गीत रामायणा वरील विवेचन - 37 - असा हा एकच श्री हनुमान Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 37 - असा हा एकच श्री हनुमान

वालीच्या वधानंतर त्याच्या क्रियाकर्मानंतर श्रीरामांनी सुग्रीवाला राज्यपदी बसवले आणि अंगदाला युवराज पदी बसवले. सत्ता प्राप्त झाल्यावर भोगविलासात रममाण होऊन सुग्रीव सीता देवींना शोधण्याचे श्रीरामांना दिलेले वचन विसरला(आपले राजकारणी करतात अगदी तसंच) ते पाहून श्रीरामांना संताप आला त्यांनी लक्ष्मणाला सुग्रीवाची कान उघडणी करण्यास पाठविले. लक्ष्मणांनी खरमरीत शब्दात सुनावल्या वर सुग्रीव भोगविलासाच्या धुंदीतून बाहेर आला आणि त्याने कोट्यवधी वानरसेनेला आमंत्रित केले आणि आठही दिशांना पाठवले. त्यापैकी दक्षिण दिशेला गेलेल्या गटात हनुमान जांबुवंत नल-निल तसेच अंगद समाविष्ट होते. त्यांनी एक महिना शोध घेतला पण सीता माईंचा कुठेही पत्ता लागला नाही. तेव्हा ते सगळे निराश झाले. तेव्हा त्यांना समुद्र तटावर एक संपाती नामक गरुड सापडतो जो जटायूची भाऊ असतो. तो जांबुवंताला सांगतो.


"हे जांबुवंता मला दूरपर्यंत बघण्याची विद्या अवगत असल्याने मी तुला सांगू शकतो की सध्या सीता देवी रावणाच्या सुवर्ण लंकेत एका वाटीकेत एका वृक्षाखाली उदास अवस्थेत बसल्या आहेत."


"धन्यवाद संपाती तुझ्या सांगण्यामुळे आमचे फार मोठे काम झाले.",जांबुवंत


"दशरथ राजा माझा मित्र असल्याने जे मी केलं ते माझं कर्तव्यच होतं.",संपाती


आता सीता मातेचा शोध तर लागला होता पण एवढ्या लांब महाकाय समुद्र ओलांडून कसे जायचे हा प्रश्न होता. तेव्हा जांबुवंताने हनुमानस समुद्र ओलांडण्यास सांगितले. पण हनुमानाला वाटलं आपण सामान्य वानर आपण एवढा मोठा पल्ला कसा ओलांडू शकू? त्यावर जांबुवंताने हनुमानाला त्याची जन्मकथा ऐकवली.


"हनुमाना तू सामान्य वानर नाहीस. तू अत्यंत शक्तिशाली आहेस. ज्याप्रमाणे पक्षीराज गरुड पायात सर्प घेऊन आकाशात उंच उड्डाण करतो आणि समुद्र ओलांडतो त्याप्रमाणे तू सुद्धा हा समुद्र ओलांडून जाऊ शकतो. जेव्हा तू जन्मास आला होता तेव्हा आकाशातला सूर्य पाहून तुला ते एखादे फळ वाटले म्हणून तू त्याला खायला अवकाशात उड्डाण करून गेला होतास.

एवढा लहान असताना जर तुला ते शक्य झालं तर आता हा समुद्र ओलांडणे तुला शक्य होणार नाही का?


तू सूर्याला खाणार हे पाहून इंद्राने तुझ्यावर वज्र फेकले ते तुझ्या हनुवटीवर लागले. ते पाहून तो बेशुद्ध पडला. ते पाहून वायूदेव ज्यांच्या आशीर्वादाने तुझा जन्म झाला ते क्रोधीत झाले त्यांनी सर्वत्र वाहणारा वारा बंद केला त्यामुळे सर्व सृष्टी भयभीत झाली. सगळे देव वायू देवाला समजावू लागले तेव्हा वायू देव शांत झाले व सर्वत्र वारा वाहू लागला. सगळ्या देवांनी तुला भरभरून आशीर्वाद आणि शक्ती प्रदान केली.

तुला कुठलेही शस्त्र क्षती पोचवू शकत नाही तसेच तू चिरंजीवी राहशील असे तुला वरदान मिळाले आहे.


फक्त ह्या शक्ती ने तू एका ऋषींना तपात व्यत्यय निर्माण केला म्हणून त्यांच्या शापामुळे तुला तुझ्या शक्तीचा विसर पडला. पण त्यांनीच दिलेल्या उ:शापामुळे जेव्हा तुझ्या शक्तीची खरी गरज असेल तेव्हा कोणी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून दिली तर तू नक्की तुझ्या शक्तीचा उपयोग करू शकतो. आज तुझ्या शक्तीचा उपयोग करण्याची खरी वेळ आली आहे.


मनात कुठलीही शंका न बाळगता आता उड्डाण घे हनुमंता! उड्डाण घे!पोचव संदेश श्रीरामांचा सीता मातेपर्यंत. आणि दाखव रावणाला तुझी शक्ती",असे म्हणून जांबुवंत हनुमानाला प्रेरित करतात आणि हनुमंत मोठी झेप घेऊन लंकेकडे उड्डाण घेतात.


{यात आपण वारंवार पाहिलं की शक्तीचा सत्तेचा गर्व झाला की गर्वहरण होते. वालीने किंवा हनुमानाने ऋषींना त्यांच्या तपात विनाकारण व्यत्यय आणला म्हणून त्यांना श्राप मिळाला. परंतु कालांतराने हनुमानाचा बलिशपणा जाऊन तो प्रगल्भ झाला. पण वाली मात्र गर्विष्ठ च राहिला . त्यामुळे वाली चा वध झाला पण हनुमानाला रामाचा सहवास मिळाला. हनुमानाच्या सुप्तावस्थेत असलेल्या शक्तींना जांबुवंताने जागवले आणि हनुमानाला आपले खरे स्वरूप कळले. ह्याचाच अर्थ आपल्यामध्ये हनुमंतां एवढी जरी नसली तरी काही न काही सुप्त गुण कौशल्य असतात ज्याची आपल्यालाच जाणीव नसते पण योग्य वेळ आल्यावर ते आपल्याला कळते.}




( पुढे रामायणात काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏 जय हनुमान🙏)



ग.दि. माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे सदोतीसावे गीत:-


तरुन जो जाइल सिंधु महान

असा हा एकच श्रीहनुमान्‌


भुजंग धरुनी दोन्ही चरणी

झेपेसरशी समुद्र लंघुनि

गरुड उभारी पंखा गगनी

गरुडाहुन बलवान्‌


अंजनिचा हा बलाढ्य आत्मज

हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज

निजशक्तीने ताडिल दिग्गज

बलशाली धीमान्‌


सूर्योदयि हा वीर जन्मला

त्रिशत योजने नभी उडाला

समजुनिया फळ रविबिंबाला

धरु गेला भास्वान्‌


बाल-वीर हा रविते धरिता

भरे कापरे तीन्ही जगता

या इवल्याशा बाळाकरिता

वज्र धरी मघवान्‌


देवेंद्राच्या वज्राघाते

जरा दुखापत होय हनुते

कोप अनावर येइ वायुते

थांबे तो गतिमान्‌


पवन थांबता थांबे जीवन

देव वायुचे करिती सांत्वन

पुत्राते वर त्याच्या देउन

गौरविती भगवान्‌


शस्त्र न छेदिल या समरांगणि

विष्णुवराने इच्छामरणी

ज्याच्या तेजे दिपला दिनमणी

चिरतर आयुष्मान्‌


करि हनुमन्ता, निश्चय मनसा

सामान्य न तू या कपिजनसा

उचल एकदा पद वामनसा

घे विजयी उड्डाण

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★