पाचवा अध्याय
कर्म संन्यास योग
अर्जुन म्हणाला, तू ज्ञान सांगून संन्यासाची महती सांगतोस , आणि युद्धास तयार होण्यास सांगतोस. कोणत्या मार्गानं माझे कल्याण होईल ते सांग. भगवान म्हणाले, संन्यास अथवा योगाने कल्याणच होते. निष्काम होऊन कर्म कर. सोपा कर्म मार्ग अनुसर. ज्याला इच्छा द्वेष नसतो तो संन्यासी असतो. अज्ञानी लोकांना सांख्य व योग भिन्न वाटतात, ज्ञानी लोकांना दोन्ही मार्ग एक वाटतात, व दोन्ही मार्गांमध्ये कल्याण होते. योग व सांख्य हे दोन्ही मार्गानी एकच गोष्ट प्राप्त होते. जो कर्म मार्ग अनुसरतो त्याचे कल्याण होते. कर्म मार्गाचे आचरण न करता संन्यास कठीण आहे. जो इंद्रियांवर विजय मिळवतो कर्म बंधन नसतात. तत्त्वज्ञ जरी पहात, खात, झोपत असले तरी काहीच करत नाही असे मानतात. स्पर्श, श्वास, दृष्टी या सर्व क्रिया चालू असूनही इंद्रियावर विजय मिळणारे योगी असतात. फळाची अपेक्षा सोडून जे कर्म करतो तो पापापासून निराळा होतो. ते बुद्धीचा उपयोग करून सावधपणे कर्म करतात परंतु निष्काम असतात, इंद्रियांवर विजय मिळवून आत्मशुद्धीसाठी कर्म करून शांती मिळवतात. कुणाचेही पाप-पुण्य परमात्मा ग्रहण करत नाही. अज्ञानाने वेढलेल्या जीवाला मोह होत असतो. सूर्य उगवल्यावर जसा प्रकाश येऊन अंधार संपतो तसेच ज्ञानाने अज्ञान संपते व आत्मज्ञान होते.
ज्ञानी मनाला हत्ती, गाय, श्व़ान, आपला व परका, हा श्रेष्ठ अथवा हीन असा भेद राहत नाही. अहंभाव संपतो. सर्वत्र सम राहून तो ब्रह्ममय होतो. प्रिय गोष्ट घडल्याने त्याला आनंद होत नाही किंवा अप्रिय गोष्टीमुळे तो दुःखी होत नाही. अंतरातील सुख ज्याला कळले त्याला इंद्रिय सुखे नकोशी वाटतात. इंद्रिय भोगाची इच्छा हेच दुःखाचे कारण असते. ज्ञानी लोक त्यात रमत नाहीत. ईच्छा, क्रोध यांचा जोर सहन करण्याची शक्ती असलेला माणूस सुखी व मुक्त होतो. त्याच्या मनातील संशय दूर झालेला असतो तो पापातून मुक्त झालेला असतो व सर्वांच्या कल्याणासाठी काम करुन मुक्ती मिळवतो. सर्व आसपासच्या वातावरणाला विसरुन दृष्टी दोन भुवयांमध्ये ठेवून तो श्वास रोखून धरतो व मन इंद्रिय बुद्धीवर नियंत्रण मिळवतो. तो इच्छा, भीती व रागापासून मुक्त होतो. संत, योगी, महात्मे मला सर्व यज्ञाचा हेतू मानतात. सर्व दुःखांचा नाश करून शांती मिळवून देणारा मानतात. व ते शांती प्राप्त करतात.
कर्मसंन्यास योग नावाचा पाचवा अध्याय येथे संपतो.
भगवदगीतेतील चौथ्या अध्यायातील पहिल्या श्लोकाप्रमाणे हे ज्ञान प्राचीन काळी भगवंतानी सूर्यदेवांना सांगीतले व तीचा उपदेश सर्व राजांना झाला व आता अर्जुनाला सांगीतले. त्यामुळे हे ज्ञान प्राचीन आहे हे सिध्द होते.
सातव्या अध्यायात भगवान म्हणतात की भुतकाळातील , वर्तमान काळातील व भविष्यातील सर्व जाणतो पण मला कोणी जाणत नाही.
ज्ञानेश्वर लिहीतात - येथे भूते जियें अतीतली । तियें मीचि होऊनि ठेंली । आणि वर्तत आहात जेतुलीं । तींही मीचि। की भविष्य माणे जियेंही । तीहीं मजवेगळी नाही ।
अकराव्या अध्यायात ते सांगतात की मी या जगात लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे, तूं जरी मारले नाहीस तरी सर्व योद्ध्यांचा पांडवाव्यतिरीक्त नाश ठरलेला आहे तू फक्त निमित्तमात्र आहेस. अर्जुन म्हणाला हे ऐकून विश्व आनंदित झाले आहे व राक्षस पळत आहेत.
याचा अर्थ असा की भगवंताचे हे ज्ञान प्राचीन असून ते वेळोवेळी सांगितले गेले आणि ते शाश्वत आहे. आणि श्रीकृष्ण हे वर्तमान, भुत, भविष्य जाणतात पण लक्षावधी लोकांमध्ये एखादाच त्यांना जाणतो व सर्वांचा अंत ठरलेला आहे निमित्त वेगळे असते.
सर्व विधिलिखित व अटळ आहे आणि भक्ति हीच तारक आहे.
मूळ संकल्पना - विधिज्ञ विंग कमांडर श्री.वसंत नारायण देशमुख.
जय श्रीकृष्ण. भगवद्गीता व श्रीमद्भागवत हे ग्रंथ वाचन करणे आवश्यक आहे.