Something about fame books and stories free download online pdf in Marathi

प्रसिद्धीबद्दल काहीतरी

प्रसिद्ध तर होणारच ; परंतु वेळ आल्यावर?

प्रसिद्ध तर होणारच, परंतु वेळ आल्यावर? हा काय प्रकार आहे. कोणाच्या तो प्रकार लक्षातच येणार नाही. कारण आजच्या काळात लोकं प्रसिद्धीच्या एवढे मागं लागले आहेत की त्यांना वाटतं मी मागं तर पडणार नाही. परंतु त्यांची अवस्था ही पितळेसारखी असते. पितळाला जसं स्वतः चमकण्यासाठी स्वतःला दहा वेळा पॉलीश करावं लागतं. ती अवस्था सोन्याची नसते. सोना हा सोनाच असतो. कारण तो चकाकतो. मात्र लोकं सोन्याचं अस्तित्व दिसू नये अर्थात सोन्याला चोरु नये. म्हणूनच सोन्याला लपवून ठेवतात. तरीही चोर बरोबर त्याचा शोध घेत त्याला चोरतातच. तसंच आहे प्रसिद्धीचं. हिरा जरी कोळशाच्या कितीतरी पटीनं आत लपला असला तरी त्याला कोळसेव्यापारी शोधतातच. तसाच एखादा व्यक्ती विचारवंत असेल आणि त्याचे विचार समाजाला चांगले वाटत असतील वा समाजाच्या अतिशय उपयोगाचे वाटत असतील तर ते विचार कोणी कितीही दडपून ठेवले, तरी ते बाहेर येणारच. उदाहरण द्यायचं झाल्यास सॉक्रेटिसचं देता येईल. सॉक्रेटिसला विषाचा प्याला दिला गेला. कारण त्याचे विचार दडपून टाकायचे होते. आज त्यांचे विचार जनमताचा वेध घेतात. तेच घडलं मुन्शी प्रेमचंदच्या आयुष्यात. त्यांच्याबाबतही एक कथा प्रसिद्ध आहे. मुन्शी प्रेमचंदनं भरपूर साहित्य लिहिलं. परंतु ते त्यांना आपल्या हयातीत प्रसिद्ध करता आलं नाही. त्यासाठी कित्येक काळ जावा लागला. जसं म्हणतात की मुंन्शी प्रेमचंदनं साहित्य निर्माण केलं. ते साहित्य कपाटात ठेवलं गेलं. त्यानंतर ते साहित्य त्याच्या मुलाच्याही काळात तसंच राहिलं. पुढं नातू झाला व नातू मोठा झाल्यावर त्याचा एक संपादक मित्र त्यांच्या घरी आला. संपादक हा साहित्याशी संबंधीत होता. मग मुन्शी प्रेमचंदच्या नातवाला वाटलं. ही काय माझ्या आजोबाची कटकट. आपण हे साहित्य या संपादकाला देवून टाकू. हे साहित्य तसं पाहिल्यास आपल्या काही कामाचं नाही. मुन्शी प्रेमचंदच्या नातवानं ते साहित्य त्या संपादकाला दिलं. संपादकानं ते साहित्य क्रमाक्रमानं छापलं व आज त्यांचं साहित्य घराघरात आहे.
प्रसिद्धीचं असंच आहे. कोण केव्हा प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. जरी कोणी कोणाचे प्रसिद्धीच्या रस्त्यावर पाय खेचत असले तरी.
लोकं पाय कसे खिचतात?याबाबत एक प्रसंग सांगतो. मुलाखत सुरु होती. मुलाखतीदरम्यान संवाद सुरु होता. मुलाखतकार एकाएकाला प्रश्न विचारत होते की त्यांनी साहित्यात योगदान कसं दिलं? तशीच काही प्रश्नावली होती व मुलाखत देणारे दोनतीन जण होते. एक मुलाखतकार बोलत होता. त्याला काहीतरी बोलायचं होतं. तो बोलणारच होता. परंतु त्याच्या हातातून माईक घेवून त्याला बोलू न देता दुसराच बोलता झाला. जसं त्याला वाटत असेल की शेजारच्यानं आपल्या कार्याचं योग्य स्पष्टीकरण दिलं तर तो प्रसिद्ध होईल व मी मागे पडेल.
प्रसिद्धी.......अलिकडच्या काळात लोकं निव्वळ प्रसिद्धीच्या मागं धावत आहेत. तरीही ते प्रसिद्ध होत नाही. काही लोकं मात्र काहीही न करता प्रसिद्ध होतात. जसे, एका साहित्य संमेलनात सचीवपदी असलेला व्यक्ती त्याला राग आल्यानं तो उपस्थीतच नव्हता, तरीही शिल्ड, स्मरणीकेवर, बॅनर, पोस्टर सर्व गोष्टींवर त्याचं नाव होतं. कोण ओळखत होतं त्याला. तो का बरं नाही आला म्हणून. आज प्रसिद्धीच्या नादान लोकं विचीत्र पद्धतीनं वागत आहेत. याचा फायदा अनेक हौसे नवशे व गवशे घेत आहेत. ते काही रुपये मागतात. त्यातील काही रुपयाचा पुरस्कार देतात व काही आपल्या जेबात टाकतात आणि प्रसिद्धीच्या नावावर व्यापार करतात. अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, मुख्य अतिथी स्थान पैशानुसार ठरलेलं असतं. मात्र काही लोकं हे प्रसिद्धीच्या कोसो दूरच असतात. त्यांनाही प्रसिद्धी आवडत नाही असं नाही. परंतु त्यानं वाममार्गानं प्रसिद्ध होता येत नाही. कारण ते इमानदार असतात. ते प्रसिद्धीसाठी कोणाला एक छदामही फेकून मारत नाही. जशी आजच्या लोकांना सवय आहे. फोटो निघाली पाहिजे म्हणून ते विचारपीठावरच राहतात. राहिली मग बाकीची कामं. कारण विचारपीठावरील लोकांचे फोटो काढले जातात. त्यात ते फोटो वर्तमानपत्रात टाकले जातात व छापून येतात. त्यानंतर ते फोटो छापून आले की आपल्या ओळखीच्या माणसांना सांगता येतं, नातेवाईकांना सांगता येतं की हा माझा फोटो पेपरात छापून आला. परंतु त्या फोटो छापून येण्याचा आनंद फक्त त्यालाच होत असतो. ज्याचा फोटो छापून येतो. कारण बाकीचे त्याचा द्वेषच करीत असल्यानं ते त्याच्या प्रसिद्धीला दिखाव्यापुरती दाद देतात. मनातून दाद देत नाहीत. ही वास्तविकताच आहे. मात्र काही लोकं कुणाच्या मधामधात काही मिरवीत नाहीत. अशाही स्वभावाचे असतात. ते ना विचारपीठावर असतात. ना प्रसिद्धीच्या मागं धावत असतात. ते सदैव, अविरत आपले कार्य करीत असतात. मग कोणी त्यांच्या कार्याला चांगलं म्हणो की न म्हणो. त्यांना त्यांच्या कार्यात काहीच फरक पडत नाही. ते कार्य करीत असतांना फक्त एवढाच विचार करतात की त्यांचं कार्य फक्त नि फक्त समाजाभिमुख व्हावं. ते कार्य समाजाच्या उपयोगात यावं. त्याच गोष्टीचा विचार करुन प्राचीन काळातील साहित्य लिहिल्या गेलं. ते साहित्य परकीय तसेच मुस्लीम साम्राज्याच्या काळात टिकून राहावं म्हणून ते साहित्य जमीनीच्या भुगर्भात गाडलं गेलं. तसं पाहता ते साहित्य भोजपत्र, ताडपत्र यावर लिहिल्या गेल्यानं नष्ट होईल म्हणून ते साहित्य ताम्रपत्र वा सुवर्णपत्रावर लिहिलं गेलं व ते जमीनीत पुरलं गेलं. कदाचीत त्यांच्याही डोक्यात त्यावेळेस