Bhagwadgita - 4 books and stories free download online pdf in Marathi

भगवद्गीता - अध्याय ४

चौथा अध्याय
ज्ञान कर्म संन्यास योग
श्री भगवान म्हणाले, हा अविनाशी योग मी प्रथम सूर्यदेवाना सांगीतला. सूर्य देवाने मनुला सांगीतला. मनुने इक्ष्वाकुस सांगीतला़ अशा गुरु शिष्य परंपरेने अनेक राजांनी जाणला. परंतु आता ही परंपरा खंडित झाली आहे. तोच पुरातन योग अर्जुना मी तुला सांगत आहे. तू माझा सखा भक्त आहेस. तू हे दिव्य रहस्य ऐक.
अर्जुन म्हणाला - तुमचा जन्म तर आजचा आहे. सूर्य देवांचा तर खुप पुर्वीचा आहे. मग तुम्ही सूर्यदेवाना योग सांगीतला हे कसे ते मला कळत नाही.
श्री भगवान म्हणाले, अर्जुना ! तुझे माझे कितीतरी जन्म होउन गेले. मला ते आठवतात. तुला ते आठवत नाहीत. मी ईश्वर आहे.  मला जन्म नाही,  मी अविनाशी आहे. मी माझ्या ईच्छेने अवतार घेत असतो.
जेव्हा पृथ्वीवर धर्माचा ह्रास होतो, अधर्म वाढतो , तेव्हा संत सज्जनांच्या रक्षणासाठी,  दुष्टांचा नाश करण्यासाठी व धर्म स्थापनेसाठी मी युगा युगात जन्म घेत असतो.  
माझ्या या दिव्य जन्मास आणि कर्मास जो जाणतो व माझ्यात एकरुप होतो त्यास पुनर्जन्म नसतो.  जे क्रोध, भय , प्रेम याचा त्याग करतात ते माझ्यात एकरुप होतात. माझ्या स्वरुपात असे कितीतरी ज्ञानी तपस्वी एकरुप झाले आहेत.  माझ्याकडे जो येतो त्याचा जसा भाव असेल तसे फळ मी देतो. 
अर्जुना ! जे माझ्या मार्गाचे अनुसरण करतात, कर्म फळाची आकांक्षा ठेवुन या लोकात देवांचे पुजन करतात त्यांना या मनुष्य लोकामधे त्यांच्या कर्माचे फळ मिळते. मी गुण, कर्माचा विचार करून चार वर्ण निर्माण केले. माझ्या मुळेच सर्व घडत असले तरी मी अकर्ता असे जाण. (मी जरी ही व्यवस्था केली असली तरी मी अकर्ता असे जाण.) मला कर्माचे बंधन नाही. मला फळाची आकांक्षा नाही. जो हे जाणतो तो कर्म फळात अडकत नाही.
 कर्म करत असूनही आपले कर्म कर्तव्य म्हणून आसक्ति न ठेवता करावे. हे जाणून पुर्वी महात्म्यांनी कर्म केले. 
पुर्वजां प्रमाणे तू सुद्धा कर्माचे आचरण कर. पंडितानाही कर्म म्हणजे कळत नाही,काय करु नये ते कळत नाही.
 मी तुला कर्म म्हणजे काय ते सांगीन त्यामुळे तू मुक्त होशील. कर्म कशाला म्हणावे, अकर्म म्हणजे काय ते जाणुन घे. याची व्याप्ती मोठी आहे. कर्मामधे अकर्म पहावे व अकर्मात कर्म. ज्याचे कर्म कामनारहित आहे तोच योगी बुद्धिमान समजावा. जो कर्म करतो, इच्छा, संकल्पाचा त्याग करून जो कर्म सुरु करतो, फळाची आशा सोड्न जो तृप्त, मुक्त राहतो, सर्व कर्मे करूनही काही करत नाही असे राहतो तोच पंडित समजावा. निरीच्छ होऊन, आसक्ति सोडून अहंकार सोडून जो कर्म करतो तो समाधानी राहतो. मन आणि बुद्धिला वश करणारा सर्व वस्तुवरील मालकीच्या जाणीवेचा त्याग करतो आणि आवश्यक गोष्टी करीता कर्म करतो त्याला पाप लागत नाही.  दुजा भाव, मत्सर त्यांच्या मनात राहत नाही. यश, अपयश काही मिळाले तरी एकाच वृत्त्तीने राहतो त्यास कर्म बंधन नाही. हवन कोणते करावे , आहुति काय द्यावी अशा आध्यात्मिक क्रियात मग्न होणाऱ्यास ब्रह्मस्वरूप प्राप्त होते. 
कांहीं योगी यज्ञातील द्रव्य देवतांना देवून उपासना करतात तर कांहीं ब्रह्मरूपी अग्नीत आहुती अर्पण करतात. जो त्रिगुणात आसक्त नाही व ज्ञानी आहे त्याचे कर्म लय पावते व देवाची प्राप्ती करून देते. जो कृष्ण भावनेत लीन झाला आहे त्याला परमधाम प्राप्त होते. लोक यज्ञ करतात, उपासना करतात व ब्रह्मरूप अग्नीत आहुती देतात. काही जण कान डोळे इत्यादि इंद्रियाना संयमरूपी अग्नीत अर्पण करतात तसेच शब्द व इंद्रियांना तृप्त  करणाऱ्या विषयांचा होम करतात. ते लोक इंद्रियांची व प्राणाची सर्व कर्मे बंद करून आत्मज्ञानाची इच्छा करतात. काही आपल्या वस्तुंचा यज्ञ करुन तप करून बुद्धीचा विकास करून अष्टांग योगाचा अभ्यास करतात. कांही आध्यात्मिक ज्ञान वाढवण्यासाठी वेदांचा अभ्यास करतात.  यज्ञ करणे, मंत्र म्हणणे हे सर्व समय ब्रह्ममय झालेले असते. यज्ञ हा फलेच्छा रहीतअसतो. कर्म हे ब्रह्ममय झालेले असून मनाचे अज्ञान दूर करते. 
आत्मज्ञानाने आत्मसंयमनाचे अग्नी चेतवीला जातो.  
मनोविकारांना जाळून श्वासोच्छवासाचे अवधान ठेवून जो अंतर्कुंभक व बहिर्कुंभक करतो व प्राणायाम करून मन व इंद्रियावर संयम ठेवतो त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. कोणी प्राणायाम करतात, कोणी आहार नियमन करतात, यज्ञ करणाऱ्यांची सर्व पातके यज्ञात नष्ट होतात. जे यज्ञ करीत नाहीत त्यांना इहलोकात सुख मिळत नाही व स्वर्ग मिळत नाही. वेदातून असे अनेक यज्ञ सांगितले आहेत. ते यज्ञ कर्मजन्य आहेत. हे कळले म्हणजे तू मुक्त होशील. कर्मातून मोक्ष मिळतो. द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. 
अर्जुना ! सर्व कर्माचे यज्ञाचे अंतिम फळ ज्ञान हेच आहे. गुरुची सेवा करून त्यांना नमस्कार करून विचारल्यास ज्ञानी, तत्त्ववेत्ते गुरू तुला दीक्षा देतील. हे ज्ञान होईल तेव्हा तुला कळेल की, सर्व जीव माझेच अंश आहेत. हे ज्ञान झाले की हे पांडवा, तुला पुन्हा मोह होणार नाही. जरी तू अती पापी असलास तरी ज्ञानरूपी नावेतून तू दुःख सागर तरुन जाशील. जसे लाकडाला अग्नी जाळतो तसा कर्मरूपी लाकडाना ज्ञानरूपी अग्नी जाळतो. या जगांत ज्ञानासारखे दुसरे पवित्र कांही नाही. असे ज्ञान भक्तिचे फल आहे. योगयुक्त असलेल्याला ते मिळते. जो संयमाने श्रद्धा  ठेवतो त्याला दिव्य शांती व ज्ञान मिळेल. तो आत्मस्वरुपाचा अनुभव घेतो. जो ज्ञानात  लीन आहे व ज्याने इंद्रिय संयम केला आहे त्याला आध्यात्मिक शांती लवकर मिळते.    ज्यांच्या मनात संशय असतो त्याला अज्ञानामुळे कल्याणचा मार्ग दिसत नाही. त्याला सुख मिळत नाही. ज्ञानामुळे शंका राहत नाहीत, अज्ञानाने ज्या शंका येतात त्याचे खंडण ज्ञानाने करावे. हे अर्जुना ! तू संशय सोडून युद्धासाठी तयार हो. 
इथे ज्ञान कर्म संन्यास योग नावाचा चतुर्थ अध्याय पूर्ण.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED