स्वर्ग नेमका कुठं? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वर्ग नेमका कुठं?

कलियुगात स्वर्गप्राप्ती? आश्चर्य वाटणारा प्रश्न?

*कोणी म्हणतात की आज कलियुग आहे आणि या कलियुगात स्वर्गप्राप्ती होत नाही. तसं पाहिल्यास त्यांचं ते समजणंही अगदी बरोबरच आहे. कारण आजच्या काळात ज्या लोकांना आपण मदत करतो. तो व्यक्ती पुढं आपल्याला मदत करेलच हे काही सांगता येत नाही. आजचा काळ असा आहे की पिता पुत्राला ओळखत नाही आणि पुत्र पित्याला. तशीच आई आपल्या लेकराला ओळखत नाही आणि लेकरु आपल्या आईला. आजचं लेकरु मोठं झालं की बस चक्कं मी माझी पत्नी व माझी मुले असे समजून मायबापाच्या गळ्याला फाशीचा फंदा लावत असतो. अर्थात वृद्धाश्रमात टाकत असतो.*
मुले आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकतात. त्याचं कारण आहे, त्यांचे आजच्या काळात मुलांवर होत असलेले संस्कार. आजच्या काळातील मायबाप बनलेली तरुणमंडळी आपल्या लहानशा बाळांसमोर आपल्या मायबापांना वृद्धाश्रमात टाकत असतात. हेच पाहात असतात लहानशी मुलं. तेच संस्कार होतात त्यांचेवर. मग तिही लहानाची मोठी होतात. मग विचार करतात. विचार करतात की माझ्या या मायबापानं माझ्या आजोबाला वृद्धाश्रमात टाकलं होतं. शिवाय ते जेव्हा घरी होते, तेव्हा अत्याचारही केला होता. आपणही तसंच करावं. जेणेकरुन त्यांना पूर्वाश्रमीच्या कर्तृत्वाची शिक्षा तर होईल. ते मग तसंच करतात. तेच नर्क असतं त्यांच्यासाठी.
स्वर्ग नरकाच्या कल्पना पुर्वीच्या ग्रंथात वेगवेगळ्या होत्या. त्या काळात सरळ सरळ व्यक्ती स्वर्गात जात असे. काही जण नरकात जात असत. म्हटलं जातं की पांडवांच्या सेनेचं नेतृत्व करणारा युधिष्ठिर स्वर्गात गेला आणि बाकीचे पांडव द्रौपदीला स्वर्गात गेले नाहीत. कारण काय असावं? यावर काही लोकं नक्कीच म्हणतात की युधिष्ठिर तर नेतृत्व करीत होता. त्याच्याच नेतृत्वात कित्येक निरपराध सैन्य मृत्यूमुखी पडले होते. मग तो कसा काय स्वर्गात गेला? परंतु तो स्वर्गातच गेला असेल. याचं कारण होतं की तो सात्वीक पुरुष होता. त्याचे विचार चांगले होते. कोणत्याही गोष्टीचा त्याला लोभ नव्हता, ना त्याला रागही येत होता. तसाच तो सर्व प्रकारच्या षडरिपूपासून दूर होता.
स्वर्गारोहनाची जेव्हा वेळ आली, तेव्हा द्रौपदीसह सर्व जायला निघाले स्वर्गारोहनाला. त्यावेळेस सर्वात प्रथम द्रौपदी पडली. तेव्हा भीमानं युधिष्ठिरला विचारलं, "बंधू, ही स्वर्गात का आली नाही?" त्यावर युधिष्ठिराचं उत्तर होतं की तिनं अर्जून सोडून सर्व पांडवांना धोक्यात ठेवलं. ती अर्जुनावरच जास्त प्रेम करीत होती. तिच्या मनात अर्जुनाबद्दल गर्व होता. जरी बाकीचे पांडव शक्तीशाली होते तरीही. परंतु तिला जेव्हा भीमानं पकडलं, तेव्हा ती म्हणाली की मला जास्त भीमच आवडत होता व त्यानंच माझ्यासाठी सर्वकाही केलं. दुःशासनाची छाती फाडून रक्त प्राशन केलं व त्याचं रक्त माझ्या केसांना लावलं. शिवाय त्यानं दुर्योधनालाही मारलं व माझ्या अपमानाचा बदला घेतला. एवढंच नाही तर त्यानं किचकवधही केला. त्यानं माझा अपमान केला म्हणून. मी तर सांगते की पुढील जन्मात मी त्याचीच पत्नी बनेल अशी इच्छा व्यक्त करते.
द्रौपदीनं पुष्टी केली आणि ती गतप्राण झाली. त्यानंतर नकुल पडल्यावर युधिष्ठिर म्हणाला की त्याला सुंदरतेचा गर्व झाला होता. सहदेव पडल्यावर त्याला विद्वत्तेचा गर्व झाला होता असं युधिष्ठिराचं उत्तर. त्यानंतर अर्जून पडल्यावर त्याला त्याच्या धनुर्विद्येचा गर्व झाला होता. असं युधिष्ठिर म्हणतात. सर्वात शेवटी भीम पडल्यावर तो विचारतो की मला तर कोणताच गर्व नाही. मग मी कसा पडलो? त्यावर युधिष्ठिर म्हणतात की तुलाही हजार हत्ती एवढं बळ होतं. त्याचा तुलाही गर्व होताच तर...... शिवाय तूच जास्त खात असल्यानं तुलाच जास्त ताकद आहे असं तुला वाटायचं. याचाच अर्थ असा की ज्या लोकांना गर्व असेल. मग तो गर्व कोणत्याही गोष्टीचा का असेना, तो स्वर्गात जात नाही असं युधिष्ठिराचं म्हणणं. शिवाय स्वर्गात जाण्यासाठी चांगले विचारसरणीही असणे गरजेचे आहे. तेही अगदी खरंच आहे.
आज असा गर्व बऱ्याच जणांना झालेला दिसतो. कोणाला मालमत्तेचा गर्व, कोणाला, पैशाचा गर्व, कोणाला सौंदर्याचा गर्व, कोणाला शिक्षणाचा गर्व, कोणाचा त्यांच्या मुलाबाळाचा गर्व, कोणाला त्याच्या उंच इमारतीचा गर्व, कोणाला त्याच्या श्रीमंतीचा गर्व. याचाच अर्थ असा की आज कोणताही व्यक्ती गर्व केल्याशिवाय सुटत नाही. मग तो स्वर्गात कसा जाईल बरं? आजचं स्वर्ग व नर्क इथंच आहे. व्यक्तींना त्यांच्या मुलांच्या तरुणपणात चांगली वागणूक मिळत असेल व त्या मुलाच्या मायबापाजवळच मुलं त्यांच्या मरणापर्यंत राहात असतील, तर ते स्वर्ग असतं आणि चांगली वागणूक मुलं देत नसतील, त्यांना वृद्धाश्रमात टाकत असतील, तर ते नर्क असतं.
आज अशीच अवस्था आहे स्वर्ग अन् नर्काची. कारण आज स्वर्गात कोणी जात नाही आणि कोणीही नर्कात गेलेला दिसला नाही. म्हणूनच चांगले कर्म करावे की जे चांगले कर्म आपली मुलं लहानपणी पाहात असतात. त्यांच्यावर त्या बालवयात संस्कार होत असतात. ते संस्कार मिटवले जात नाहीत. जर आपण त्याच बालवयात त्यांना काय कळते म्हणून आपल्याच मायबापांना वृद्धाश्रमात टाकत गेलो तर ते पुढे जावून आपल्या म्हातारपणात आपल्यालाही वृद्धाश्रमात टाकत असतात. मग आपण कितीही आपली वाचाळ वाणी चांगली बोललो त्या काळात तरी, पुर्वाश्रमीचे आपले वागणे आपल्या कर्म स्वरुपात आपल्याला वाईट दिवस दाखवत असतात हे तेवढंच खरं आहे.
महत्वपुर्ण बाब ही की आपलं म्हातारपणातील आयुष्य चांगलं जाणं म्हणजे आपलं स्वर्गारोहण व आपला स्वर्गच आणि म्हातारपणातील आयुष्य चांगलं न जाणं म्हणजे आपला नर्कच होय. जर आपणही युधिष्ठिर सोडता इतर पांडवांसारखं गर्व करीत असू आणि मायबापाची सेवा करीत नसू तर आपल्याही म्हातारपणात नर्कच मिळेल, स्वर्ग मिळणारच नाही आणि स्वर्ग जर हवा असेल तर आपण कोणत्याही स्वरुपाचा गर्व करु नये. चांगले विचार ठेवावेत. चांगले वर्तन ठेवावेत. राग करु नये. लोभ करु नये. तसेच एकंदरीत सांगायचं झाल्यास आपण स्वतःला पुर्णतः षडरिपूपासून दूर ठेवावे. तसेच आपले कर्मही चांगलेच असावे. तरंच आपल्याला याही कलियुगात स्वर्गप्राप्ती होईल यात तिळमात्र शंका नसून हीच सत्य बाब आहे हेही तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०