आलंच असेल की ज्यावेळेस जमीन खोदण्यात येईल. तेव्हा हेच ताम्रपत्र सापडेल व आपल्यातील चांगल्या विचारांचा लोकांना फायदा होईल. हाच विचार करुन साहित्य टिकवल्या गेलं. कारण मुस्लीम राज्यकर्ते विद्यापीठंची विद्यापीठं जाळत होती. जसं कर्नाटकमध्ये कल्याण राजानं अनुभव मंटपाला दहाव्या शतकात आग लावून अनमोल साहित्य जाळलं. ते जाळण्यापुर्वीच काही लेखकांनी तेथून काही पुस्तकं पळवली व ती पुढं जमीनीत गाडली. तीच कृती पुढं तेराव्या शतकात बख्तियार खिलजीनं केली. त्यानं तर पुर्णतः नालंदा विद्यापीठालाच आग लावून दिली. जे विद्यापीठ तीन ते चार महिने सतत जळतच होतं.
आज आपल्याला ताम्रपत्र व इतर साहित्य सापडत आहेत. घर बांधतांना जे पायवे खोदतो त्यात. त्यामुळंच उघड होत आहे त्या काळातील लिहिलेलं साहित्य. खरंच त्या काळातील लोकांनाही कल्पना नसेल की आपले वंशज आपल्या ताम्रपत्राला शोधून काढतील. उदाहरण द्यायचं झाल्यास मुकूंदराजाचं देता येईल. मुकूंदराजाने विचार केला नसेल की माझंही विवेकसिंधू तब्बल आठशे वर्षानंतर सापडेल व मी आठशे वर्षानंतर प्रसिद्ध होईल. कारण मुकूंदराजांनी बाराव्या शतकात लिहिलेला विवेकसिंधू आज छापील स्वरुपात प्रसिद्ध झाला आहे. तेच घडलं आहे इतरही लेखकांच्या बाबतीत.
महत्वपुर्ण बाब ही की माणसाला केव्हा प्रसिद्धी मिळेल हे सांगता येत नाही. त्यासाठी प्रसिद्धीमागं धावू नये. काळाच्या ओघात चांगलं कार्य हे अस्तित्वात येईलच. जेव्हा वेळ येईल. त्यासाठी घाबरुन जायची व स्वतः वाटून घ्यायची गरज नाही की मी स्वतः माझी प्रसिद्धी केली नाही तर उद्या माझं कार्य इथंच संपेल. तसं वाटणंही साहजीकच आहे. कारण आज वागत असलेले व्यवहार करीत असलेले लोक. आजची मंडळी स्वतःच्या मायबापालाच विचारत नाही, ती काय आपल्याला आपल्या मरणानंतर प्रसिद्ध करेल. ही लोकांना भीती वाटत असते. म्हणूनच अशी मंडळी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करीत असतात. परंतु ते जरी खरं असलं तरी ज्याचा कोणी नसतो त्याचा विधाता असतो. त्याप्रमाणेच तुमचं कार्य जर चांगलं असेल ना तर ते काळाच्या ओघात नक्कीच पुढं येईल. फक्त तुमच्या कार्यात तेवढा दम पाहिजे. हे तेवढंच खरं. ते जर दमदार असेल तर कोणाला काहीच करण्याची गरज नाही यात शंका नाही. त्यामुळंच आपण प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता आपण आपलं कार्य करीत राहावं म्हणजे झालं. कारण कार्य अशी एक गोष्ट आहे की जे कोणीही कितीही लपवलं तरी ते अगदी कोळशात लपलेल्या हिऱ्यासारखं पुढं येतं. त्यासाठी स्वतःचा उदोउदो करुन घेण्याची गरज नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय