भगवद्गीता अध्याय ९वा.
मी हे सर्व जग व्यापले आहे, पण त्यात न दिसता.
सर्व भूतमात्रांच्यात मी आहे पण मी त्यांच्यांत नाही.
माझे योग ऐश्वर्य पहा. हे सर्व विश्व माझ्या ठायी आहे. हे सर्व जग माझाच विस्तार आहे. वारा सर्वत्र वाहात असतो तरी नभात असतो तसे सर्व भूतमात्र माझ्यात राहतात.
कल्पाचा अंत होतो तेव्हा सर्व माझ्यात विलीन होतात. व कल्पाचा आरंभ होतो तेव्हा मी सर्व भूतमात्रांना मी निर्माण करतो. मी ही कर्मे करीत असलो तरी ती मला बद्ध करत नाहीत.
मी या सर्व करण्यापासून अनासक्त, अलिप्त असतो. सर्व भौतिक सृष्टि माझ्या अधिन आहे. माझ्या इच्छेनुसार तीची उत्पत्ति होत व नाश होत असतो.
माझ्या मानव अवतारात कांहीं मुर्ख माझा उपहास करतात. मला ओळखत नाहीत. माझ्या दिव्य रूपाला जाणत नाहीत.
माझ्या अलौकिक महेश्व़री रूपाला व सार्वभौमत्वाला जाणत नाहीत.
आणि असे भ्रमीत झालेले लोक विवेकशून्य व आसुरी प्रवृत्तीचे असतात. जे महात्मे असतात ते दैवी शक्तीच्या संरंक्षणात असतात.
ते मला सर्व श्रेष्ठ परमेश्वर मानत असल्याने माझ्या भक्तित रममाण असतात.
ते माझी स्तोत्रे गात असतात. दृढ निश्चयाने मला शरण येतात. हे सर्व माझी सातत्याने भक्तिभावाने माझी पुजा करत असतात.
मी कर्मकांड आहे, मीच यज्ञ, पितरांना अर्पण केलेले मी, मीच मंत्र, मीच तुप, मीच अग्नी व यज्ञातील आहुति पण मीच.
या जगाचा प्रपिता, पिता व माता.
मीच पोशिंदा म्हणजेच रक्षणकर्ता.
मीच प्रणव, मीच ऋग्वेद, मीच सामवेद आणि यजुर्वेद ही. मी ध्येय व मीच मित्र व रक्षक. मीच उत्पत्ति, विनाश, मीच बीज आणि सर्वांचा आधार मी व मीच आश्रयस्थान.
उष्णता, पाऊस, दुष्काळ यांचे मीच व्यवस्थापन करतो.
मी अमरत्व व मृत्यू.
मीच जीवांतील चैतन्य व अचेतन पण मी.
जे वेदांचे अध्ययन करतात व सोमरसाचे प्राशन करतात व यज्ञ करून स्वर्गसुख मागतात ते इंद्र लोकात जाऊन स्वर्ग लोकात देवांप्रमाणे सुख प्राप्त करतात.
स्वर्गलोकात सुख भोगल्यावर पुण्यसंचय संपल्यावर त्यास पुनर्जन्म मिळतो.
अशा रीतीने वेद धर्माचे पालन करणाऱ्या व कामना ठेवणाऱ्यांना क्षणीक सुख प्राप्त होते. पण ते जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात.
जे लोक माझी अनन्य भक्तिभावाने माझे चिंतन करतात त्यांचा योगक्षेम मी चालवतो. हे कौंतेया, जे साधक श्रद्धेने अन्य देवतांची भक्ति करतात ते अजाणतेपणी माझीच पुजा करत असतात.
सर्व यज्ञांचा हेतू , भोक्ता , स्वामी मीच आहे. जे मला जाणत नाहीत त्यांचे पतन होते.
जे लोक इतर देवांची भक्ति करतात ते त्यांना, जे भूतांची पुजा करतात ते त्यांना, पुर्वजांची पुजा करतात ते पितरांना व जे माझी भक्ति करतात ते मला प्राप्त होतात.
जे भक्तिने मला पाने, फुले, पाणी, फळे देतात ते त्यांनी शुद्ध मनानें, भक्तिने दिलेले असल्यामुळे मी त्याचा लगेच स्वीकार करतो.
हे कौंतेया, तू जे कर्म करतोस, जे भोजन करतोस, दान, जप, हवन करतोस ते ते मला अर्पण कर. तू जर मला समर्पण केलेस तर शुभ अशुभ फळांच्या बंधनातून मुक्त होशील.
कर्म फळ संन्यास योगाने मला प्राप्त करशील. मला कोणी प्रिय अथवा अप्रिय नाही. मला सर्व सारखे आहेत. जे माझी भक्तिभावाने सेवा करतात त्यांच्यात मी आहे.
एखादा दुराचारी , दुष्ट माझी अनन्य भक्तिभावाने पुजा करत असेल निश्चयाने भक्ति करत असेल तर तो सज्जन समजावा.
तो लवकर धर्मात्मा होतो व शाश्वत शांती चा लाभ त्याला होतो.
हे कौंतेया, माझ्या भक्तांचा नाश होत नाही. जे माझ्या आश्रयाला येतात ते मग त्या स्त्रिया असोत, शुद्र, वैश्य अथवा पापयोनीतील असोत त्या सर्वांना श्रेष्ठ गति प्राप्त होते.
पुण्यवान ब्राह्मण, क्षत्रिय राजे, असे सर्व या अनित्य व असुखी अशा जगात माझी भक्ति करतील ते श्रेष्ठ आहेत व तू या जगात आला आहेस म्हणून तू माझी उपासना कर.
तू मला आपले मन अर्पण करशील, माझी पुजा समर्पित भावनेने करशील तर तू मला प्राप्त होशील.
नववा अध्याय समाप्त.