Avoid mistakes as much as possible books and stories free download online pdf in Marathi

शक्यतोवर चुका टाळाव्यात

शक्यतोवर चुका टाकाव्यात?

चुकीलाही माफी असते. जर एखादा व्यक्ती एखाद्या वेळेस चुकला तर. परंतू त्या चुकांना माफी कशी द्यावी की जी चूक वारंवार होते. काही लोकं वारंवार चुका करीत असतात. त्याची काही कारणं असतात. पहिलं म्हणजे आळसपणा. काम करायचा कंटाळा येणे. ज्या लोकांना काम करायचा अतिशय मोठ्या प्रमाणात कंटाळा येतो, ती मंडळी वारंवार चुकतात. काही मंडळी आपल्याला कोणी कामच सांगू नये म्हणून जाणूनबुजून चुका करीत असतात. काही मंडळी ही अनवधानानं चुकतात. काही मंडळी हे बेजबाबदारीपणानं चुकत असतात. त्यांना जबाबदारी काय असते ते समजतच नाही. तसंच काही मंडळींना चुका करायची सवय असते म्हणून चुकतात.
चुकांना माफी असावी. परंतू कोणत्या? ज्या चुका अनवधानानं होतात. तसेच ज्या चुका वारंवार होत नाही. एखाद्या वेळेसच होते. तशीच जी चूक किरकोळ स्वरुपाची असते. परंतू ज्या चुका कोणी आळस करुन करीत असेल, तर त्या लोकांच्यात नवा उत्साह भरण्यासाठी त्यांना चुकांवर माफी देवू नये. तसंच जी मंडळी जाणूनबुजून आपल्याला काम सांगू नये म्हणून चुका करतात. अशांना वेळीच फटकारले पाहिजे. अशांनाही चुकांवर क्षमा करु नये आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला वारंवार चुका करायची सवय असते. त्या व्यक्तीला कधीच माफी देवू नये.
कारण एक चूक. एक चूक पुर्ण व्यवहार चुकवून टाकते. एक चूक पुर्ण जीवनभर बदलवून टाकते अन् एक चूक पुर्ण आयुष्यच उध्वस्त करुन टाकते.
चुका...... चुका करणं सोपं काम आहे. परंतू त्या सुधारणं कठीण काम आहे. चुकीबद्दल एक उदाहरण देतो. आपण ताजमहालचं नाव ऐकलं असेलच. तो शहाजहान बादशाहानं आपली बेगम मुमताजमहलसाठी बांधला. कारण त्याचं प्रेम होतं तिच्यावर. बरोबर आहे. प्रेमच होतं आणि लोकं म्हणतात की विशेष प्रेम यासाठी की तिनं त्याचा विवाह आपल्या बहिणीसोबतही लावून दिलेला होता. तसंच तिनं शहाजहानसाठी अशा ब-याच गोष्टी केल्या होत्या की ज्या गोष्टीला विसरता येत नव्हतं. म्हणूनच ती सदैव स्मरणात राहावी. म्हणून शहाजहान बादशाहानं तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला.
ज्या शहाजहान बादशाहानं ताजमहाल आपली लाडाची बेगम मुमताजमहल साठी बांधला. त्यावेळेस तो महल बांधून होताच त्याच्यासमोर बांधकामाचा कारागीर हजर झाला. म्हणाला,
"जहापनाह, मी महाल बांधून पुर्ण केला आहे. आता तो आपल्या खिदमतमध्ये तयार आहे. आपण हवं तर पाहून घ्यावं."
बादशाहानं ताजमहाल पाहिला. त्याचं रेखीवपण पाहिलं. तसा तो वास्तुकलेचा एक देखणा नमुनाच होता. ते पाहून बादशाहा भारावला व विचार करु लागला की यानं ताजमहाल तर बांधला. परंतू असा ताजमहाल दुसरीकडे कुठेच बांधला जावू नये. काय करावं.
बादशाहा विचार करु लागला. विचारांती त्याला समजलं की आपण याचे हातपाय कापावे. तसा विचार केला खरा. परंतू क्षणातच विचार आला की नाही. जर याचे हातपाय छाटले तरी हा मुखानं किंवा कोणत्याही स्वरुपात असा ताजमहाल उभारु शकतो. त्यापासून आपण याची बुद्धीच छाटली तर........ना रहेगा बास ना बजेगी बासरी. बुद्धीच छाटावी. परंतू ती कशी छाटणार. त्यासाठी डोकंच छाटावं लागेल. म्हणजे बुद्धी नष्ट होईल.
बादशाहा विचारच करीत होता. तोच तो बांधकाम कारागीर म्हणाला,
"जहापनाह, कसला विचार करताय?"
"विचार करतोय की आता बांधकाम पुरे झाले. झाले ना?"
"होय. बांधकाम पुर्ण झालं. आता सांगा आपला विचार?"
"काहीच बाकी नाही ना?"
"नाही. काहीच बाकी नाही."
"आता सांगतो मी माझा विचार." असे म्हणत तो आपले विचार सांगू लागला.
"मी विचार केलाय की यापुढं असं ताजमहाल सारखं बांधकाम कुठंही दुसरीकडं उभं राहू नये. म्हणून तुझी बुद्धी छापायचं ठरवलं."
"बुद्धी! म्हणजे?"
"अरे, डोकं. तुझं डोकंच धडावेगळं करायचं आहे मला. म्हणजे ना रहेगा बास व ना बजेगी बासरी. तूच राहणार नाहीस तर अशी ताजमहाल सारखी इमारत पुन्हा कशी उभी राहील!"
ते बादशाहाचे बोल. ते माहीतच होतं त्या कारागीराला. परंतू त्यावर किंचीतही न घाबरता तो म्हणाला,
"खुशाल छाटा. परंतू एक काम बाकी राहिलंय. ते पुर्ण करतोय. जेणेकरुन जहापनाह मी खुशीनं मरु शकेल व माझ्या आत्म्यालाही शांती मिळेल आणि आपल्या बेगमच्याही आत्म्याला शांती मिळेल."
"ठीक आहे." बादशाहा म्हणाला. त्याला काय माहीत होते की तो त्याचा जीव घेवून एक घोडचूक करीत आहे.
कारागीर गेला. त्याला बादशाहानं सांगीतलं होतं की तो त्याचा जीव घेणार. म्हणून त्यानं जाणूनबुजून एक अशी युक्ती केली नव्हे तर चूक करुन ठेवली की त्याचे परिणाम बादशाहाला मरणापर्यंत दिसलं आणि आजही दिसत आहे बादशाहा गेल्यानंतरच्या एवढ्या वर्षानंतरही. बादशाहानं केलेली एक लहानशी चूक आजही कित्येक कारागीरांना सुधरवता आली नाही. कित्येक पिढ्या गेल्या आणि कित्येक कारागीर गेले तरीही. ती चूक आहे वर छतावरुन गळणारं पाणी. ते छतावरुन गळणारं पाणी थेट मुमताजमहलच्या डोक्यावरच गळतं. बादशाहानं हयातीतही ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतू जमलं नाही. त्यानंतर इतरही कारागीरांना. कदाचीत त्याच व्यक्तीला बादशाहानं जीवंत ठेवलं असतं तर आजही त्या ताजमहालात तसं पावसाचं पाणी छतावरुन त्या कब्रच्या तोंडाजवळ गळलं नसतं.
भारतात आणखी एक चूक झाली, ती राजा दाहिरच्या काळात. राजा दाहिर हा हिंदू राजा. त्यावेळेस त्याला मारण्यासाठी मोहम्मद बिन काहीच नावाचा पहिला मुस्लिम व्यक्ती सैन्य घेवून भारतात आला. कसा आला? त्यावेळेसही एक चूक झाली. घोडचूकच ती. येथील अलोर किल्ल्याच्या किल्लेदार ज्ञानमतला राजा बनायचे होते. त्याचबरोबर त्याचा सहाय्यक बुद्धभुषणला सेनापती. त्यांनी तशी मनिषा मोहम्मद बिन कासीमला बोलून दाखवली व मदत करण्याविषयी विनंती केली. त्यावेळेस मोहम्मद बिन कासीम बगदादला राहात होता. परंतू त्या बोलण्यानं तो भारतात आला व त्यानं राजा दाहिरला ठार केलं. त्यानंतर त्यानं ज्ञानात व बुद्धभुषणलाही. याचाच अर्थ असा की आपल्याच चुकीनं आपलंच तेल गेलं व तूप गेलं अशी स्थिती निर्माण झाली होती. ह्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली पृथ्वीराज चव्हाणच्या काळात. जयसिंग राठोडला दिल्लीचा शासक बनायचे होते. त्यानंही संधी केली मोहम्मद घोरीशी. बदल्यात पृथ्वीराजला बंदी बनवून त्यांना मारल्यानंतर जयसिंगालाही त्यानं राजा बनवलं नाही. उलट त्याला ठार केलं व त्याच्या मुलाला दिल्लीचा दरवाजा तोडतांना त्या दरवाज्याच्या खिळ्याला लटकावलं व हत्तीच्या धडकेनं मारुन टाकलं त्याला. तरीही आम्ही सुधारलो नाही. सतराव्या शतकात मिरजाफरनं गादीवर बसण्यासाठी आपल्याच जावयाची म्हणजे मिरकासीमची हत्या करवली. बदल्यात मिरजाफरलाही तुरुंग झाला. तसंच रघुनाथरावानंही राजगादीवर बसण्यासाठी आपल्याच पुतण्याची म्हणजे नारायणराव पेशव्याची हत्या केली. हे कार्य इंग्रजांकडून करवून घेतलं गेलं. बदल्यात रघुनाथरावाला काय मिळालं? त्याला इंग्रजांनी तुरुंगात टाकलं.
अनेक ठिकाणी भारतीय मंडळी चुका करीत गेले स्वार्थासाठी. बदल्यात काहीच मिळालं नाही. उलट त्याचे गंभीर परिणाम होत गेले. आपल्यालाच पारतंत्र्य शोषावं लागलं. तरीही आम्ही सुधरलो का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. काल आपल्याच चुकीनं आपण पारतंत्र्य भोगलं. एकसंघ राहिलो नाही. इंग्रजांची वेळीच चाल लक्षात घेतली नाही अन् आजही तशी चूक आपल्या लक्षात येत नाही. बरेचजणांना सत्ता पाहिजे. मला सत्तेवर कसं बसता येईल याचा प्रत्येकालाच विचार. कधी एकसंघ होणार नाही आपण. सामान्य लोकं वा बहुजण तर कधीच नाही. आज निवडणुकीचीच गोष्ट घेवू. देशात केवळ दोनच पार्ट्या असायला हव्या. अमेरिका किंवा इंग्लडसारखा. परंतू आपल्या देशात किती पार्ट्या आहेत. कशासाठी आहेत? का उपयोग आहे एवढ्या पार्ट्यांचा? गरज नाहीच तेवढ्या पार्ट्रयांची. तरीही स्वार्थपणा व मतलबीपणा यामुळंच प्रत्येकजण निवडणुकीत उभा राहतो. स्वतंत्र्यता आहे म्हणतो. निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार आहे म्हणतो आणि उभा राहतो. परंतू निवडून येतो का? तर याचंही उत्तर नाही असंच येतं. आपली क्षमता नसतांना ही मंडळी का निवडणुकीत उभे राहतात तेच कळत नाही. शिवाय एवढे पक्ष उभे राहतात की त्यांच्यासाठी निवडणूक यंत्रणा राबवितांना देशाचा भरपूर पैसा खर्च होतो. ज्या खर्चाला बजेटमध्ये जोडलं जात नाही. ही झाली देशाची निवडणूक. परंतू साधी नगरसेवकाची निवडणूक पाहू. याही निवडणुकीची तसं पाहिल्यास काहीच गरज नाही. फालतूचा खर्च आहे.
