गीत रामायणा वरील विवेचन - 43 - रघुवरा, बोलत का नाही Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 43 - रघुवरा, बोलत का नाही

सेतू बांधत असता रावण त्याचे हेर श्रीरामांच्या कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवतो. ते हेर श्रीरामांच्या सैन्यात कोण कोण आहे? केवढी मोठी वानर सेना आहे, त्यांची किती शक्ती आहे? ह्याची संपूर्ण माहिती काढतात. आणि रावणाला लंकेत जाऊन कळवतात. रावण ते ऐकून आपल्या सैन्याला युद्धाची तयारी करण्याचे आदेश देतो. रावणाचा कनिष्ठ भ्राता विभीषण रावणाला पदोपदी समजावतो.


"हे लंकेश अजूनही वेळ गेली नाही. रामाला त्याची पत्नी सन्मानपूर्वक अर्पण करा आणि लंकेचा विध्वंस होण्यापासून वाचवा. श्रीराम दयाळू आहेत ते तुम्हाला क्षमा करतील. आपण अत्यंत महान राजे आहात. पुलत्स ऋषींचे पुत्र आहात. आपण शंकराचे परम भक्त आहात. आपल्याला एका परस्त्री साठी असे युद्ध करणे शोभत नाही. ज्या स्त्रीचे तुमच्यावर प्रेम नाही तिला बळजबरीने बंदिस्त ठेवण्यात कोणता पुरुषार्थ आहे? आपल्या सारख्या पराक्रमी वीराने हे कृत्य करणे अयोग्य आहे. देवी मंदोदरी सारखी सर्वगुणसंपन्न भार्या असताना आपण परस्त्री ची अभिलाषा करणे चुकीचे आहे. आपल्या परस्त्री मोहामुळे आपण नाहक लंका वासीयांना धोक्यात टाकता आहात.",विभीषण कळवळून रावणाला समजवण्याचा प्रयत्न करतो पण रावण काही समजून घेण्याऐवजी विभीषणावर क्रोधीत होतो व त्याच्यावर लत्ता प्रहार(लाथ मारून) करून त्याला लंकेच्या बाहेर हाकलून देतो. रावणाला त्याची माता,भार्या सगळे समजवतात पण तो कोणाचेही ऐकत नाही.


विभीषण इकडे आकाशमार्गे समुद्र तटावर येऊन वानर सेनेत सामील होतो. आधी विभीषणाला लक्ष्मण पाहतो आणि हा शत्रू आहे असे वाटून शंकीत होतो पण हनुमान सगळ्यांना विभीषणाची ओळख सांगतो व विभीषण रामाचाच भक्त आहे असे सांगतो.

[हनुमान सीता देवींना निरोप द्यायला जेव्हा लंकेत गेले असतात तेव्हा ते एका प्रासादाच्या बाहेर उभे असता त्यांना आतून राम नामाचा जयघोष कानी पडतो. काही वेळाने त्यांची प्रासादातून आलेल्या विभीषणाशी भेट होते व विभीषण हा रावणाचा भाऊ असून सज्जन आहे व श्रीरामांचा निस्सीम भक्त आहे ह्याची हनुमानस ओळख पटते.]

श्रीराम विभीषणाची मैत्री स्वीकारतात. विभीषण रामांना लंकेची, तेथील सैन्याची,रावणाची संपूर्ण माहिती देतो.


इकडे रावण देवी सीतेचे मन वळवण्यासाठी एक क्लुप्ती योजतो. त्याला वाटते राम इथे येईपर्यंत सीता जर माझी पत्नी झाली तर राम काहीही करू शकणार नाही म्हणून तो एका राक्षसाकरवी रामांचे एक मायावी शीर बनवून घेतो व एक धनुष्य बाण तयार करवून घेतो व सेवकांसह वाटीकेत सीतेजवळ जाऊन एका थाळीत रामांचे ते मायावी शीर आणि धनुष्य बाण ठेवायला सांगून सीता देवींना म्हणतो,


"हे बघ सीते मी तुला म्हंटल होतं की तुझ्या रामाचा माझ्या पुढे काहीही निभाव लागणार नाही. माझ्या सेनापतीने राम निद्रिस्त असताना त्याचा शिरच्छेद केला व हे तुला खात्री पटावी म्हणून त्याचे शीर व हा त्याचा धनुष्य बाण इथे आणला आहे. आता ज्या रामाची तू वाट बघत होती तो कधीही येणार नाही. ज्या रामासाठी तू मला एवढा काळ अव्हेरले तो रामच आता राहिला नाही तेव्हा आता जास्त वेळ न दवडता त्वरित माझ्याशी विवाह करण्यास तयार हो",रावणाने असे म्हणताच सीता देवींना धक्का बसतो. आपण काय ऐकलं ह्याचा त्यांना क्षणभर अर्थ बोधच होत नाही. त्या एकटक त्या थाळी मधील शीर बघत राहतात आणि अचानक त्यांना हुंदका फुटतो व अश्रुधारा वाहू लागतात व त्या थाळीतील रामांच्या मायावी शीराला खरे मानून त्याला उद्देशून बोलू लागतात,


"रघुवरा! हे काय घडलंय! मला माझ्या कानांवर, डोळ्यांवर विश्वास बसत नाही. माझ्या आधी तुमचे जाणे कसे शक्य आहे? ज्योतिष्याने सांगितलेले भविष्य वर्तन सगळे चुकीचे कसे निघाले? माझ्या दुर्दैवाने हा काय प्रहार केला माझ्यावर. मी हे शीर खोटं तरी कशी म्हणू ? हेच कमलनेत्र, हेच कर्ण(कान) ,हाच चेहरा. असं कसं अघटित घडलं? माझ्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली मी किती अभागिनी आहे! एका क्षणात माझ्यापासून माझं सर्वस्व हिरावल्या गेलं आहे. हे रघुवरा माझ्या रडण्याचा आवाज ऐकून तरी तुम्हाला ह्या चिरनिद्रेतून जाग येईल काय? हे धनुष्य मी ओळखले पण त्याला धारण करणारे बलशाली बाहू कुठेय? आता माझ्या स्वामींची ती श्यामल मूर्ती मला पुन्हा कधीच दिसणार नाही? ह्या पृथ्वीची गती थांबली आहे आणि ह्या सगळ्या दिशा सुन्न झाल्या आहेत असे मला वाटतेय. ",अविरत रडत सीता देवी बोलत असतात.


त्या पुढे म्हणतात, "विवाहात घेतलेल्या शपथा तुम्ही कसे बरे विसरलात? माझा निरोप न घेता असे अचानक कसे निघून गेलात?


(आपल्या भारतीय संस्कृती मध्ये विवाहात 'धर्मेच अर्थेच कामेच मोक्षेच इमं नातिचरामि॥ ' अशी शपथ असते. म्हणजे धर्माच्या,अर्थाच्या,कामाच्या,मोक्षाच्या ठिकाणी पती सदैव पत्नीसोबतच राहीन अशी शपथ घेतो म्हणजे एकंदरीत कुठलीही परिस्थिती येवो मी तुला एकटं सोडणार नाही असे पती विवाहाच्या वेळेस पत्नीला वचन देतो.)


माझी आर्त हाक तुम्हाला ऐकू येते का? तुम्ही स्वर्गात जाऊन पूर्वजांना भेटले पण इथे तुमची जानकी परक्याच्या कैदेत जिवंत आहे ह्याची तुम्हाला काहीच कशी जाणीव नाही? हे रघुकुळाला शोभणारे वर्तन नाही.


मला सोडवण्यासाठी अथांग सागर ओलांडून आपण इथवर आलात ते सगळं का व्यर्थ गेलं? माझ्यासारखी कुळाचा नाश करणारी स्त्री धरणीच्या पोटी कशी जन्मली? माझ्या पित्याने जे यज्ञ, धार्मिक कार्य केले होते ते असे कसे व्यर्थ गेले? कौसल्या देवींनी कमावलेलं पुण्य सगळं कसं व्यर्थ गेलं?",अत्यंत दुःखाने नैराश्याने सीता देवी बोलत असतात.


अखेर रावणाशी निर्वाणीचे बोलताना त्या म्हणतात,


"रावणा! ज्या शस्त्राने तू माझ्या स्वामींचा वध केला त्याच शस्त्राचा घाव माझ्यावर सुद्धा घाल म्हणजे रामसोबत तर जाऊ शकली नाही परंतु रामांच्या मागे तरी ही वैदेही सीता जाऊ शकेल."


सीता देवीचे हे बोलणे ऐकून रावणाचा भ्रमनिरास होतो.


{ह्या प्रसंगावरून सीता देवींना झालेलं अतीव दुःख, बसलेला तीव्र धक्का, वेदनेचा आक्रोश स्पष्ट होतो. चारित्र्यवान स्त्री कशी अखेरपर्यंत आपल्या पतीशी एकनिष्ठ एकरूप असते हे स्पष्ट होते. इथे सीता देवी पतीच्या पश्चात ही त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत. रावणाला वाटलं की पती पश्चात सीता आपल्याला प्राप्त होईल पण ते खोटं ठरलं. कारण सीता आणि राम हे एकरूप आहेत त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही.


रावणाने एका स्त्रीमोहामुळे आपली पातळी किती घसरवली, आपल्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ परस्त्री ची मनधरणी करण्यात गमावला आणि आपला विनाश कसा ओढवला हे ह्यातुन स्पष्ट होते. जे आपले नाही त्याचा व्यर्थ लोभ मोह करू नये मग ती स्त्री असो किंवा सत्ता किंवा पैसा ह्यातून हा बोध घेण्यासारखा आहे. }


(रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जयश्रीराम🙏 जय सीता माई🙏)



ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे त्रेचाळीसावे गीत:-


काय ऐकतें? काय पाहतें? काय अवस्था ही?

रघुवरा, बोलत का नाही?


जायेआधीं मरण पतीचें, हें कैसें घडलें?

दैवच अंती तुटुन खड्गसे माझ्यावर पडलें

पुण्यहीन का ठरल्या लोकीं कौसल्यामाई?


ज्योतिषांचीं ग्रहगणितें का सर्वथैव चुकलीं?

अभागिनी ही कशी अचानक सर्वस्वा मुकली?

धुळींत निजले पुरुषोत्तम का या मूढेपायीं?


ओळखितें मी कमलनेत्र हे, ओळखितें श्रवणें

सरे न का ही झोंप राघवा, दीनेच्या रुदनें?

गतीहीन कां झाली सृष्टी, सुन्‍न दिशा दाही?


सुवर्णधनु हें ओळखिलें पण कुठें महाबाहु?

श्यामवर्ण ती मूर्त पुन्हां मी कुठें कधी पाहूं?

नयन जाहले रडुन कोरडे, अंगाची लाही


विवाहसमयीं शपथ दिली ती विसरलांत सखया!

पुशिल्यावांचुन स्वर्गी गेला सोडुनिया जाया

ऐकलेंत का? - जनकनंदिनी आर्त तुम्हां बाही


रघुकुलतिलका, तुम्ही भेंटला पितरांना स्वर्गी

परक्या हातीं सजीव उरली अर्धांगी मार्गी

रघुकुलजातें शोभुन दिसली रीत तरी का ही?


अथांग सागर जिंकुन आला कशास मजसाठीं?

काय जन्मलें कुलनाशिनि मी धरणींच्या पोटीं?

जनकें केले यज्ञ, तयांची काय सांगता ही?


हे लंकेशा, ज्या शस्‍त्रानें मारविलें नाथां

घाव तयाचा घाल सत्वरीं सीतेच्या माथां

रामामागें तरी जाउ दे अंती वैदेही

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★