शबरी श्रीरामाच्या दर्शनाने कृतकृत्य होते. एवढा काळ फक्त श्रीरामांच्या दर्शनासाठी तिच्या देहात थांबलेला प्राण अनंतात विलीन होऊन जातो. श्रीराम दर्शनाने तिचे मन तृप्त होते. श्रीराम व लक्ष्मण आजूबाजूच्या मुनीजनांच्या मदतीने शबरीचे योग्यप्रमाणे दहन करतात व पुढच्या मार्गाला जातात.
कबंध राक्षसाने सांगितल्यानुसार श्रीराम व लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताकडे वाटचाल करू लागतात. तिथे सुग्रीव व त्यांचे मंत्री हनुमान व इतर सहकारी राहत असतात. सुग्रीवाचे त्याच्या मोठ्या भावासोबत वालीसोबत वैमनस्य झालं असते त्याची कथा खालील प्रमाणे आहे:-
[ एकदा एक राक्षस वालीला युद्धासाठी ललकरतो. ते ऐकून वाली त्याच्याशी युद्ध करतो. युद्धात आपण हरणार हे पाहून तो राक्षस पळून जातो. वाली पुन्हा आपल्या राजदरबारात येतो. काही काळाने तोच राक्षस वालीला पुन्हा युद्धसाठी आव्हान देतो. तेव्हा वाली चे डोके भडकते तो आता ह्या राक्षसाचा नायनाट करायचाच असे ठरवून युद्धासाठी बाहेर पडायला निघतो पण जाता जाता वालीची पत्नी तारा त्याला अडवते.
"स्वामी! तो राक्षस मायावी दिसतोय तरी आपण त्याच्या आव्हानाला महत्त्व देऊ नये. त्याचा आपल्याला क्षती पोचवण्याचा मनसुबा दिसतोय. तरी आपण शांत राहावे असे मला वाटते.",तारा
"देवी तारा हे तू मला काय सांगते आहेस? एका विरपुरुषाची अर्धांगिनी असून असा पळपुटेपणा मला करायला सांगतेस? ते कदापि शक्य नाही. जोपर्यंत त्या कपटी राक्षसाला मी रौरवात धाडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.",असे म्हणून वाली युद्धास जातो. जाता जाता सुग्रीव सुद्धा भावाला मदत करण्यास युद्धात सहभागी होतो. जेव्हा एकट्या वाली समोरच आपला निभाव लागत नव्हता, आतातर त्याचा त्यांच्यासारखाच दिसणारा भाऊ सुद्धा आला हे पाहिल्यावर तो राक्षस त्याच्या गुहेत पळून जातो. ते बघून चेवाने वाली गुहेत जातो व सुग्रीवाला गुहेच्या बाहेर माझी वाट बघ असे सांगतो.
बराच काळ सुग्रीवाला आतून युद्धाचा आवाज येतो आणि मग गुहेतून रक्ताचे ओहोळ वाहू लागतात. ते पाहून सुग्रीव च्या मनात नक्कीच राक्षसाने वालीला मारले असावे अशी शंका निर्माण होते. जर राक्षस वालीला मारू शकतो तर आपण तर सहजच राक्षसाच्या हातून मारले जाऊ अशी भीती वाटून सुग्रीव त्या गुहेचे प्रवेश दार मोठी शिळा लावून बंद करतो. वाली आता मरण पावला आहे त्यामुळे किष्किंदा राज्य हे राजा विना कसे राहू शकेल म्हणून सर्वानुमते सुग्रीवाचा राज्यभिषेक होतो आणि काही काळानंतर वाली त्या गुहेतून जेव्हा बाहेर यायला बघतो तेव्हा त्याला कळते की गुहेचे दार शिळेने बंद केले आहे. नक्कीच हे सुग्रीवाचेच काम आहे हे त्याला कळते त्यामुळे तो क्रोधीत होऊन ती शिळा भिरकावून बाहेर येतो आणि किष्किंदा दरबारात हजर होतो. त्याला पाहून त्याची पत्नी तारा ला तसेच सुग्रीव इतरांना आनंद होतो पण सुग्रीव राज्यपदी बसलेला पाहून वालीची तळपायाची आग मस्तकात जाते. त्याचा असा गैरसमज होतो की राज्यपदासाठी सुग्रीवने मुद्दामहून गुहेला शिळा लावून ठेवली. सुग्रीव त्याला समजवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो परंतु वाली काहीही ऐकण्यासाठी तयार नसतो. तो युद्धात सुग्रीवाचा दारुण पराभव करतो. तसेच सुग्रीवाची पत्नी रुमा हिचे बलपूर्वक हरण करतो.