आज देशातील पार्ट्यांचे निरीक्षण करता बहुतेक पार्ट्या ह्या बहुजणांच्याच आहेत. त्यांच्यात एकीच नाही. मग निवडून कसे येणार. ती आपली चूकच आहे. स्वातंत्र्य आहे, निवडणूकीला उभं राहण्याचा अधिकार आहे म्हणून सर्वांनीच टाळूवरचं लोणी खावून पाहायचं काय आपल्याच मतांचं विभाजन करुन आणि वारंवार चुका करुन. परंतू आम्हाला स्वार्थ आहे ना. आमच्याच स्वार्थीपणातून चूक करण्याची सवय आहे ना पूर्वीपासूनच. ज्याप्रमाणे मोहम्मद बिन कासीम, मोहम्मद घोरी व इंग्रजांनी आमीष दाखवून आपल्याकडून त्या काळात जी चूक करुन घेतली. तीच चूक आजही आपल्या लक्षात येत नाही व त्याच चुका आपण वारंवार करीत असतो. केवळ सत्तेवर येण्यासाठी नाही तर आपल्या स्वार्थासाठी. मला बसता येत नाही ना सत्तेवर. मग तुही बसायचं नाही सत्तेवर. जसं दोन मांजरांचं भांडण आणि माकडाचा लाभ.
आज एवढ्या पार्ट्या आहेत की या पार्ट्यांचा खर्च पाहता देशाच्या अर्थव्यवस्थेची अपरीमीत हानी होते. परंतू त्याचा विचार कोण करतो? मुख्य पार्ट्या ह्या लहानमोठ्या पार्टी नेत्यांना भडकवून त्यांना मतांचं विभाजन करण्यासाठी उभं करतात. म्हणतात की आम्ही सत्तेवर आलो की तुम्हाला मंत्रीपद देवू. मग निवडणूक झाली आणि ते निवडून आले की मंत्रीपदही मिळतं. परंतू स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्याचा, विकास करण्याचा अधिकार मिळतो का? तर याचं उत्तर नाही असंच येतं.
पार्ट्यांबाबत सांगायचं झाल्यास बहुजनांच्या तर शेकडो पार्ट्या आहेत. एकट्या अस्पृश्य समाजात एवढ्या पार्ट्यांची गरज नसतांना प्रत्येक घरामागे एक पार्टी आहे. त्यातच मुख्य पार्ट्यांनीही या अस्पृश्य समाजातील काही कुटूंबात घर केलं आहे. मग अस्पृश्यांच्या मताचं विभाजन झाल्यानं ते नेते कसे निवडून येतील! ती आपली चूकच आहे. बरं झालं आरक्षण आहे म्हणून. नाहीतर एकही अस्पृश्य समाजाचा नेता निवडून आला नसता. ही देखील आपली चूकच आहे.
चुका.....अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चुका करत आहो आपण. कालही चुका करत होतो आपण. वारंवार चुका करीत असतो आपण आणि स्वार्थासाठी जाणूनबुजूनही चुका करीत असतो आपण. त्याबद्दल भोगलेच आहे आपण त्यांचे गंभीर परिणाम. तरीही सुधारलो नाही आपण. कधी सुधारणारही नाही. कारण जणू आपण शपथच घेतलीय ना. वारंवार चुका करण्याची. मग आपलं कितीही नुकसान होवो.
महत्वाचं सांगायचं म्हणजे का चुका कराव्या? का वारंवार तीच कृती करुन वा त्याची पुनरावृत्ती करुन आपल्या चुकात वाढ करावी? अन् का आपण आपल्याच संकटात वाढ करावी? काल आपण चुका केल्या, ज्याचे परिणाम आपण भोगलेच आहे. आज वेळ आहे विचार करायला आणि आपल्या चुका सुधारायला. कारण आपण स्वतंत्र आहोत आणि आपल्याला जसं निवडणुकीत उभं राहण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच आपल्याला विचार करण्याचंही स्वातंत्र्य आहे. आपण तसा विचार करावा व आपल्या चुका सुधाराव्यात. जेणेकरुन आपण पुन्हा कधीच गुलाम होणार नाही. नाहीतर अशाच आपल्या स्वार्थीपणानं आपण चुका वारंवार करीत राहिलो ना तर आज स्वतंत्र आहोत, उद्या राहणार की नाही याचीच काळजी वाटते नव्हे तर शंका. आपण स्वतःला आणि आपल्या देशाला वाचवायचं असेल तर शक्यतोवर चुका टाळाव्यात. मग त्या किरकोळ स्वरुपाच्या का असेना. यात तिळमात्र शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED