श्रीराम सीता देवींच्या वियोगाने व्यथित असतात. लक्ष्मण त्यांचे सांत्वन करतात त्यांना धीर देतात. काही वेळाने त्यांच्या मनोवस्थेत बदल होतो. त्यांचं नैराश्य कमी होते व आपण सीतेचा शोध घेतला पाहिजे असे त्यांना वाटते. कुटी जवळच्या आवारात हिंडणारे हरणं सारखे दक्षिण दिशेकडे बघत असतात जे बघून श्रीराम व लक्ष्मणांना कळते की नक्कीच सीता देवी ह्याच मार्गाने गेल्या असाव्यात.
ते दोघे दक्षिण दिशेने मार्गक्रमण करू लागतात. थोडं अंतर गेल्यावर त्यांना काही चुरगळलेली फुलं दिसतात. ते फुलं सीतेच्याच केसांमधील आहेत ही ओळख श्रीरामांना पटते. काही पावलांच्या खुणा सुद्धा त्यांना आढळतात त्यावरून श्रीराम लक्ष्मणास म्हणतात,
"हे पहा लक्ष्मणा हे फुलं आणि पदचिन्ह सीतेचेच आहेत. ह्याचाच अर्थ ती इथूनच गेली असावी. पण तिच्या पुढे जाणाऱ्या पाऊल खुणांवर काही राक्षसी पावलांचे ठसे सुद्धा दिसत आहेत. ज्याप्रमाणे वादळात कमळं छिन्न विच्छिन्न होतात त्याप्रमाणे सीतेच्या पाऊल खुणा ह्या राक्षसी पावलांनी मोडल्या गेल्या आहेत.
नक्कीच इथे कोणी दुष्ट निशाचर राक्षसाने मैथिलीला बळजबरीने नेलं आहे. ते बघ समोर कोणाचे तरी रत्नजडित धनुष्य तुटून पडलेले दिसतेय. नक्कीच ह्या ठिकाणी दोन जणात युद्ध झालेलं दिसतेय. खाली वैदूर्य मण्यांनी मढवलेलं कोणाचे तरी कवच पडलेलं आहे कदाचित सीतेला नेणाऱ्या राक्षसाला कोणीतरी अडवलं असणार! ", आणखी थोडं पुढे गेल्यावर श्रीराम म्हणतात,
"ते पहा लक्ष्मणा तिथे रथाचे छत्र त्याचा दांडा तुटून धूळ खात पडलेला आहे. रथ ही मोडून पडला आहे. रथाची चाके तुटून पडली आहे. इस्ततः बाण ही पसरले आहे. अरेरे! ह्या रथाचा सारथी तिथे मरून पडला आहे. त्याचे तोंड रक्ताने माखलेले आहे. ह्यांची अशी अवस्था का झाली असेल? बाजूलाच एक गाढव(रासभ किंवा गर्दभ)आकाशाच्या दिशेने तोंड करून मरून पडलं आहे. सामान्यतः अश्व(घोडा) वाहक असलेले रथ असतात परंतु इथे गाढव वाहक असलेला असा विचित्र रथ कोणाचा असेल? अनुमान सुद्धा करता येत नाही,नेमकं इथे काय झालं असावं ह्याचा काहीच अंदाज लागत नाही. सीतेला प्राप्त करण्यासाठी राक्षस आणि ह्या रथाच्या मालकामध्ये तर युद्ध झालं नसेल? सीतेला कोणी पळविले की युद्ध करून जिंकले की कोणी खाऊन टाकले काही काही कळत नाही.",एवढे बोलून श्रीराम सर्वत्र बघून मोठ्याने गर्जना करतात,
"ज्यांनी कोणी माझी सीता नेलेली आहे त्यांनी ती पुन्हा माझ्याजवळ आणून द्यावी नाहीतर परिणाम फार वाईट होतील. माझ्या क्षात्र शक्तीला आव्हान देण्याची चूक करू नका! माझ्या सीतेला बळजबरीने नेणारा स्वर्गातील देव असो की पृथ्वीवरचा मानव वा असो पाताळातील राक्षस कोणालाही मी सोडणार नाही. त्या नाराधमाला जाळून तिन्ही लोक मी माझ्या शौर्याने चळा चळा कापवेन."
{ह्या गीतातून आपल्याला हे स्पष्ट होते की मूळ जो वीर असतो तो काही काळ जरी निराश झाला तरी तो पुन्हा उठतो आणि झुंज देण्यास सज्ज होतोच}
(राम कथेत पुढे काय होईल जाणून घेऊ उद्याच्या भागात तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)
ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे बत्तीसावे गीत:-
ही तिच्या वेणिंतिल फुले
लक्ष्मणा, तिचीच ही पाऊले
एक पदांचा ठसा राक्षसी
छेदित गेला पदचिन्हांसी
वादळे तुटली पद्मदले
खचित लक्ष्मणा, खचित या स्थली
रात्रिंचर कुणि छळी मैथिली
जिंकिले सत्वा का अंगबले?
दूर छिन्न हे धनू कुणाचे?
जडाव त्यावर रत्नमण्यांचे
कुणाला कोणी झुंजविले?
वैदुर्यांकित कवच कुणाचे?
धुळित मिळले मणी तयाचे
राक्षसा कोणी आडविले?
पहा छत्र ते धूलीधूसर
मोडुन दांडा पडले भूवर
कुणी या सूता लोळविले?
प्रेत होउनी पडे सारथी
लगाम तुटके तसेच हातीं
तोंड ते रुधिरे भेसुरले
पहा रथाचे धूड मोडके
कणा मोडला, तुटली चाके
बाणही भवती विस्कटले
थंड दृष्टिने न्याहळीत नभ
मरून थिजले ते बघ रासभ
कुणाचे वाहन हे असले?
अनुमानाही पडे साकडे
कोणी नेली प्रिया? कुणिकडे?
तिच्यास्तव दोघे का लढले?
हृता, जिता वा मृता, भक्षिता
कैसी कोठे माझी सीता?
गूढ ते नाही आकळले
असेल तेथुन असेल त्यांनी
परतुन द्यावी रामस्वामिनी
क्षात्रबल माथी प्रस्फुरले
स्वर्गिय वा तो असो अमानुष
त्यास जाळण्या उसळे पौरुष
कापविन तीन्ही लोक बले
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★