटीत कोण रक्षण करेल? कदाचित हे हरण मायावी सुद्धा असू शकते",श्रीराम सीतेला समजावत म्हणाले परंतु सीतादेवी ऐकण्यास तयार नव्हत्या. त्यांनी आपलं म्हणणं पटवण्यासाठी वेगळाच मुद्दा काढला. त्या म्हणाल्या,


"अयोध्येत जे धन कोंडून ठेवलं आहे ते नक्कीच तुमच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी ह्या मृगाच्या रूपाने आलेलं आहे. त्यामुळे माझी काळजी न करता आपण त्वरित जाऊन हरीण आणावं. आपण येईपर्यंत भ्राता लक्ष्मण इथे थांबतील. ते हरीण मी जीवापाड जपेन आणि आपण अयोध्येत पुन्हा जाऊ तेव्हा त्याला बघताच माता कौसल्या, माता सुमित्रा तसेच माझ्या भगिनी किती अचंबित होतील तसेच भरत आणि कैकयी किती हेवा करतील ह्या कल्पनेनेच मला आनंद होतोय. आता कशासाठी थांबला आहात? त्वरा करा!"(इथे एक प्रश्न पडतो रामांनी स्वतः जाण्याऐवजी लक्ष्मणास हरीण आणण्याची आज्ञा का दिली नसेल?)


"सीते ते हरण चपळ आहे. ते जर माझ्या हातात जिवंत सापडलं नाही तर?",श्रीराम


"काही हरकत नाही! जिवंत सापडलं तर मी त्याला सांभाळून ठेवेन वनवासात त्याचे तेजस्वी रूप आपल्याला सोबत करेल व आपला वनवास उज्वल करेल पण समजा पकडताना त्याला बाण मारावा लागला आणि ते मेले तर भ्राता लक्ष्मण त्याची कातडी काढून आपणास ध्यानस्थ बसण्यासाठी मृगजिन करून देतील त्यावर आपण इंद्रासारखे दिसाल. कृपया जा ते बघा ते हरीण त्या टेकडीवर दिसते आहे. ",सीता देवी अत्यंत आग्रहाने हट्टाने म्हणाल्या.


{एकंदरीत सीता देवींनी हरीण पाहिजे म्हणजे पाहिजे असा हट्टच धरला होता. त्यांचा तो अती हट्ट, रामांनी तो पुरवण्याचा घातलेला घाट हे सगळं पुढच्या अनिष्ट परिणामांची नांदी च होती. त्यावेळी सगळ्यांना विनाश काले विपरीत बुद्धी झाली होती. ह्यावरून एकच बोध घेता येतो की नसत्या गोष्टींचा मोह करू नये. कोणत्या गोष्टीमागे काय रहस्य दडलं असेल काही सांगता येत नाही.}


(पुढे रामायणात काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)


प्रतिभावंत गीतकार ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे एकोणतीसावे गीत:-

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

तोडिता फुले मी सहज पाहिला जाता

मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा


झळकती तयाच्या रत्ने श्रृंगावरती

नव मोहफुलासम सुवर्ण अंगावरती

हे नयन भाळले त्याच्या रंगावरती

ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता


तो येउन गेला अनेकदा या दारी

दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी

घाशिले शिंग या रंभास्तंभावरी

तो दिसे सुवर्णी बघा देवरा, कांता


चालतो जलद-गति, मान मुरडितो मंद

डोळ्यात काहिसा भाव विलक्षण धुंद

लागला मृगाचा मला नाथ हो छंद

वेडीच जाहले तृणातरी त्या बघता


किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू?

त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू?

मजसाठि मोडिले आपण शांकरधनू

जा, करा त्वरा, मी पृष्ठि बांधिते भाता


कोषात कोंडिले अयोध्येत जे धन

ते असेल धुंडित चरणा साठी वन

जा आर्य, तयाते कुटिरी या घेउन

राखील तोवरी गेह आपुला भ्राता


सापडे जरी तो सजीव अपुल्या हाती

अंगिची तयाच्या रत्ने होतिल ज्योति

देतील आपणा प्रकाश रानी राती

संगती नेउ त्या परत पुरासी जाता


जाताच पाहतिल हरिण सासवा, जावा

करितील कैकयी भरत आपुला हेवा

ठेवीन तोवरी जपून गडे तो ठेवा

थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता?


फेकून बाण त्या अचुक जरी माराल

काढून भाउजी घेतिल त्याची खाल

त्या मृगासनी प्रभु, इंद्र जसे शोभाल

तो पहा, दिसे तो दूर टेकडी चढता

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★