गीत रामायणा वरील विवेचन - 53 - प्रभो मज एकच वर द्यावा Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गीत रामायणा वरील विवेचन - 53 - प्रभो मज एकच वर द्यावा

{तुलसीदास कृत तुलसी रामायण हे श्रीरामांच्या राज्यभिषेकानंतरच संपते. उत्तर रामायण त्यात नाही तसेच सीता देवींनी जी अग्निपरीक्षा दिली त्याबद्दल तुलसीदासांचे असे मत आहे की रावणाच्या कैदेत जी सीता होती ती खरी नसून सीतेची प्रतिकृती होती खऱ्या सीता देवी अग्नी कडे सुरक्षित होत्या म्हणून रावणाच्या वधानंतर खोटी सीता अग्नीत प्रवेशली आणि खरी सीता अग्नी देवाने श्रीरामांना अर्पण केली. गीतरामायण हे वाल्मिकी रामयणावर आधारित असल्याने ह्यात उत्तर रामायण आहे तसेच मागील ५१ व्या गीतात नमूद केल्या प्रमाणे अग्निपरीक्षा सुद्धा आहे.}


श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा आनंदात पार पडल्यावर सगळे आप्त मंडळी श्रीरामांचा निरोप घेतात. सुग्रीव,विभीषण ह्यांना भेटवस्तू देऊन श्रीराम निरोप देतात.


"सुग्रीवा तू माझ्या भावप्रमाणेच आहेस. आज तुझ्या व वानर सेनेच्या मदतीने आपण हा दिवस पाहू शकलो. आता किष्किंदेचे राज्य भूषव. माझ्या तुला खूप शुभेच्छा आहेत.",श्रीराम


"प्रभू ही तर आपली नम्रता आहे. जो काही पराक्रम केला तो आपणच. आम्ही तर केवळ निमित्तमात्र होतो. आपल्या आशीर्वादाने मी कृतकृत्य झालो. आपले प्रेम कायम असेच राहील. आता आज्ञा असावी.",असे म्हणून सुग्रीव किष्किंदेला रवाना होतो.


"विभीषणा! लंकेत जाऊन निरपेक्षपणे आणि सुखाने राज्य कर. लंकेची जनता तुझ्या सारखा सद्गुणी राजा लाभल्यामुळे धन्य झाली आहे.",श्रीराम


"हे सगळं आपल्या कृपेने झालं प्रभू! मी आपला उपकृत आहे. आता आज्ञा असावी",असे म्हणून विभीषण सुद्धा लंकेकडे प्रयाण करतो.


त्यानंतर हनुमान श्रीरामांच्या पुढे येऊन त्यांना अभिवादन करतात. त्यांना पाहून श्रीराम प्रेमाने म्हणतात,


"बोल हनुमंता तुला काय आशीर्वाद देऊ? तू तर माझा भाऊ,मित्र,दूत,भक्त अडचणीतून मार्ग काढणारा,मदत करणारा,जीवाला जीव देणारा जिवलग आहे. माझ्या हृदयात तू आणि तुझ्या हृदयात मी आहे. जिथे तुझं नाव घेतील तिथे मी असेलच आणि जिथे माझं नाव घेतल्या जाईल तिथे तू असशीलच असे एकरूप आहोत आपण तेव्हा तुला वेगळा काय आशीर्वाद, शुभेच्छा देऊ?",श्रीरामांनी असे म्हणताच हनुमंत सद्गदित होऊन म्हणतात,


