रात्र थोडी सोंंगे फार
सध्या शिक्षणक्षेत्रात शिकविण्याऐवजी कागदं रंगवायचे काम जास्त आहे. त्यातच बहुुतःश कामकाज ऑनलाइन असल्यानं रोजच व्हाट्सअपवर नवनवीन माहिती भरण्याचे पेव सुटलेय. एक काम संपतच नाही तर दुसरं काम येवून ठेपते. त्यातच उन्हाळी सुट्ट्या. त्यामुळे सगळे शिक्षकवृंद सुटीवर गेलेले असतांनाही ही हजामत करण्यासाठी त्यांना शाळेत बोलवावे लागत आहे. बिचारे काही शिक्षक सुट्ट्या असतांनाही ही कामं व्यवस्थीत पार पडावी म्हणून शाळेत येत आहेत. परंतू या कसरतीत काही शिक्षक असेही आहेत की ज्यांना वर्ग एेके वर्ग अशाच प्रकारे वागतात. त्यांना या लिखीत कामाचं काही एक सुतोवाच नाही.
शिक्षणक्षेत्रातील ही व्हाट्सअपवर येणारी रोजची पत्र. ही माहिती भरा. ती माहिती भरा अशा प्रकारचा कामाचा रेटा. त्यातच ही माहिती भरण्यासाठी सीमीत वेळ. त्यातच काही काही शाळांना बाबू आणि शिपाही आहे. त्यांचं ठीक. परंतू ज्या शाळेत बाबू शिपाही नाही. शिक्षकही सुटीवर आहेत. त्या शाळेतील मुख्याध्यापकानं काय करावं? कशी ही माहिती भरावी? हा प्रश्न आहे. शिवाय या माहितीतून काय साध्य होणार आहे? हाही एक प्रश्नच आहे.
काही शाळेचं ठीक आहे की ज्या शाळेत बाबू आहेत. शिपाही आहेत तसेच मुख्याध्यापकही कायम स्वरुपाचा आहे. परंतू ज्या शाळेत बाबू नाही. शिपाही नाही तसेच मुख्याध्यापकही कायम स्वरुपाचा नाही. त्या शाळेचं कसं? हाही एक प्रश्नच आहे. कारण प्रभारी मुख्याध्यापकालाही इतर शिक्षकांएवढंच वेतन मिळतं. त्यालाही उन्हाळ्यातील सुटीतील प्रवास भत्ता देय नसतो. त्यालाही साहजीकच उन्हाळी सुट्ट्या असतात. मग त्यानं शाळेतील ही लिखीत स्वरुपाची शैक्षणीक कामं कशी करावी? हाही प्रश्न.
आज शिक्षणक्षेत्र अगदी गुंतागुंतीचं झालं आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद जरी असल्या तरी शिक्षकांना शिकविण्याचे काम होतेच. तरीही कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असा बहाणा करुन शासनानं उन्हाळ्यातही विद्यार्थ्यांच्या शाळा ठेवल्या आणि आता उन्हाळी सुटीत माहिती भरण्याचं सत्र चालवून शिक्षकालाच नाही तर मुख्याध्यापकांनाही पागल करण्याचं धोरण अवलंबलं.
महत्वाचं म्हणजे शिक्षकांना कशाला हवी ही ऑनलाइन माहिती भरणं. साध्या साध्या गोष्टी ठीक आहेत. परंतू ही दररोजची पत्र कशाला हवीत आणि यातून साध्य काय होणार? काय साध्य करायचंय? ह्या बाबी अजूनही अनाकलनीय आहेत. परंतू शासन ते करायला लावणारच. कारण त्यांच्या आज शिक्षकांना मिळणारे वेतन डोळ्यात खुपते. त्यामुळं ते शिक्षकांना कसे स्वस्थ बसू देतील! ही देखील बाब आश्चर्य करण्यासारखीच आहे. हो मानावं लागेल की शिक्षक शाळेचा आत्मा आहे.प्राण आहे. जसे विद्यार्थी शाळेचे आत्मे आहेत तसे. परंतू त्यांनाही जीवन आहे. त्यांनाही घरदार आहे. त्यांनाही त्यांची वैयक्तीकता आहे. परंतू जर अशी शाळेची कामं असतील आणि तेही शाळेला सुट्ट्या असतांना. तर त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते. त्यातच मुख्याध्यापकाच्याही. मुख्याध्यापक असा घटक आहे की जो वेतन मिळते म्हणून शाळेला चोवीस तास बांधील असतो. जरी तो एखाद्या समारोहात असेल आणि शाळेत कमीजास्त झाल्यास तो समारोह सोडून तत्काळ त्याला जावे लागते. हे केवळ वेतन मिळतं म्हणून करावं लागतं आपली वैयक्तीकता त्यागून. जणू तो शासनाचा गुलाम आहे.
विशेष म्हणजे शासनानं या बाबींकडे लक्ष द्यावे. त्यांनी कामं करुन घ्यावी. कामाला कोणताच शिक्षक वा मुख्याध्यापक नाही म्हणत नाही. परंतू निदान उन्हाळा तरी त्यांना चांगल्या पद्धतीनं उपभोगू द्यावा. या काळात शाळेव्यतिरीक्त त्यांच्या वैयक्तिक जीवनात बरीच कामं असतात. त्यांच्या परीवारात विवाह समारंभ असतात. त्यांच्या मुलांचे शाळा प्रवेश असतात. पत्नीला दिवसातून दोन तास द्यायचे असतात. परंतू शासनाच्या अशा प्रकारच्या धोरणानं वा कामानं घरी लक्ष देता येत नाही. त्यातच त्यांच्या मनाची घालमेळ सुरु होते. अशी घालमेळ की त्याचं घरी मन लागत नाही. यातच सारखी चिडचिड होते व याची परियंती त्याचा अपघात वा आत्महत्या. निव्वळ आणि निव्वळ विचार करीत असल्यानं.........
एक याबाबतीत वास्तविकता सांगतो. नुकतंच शासनानं एक तारखेला शाळा सिद्धी भरायला लावली. त्यातच पसतीस पेजेसचा यु डायसप्लसचा फाम. त्यात बिंदू नामावली. एवढंच नाही तर आता विद्यार्थ्यांची माहिती भरणं. एक निपटत नाही तर दुसरं. तरीही प्रवास भत्ता मुख्याध्यापकाला नाही. कारण तो प्रभारी. परंतू तो प्रभारी जरी असला तरी त्याला शाळेत तर रोजच जावं लागतं ना. तसेच उन्हाळी सुट्ट्या ह्या इतर शिक्षकांना. त्यालाच का नाही हाही प्रश्न. इतर शिक्षक शाळेत राबतात. मग मुख्याध्यापक हा काय बसून राहतो? वैगेरे सा-याच गोष्टी. त्यातच वरुन धमक्या. कामं न झाल्यास वेतन थांबेल. तेव्हा शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी जगावं तसं हाही मुख्य पैलू. खरंच हे शासन आहे की शिक्षक मुख्याध्यापकाच्या जीवाचे कसाई आहेत तेच कळत नाही. यावरुन एक म्हण आठवते. ती म्हणजे रात्र थोडी सोंगे फार. खरंच शाळेतील इतर शैक्षणीक कामे करायला मुख्याध्यापकाजवळ व शिक्षकांजवळ पुरेसा वेळ नाही. वेळ कमी आहे व कामं जास्त आहेत.म्हणून शिक्षणक्षेत्रातील या कामाला पाहता रात्र थोडी व सोंग फार ही म्हण अगदी यथोयोग्य बसते. शासनानं कामं नक्कीच सांगावीत. पण जी कामं अत्यावश्यक आहेत ती.विनाकारणची कामं सांगून विनाकारणचा शिक्षकांवर ताण देवू नये. असे जर झाले तर प्रत्येक मुख्याध्यापक व शिक्षक उद्या वेडा झाल्याशिवाय राहणार नाही हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०