Consider the work of the kingmaker books and stories free download online pdf in Marathi

किंगमेकरचं कार्य विचारात घ्यावं

*किंगनं किंगमेकरचं कार्य विचारात घ्यावं?*

*पुर्वी किंग जो बनायचा. तो आपल्या जनतेचं कार्य विचारात घ्यायचा. तसे काही अपवाद होतेच. आज मात्र तसं नाही. आजचे बरेच शासनकर्ते शासनकर्ते बनले. परंतु जसे ते शासनकर्ते बनले. तसे ते किंगमेकर भुमिका वठविणाऱ्या जनतेला विसरले व त्यांनी सत्तेवर येताच किंगमेकर असलेल्या जनतेसाठी कार्य केले नाही तर जनतेलाच लुटून अमाप संपत्ती गोळा केली की ज्या संपत्तीचं मोजमापच करता येत नाही.*
किंगमेकर........किंगमेकर याचा अर्थ राजा बनविणे किंवा राजाला तयार करणे. राजा बनविण्यात प्रजेचं खास महत्व आहे पुर्वीच्या काळात काही आदिवासी समुदायात राजा बनविण्याची पद्धत ही वेगळीच होती. त्या आदिवासी समुदायात राजा बनवितांना जो कोणी अनोळखी व्यक्ती त्याच्या राज्यात येत असे. त्या अनोळखी व्यक्तीची ते परीक्षा घेत व त्याला राजा बनवीत. त्यानंतर तो राजा बनल्यानंतर संपूर्ण वर्षभर त्या अनोळखी व्यक्तीच्या आज्ञेत वागत असत. आजही भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतात राजा हा जनतेतूनच निवडून येतो. जनता मतदान करते व पाच वर्षासाठी जनता प्रतिनिधीक स्वरुपाचा राजा बनवते. मग पाच वर्षपर्यंत तो राजा निरंकुश पद्धतीनं वागत असला तरी भारतीय जनतेला ते सहनच करावं लागतं. मात्र स्वित्झर्लंडमध्ये तसं नाही. तिथं राजाला पदच्यूतही करण्याची पद्धत आहे. जर त्यानं जनतेचं काम नाही केलं तर......आणि तीच पद्धत अतिशय योग्य पद्धत आहे.
भारतीय इतिहासाचा अभ्यास केला तर काही काही शासक हे पुर्वीही जनतेनंच बनवलेले आढळून येतील तर काही काही शासक हे स्वतः बनलेले आढळून येतील. जसा बादशाहा औरंगजेब जेव्हा बादशाहा बनला, तेव्हा त्यानं पदलालसेपोटी आपल्या स्वतःच्या भावांची हत्या केली. तसेच आपल्या स्वतःच्या वडीलाला कैदेत टाकले. परंतु शिवाजी जेव्हा राजे बनले. तेव्हा त्यांनी जनतेचं मत विचारात घेतलं. त्यानंतरच त्यांना राजे बनता आलं. त्यानंतर संभाजी, राजाराम व खुद्द छत्रपती शाहू राजे बनले. तेव्हा त्यांना राजपद त्या काळातील मंत्रीमंडळानं बहाल केलं.
राजा कोणीही बनो. प्रश्न हा नाही की राजानं प्रजेला विसरावं. त्यांचं ऐकू नये. त्यांच्या हिताचं कार्य करु नये. हं, राजा जर स्वप्रयत्नानं बनला तर ठीक आहे. परंतु कोणताच राजा स्वप्रयत्नानं राजा बनत नाही आणि राजपद धारण करीत नाही. त्यासाठी त्याला जनतेचं थोडंसं सहकार्य घ्यावंच लागतं. जसा युद्धाचा जर प्रसंग आलाच तर युद्धही करावंच लागतं आणि असं युद्ध करतांना त्यांना सैनिकांनी गरज पडते. आता सैनिक कोण? असा प्रश्न केल्यास त्या सैनिकांना प्रजाच म्हणता येईल. परंतु बऱ्याचशा राजांनी ती गोष्ट लक्षात न घेता निरंकुशपणाचं प्रदर्शन केलं व विसरलेत की आपण या राजपदावर आलोत. हे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं नाही तर आपल्यासाठी हे सैनिक लढले. त्यांनी वीरमरण पत्करलं. म्हणूनच आपल्याला या पदावर येता आलं.
आज तेच होत आहे. राजपद धारण करणारा व्यक्ती जरी जरी पाच वर्षासाठी राजपद धारण करीत असला तरी तो निवडणुकीत निवडून येताच जनतेला विसरतो. तो पाच वर्षापर्यंत कधीच जनतेत फिरकत नाही. जनतेच्या समस्या जाणून घेत नाही. महागाईचं त्याला काहीच वाटत नाही. घरच्या सिलेंडरची भाववाढ होते. काहीच फरक पडत नाही त्या राजपद धारण करणाऱ्या व्यक्तीला. पेट्रोल, डिझेल वाढतो. त्याचंही काहीच लेनदेण नाही. जनता हाल बेताल सहन करते. त्याचंही काहीच घेणंदेण नाही. उलट जो एस टी नावाचा प्रत्येक कर प्रत्येक माणसाची पंचाईत करीत असते. बँक प्रत्येक माणसाच्या तालावर चालायला पाहिजे. परंतु ती आज लोकांना केरकचरा समजून केरकचऱ्यासारखी वागणूक देतांना दिसते. उद्योगपतीची तर आजच्या काळात चांदीच चांदी आहे. आजच्या काळात दुरदर्शनचे पैसे भरावे लागतात. पैसे भरल्याशिवाय दुरदर्शनवर चित्र दिसत नाहीत. याचाच अर्थ राजपदानं जनतेला मनोरंजनाचं साधन असलेलं मनोरंजनाचं साधन हिसकावलं. पैसा असेल तरच मनोरंजनाचा उपभोग घ्या असं सरकारचं तत्व.
आज राजपदाच्या कारणानं मोबाईलवर बोलायचे पैसे भरावे लागतात. मोबाईलमध्ये पैसे नसेल तर सिलेंडर घेता येत नाही. कारण नंबर लावायला मोबाईलवर बोलावं लागतं आणि पैशाशिवाय मोबाईलमधून बोलता येत नाही. आज राजपदानं शाळाही उद्योगपतींच्या घशात जात असून पुढं शिक्षणही निःशुल्क मिळणार की नाही हाही एक प्रश्न आहे. तसंच बँकेत पैसे असतील आणि व्यवहार केल्या गेला नाही तर ते पैसे पुर्णतः आपल्याला परत मिळतीलच याची शाश्वती नाही. त्यातच दरवर्षी के वाय सी करावी लागत असल्यानं त्याला लागणारे शुल्क ते जनतेच्याच खिशातून जात आहे. त्यामुळं कमाई करुन मिळवला जाणारा पैसा हा पोटासाठी खर्च करायचा की केवळ त्या पैशातून केवळ सरकारचेच पोट भरायचे? असाही एक प्रश्न जनतेला कधी कधी पडतो.
जनता सरकारला अनन्वीत पैसा देत आहे. प्रत्येक गोष्टीचा कर भरुन. प्रत्येक गोष्टीत कर भरत आहे. त्यासाठी जनता कितीतरी प्रमाणात कष्ट उपसत आहे. परंतु त्याचा सरकारला काही विचार नाही. सरकार फक्त बोलते. कर्तृत्व तशा बोलण्यासारखं नाही. काळा पैसा सरकारनं देशात परत आणू म्हटलं. तो आला नाही.
