निर्वाण दुःख निवारण्याचा मार्ग Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निर्वाण दुःख निवारण्याचा मार्ग

निर्वाण;दुःख निवारण्याचा मार्ग!

सर्व दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग म्हणजे निर्वाण. निर्वाणालाच प्रथम स्थान द्यावं. निर्वाण अवस्था प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असते.
निर्वाण अवस्था. ती प्रत्येकाच्या आयुष्यात येत असली तरी लोकं त्या निर्वाणाला महत्व देत नाहीत. त्यांना तर असं वाटते की त्यांच्या आयुष्यात निर्वाणच नाही. त्याच निर्वाणाची भीती न बाळगता ती लोकं जगत असतात आणि क्रमशः दुःख प्राप्त करीत असतात नव्हे तर दुःखी कष्टी होत असतात. ते संपत्तीचा संचय करीत असतात. जी संपत्ती निर्वाणानंतर मिळत नाही वा कोणीही घेवून जात नाही.
हे जीवन नश्वर असं जीवन आहे. या जीवनात जीवंतपणी शरीरात एक श्वास वास करीत असतो. तो श्वास म्हणजे त्याला कोणी आत्मा म्हणतात. कोणी त्याला देव म्हणतात, कोणी आणखी काही. ह्या श्वासाला तो आहे, तेव्हापर्यंत गर्व अर्थात अहंकार असतो.याच अहंकारापोटी हा श्वास राग, लोभ, द्वेषाच्या आहारी जात असतो.
राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर हे माणसाचे पाच शत्रू. हे सर्व शत्रू संपत्ती संचय करण्यातून निर्माण होत असतात म्हणजे एखाद्याला जेव्हा दुस-यांकडून संपत्ती मिळत नाही, तेव्हा राग येणारच. तसेच एखाद्याला पुत्र असतील, तर पुत्रप्राप्ती झाल्यानंतर लोभ सुटणारच आणि द्वेष........त्यात तुमचा स्वार्थच असतो. प्रतिस्पर्धा असते पुढे जाण्याची. ती प्रतिस्पर्धा नकोच आपल्या जीवनात कधी. ही अगाढ संपत्ती, ही वैभवसंपन्नता असली की गर्वही चढतो. हा गर्व म्हणजेच अहंकार. जो अहंकार हानीकारक असतो.
राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर हे आपले शत्रू. तसं पाहता जी आपल्याजवळ अगाढ संपत्ती असते, ती अगाढ संपत्ती आपली आपल्याजवळ टिकत नाही. तशीच ती वैभवसंपन्नताही. तिला टिकवायला जीवंत राहावं लागतं. परंतू प्रत्येक व्यक्ती हा जीवंत राहात नाही. तो कधी ना कधी मरण पावतोच. प्रत्येक जन्मणारा व्यक्ती हा मरण पावतोच. ही सत्यता आहे. ही सत्यता प्रत्येक जन्मणा-या जीवास माहित आहे. तरीही हा एवढा अहंकार. तरीही हा एवढा राग अन् तरीही हा एवढा लोभ. हे सर्व रिपू असून हे रिपू प्रत्येक जन्मणा-या जीवाची हानी करीत असतात.
जो मनुष्य या रिपूंची पर्वा करीत नाहीत. तेच महापरीनिर्वाणास पोहोचतात अन्यथा त्यांना मोक्ष प्राप्त होत नाही. आज सत्य हे आहे की व्यक्तीने कितीही लोभ करुन कितीही धनसंपत्ती संचय केली, तरी त्याचे म्हातारपणी त्याला सुख मिळेलच असे नाही. आज कितीही धनसंपत्ती असली तरी मोठे झाल्यावर पुत्र त्या संपत्ती धारकास विचारच नाहीत. तसेच कितीही संपत्ती असली तरी काही काही पुत्र त्या संपत्तीचाही त्याग करतात. पुर्वीही असंच होतं. कितीही कष्ट करुन पित्यानं कितीही मोठं राज्य तयार केलं असलं तरी त्याचे पुत्र साम्राज्य मिळविण्यासाठी प्रसंगी बापाची व भावाची हत्या करायला मागेपुढे पाहात नसत. त्यातच ती संपत्ती व तो साम्राज्यविस्तार त्या मेलेल्या बापानं अपार कष्टानं केला असला तरी ते राज्य त्याच्या मरणानंतर त्याच्या सोबत जात नसे. म्हणून असं दुस-यांना दुःख देवून साम्राज्यविस्तार करण्याऐवजी विशेष म्हणजे दुस-यांना सुखात ठेवले तरच खरं निर्वाणपद प्राप्त होवू शकते.
निर्वाणाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक चांगलं निर्वाण व दोन वाईट निर्वाण.
वाईट निर्वाण हे वाईट कर्मावर आधारीत असते. जर मनुष्याने चांगलं कर्मच केलं नाही. सतत राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर व गर्वच करीत राहिला तर त्याला निर्वाणपद हे वाईटच मिळणार. तसेच एखाद्यानं चांगलं कर्म केलं तर त्याला निर्वाणपद चांगलंच मिळणार. ज्याला चांगलं निर्वाणपद प्राप्त होते, तोच व्यक्ती महापरीनिर्वाणास प्राप्त होतो.
सिद्धार्थ गौतम बुद्धांनी हेच तत्व सांगीतलेले असून त्यांनी चांगल्या निर्वाणाचा मार्ग सांगीतला. जो मार्ग शांती प्रदान करणारा होता. ते म्हणत की फक्त चांगलं कर्मच आपल्या सोबत येतं. वाईट कर्म नाही. तसेच कितीही आपल्या जवळ संपत्ती असेल, तर ती आपल्यासोबत जात नाही. सर्व इथल्या इथंच राहातं. कोणी काहीही घेवून जात नाही. म्हणून माणसानं चांगलं कर्म करावं. वाईट कर्म करु नये.
आज सिद्धार्थ गौतमाचंच तत्व लागू पडतं. कारण आज एक पिता आपल्या पुत्रावर अपरंपार प्रेम करतो. त्याला जगविण्यासाठी व त्याला अपारंपारीक सुख देण्यासाठी वाईट कर्मही करतो. परंतू तो जेव्हा म्हातारा होतो. तेव्हा त्यांची ती मुलं त्याला सोडून पत्नीच्या मनानुसार चालतात व दुःख होतं. म्हणून सिद्धार्थ म्हणतात की चांगले कर्म करा व लोभ सोडा.
पित्याचे वाईट कर्म हेच त्याच्या पुत्राच्या वाईट वागण्याचे कर्म ठरत असतात. कारण तो पुत्र आपल्या पित्याच्याच कर्माचे अनुकरण करीत असतात. सिद्धार्थानं ह्याच तत्वावर जोर दिल्यानं सिद्धार्थानं सांगीतल्यानुसार आपोआपच निर्वाणाला महत्व प्राप्त झालं आहे. कारण आयुष्य जगत असतांना आपण असंच आयुष्य जगत असतो. अगदी राग, लोभ, द्वेष, मद, मत्सराचं. तेव्हा हे आयुष्य आपल्या जीवनात दुःखच आणत असतं. असं दुःख येवू नये म्हणून निर्वाण. निर्वाणानंतर दुःख कायमचं संपत असल्यानं दुःख निवारण्याचा मुख्य मार्ग हा निर्वाण होय असं गौतम बुद्ध म्हणतात. त्याचबरोबर दुःखावर थोडीशी फुंकर मध्यममार्ग वापरल्यानं टाकू शकतो व आपल्या जीवनातील दुःख थोडंसं हलकं करु शकतो असंही गौतम बुद्ध म्हणतात.
महत्वाची गोष्ट म्हणजे निर्वाण म्हणजे मृत्यू. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. जो माणूस जन्मला. तो कधी ना कधी मरणारच आहे. असे असतांना अति, लोभ, अति स्वार्थ आणि अति पैसा कमविण्याचा हव्यास आपण करु नये. मृत्यूनंतर जेही आपण कमवतो, ते जिथले तिथेच राहते, तसेच आपले वागणे जर चांगले नसले तर आपली मुलंही चांगली निघत नाही. म्हणून चांगली मुलं निघावीत, यासाठी आपले कर्मही चांगले असायला हवेत हे शंभर प्रतिशत खरं आहे. कारण जशा बिया पेरु. तसे पीक तयार होईल. तेव्हा चांगली मुलं आणि पिढी तयार करण्यासाठी आपले चांगले कर्मही कारणीभूत असतात आणि असे वाईट कर्म आलेच तर त्याचे निवारण करण्यासाठी निर्वाण हाच अंतिम मार्ग ठरतो. म्हणून निर्वाणाला न घाबरता निर्वाणावर प्रेम करावे. तोच दुःख निवारण्याचा अंतिम मार्ग होय.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०