Will Marathi schools close? books and stories free download online pdf in Marathi

मराठी शाळा बंद पडणार काय

मराठी शाळा बंद पडणार काय?

मराठी माध्यमाच्या शाळा आज ओस पडत चाललेल्या आहेत. पटसंख्या कमी होत चाललेली आहे. त्यातच शिक्षकांना चिंता लागलेली आहे की मराठी शाळा बंद होणार तर नाही.
सगळा विद्यार्थ्यांचा ओंढा मराठी माध्यमाकडे न झुकता तो इंग्रजी माध्यमाकडे जातांना दिसत आहे. त्यातच शिक्षकांची वणवण भटकंती वाढलेली आहे. तसेच आपली शाळा टिकावी यासाठी स्पर्धेची चढाओढ लागलेली असून एका एका विद्यार्थ्यांसाठी शिक्षक तसेच मुख्याध्यापक रस्सीखेचणीचा खेळ खेळत आहेत नव्हे तर एक एक विद्यार्थी मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
मराठी शाळा बंद पडणार की काय, अशी भीती आज निर्माण झालेली असून जो तो काँन्व्हेंटच्या पाठीमागे लागत आहे. त्यातच सरकारनंही काँन्व्हेंटमध्ये मराठीचा एक विषय सक्तीचा करुन जणू काँन्व्हेंटला एकतर्फी मान्यताच दिलेली आहे. यातूनच मराठी शाळेबद्दल शिक्षकांच्या मनात भीती निर्माण होणार नाही तर काय, त्यातच शिक्षकांना आपल्या नोक-या धोक्यात आल्या आहेत असे वाटायला लागले आहे.
मराठी शाळेची दुर्गती झाली. त्याची कारणंही तशीच आहेत. मराठीच्या शाळेत शिकविणारे पालक हे जास्त शिकलेले नसतात. त्यातच ते अत्यंत गरीब असतात. जे आपल्या मुलांवर शिक्षणासाठी पैसे लावू शकत नाहीत. तसेच ते शिकवण्याही लावून देवू शकत नाही अन् ते कोणाकोणाला शिकवण्या लावून देतील! अज्ञानामुळं अशी मंडळी जास्तीत जास्त मुलं पैदा करीत असून त्यांना पुरेसं खायलाही देवू शकत नाहीत. याऊलट काँन्व्हेंटमध्ये शिकविणारे पालक हे जास्त शिकलेले असतात. ते सुशिक्षितच नाही तर श्रीमंतही असतात. ते आपल्या पाल्यांना काँन्व्हेंटमध्ये टाकतात. व्यतिरिक्त घरीही त्यांचा अभ्यास घेतात. त्याशिवाय आपल्या पाल्यांच्या शिकविण्याही लावून देतात. अशी शिकलेली पालक मंडळी एक किंवा दोन मुलांव्यतिरिक्त जास्त मुलं पैदा करीत नाहीत. त्यामुळं मुलं शिकवायला जास्तीत जास्त पैसा उरतो. जो पैसा त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी कामात येतो.
मराठी शाळेत अशा सुविधा नसतात की ज्यातून विद्यार्थ्यांचा विकास होवू शकेल. मुलांना शिकवायला योग्य असा पर्याय मराठी शाळेतील पालक मिळवून देवू शकत नाहीत. ते आपल्या पाल्यांसाठी पैसे लावू शकत नाही. आपल्या पाल्यांना शिकवणी लावून देवू शकत नाही. आपल्या पाल्यांचा अभ्यास घरी बसवून शिकवू शकत नाही. त्यामुळं मराठी शाळा मागे पडणार नाही तर काय?
आज मराठी शाळा मागे पडत चाललेल्या आहेत. जो तो काँन्व्हेंटलाच टाकत आहे. कारण त्यांना वाटते की मुलं काँन्व्हेंटमध्येच हुशार होतात. परंतू विशेष सांगायचं म्हणजे ज्या सुविधा इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मिळतात. त्या सुविधा मराठी माध्यमाच्या मुलांना मिळत नसल्यानं मराठी माध्यमाची मुलं मागं पडणार नाही तर काय? परंतू यामध्ये त्या घटकांचं कौतूक करण्यासारखं आहे. तो घटक म्हणजे या मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक. एवढ्या असुविधा असूनही या मराठी माध्यमातील शिक्षक तारेवरची कसरत करतात नव्हे तर पालक कोणतेच सहकार्य करीत नसूनही ते अत्यंत चिकाटीने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात. जर काँन्व्हेंटसारख्या सुविधा मराठी माध्यमाच्या मुलांना असत्या तर तिही मुलं आज पुढंच राहिली असती.
मराठी शाळेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक गोष्ट आवर्जून सांगेन की याच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्र घडवलं. काल हीच मराठी माणसं लढली आणि देश स्वतंत्र्य केला. हा इतिहास आहे. पण असे जरी असले तरी आज मराठी माध्यमातील मुलं मागं पडत चाललेली आहेत. शिक्षक अजूनही तग धरुन आहेत. ते अापल्या नोक-या वाचविण्यासाठी आवाहन करीत आहेत. वणवण भटकंती करीत आहेत. मराठी शाळा वाचवा म्हणत आहेत. पण त्यांच्या या प्रयत्नानं मराठी शाळा वाचणार का? हा यक्षप्रश्न अजूनही मनामनात शिल्लक आहे. जो मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
आज हे सर्व पाहता मराठी माध्यम संपण्याच्या मार्गावर असून मराठी माध्यमाच्या शाळा संपणार की काय किंवा मराठी शाळा बंद होणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यातच मराठी माध्यम बंद होवून काँन्व्हेंटला प्राधान्य देवून नवी पाश्चात्य विचारधारा निर्माण होवून या देशातील मराठीची संस्कृतीही संपते काय? अशीही भीती पर्यायानं निर्माण झाली आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED