हनुमान श्रीरामांकडे देवी सीता ची ख्याली खुशाली कळवायला आले. त्यांनी श्रीरामांना सीता देवींनी ओळख म्हणून दिलेला मणी दिला. तो पाहून श्रीराम हर्षोल्हासित झाले व त्यांनी हनुमानाला आलिंगन दिले.
"हनुमंता! कशी आहे माझी सीता? माझ्या आठवणीत तिने नक्कीच दुरावस्था करून घेतली असेल. रावणाने तिला काही त्रास तर दिला नाही न?",श्रीराम
तिकडे लंकेत सीता देवीचे शंकानिरसन केल्यावर इकडे हनुमान रामांची शंकानिरसन करत म्हणाले,"
प्रभू! आपण म्हंटल त्याप्रमाणे त्यांनी आपल्या विरहात वाईट अवस्था तर करून घेतली आहे आणि त्या राजप्रसादात न राहता अशोकवाटिकेत एका वृक्षाखाली राक्षसिणीच्या गराड्यात राहत आहेत. तिथे एक त्रिजटा नामक राक्षसींन सीता देवींकडे लक्ष देण्याचे काम करते ती जरी राक्षसींन असली तरी सीता देवींची नीट काळजी घेते. सीता देवी आपली आतुरतेने वाट बघत आहेत. रावणाने त्यांना वेळोवेळी भेटून त्यांचं मन बदलावायचा प्रयत्न केला पण सीता देवी सदैव आपलेच गुणगाण करत राहिल्या. आपला निरोप मिळाल्यावर त्यांना आनंद झाला आहे.",हनुमान
"चला आता आपल्याला शीघ्र अति शीघ्र दक्षिणेकडे प्रस्थान करावे लागेल. ",श्रीराम
"मी तात्काळ माझ्या वानर सेनेला तश्या सूचना देतो",असे म्हणून सुग्रीव ने वनारसेनेला सूचना केल्या आणि राम-लक्ष्मण, सगळी वानर सेना, सुग्रीव,जांबुवंत,हनुमान,नल,-निल,अंगद दक्षिणेकडे निघाले.
मलय पर्वत, चंदन वन, अनेक नद्या , धबधबे आणि वने पार केल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेने समुद्राकडे प्रस्थान केले.
[श्रीरामांनी त्यांच्या सेनेला कोडीकरई येथे एकत्रित केले. तामिळनाडू राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे.
कोडीकरई हे ठिकाण वेलंकनीच्या दक्षिणेला आहे. ह्या गावाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पाल्क स्ट्रीट आहे.
ह्या ठिकाणी आल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेच्या असे लक्षात आले की ह्या ठिकाणहून समुद्र ओलांडून जाणे शक्य नाही आणि येथे पूल सुद्धा बांधला जाऊ शकत नाही म्हणूनच श्रीराम त्यांच्या सेनेसह रामेश्वरमला गेले.]
रामेश्वरम चा समुद्रभाग शांत असल्याने तिथे सेतू बांधणे शक्य होते. तरी सुद्धा ज्या समुद्रात सेतू बांधायचा आहे त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे असे रामांना वाटले म्हणून त्यांनी समुद्राला आवाहन केले. त्यांनी रोज तीन दिवस समुद्राला आवाहन केले पण समुद्राने काही प्रतिसाद दिला नाही त्यावर राम क्रुद्ध झाले व त्यांनी समुद्रावर बाण सोडण्याचा निर्णय घेतला ते पाहून समुद्र भयभीत झाला व प्रकट झाला त्याने रामांची क्षमा मागितली व त्याने सांगितले की तुमच्या सेनेत नल-निल जे वानर आहेत ते विश्वकर्मा चे वंशज आहेत त्यामुळे त्यांचा हात लावून जर तुम्ही खडक पाण्यात टाकले तर ते तरंगतील आणि हळूहळू सेतू बांधणे पूर्ण होईल.
