पाऊस; आमचा मित्र की शत्रूसारखा!
पावसाळा सुरु आहे. श्रावण महिना अद्याप लागला नाही. बाहेर टिपटिप पाऊस पडत आहे. काळेकुट्ट मेघ आकाशात दिसत आहे. तसा कधीकधी वीजेचा कडकडाटही ऐकू येत आहे. त्यातच पावसाच्या धाराही येत अाहेत.
पुर्वी काही दिवसपर्यंत दडी मारुन बसलेला पाऊस दोन दिवसापासून चांगला मुसळधार कोसळत असल्यासारखा दिसत असून या दोन दिवसात अगदी शेतक-यांना दिलासा देण्यालायक पाऊस झालेला आहे. त्यातच यावेळी आलेल्या पावसानं शेतकरीच नाही तर त्याची पीकही आनंदित झालेली आहेत.
आज मुख्यतः खरी गरज आहे ती पावसाची. पाऊस नसेल तर पीकं पीकू शकत नाहीत. ती पेरताच येवू शकत नाहीत आणि ती पिकली नाहीत तर दुष्काळ निर्माण होवू शकतो.
पाऊस जसा आनंद देतो तसं दुःखही देत असतो. कधीकधी एवढा पाऊस पडतो की त्या पावसाला रोक लावणे कठीण जाते. ज्यावेळी पाऊस जास्त पडतो. तेव्हा नद्या नाले दुफळी भरुन ओसंडून वाहात असतात. यातच सततच्या पावसानं नदी नाल्यांना पूरही येतो. शेतात व शिवारात सतत पाणीही पडत असल्यानं शेतात पाणी साचून पीकं पिवळी पडतात. नव्हे तर त्यांची पानंही पिवळी पडतात.
युद्धजन्य परीस्थीतीमध्ये तर पावसाळा कहरच करीत असतो. पाऊस अशावेळी आल्यास कित्येक सैनिक हे रोगाच्या आहारी जातात. त्यातूनच ज्या देशातील सैनिकांची प्रतिकारशक्ती कमजोर असेल, असे सैनिक देश युद्ध हारत असतात. उदा. दुस-या महायुद्धाच्या वेळी जर्मन सैनिकांची व आझाद हिंद सेनेची अशीच गत झाली. नेपोलियन बोनापार्टच्या वेळीही अशीच गत झाली. तसेच सिकंदर जेव्हा भारतात आला, तेव्हाही पावसानं असाच घात केला.
युद्ध जिंकायचं असेल तर पाऊस हा महत्वपूर्ण भुमिका बजावतो. त्याचं सतत पडणं हे सैनिकांना नेस्तनाबूत करणारं पाऊल ठरत असतं. कारण एवढ्या भव्यदिव्य सैनिकांना पावसात रसद पोहोचविणं काही साधी सोेपी गोष्ट नाही. त्यातच वाहत्या नद्या व भरधाव ओढे यामुळं रस्ते वाहून जातात. त्यामुळे नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी रसद न पोहोचल्यानं सैन्याची उपासमार होत असते व युद्ध हारावं लागतं.
पाऊस जर जास्त आलाच तर या जास्त पावसाचा त्रास पाण्यातील जीवजंतूंनाही होत असतो, तसेच पाण्याबाहेरील जीवजंतूंनाही होत असतो. या पावसाच्या पाण्यानं गड्डे भरल्यानं मुंग्यांच्या वारुळातही पाणी शिरतं व असंख्य मुंग्या मरण पावत असतात. त्यातच काही जनावरे पुराचे ओढे पार करीत असतांना वाहूनही जात असतात. काही मासोळ्याही पुराच्या विरुद्ध दिशेनं पोहतात नव्हे तर त्या पाण्यात उड्याही मारतात. त्यातच अशा उड्या मारत असतांना त्यांच्या उड्या ह्या किना-यावर पडून त्या किना-यावरुन पाण्यात न जाता आल्यानं त्या मासोळ्या मरण पावतात. काही मासोळ्या मात्र पाण्याच्या या वाहव्याने रस्त्यातील झाडावर चढतात. त्यातच त्या झाडाखालचे पाणी ओसरताच त्या झाडावर चढलेल्या मासोळ्या मरण पावतात.
महत्वाचं म्हणजे पाऊस हा आपला शत्रूच आहे. कारण या पावसात साचणा-या पाण्यात डासाची व माशांच्या अळ्यांची उत्पत्ती होवून हिवताप व विषमज्वर तसेच कावीळ रोगांचाही प्रादुर्भाव होत असतो. अर्थात सांगायचं म्हणजे पाऊस हा शत्रूच वाटतो. परंतू तो शत्रू जरी वाटत असला तरी तो शेतातील पीकं पिकवीत असल्यानं तो मित्रासारखा जेव्हा वागतो. तेव्हा खरंच विचार येतो की पाऊस खरंच कितीतरी चांगल्या स्वरुपाचा असतो. तरी पावसाळा बरा नाही. असे बरेच लोकं म्हणत असतात. परंतू पावसाळा हा आपला शत्रू नाही, मित्र आहे. कारण त्या पावसात जो आनंद मिळतो, तो आनंद कोणत्याही मापदंडात मोजता येत नाही. ते काळे घननीळ ढग, तो इंद्रधनू, ते बेडकांचे आवाज, त्या रातकिड्यांची किरकिर आणि ती रिमझीम टपकणारी जलधारा, उनसावलीचा पाठशिवणीचा खेळ हा पावसाळ्याशिवाय कधीच दिसत नाही. म्हणून इतर ऋतूंपेक्षा पावसाळा हा अतिशय चांगला असा ऋतू आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०