Bhagwadgita - 10 books and stories free download online pdf in Marathi

भगवद्गीता - अध्याय १०

१० विभूति योग.
श्री भगवान म्हणाले, हे प्रिय महाबाहो, माझे हे तुझ्या हितासाठी सांगत असलेले अनमोल असे ज्ञान पुन्हा ऐक.
देवता, महर्षी माझा उद्भव जाणत नाहीत कारण देवता व महर्षींचा उद्भव माझ्या ठायी आहे. त्यांचे आदिकारण मी आहे.
अनादि, जन्मरहित व सर्वेश्व़र अशा मला जो मनुष्य मला जो जाणतो तो पाप मुक्त होतो. प्राणिमात्रांचे सर्व भाव जसे की मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, क्षमा, सत्य,सुख आणि दुःख, जन्म मृत्यू, अहिंसा, समता, समाधान, तप, दान, यश अपयश, बुद्धि, निर्मोहता, ज्ञान, तसेच संशय, भया पासुन मुक्ति इत्यादि वृत्ति माझ्या पासुन उत्पन्न होतात.
सात ऋषी तसेच त्यापुर्वीचे चार महर्षि व मनुंचा जन्म माझ्या मुळे झाला आहे व त्यांचे पासून इतर प्राण्यांची उत्पत्ति झाली आहे.
जो माझे ऐश्व़र्य व योगशक्ति जाणतो तो निसं:शय माझी भक्ति करतो.
मी सर्व भौतिक व आध्यात्मिक गोष्टींचे उत्पत्तिकर्ता आहे. ज्ञानी लोक हे जाणून माझी भक्ति करतात.
ते मनापासून माझी प्रार्थना करतात, माझे वर्णन करण्यात आनंद मिळवतात. माझ्या बद्दल बोलण्यात रमतात.
जे निरंतर प्रेमाने माझी भक्ति करतात त्यांना माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी मी बुद्धि व ज्ञान देतो. मी त्यांच्या मनातील अज्ञानरूपी अंधार त्यांच्या चित्तात ज्ञानरूपी दिव्याने राहून नष्ट करतो.
अर्जुन म्हणाला, तुम्हीच परमधाम, तुम्हीच पवित्र परब्रम्ह आहात, तुम्हीच दिव्य व शाश्व़त पुरूष आहात.
देवाधिदेव, तुम्ही अजन्मा आहात.
नारदमुनी, असित, देवल व व्यास हे पण तुमच्या विषयी असेच सांगतात व तुम्ही पण तेच सांगत आहात.
हे केशवा, तू मला सांगत असलेले सर्व सत्य कथन आहे असे मानतो. भगवंता, तुझे रूप देव दानवांना पण अज्ञात आहे.
हे भूतेशा, (सर्व भूतांची निर्मिती करणाऱ्या) देवाधिदेवा, हे पुरूषोत्तमा, तू जगाचा नायक आहेस आणि तुच स्वत:ला जाणतोस.
तू हे जग व्यापुन राहिला आहेस ते कोणत्या दिव्य शक्ती द्वारे , हे तुझे ऐश्व़र्य आहे ते सांगण्यास तुच योग्य आहेस.
हे योगेश्व़रा ! मी तुझेच चिंतन करीत असतां तुला कसे जाणावे ?
तुझे कोणत्या प्रकारे चिंतन करावे ते तू मला सांग.
हे जनार्दना ! आपली योगशक्ति व विभूति पुन्हा सांग कारण आपली अमृत वाणी ऐकताना माझ्या मनाची तृप्ति होत नाही.
श्री भगवान म्हणाले, माझ्या प्रमुख व दिव्य विभूति सांगतो त्या ऐक परंतु त्या अनंत आहेत.
हे गुडाकेश अर्जुना ! सर्वांच्या चित्तातला आत्मा मीच आहे असे जाण. सर्व भूतमात्रांचा आदि, मध्य, व अंत ही मीच आहे. ( गुडाकेश-ज्याने निद्रा रूपी -अज्ञानरूपी अंधारावर विजय मिळवला आहे असा).