"प्रभो! मला एकाच वर द्या की तुमच्या चरणी माझा भाव कायम रहावा. माझे चंचल मन कधीही तुमच्या भक्तीपासून ढळू नये. जोपर्यंत ह्या जगात रामकथा सांगितल्या जाईल तोपर्यंत मला आयुष्य असावं. सदैव माझ्या मुखी रामकथा असावी. सदा रामकथा माझ्या कानावर पडावी, श्रीरामांशीवाय मला दुसरा कुठलाच छंद नसावा. आपले पवित्र चरित्र मला देव,अप्सरा,तिन्ही लोकांत सांगायची आहे. रामकथा अखंड ऐकण्यासाठी मला अमरत्व मिळावं. आकाशातील ढगांप्रमाणे मला राम स्तुती अखंड स्वतः मध्ये भिनवायची आहे तसेच अखंड जनमानसात त्याचा वर्षाव करायचा आहे. माझा संपूर्ण जन्म रामाचे चिंतन करण्यात जावा. सदैव डोळ्यासमोर राम राम आणि फक्त रामच दिसावा. जोपर्यंत हे जग सुरू आहे तोपर्यंत जिथे जिथे रामायण सुरू असेल तिथे तिथे जाऊन मला ते श्रवण करता यावं. ह्या जगात असंख्य लोकं आहे , त्यांच्या असंख्य भाषा आहेत त्या सगळ्यांनी रामकथा गावी,त्या सगळ्यांना रामकथेचे महत्व मला सांगता यावे. सूक्ष्म अतिसूक्ष्म देह धारण करून मला पृथ्वीवर स्वर्गात कुठेही फिरता यावं आणि प्रत्येक स्थळी सुरू असलेल्या रामकथेचा लाभ मला व्हावा व रामकथेचा प्रसार मी ठिकठिकाणी करू शकावा असा मला आशीर्वाद द्या प्रभू! ह्यावाचून अन्य मला काही नको.",असे म्हणून हनुमंत श्रीरामांना चरणस्पर्श करतात. त्यांना हलकेच उठवून श्रीराम त्यांना गाढ आलिंगन देतात. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू झरू लागतात. ती अतुलनीय भक्तीप्रेम बघून क्षणभर काळही भारावून स्तब्ध होतो.


श्रीराम हनुमंतांना आशीर्वाद देतात,


"तथास्तु! हनुमंता! तुला जे पाहिजे तसेच होईल. तू चिरंजीवी होशील. जिथंही रामकथा सुरू असेल तिथे सगळ्यात आधी आणि सगळ्यात नंतर जाणारा श्रोता तूच असशील. हा तुझ्या रामाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील."


{ म्हणून हनुमान चिरंजीव आहेत. अमर आहेत. आजही जिथे जिथे रामकथा सुरू असते तिथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असे आढळून येईल की हनुमंत कुठल्या ना कुठल्या रुपात तिथे हजर असतातच. रामकथा सुरू असताना एखादी व्यक्ती तुम्हाला दिसेल की जी सगळ्यात आधी येऊन बसते आणि सगळ्यात नंतर जाते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः हनुमंतच असतात. हनुमंतां एवढया पात्रतेचा प्रत्येक भक्त जरी नसला तरीही प्रत्येक निस्सीम भक्ताच्या मनात हेच भाव असतील असे मला वाटते. हे गीत भक्तीप्रेमाचे अत्यंत उत्तम वर्णन करणारे गीत असल्याने संपूर्ण गीतरामायणातील माझे सगळ्यात आवडते गीत आहे.}


(रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩 जय हनुमान🙏🚩)


ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे त्रेपन्नावे गीत:-


प्रभो, मज एकच वर द्यावा

या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा


कधिं न चळावे चंचल हें मन

श्रीरामा, या चरणांपासुन

जोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा


रामकथा नित वदनें गावी

रामकथा या श्रवणीं यावी

श्रीरामा, मज श्रीरामाविण दुसरा छंद नसावा


पावन अपुलें चरित्र वीरा

सांगुं देत मज देव अप्सरा

श्रवणार्थी प्रभु, अमरपणा या दीनासी यावा


मेघासम मी अखंड प्राशिन

असेल तेथुन श्रीरामायण

मेघापरी मी शतधारांनीं करीन वर्षावा


रामकथेचें चिंतन गायन

तें रामांचें अमूर्त दर्शन

इच्छामात्रें या दासातें रघुकुलदीप दिसावा


जोंवरि हें जग, जोंवरि भाषण

तोंवरि नूतन नित रामायण

सप्तस्वरांनी रामकथेचा स्वाद मला द्यावा


असंख्य वदनें, असंख्य भाषा

सकलांची मज एकच आशा

श्रीरामांचा चरित्र-गौरव त्यांनी सांगावा


सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी

फिरेन अवनीं, फिरेन गगनी

स्थलीं स्थलीं पण रामकथेचा लाभ मला व्हावा

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★