गीत रामायणा वरील विवेचन - 44 - सुग्रिवा हे साहस असले Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 44 - सुग्रिवा हे साहस असले

रावण पुन्हा देवी सीतेकडून अपयश घेऊन आपल्या प्रासादात निघून जातो तो गेल्यावर त्रिजटा नामक एक राक्षसीण दुःखाने व्याकुळ झालेल्या सीता देवींना श्रीराम सुखरूप असून ते शीर मायावी आहे असे सांगते ते ऐकून सीता देवींचा आनंद गगनात मावत नाही. त्या डोळे पुसतात व पुन्हा त्यांचे मन श्रीरामांची आतुरतेने वाट पाहू लागते.


इकडे श्रीराम आपल्या सेनेसह समुद्रपार करून लंकेजवळ पोचले असतात. श्रीराम,लक्ष्मण,हनुमान,विभीषण व सुग्रीव लंके बाहेर असलेल्या एका पर्वतावरून लंकेचं अवलोकन करत असतात. त्याच वेळी रावण सुद्धा त्याच्या प्रासादातील उंच जागेवरून सेनेची पाहणी करीत असतो. विभीषण श्रीरामांना लंकेतील प्रत्येक जागेची बारकाईने माहिती देत असतो तेवढ्यात सुग्रीवाचे लक्ष कुठेतरी केंद्रित होते व तो कोणालाही न सांगता तिथे झेप घेतो.


सुग्रीव,रावण जिथे उभा असतो तिथे झेप घेतो आणि त्याच्याशी द्वंद्व युद्ध सुरू करतो. दोघांमध्ये अटीतटीची मारामारी होते. रावण त्याच्या मायावी शक्ती दाखवणं सुरू करतो. तेव्हा मात्र सुग्रीवाचा नाईलाज होतो त्याची शक्ती थिटी पडू लागते. आता जर आपण इथून पळालो नाही तर आपण नक्की मरणार ह्याची खात्री पटल्यावर सुग्रीव तिथून झेप घेऊन पुन्हा श्रीराम व इतर उभे असतात त्या पर्वत शिखरावर येतो.


तो अत्यंत जखमी अवस्थेत असतो. ते पाहून श्रीराम त्याला धीर देतात व म्हणतात,


"सुग्रीवा मला कळतेय तुझी मनाची अवस्था काय झाली होती. रावण दिसताच तुझा क्रोध अनावर झाला म्हणून तू असं केलं पण मित्रा असं विचार न करता मनात येईल ते वागणं तुझ्यासारख्या राजाला शोभत नाही. तो रावण मायावी आहे हे आपल्याला माहीत आहे तरीही तू कोणाला काही न कळू देता अचानक त्याच्यावर हल्ला करण्यास कसा काय गेला? न तू मला विचारले न नळाला किंवा लक्ष्मणाला मनातला हेतू सांगितला. कोणाला पुसटशी सुद्धा कल्पना न देता असं जीवघेणं साहस उचित नव्हतं. मला माहित आहे तू शक्ती शाली आहेस त्यावर मला शंका नाही. आणि माझ्यावरच्या भक्तीमुळे तू हे सगळे केले हेसुध्दा मला समजतेय परंतु तरीही हे कृत्य योग्य ठरले नाही. मला सांग! द्वंद्व करूनच जर तुला रावण वध करायचा होता तर ही एवढी मोठी वानर सेना आपण उगीच च जमवली का? समुद्रसेतु बांधून सगळ्यांना इथवर आणण्याचा खटाटोप उगीच केला का?


खऱ्या वीराला असं उत्तेजित होणे शोभा देत नाही. खरा योद्धा तोच जो आधी योजना तयार करतो आणि त्या योजनेप्रमाणे रणांगणात वागतो. रावणासोबत झुंजताना समजा तुझं काही बरं वाईट झालं असतं तर एका चांगल्या मित्राला मी गमावलं असतं आणि आपला राजा मरण पावला हे समजताच ही संपूर्ण वानर सेना खचली असती, त्यांना खचलेलं पाहून राक्षस सेना त्वेषाने लढली असती आणि रावणाचा विजय झाला असता त्यामुळे रावण गर्वाने आणखी उन्मत्त झाला असता मग सीतेला आपण कसे सोडवू शकलो असतो?


आपण अग्नीला साक्षी ठेवून ज्या शपथा, वचन दिले- घेतले होते ते व्यर्थ ठरले असते. मग त्या अधम रावणाला कोण मारू शकले असते? त्यामुळे आता यापुढे असे अविचारी साहस करू नको. समस्त वानर सेनेला एका ठिकाणी गोळा कर आणि युद्ध योजनेची त्यांना कल्पना दे. असे विनाकारण एकट्याने लढून तुझे शौर्य वाया घालवण्यापेक्षा आपण सगळे मिळून रावणाचा नायनाट करू.


{ह्या प्रसंगावरून आपण हा बोध घेऊ शकतो की कुठलीही कृती करताना पुढे त्यामुळे होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांचा आधीच विचार केलेला बरा. उत्तेजित न होता मन आणि मस्तिष्क शांत ठेवूनच कुठलही कार्य करावं तरच ते यशस्वी होते.}


(रामकथेत पुढे काय होईल ते जाणून घेऊ उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🚩🙏)



काव्यशिरोमणी गीतकार ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे चौरेचाळीसावे गीत:-



सुग्रीवा, हे साहस असले

भूपतीस तुज मुळिं न शोभलें


अटीतटीचा अवघड हा क्षण

मायावी तो कपटी रावण

भिडलासी त्या अवचित जाउन

काय घडें तें नाहीं कळलें


विचारल्याविण मला, विभिषणा

सांगितल्याविण नला, लक्ष्मणा

कुणा न देतां पुसट कल्पना

उड्डणा तव धाडस धजलें


ज्ञात मला तव अपार शक्ति

माझ्यावरची अलोट भक्ति

तरीहि नव्हतें योग्य संप्रति

अनपेक्षित हें काही घडले


द्वंद्वे जर तुज वधणें रावण

वृथा जमविलीं सैन्यें आपण

कशास यूथप वा वानरगण

व्यर्थच का हे ऋक्ष मिळविले?


काय सांगुं तुज, शत्रुदमना

नृप नोळखती रणीं भावना

नंतर विक्रम, प्रथम योजना

अविचारें जय कुणा लाभले?


तू पौलस्त्यासवें झुंजता

क्षीण क्षण जर एकच येता

सन्मित्राते राघव मुकता

तव सैनिक मग असते खचले


काय लाभतें या द्वंद्वानें?

फुगता रावण लव विजयानें

लढते राक्षस उन्मादानें

वानर असते परतच फिरले


दशकंठचि मग विजयी होता

मैथिलीस मग कुठुन मुक्तता?

व्यर्थच ठरतीं वचनें शपथा

कुणी राक्षसां असतें वधिलें?


जा सत्वर जा, जमवी सेना

करी रणज्ञा, सुयोग्य रचना

आप्त-सैन्यासह वधूं रावणा

व्यर्थ न दवडी शौर्य आपुले

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★