सरकारला सर्व हिरवं हिरवं दिसतं. कारण लोकांचे पैसे बँकेत आहेत. अकाऊंटवरुन दिसून येतं. परंतु हे खाते कसे उघडले? हे सरकारला माहीत नाही. शिवाय प्रत्येकाजवळ मोबाईल आहे आणि त्याचा रिचार्जही जनता करते. परंतु तो कसा करते? त्यासाठी काय काय मशागत करते हे सरकारला ठाऊक नाही. तसाच मनोरंजनासाठी टीव्हीचा रिचार्ज करते. कारण त्यांना लेकरांचं मनोरंजन करुन घ्यावं लागतं. लेकरं कॉन्व्हेंटला शिकवितात. कारण चांगलं शिक्षण आपल्याही मुलांना मिळावं ही जनतेची अपेक्षा. काही लोकं तर सरकारीच शाळेत शिकवितात. ज्या शाळेत शिक्षकच दिसत नाही. ते शिक्षक मराठा आरक्षण, अध्ययन निष्पत्ती प्रशिक्षण, ऑनलाईन कामं यात व्यस्त असतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की सरकारला सगळं हिरवं जरी दिसत असलं तरी त्यात ती जनता घरी आपलं आयुष्य कसं काढते. काय काय सहन करते आयुष्य जगतांना. ती बँकेत पैसे ठेवते. घरी मात्र उपाशी राहावं लागतं. सरकारनं सांगीतलं होतं की बँकेत खाते उघडा. पंधरा हजार रुपये येणार. आलं काहीच नाही. परंतु खाते तर उघडले गेले ना बँकेत. आता आमचे बँकेतील पैसे व्यर्थ जाईल व प्रत्येक सरकारी योजनेला बँकेचं खातं लागतं म्हणून बँकेत खातं सुरु ठेवणं सुरु आहे व ते खातं बंद होवू नये म्हणून दरवर्षी पैसे लावून के वाय सी ही करणं सुरु आहे.
महत्वाचं म्हणजे ज्या जनतेनं किंग बनवला. तो किंग किंगमेकर असणाऱ्या याच जनतेला विसरला असून ती जनता कशी आहे. सुखी आहे की नाही याचं त्या किंगला काही घेणंदेणं नाही. केवळ रस्ते बनविण्यानं व बँकेत खातं उघडून घेतल्यानं किंगची योग्य भुमिका दिसून पडत नाही. त्यासाठी जनतेची निदान प्राथमिक गरज पुर्ण होणं गरजेचं आहे. इथं तर राशनच्या दुकानातून जीवनोपयोगी वस्तू निःशुल्क मिळतात. कोणाला तर ज्याच्या घरी चार चार गाड्या आहेत. ज्यांची घर तीन मजली आहे. ज्याला चार चार मुलं आहेत. जे गरीब नाहीत. खरंच तसं राशन देतांना त्याची आर्थिक स्थिती तपासली काय? तपासून घेण्याची गरज नाही काय? राशनही त्यालाच मिळतं. ज्याला आवश्यकता नाही. अन् ज्याला आवश्यकता आहे, त्याला राशन मिळत नाही.
आधुनीक काळातील किंगमेकर म्हणजे जनता. पुर्वी जो राजा बनायचा. त्याला राजा जनता बनवायची. तो आपल्या जनतेचं कार्य विचारात घ्यायचा. तसे काही राजे अपवाद होतेच. आज मात्र तसं नाही. आजचे बरेच शासनकर्ते स्वतःला राजा मानतात. ते लोकांच्या मतदानानं निवडून येतात व शासनकर्ते बनतात. त्यानंतर ते किंगमेकर असलेल्या जनतेला विसरतात व ते सत्तेवर येताच किंगमेकर असलेल्या जनतेसाठी कार्य करीत नाही तर जनतेलाच लुटून अमाप संपत्ती गोळा करतात की ज्या संपत्तीचं मोजमापच करता येणं शक्य होत नाही.
किंग महासत्तेचा विचारवंत नसल्यानं देश महासत्ता बनत नाहीत. केवळ मोठंमोठे आश्वासन दिल्यानं देश महासत्ता बनत नाही. त्यासाठी तेवढंच कर्तव्यही हवं. सकारात्मक असलेलं कर्तव्य. तेव्हाच देश महासत्ता बनेल. देश महासत्ता बनविण्यासाठी प्रत्येक देशातील नागरीकांचं मत विचारात घेणं गरजेचं. तसंच राजा बनताच जनतेला विसरुन वा जनतेची दिशाभूल करुन देश महासत्ता कधीच बनवता येणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय