सृष्टीनंच दिले जगण्याचे सुत्र Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सृष्टीनंच दिले जगण्याचे सुत्र

सृष्टीनंच दिले जगण्याचे सुत्र

माणसाचं जीवन दुःखानं भरलेलं आहे. तो एकटा या पृथ्वी वर आला आणि एकटाच जाणार आहे. त्यातच दुःख ही त्याला एकटच झेलावं लागतं. अशावेळी तो खचून जावू नये म्हणून त्याला गोतावळा दिला. तसंच पशूपक्षी वनस्पतीही शिकवतात जगण्याचं सुत्र. जगणं आनंददायी व्हावं म्हणून.
माणूस जन्माला येतो. त्यातच त्याचं पालनपोषण त्याचे मायबाप करीत असतात. अशावेळी तो जेव्हा थोडा मोठा होतो. तेव्हा त्यानं या जगात रमावं म्हणून त्याला मायबाप मिळतात. त्यानंतर मित्रपरीवारही. तो थोडासा मोठा झाला की त्याचा विरंगुळा व्हावा, म्हणून सृष्टी हळूहळू त्याचे सवंगडी वाढवीत असते. त्यातच या वयात त्याला गुरु मिळतात. शाळेतील मित्र मैत्रीणी मिळतात. तो आणखी थोडा मोठा होताच, त्याचा विवाह होतो, त्याचे मायबाप मोठे झालेले असतात. ते जास्त दिवस जगू शकणार नसतात. त्यामुळं त्याला त्याच्या मायबापानंतरही या सृष्टीत जगता यावं म्हणून त्याला एक जन्मभराची साथ निभाविणारी एक जोडीदारीणही सृष्टी मिळवून देत असते. तसेच तिलाही आणि त्यालाही कालांतरानं ही सृष्टी कंटाळवाणी वाटू नये, म्हणून त्या दोघांना मुलं होतात. मग मुलं होताच त्यांचं जीवन आनंददायी बनतं. पुढं मुलं मोठी होवून कर्तबगारी करीत असतांना त्यांना करमत नाही. म्हणून नातवंड होतात. एकंदरीत सांगायचं झाल्यास जी सृष्टी आपल्याला जन्माला घालते. तीच सृष्टी आपण जगावं, आपल्याला ही सृष्टी कंटाळवाणी वाटू नये, म्हणून आपल्या विरंगुळ्याचं साधनही निर्माण करुन देते. आणखी सांगायचं झाल्यास हीच सृष्टी आपण जर कर्तबगारी असेल, तर आपल्याला काही जबाबदा-याही सोपवते. त्या जबाबदा-या पार पाडता पाडता आपल्याला वेळ मिळत नाही. त्यातच वेळ कसा जातो, तेही कळत नाही.
प्रत्येक व्यक्ती हा विनाकारण जन्माला येत नाही. त्याचं काही कर्तव्य ठरलेलं असतं.सृष्टी प्रत्येकाला त्याचं कर्तव्य सोपवून जन्माला घालत असते. तिचा उद्देशच असतो की अमुक अमुक व्यक्तीनं नवनिर्मीती करावी. मग ती नवनिर्मीती कोणत्याही पद्धतीची का असेना. त्याचं कार्य संपलं की तो या जगातून निरोप घेणारच घेणार. परंतू जन्म घेणारा व्यक्ती हा आपलं कर्तव्य विसरुन आपलं कर्म करीत असतो. त्याला सृष्टी ज्या उद्देशासाठी पाठवते. ते कार्य तो करीत नसून आपल्या ज्ञानाच्या व ताकदीच्या भरवशावर वाईट कर्म करीत असते. जे कर्म सृष्टीला आवडत नाहीत. त्यातच ही सृष्टी तसे वाईट कर्म दिसताच त्याची वाट पाहात शेवटी त्या वाईट कर्माची शिक्षा माणसांना देत असते.
मग आपले वाईट कर्म कोणते?असा विचार केल्यास जे कर्म सृष्टीला वाईट वाटतात ते वाईट कर्म. आता सृष्टीला वाईट कोणते कर्म वाटतात? जे सृष्टीला आवडत नाहीत. ते कर्म वाईट वाटतात. याचा अर्थ असा की सृष्टीला तिच्या विनाशाच्या गोष्टी आवडत नाहीत. तिच्या विनाशाच्या गोष्टी म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी? तिनं जन्माला घातलेल्या गोष्टीचा नाश करणे. जसे प्राणी हत्या करणे. वृक्षांची हत्या करणे, जमीनीची हत्या करणे.
जमीनीची हत्या! हा काय प्रकार आहे? अर्थात जमीन खोदणे. कोळसा, मँगनीज (खनिजे) मिळविण्यासाठी जमीनीचे पोट फाडणे. आता लोकं म्हणतील की जर आम्ही प्राणी मारुन खाल्ले नाही, तसेच झाडांना कापून खाल्लं नाहीतर जगणार कसे? हे म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण आपण तसं केलं नाही तर आपण जगूच शकणार नाही आणि म्हणूनच यामुळं दुःख येतं. जे दुःख कालांतरानं मरतेसमयी भोगावं लागतं. लोकं असा व्यक्ती मरण पावल्यावर त्याला कर्माची फळं भोगली असं म्हणत असतात. सृष्टी हीच जगण्याची सुत्र देत असते. आपल्या जीवनाला हे जीवन जगत असतांना ते जीवन नीरस वाटणार नाही याची काळजी ही सृष्टीच घेत असते. जर सृष्टीनं या गोष्टी आपल्याला दिल्या नसत्या तर आपण या सृष्टीत जास्त काळ काढता आला नसता. त्यामुळं सृष्टीच आपली नातेवाईक आहे नव्हे तर सृष्टीच आपली मायबाप आहे असे म्हणायला काहीही हरकत नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०