सुग्रीव दयनीय अवस्थेत घाबरून अश्या ठिकाणीं पळून जातो जिथे वाली येण्याची शक्यता नसते. आणि ते ठिकाण असते ऋष्यमुख पर्वत. ह्या पर्वतावर एका मुनींना तप करत असताना त्रास दिल्याने वालीला श्राप मिळतो की तो या पर्वतावर कधीही येऊ शकणार नाही. त्यामुळे जीव मुठीत घेऊन सुग्रीव! हनुमान,जांबुवंत ,नल आणि निल ह्यांच्यासह इथे वास्तव्यास येतो. ]
जेव्हा सुग्रीवाला दुरून दोन धनुर्धर येताना दिसतात तेव्हा त्याला वाटते की नक्कीच आपल्याशी युद्ध करण्यास वालीनेच ह्यांना पाठवलं असावं म्हणून सुग्रीव हनुमानाला ह्या धनुर्धरांचा अंदाज घ्यायला पाठवतो.
हनुमान एका विप्राचे(ब्राम्हणाचे) रूप घेऊन श्रीरामांना भेटायला जातो. तिथे संभाषण करत असता हनुमानाला कळते की लहानपणापासून आपण ज्या आराध्य देवाचे नामस्मरण करत होतो ते दैवत श्रीराम आपल्या समक्ष उभे आहे. तसेच श्रीरामांना सुद्धा हा विप्र हनुमान च आहे हे कळून चुकते.
हनुमानाला जेव्हा त्यांचा खरा उद्देश कळतो तेव्हा तो आपल्या खऱ्या स्वरूपात येतो. ऋष्यमुख पर्वत चढण्यास बराच वेळ लागला असता म्हणून हनुमान विराट रूप धारण करून श्रीराम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसून नेतो. सुग्रीवाला हनुमान श्रीराम-लक्ष्मणाची ओळख करून देतो आणि त्यांच्या येण्याचे प्रयोजन सुद्धा कथन करतो तेव्हा सुग्रीवाला कळते की श्रीराम व आपण समदुःखी आहोत आणि एक दुःखी व्यक्तीच दुसऱ्या दुःखी व्यक्तीचे दुःख समजून घेऊ शकते. म्हणून सुग्रीव हनुमानास अग्नी प्रज्वलित करण्यास सांगतो आणि त्या अग्नीच्या साक्षीने श्रीरामांशी मैत्री प्रस्थापित करतो.
सुग्रीव अग्निसमोर शपथ घेताना म्हणतो,
"हे श्रीरामा आज ह्या चंद्र,अग्नी आणि पृथ्वीच्या साक्षीने मी तुझे मित्रत्व स्वीकारले आहे. तुझ्याप्रमाणेच मी सुद्धा वनवास भोगत आहे. तुझी जशी पत्नी बलपूर्वक हरण केल्या गेली आहे तसेच माझी सुद्धा पत्नी माझ्या मोठ्या भावाने वालीने बलपूर्वक हरण केली आहे. हनुमानाच्या तोंडून तुम्ही माझी कर्मकाहाणी ऐकली आहेच. दोन समदुःखी व्यक्तीच एकमेकांना साहाय्य करू शकतात. माझा भाऊ असून त्याने असे गैरकृत्य केले आहे त्या वालीला एकदा रौरवात तू पाठव म्हणजे आज जसा मी राहूने ग्रासलेल्या सुर्यासारखा तेजहीन झालो आहे त्यातून बाहेर पडून मी माझे तेज पुन्हा मिळवीन. मला माझे राज्य,गेलेले वैभव पुन्हा मिळाले की मी शक्तिशाली होईन माझ्या शक्तीचे कौतुक माझ्याच तोंडाने सांगणे मला योग्य वाटत नाही. तुला त्याचा अनुभव येईलच. एकदा का मला माझे राज्य मिळाले की माझी संपूर्ण वानर सेना त्या रावणाच्या विरोधात उभी ठाकेल आणि आमची वानर सेना सीता देवींना परत मिळविण्यासाठी जीवाला जीव द्यायला ही कमी करणार नाही भलेही त्यासाठी सिंधू नदी पार करावी लागो किंवा पर्वतं खोदून मार्ग बनवावा लागो. आमची वानरसेना ते सुद्धा करेल.
आता आपली मैत्री झालीच आहे तर शुभस्य शीघ्रम व्हायला पाहिजे. तू लवकरात लवकर वालीचा वध कर मग आपण सीता देवींना शोधण्याच्या कार्याला सुरुवात करू. संपूर्ण पृथ्वी पालथी करून मी सीता देवींना शोधून देईन हे माझे आपल्याला वचन आहे. त्या कार्यात जो कोणी आडवा येईल त्याला मी यमसदनी पाठवेल.",एवढं श्रीरामांना सांगून सुग्रीव हनुमान व जांबुवंताला म्हणतो,
"हनुमाना! व जांबुवंता तसेच नल व निल आजपासून मी आपला राजा नसून आपले राजे श्रीराम आहेत आणि आपण त्यांचे मंत्री आहोत. यापुढे ते जे सांगतील तसे आपल्याला वागायचे आहे."
अश्या तर्हेने सुग्रीव व श्रीरामांची मैत्री रावणाला व वालीला शह देण्यास सिद्ध होते.
{ह्या गीतातील प्रसंगावरून हे स्पष्ट होते की परस्त्री ला हरण करणे हा फार मोठा गुन्हा असून त्यासाठी रामाला वालीचा वध करावा लागला. वास्तविक पाहता वाली हा इतका शक्तिशाली होता की त्याने एकदा एका युद्धात रावणाला हरवले होते. रामांना अगदी सहजपणे वाली मदत करू शकला असता पण वालीने सुग्रीवाची पत्नी बलपूर्वक आणि सुग्रीव जिवंत असताना ताब्यात घेतली त्यामुळे तो पापी ठरत होता व श्रीरामांच्या मनातून उतरला होता त्यामुळे त्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले.}
(रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)
ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे पस्तीसावे गीत:-
साक्षीस व्योम, पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
रामा, तुझ्यापरी मी वनवास भोगताहे
हनुमन्मुखे तुला ते साद्यंत ज्ञात आहे
दुःखीच साह्य होतो दुःखात दुःखिताला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
बंधूच होय वैरी, तुज काय सांगु आर्या!
नेई हरून वाली माझी सुशील भार्या
वालीस राघवा, त्या तूं धाड रौरवाला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
बाहूत राहुच्या मी निस्तेज अंशुमाली
गतराज्य-लाभ होता होईन शक्तिशाली
माझेच शौर्य सांगू माझ्या मुखे कशाला?
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
होता फिरून माझे ते सैन्य वानरांचे
होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे
ते लंघतील सिंधू, खणतील शैलमाला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
ते शोधितील सीता, संदेह यात नाही
निष्ठा प्लवंगमाची तू लोचनेच पाही
होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
झालेच सख्य रामा, देतो करी कराते
आतां कशास भ्यावे कोणा भयंकराते?
तू सिद्ध हो क्षमेंद्रा, वालीस मारण्याला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
घालीन पालथी मी सारी धरा नृपाला
रामासमीप अंती आणीन जानकीला
धाडीन स्वर्ग-लोकी येतील आड त्याला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
हनुमान, नील, ऐका, मंत्री तुम्ही न माझे
सुग्रीव एक मंत्री, हे रामचंद्र राजे
आज्ञा प्रमाण यांची आता मला, तुम्हाला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★