तीच श्रद्धांजली ठरेल? Ankush Shingade द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तीच श्रद्धांजली ठरेल?

तीच श्रद्धांजली ठरेल?

आज जगात सुरु आहे आनंद भोगण्याची स्पर्धा. आनंद भोगण्यासाठी आजचे लोकं प्रसंगी दुसऱ्याचा जीवही घेतात. त्यात त्यांना निर्भेळ आनंद मिळतो. साधी एक फुट जागाही आपण सोडत नाही. कारण आपल्याला ती जागा सोडल्यानं आनंद मिळत नाही. ती गोष्ट सारखी आपल्याला कुटकूट खात असते. वाटतं की ती जागा आपली आहे. आपल्या मालकीची आहे. ती कोणी घ्यायला नको.
ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या जागेचं महत्व वाटते. तसंच वाटतं एका राजाला. एक राजाही आपल्या प्रदेशातील सीमेवरील एक फुट जागा सोडत नाहीत. कारण त्यात त्याच्या एकट्याचा स्वार्थ नसतो. स्वार्थ असतो सर्वच देशातील लोकांचा. ज्यांनी त्याला राजा बनवलं असतं. आपला एक प्रतिनीधी म्हणून त्याला नियुक्त केलेलं असतं. पर्यायानं सांगायचं झाल्यास त्याला काळजीवाहू बनवलेलं असतं व तो काळजी वाहतोच. म्हणूनच जगात जेही कोणी राजे वा गुरु झालेत. त्यांनी त्यासाठीच आपलं बलिदान दिलं.
जगाचा हा इतिहास पाहता पुर्वीचे राजे सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोकापासून तर राजा दाहिरपर्यंत आणि त्यानंतरही पृथ्वीराज चव्हाणपासून तर आजच्या काळातील महात्मा गांधीपर्यंत सर्वांनीच समाज सुधारण्यासाठी बलिदान दिलं. आता कोणी त्यांच्यावर ताशेरे ओढतात. कारण तो आताचा काळ आहे आणि ताशेरे कोण ओढतात? जे काहीच करु शकत नाहीत.
काल झालेले संतही त्याच विचारांचे होते. काल होत असलेल्या अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वदली. त्याच परंपरेत संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जगनाडे यांनी कार्य केले. यात काही संतांना जलसमाधी मिळाली तर काही संतांना भुमीसमाधी. याचा अर्थ बलिदानच दिलं त्यांनी. याच परंपरेत संभाजी महाराज यांचं धर्मासाठी झालेलं बलिदान. गुरु तेगबहाद्दूर सिंह यांचं धर्मासाठी झालेलं बलिदान. त्याच परंपरेत फतेहसिंह, जोरावर सिंह आणि त्यांच्या भावाचं बलिदानी कर्तृत्व हेही वाखाणण्याजोगं होतं. याच श्रेणीत महाराष्ट्रात महाराणी अहिल्याबाई, महाराणी ताराबाई, कर्नाटकातील राणी चेन्नमा, झाशीची राणी लक्ष्मीबाई या महिलांनीही राण्या बनून आपआपल्या राज्याची अस्मिता वाचवली. त्याच श्रेणीत येतात गुरु गोविंद सिंह, शिवराय व इतर अनेक थोरपुरुष. ज्यांनी आपल्या राज्यासाठी, आपल्या अस्मितेसाठी आपल्या प्राणाची आहूती दिली. फतेहसिंह व जोरावर सिंह या गुरु गोविंद सिंहाच्या इवल्या इवल्या मुलांनी चक्कं धर्मासाठी नकार देत हसत हसत आपलं मस्तकही कापू दिलं. परंतु त्यांचं वय लहान असतांनाही त्या इवल्या वयात त्या तिक्ष्ण असलेल्या समशेरीसमोर ते डगमगले नाहीत. महत्वपुर्ण गोष्ट ही की फतेहसिंह व जोरावर सिंह वा संभाजी व तेगबहाद्दूर सिंह यांनी धर्मासाठी केलेलं बलिदान फालतू होतं काय? नाही. ती शुल्लक बाब नव्हती व ते फालतूचं बलिदान नव्हतं. ना ते त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केलं होतं. ना ते त्यांच्या आत्मीक सुखासाठी. त्यांनी ते बलिदान केलं. ते त्यांनी लोकांसाठी व स्वराज्यासाठी बलिदान दिलं.
गुरु गोविंद सिंहांचं ते कार्य. फतेहसिंह व जोरावर सिंहाचं ते बलिदानी वागणं. ते कशासाठी होतं? संभाजी व गुरु तेगबहाद्दूर सिंह. यांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान. ते कशासाठी? ते भारतीय क्रांतिकारकांचे बलिदान? तेही कशासाठी होते? एवढ्या भारतीय राजांनी आपला देश वाचविण्यासाठी केलेल्या लढाया. कशासाठी? शिवरायांनी केलेली स्वराज्यासाठी धडपड. तिही कशासाठी होती? एवढंच नाही तर देशातील तमाम भागात झालेल्या संतांनी केलेलं कार्य. ते कार्य कशासाठी होतं? ते सर्व कार्य त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी नव्हतं. ती धडपड त्यांच्या स्वतःच्या जगण्यासाठी नव्हती तर ती होती आपली भावी पिढी सुखी राहायला हवी. समाधानी राहायला हवी. त्यांनी आनंद भोगायला हवा यासाठी.
आज आपण काय करतो? महापुरुषांवरच व्याभिचाराचे ताशेरे ओढत असतो. महापुरुषांना बदनाम करीत असतो. महापुरुषांचे वाभाडे काढतो. महापुरुषांची टिंगल टवाळकी करीत असतो. तसं कोणी करु नये. महापुरुषांची आपण बदनामी करु नये. महापुरुष हे आपले आधारस्तंभ आहेत. ते होते, म्हणून आपण आज आनंदात आहोत. ते जर झाले नसते तर आपण आज कोणत्यातरी राजसत्तेचे गुलामच असतो. जी राजसत्ता आजही आपल्यावर राज करीत राहिली असती. ती राजसत्ता आजही आपला कोंबड्या बकऱ्यासारखा बळी घेत राहिली असती. कोणतीतरी राजसत्ता धर्मासाठी बळी घेत असती तर कोणती राजसत्ता भेदभावात्मक अत्याचार करुन. कोणत्या राजसत्तेनं आपल्याला बोलायलाही मनाई केली असती तर कोणत्या राजसत्तेनं आपल्याला लिहायलाही मनाई केली असती. हे तेवढंच खरं. म्हणूनच आपण त्या महापुरुषांनी केलंलं कार्य विसरु नये. त्यांचा आदर करावा. त्यांच्या विचारांचा आदर करावा. जेणेकरुन तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०