समुद्राने सांगितल्यानुसार सेतू बांधणे सुरू।झाले.।सगळी वानर सेना कामाला लागली. प्रत्येक खडकावर श्रीराम नाम लिहून नल निल चा हात लावून तो खडक पाण्यात सोडला जाऊ लागला. इकडे श्रीरामांनी सुरू केलेले कार्य सिद्धीस जावे म्हणून महादेवाचे आशीर्वाद घ्यावे म्हणून तिथे असलेल्या वाळूने मोठे महादेवाची पिंड बनवणे सुरू केले.
सगळेजण मिळून काम करू लागले. सगळेजण रामांचे स्तुतिगीत गाऊ लागले. सगळेजण सेतू बांधा रे सागरी असे स्फूर्तिगीत गाऊ लागले.
मोठं मोठ्या शिळा,खडके, झाडे, समुद्रात टाकून सेतू बांधणे सुरू झाले. ह्या सेतूने ते लंकेपर्यंत पोचणार होते. ज्याचा पदस्पर्श होताच कुठल्याही पाण्याला तीर्थ स्वरूप यावं अश्या पवित्र रामासाठी वानर सेना झटत होती. रामांचा जयघोष करता करता त्यांचे चाललेले कार्य बघून सगळ्या दिशा पृथ्वी आकाश पशु पक्षी सगळे भारावून गेले होते. त्यांच्या कार्यामध्ये एक खार सुद्धा लगबगीने छोटे छोटे दगड समुद्रात टाकून त्यांना मदत करत होती ते पाहून श्रीरामांना तिचे कौतुक वाटले व त्यांनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला त्यामुळे खारीच्या पाठीवर तीन पट्टे आहेत असे म्हणतात.
मोठ्या उत्साहाने वानर सेना सेतू बांधत होती. काही काळाच्या अविरत श्रमाने व प्रयत्नाने अखेर सेतू पूर्ण होत आला होता. राम जिंकणार रावण हरणार, हा सेतू नसून एक देदीप्यमान प्रकाशाचा झोतच रावणाच्या खालप्रवृत्तीने अंधारलेल्या लंकेत प्रवेशनार ह्याची वानर सेनेला खात्री पटू लागली.
इकडे रामांनी महादेवाची वालुकामय पिंड बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा केली व शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले व त्यांनी रामांना कार्यसिद्धीचा शुभाशीर्वाद दिला.
रामेश्वरम ते लंका( श्रीलंका )असा ३० मैल लांब व सव्वा मैल रुंद असा रामसेतू पूर्ण तयार झाला. राम लक्ष्मण व सेना लंकेकडे जाण्यास तयार झाले.
(रामकथेत पुढे काय होईल ते जाणून घेऊ उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏 जय कपी(वानर) सेना🙏🚩)
ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे बेचाळीसावे गीत:-
बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरी
गिरिराजांचे देह निखळूनी
गजांगशा त्या शिळा उचलुनी
जलांत द्या रे जवें ढकलुनी
सेतुबंधने जोडुन ओढा समीप लंकापुरी
फेका झाडें, फेका डोंगर
पृष्ठीं झेलिल त्यांना सागर
ओढा पृथ्वी पैलतटावर
वडवाग्नी तो धरील माथीं सेतू शेषापरी
रामभक्ति ये दाटुनि पोटीं
शततीर्थांच्या लवल्या पाठी
सत्कार्याच्या पथिकासाठीं
श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी
नळसा नेता सहज लाभतां
कोटी कोटी हात राबतां
प्रारंभी घे रूप सांगता
पाषाणाच हे पहा लीलया तरती पाण्यावरी
चरण प्रभुचे जळांत शिरतां
सकळ नद्यांना येइ तीर्थता
आरंभास्तव अधीर पूर्तता
शिळा होउनी जडूं लागल्या, लाट लाटांवरी
गर्जा, गर्जा हे वानरगण!
रघुपती राघव, पतीतपावन
जय लंकारी, जानकिजीवन
युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी
सेतू नच हा क्रतू श्रमांचा
विशाल हेतु श्रीरामांचा
महिमा त्यांच्या शुभनामाचा
थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी
बुभुःकारुनी पिटवा डंका
विजयी राघव, हरली लंका
मुक्त मैथिली, कशास शंका
सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★