मी विष्णु आहे, आकाशातील आदित्यांमध्ये मी सूर्य आहे. मी मरूदगणामधील मरीची आहे व नक्षत्रांमधील चंद्र मी आहे.
वेदांमध्ये सामवेद, देवांमध्ये इंद्र मी प्राणीमात्रांमधील चेतना मी, व इंद्रियांतील मन मी आहे. मी रुद्रांमध्ये महादेव, यक्ष व राक्षसांमध्ये कुबेर, वसूंमध्ये अग्नि, व पर्वतांमध्ये मेरू पर्वत मी आहे.
हे अर्जुना ! पुरोहितांमधील मुख्य असा जो बृहस्पती तो मी आहे, सेनापती मध्ये कार्तिकेय मी व जल स्त्रोतामध्ये सागर मी आहे. महर्षींमध्ये भृगु तर वाणीमधिल ॐकार मी. यज्ञांमध्ये जप मी., तर स्थावरांमध्ये हिमालय मी आहे.
वृक्ष झाडांमध्ये अश्व़थ वृक्ष तर देवर्षींमध्येँ नारद तर गंधर्वांमध्ये चित्ररथ व सिद्ध ऋषींमध्ये कपिल मुनी आहे.
अमृतमंथनातून निघालेला उच्चैश्रवा अश्व मी तर हत्तींमधील ऐरावत मी व मनुष्यांचा राजा मी आहे. धेनुंमध्ये कामधेनू, शस्त्रांमध्ये वज्र मी., प्रजोत्पत्ती करवणारा काम (मदन) मी, सर्पांमध्ये वासुकि मीच.
नागांमध्ये अनंत मी, जलदेवतांमध्ये वरुण मी, पितरांमध्ये अर्यमा मी व नियंत्रकांमध्ये यम मी. दैत्यांमध्ये प्रल्हाद मी, ग्रासणाऱ्यात काल मी, पशुंमध्ये वनराज मी., पक्ष्यांमध्ये गरूड मी. वेगवानांमध्ये पवन मी.
शस्त्रनिपुणांमध्ये राम मी. जलचरांमध्ये मगर मी व नद्यांमध्ये गंगा मी.
हे अर्जुना ! सृजनांचा आदि, मध्य, अंत मी. विद्यांमध्ये अध्यात्म मी, तर्कशास्त्रांतील तत्वनिर्णय मी.
अक्षरांमधील 'अ' कार मी समासातील द्वंद्व समास मी, काळ पण मी व सृष्टि कर्ता ब्रह्मदेव मी. उत्पत्तीचे कारण मी, संहारकात मृत्यू मी. स्त्रियांमध्ये मी कीर्ति, श्री, स्मृति, मेधा, धृति, वाचा, क्षमा, - मी.
गायल्या जाणाऱ्या सामवेदी सुक्तामधील बृहन्साम, छंदातील गायत्री मी, महिन्यांमधील मार्गशीर्ष मास मी, व ऋतुचक्रातील वसंत ऋतु मी‌. कपटांमध्ये जुगार मी, तेजस्वी लोकांचे तेज मी, विजय मी, बलवानांचे बल मी.
यादवांतील वासुदेव, पांडवांत धनंजय, मुनींमध्ये व्यास, व कवींमध्ये शुक्राचार्य मी. शिक्षा देणाऱ्यांचा दंड मी, विजय मिळवु इच्छिणाऱ्यांची निति मी.
रहस्यातील मौन तर विद्वांनांचे ज्ञान मी. संपूर्ण सृष्टी चे बीज मी. या चराचरात कोणतीही वस्तू माझ्याशिवाय असू शकतं नाही.
हे शत्रुंवर विजय मिळवणाऱ्या अर्जुना ! माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही.
माझ्या विभूतींचा विस्तार हा केवळ उदाहरणादाखल सांगितला आहे.
ऐश्व़र्यवान , कांती व सौंदर्य युक्त , शक्तीशाली अशा सर्व वस्तू माझ्या तेजाचा अंश आहेत. पण हे धनंजया ! तुला या सर्व विभूति जाणण्याचे कारणच नाही, कारण माझ्या एका अंशाने विश्व़ व्यापले आहे.
दहावा अध्याय समाप्त.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED