Geet Ramayana Varil Vivechan - 36 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 36 - वाली वध ना खल निर्दालन

वालीला ब्रम्हदेवाकडून असा वर मिळाला असतो की जो ही त्याच्यासमोर युद्धास उभा ठाकेल त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल. त्यामुळे वाली कधीच कोणाशी हरत नाही. अशी माहिती जांबुवंत हा सुग्रीवाचा ज्येष्ठ मंत्री असतो तो श्रीरामांना देतो. त्यामुळे श्रीराम अशी योजना आखतात की सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आमंत्रण द्यायचं आणि रामाने त्याच्या पुढे न येता एका वृक्षा आडून बाण मारायचा.


श्रीरामांच्या सांगण्यावरून किष्किंदा नगरीत जाऊन सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आव्हान केले,


"वाली बाहेर ये! तुझा काळ तुला बोलावतोय असे समज! भावाच्या बायकोला पळवणार्या अधमा! बाहेर ये! मी सुग्रीव तुला युद्धासाठी आमंत्रण देतोय. ",सुग्रीव म्हणाला


ते ऐकून वाली चिडून बाहेर आला,"अरे भ्याडा! एवढा काळ ऋषयमुक पर्वतावर लपून बसलेला तू ! तू काय माझा काळ बनणार! दोन धनुर्धरांच्या जीवावर मला युद्धाचे आमंत्रण देतो मूर्खा! थांब बघतोच तुला आता!",वाली ( ह्याचा अर्थ वालीचे गुप्तचर चांगलेच कार्यरत होते असे दिसते. त्यांनी श्रीराम व लक्ष्मण सुग्रीवाला भेटले ही खबर वालीला पोचवली होती.)


आणि वाली आणि सुग्रीवाचे युद्ध ठरले. तरीही सुग्रीवाला खात्री वाटेना की आपला एवढा बलशाली भाऊ वाली त्याला श्रीराम हरवू शकतील की नाही त्यामुळे सुग्रीवाने ती शंका हनुमानजवळ बोलून दाखविली. हनुमानाने ती श्रीरामास सांगितली. श्रीरामांनी सुग्रीवाची शंका दूर करण्यास त्याला एका ठिकाणी बोलावले जिथे सात वृक्ष एका रांगेत उभे होते. श्रीरामांनी एक असा बाण मारला की सातही वृक्ष मधून कापल्या गेले ते बघून सुग्रीवाची शंका दूर झाली.


युद्ध मैदानात वाली आणि सुग्रीव एकमेकांसमोर आले. वालीने सुग्रीवाला मुष्टि युद्धात पछाडणं सुरू केलं. सुग्रीव घाबरून पळून आला आणि रामाला म्हणाला

"श्रीराम आपण बाण का नाही मारला? मी जर पळून आलो नसतो तर माझा मृतदेह तुम्हाला पाहायला मिळाला असता. तुम्हाला मला मदत करायचीच नव्हती तर मला नसत्या भानगडीत भरीस का पाडलं?"


"अरे सुग्रीवा! गैरसमज करू नको. तुम्ही दोघे भाऊ इतके सारखे दिसता की मी गोंधळात पडलो म्हणून मी बाण चालवला नाही. एखादी अशी खूण हवी जेणेकरून दुरुनही तू मला ओळखू येशील.",श्रीरामाने असे म्हणताच हनुमानाने एक फुलांची वेल सुग्रीवाच्या गळ्यात एखाद्या माळेसारखी घालून दिली.


"आता जा पुन्हा वालीला आव्हान दे",श्रीराम.


सुग्रीवाने वालीला पुन्हा आमंत्रण दिले. वाली पुन्हा चवताळत मैदानात आला. जाताना ताराने वालीला सावध केलं की सुग्रीवासोबत कोणीतरी आहे म्हणून तो पुन्हा आव्हान देतो तुम्ही जाऊ नका पण वाली ताराचे म्हणणे हसण्यावारी नेतो आणि म्हणतो,

"तारा ते दोन धनुर्धर माझे काहीही बिघडवू शकत नाही. तो निश्चिन्त राहा",असे म्हणून वाली पुन्हा युद्धास सज्ज होतो.


पुन्हा मुष्टि युद्ध करताना सुग्रीव अर्थातच मार खाऊन घेत असतो तेवढ्यात एक बाण वालीच्या पाठीत लागतो आणि तो कोसळतो.


तो कोसळलेला बघताच श्रीराम लक्ष्मण हनुमान आणि वालीचे कुटुंबीय मैदानात येतात.


तारा वालीचे डोके आपल्या मांडीवर घेते. श्रीराम वालीला त्यांची ओळख सांगतात. वाली श्रीरामांना जाब विचारतो,


"हे रामा! मी तुझा शत्रू नसताना, तुझ्या अध्यात मध्यात नसताना तू मला का मारले? हा कोणता न्याय आहे? ही कोणती नीती आहे?"


"अरे वाली! तू गर्वाने उन्मत्त झाला होता. कनिष्ठ बंधू हा पुत्रासमान असतो आणि त्याची भार्या पुत्रवधू समान असते तिलाच तू पळविले जे नीतीला धरून नव्हतं. म्हणून मला तुला मारावे लागले. तसेच मी सुग्रीवाचा मित्र ह्या नात्याने त्याला त्याची भार्या परत मिळवून द्यायचे वचन दिले होते. तुला मारल्याशिवाय ते शक्य नव्हते. तू अहंकाराने आंधळा झाला असल्याने तुला समजावून सांगणे व्यर्थ होते. तसेच सुग्रीवाने सुद्धा मला माझी भार्या शोधण्यास मदत करण्याचे वचन दिले होते त्यामुळे मला असे करणे क्रमप्राप्त होते.",श्रीराम


"एवढंच होतं तर आपण मला म्हंटल असतं तर मी रावणाचा वध करून तुम्हाला तुमची भार्या सहज मिळवून दिली असती. सुग्रीवाची मदत घेण्याची तुम्हाला गरजच पडली नसती",वाली


"अरे जो स्वतः च परस्त्रीची कामना करतो त्याच्याकडून मी कशी काय मदत घेतली असती? ते मला योग्य वाटलं नाही ",श्रीराम


"परंतु श्रीरामा मला हे सांगा की युद्धात पाठीमागून वार करणे हा कुठला न्याय आहे?",वाली


"अरे वाली वानर राज ! तू एखाद्या पशु प्रमाणे वागलास नीतीने तुझे वागणे नव्हते त्यामुळे शिकारीला जाताना जसा राजा पशूला बेसावध ठेवून त्याच्यावर वार करतो तसाच मी तुझ्यावर वार केला ह्यात मी नितीनेच वागलो आहे. तसेच भरत हा ह्या संपूर्ण भूमीचा राजा आहे त्याचा भाऊ म्हणून त्याच्या राज्यात अनितीने वागणाऱ्यास शिक्षा देणे हे माझे कर्तव्य आहे म्हणून तुझा वध करून मी माझे कर्तव्य पालन च केले आहे. त्यात काहीच गैर किंवा अन्यायाचे नाही. तुझ्या मरणापाश्चात तुला नक्कीच मोक्षप्राप्ती होईल ह्याची मी तुला खात्री देतो त्याचप्रमाणे तुझ्या पुत्राची अंगदाची मी काळजी घेईन ह्याचे मी तुला वचन देतो.


तुझ्यानंतर ही किष्किंदा नागरी सुग्रीवच सांभाळेल.",हे श्रीरामांचे बोलणे ऐकून वालीचे समाधान होते व तो प्राण सोडतो. त्याचे यथायोग्य दहन केले जाते त्यानंतर सुग्रीवाचा राज्यभिषेक होतो आणि अंगदाला युवराज पद मिळते.


{त्यानंतर वालीची पत्नी तारा ही सुग्रीवाची पत्नी होते की नाही ह्याबद्दल फारशी माहिती नाही. कुठे ती सुग्रीवाची पत्नी होते असे लिहिलेले आढळलेले आहे. त्यावर अनेक जण विचारतात की आता हे कसं चाललं? आता सुग्रीवाला मोठ्या भावाच्या बायकोशी लग्न करणे कसे चालले? तर त्यावर असे उत्तर आहे की मानव व वानर ह्यांचे नियम वेगळे आहेत. मानवाला मृत भावाच्या बायकोशी लग्न करणे अनुचित होईल पण वानरासाठी ते उचित असेल. मृत भावाच्या पत्नीशी लग्न करणे आणि जिवंत भावाच्या बायकोला पळविणे ह्यात खूप फरक आहे. ह्यात आपण आणखी एक दृष्टिकोन पाहू शकतो की ताराशी लग्न करून सुग्रीवाने तिची रीतसर जबाबदारी घेतली आणि अंगदाला सुद्धा युवराज बनवून त्याची सुद्धा रीतसर जबाबदारी घेतली.


काही जण असे प्रश्न विचारतात की तारा पतिव्रता कशी काय बुवा? वालीचीही बायको आणि नंतर सुग्रीवाचीही बायको असे दोन लग्न करणारी स्त्री पतिव्रता कशी बरे? तर त्याचे हे उत्तर आहे की मुळात जरी ताराने दोन लग्न केले तरी जेव्हा ती वालीची पत्नी होती तेव्हा ती मनाने आणि तनाने वालीशी एकनिष्ठ होती. जेव्हा वाली मरण पावला तेव्हा ती सुग्रीवाची पत्नी झाली. आणि जेव्हा ती सुग्रीवाची पत्नी होती तेव्हा ती मनाने आणि तनाने सुग्रीवाशी एकनिष्ठ राहिली. ह्याचा अर्थ तारा एकच वेळी दोघांची बायको नव्हती. एक पती मेल्यावर तिने दुसरे लग्न केले आणि ज्या पतीसोबत ती राहिली त्याच्याशिवाय तिने अन्य कुठल्याही पुरुषाचा संग किंवा विचार केला नाही म्हणून ती पतिव्रता ठरते. }


(रामायणात पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)


ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे छत्तीसावे गीत:-


मी धर्माचे केले पालन

वालीवध ना, खलनिर्दालन


अखिल धरा ही भरतशासिता

न्यायनीति तो भरत जाणता

त्या भरताचा मी तर भ्राता

जैसा राजा तसे प्रजाजन


शिष्य, पुत्र वा कनिष्ठ भ्राता

धर्मे येते त्यास पुत्रता

तू भ्रात्याची हरिली कांता

मनी गोपुनी हीन प्रलोभन


तू तर पुतळा मूर्त मदाचा

सुयोग्य तुज हा दंड वधाचा

अंत असा हा विषयांधाचा

मरण पशूचे पारध हो‍उन


दिधले होते वचन सुग्रिवा

जीवहि देइन तुझिया जीवा

भावास्तव मी वधिले भावा

दिल्या वचाचे हे प्रतिपालन


नृपति खेळती वनि मृगयेते

लपुनि मारिती तीर पशूते

दोष कासया त्या क्रीडेते

शाखामृग तू क्रूर पशूहुन


अंत्य घडी तुज ठरो मोक्षदा

सांभाळिन मी तुझ्या अंगदा

राज्य तुझे हे, ही किष्किंधा

सुग्रीवाच्या करी समर्पण

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


इतर रसदार पर्याय