Hive and rain books and stories free download online pdf in Marathi

पोळा आणि पाऊस

पोळा आणि पाऊस

ते रामपूर नावाचं गाव. त्या गावात महादेव नावाचा एक शेतकरी राहात होता. तो आपली पत्नी शिला व दोन लहान मुलासमवेत खुश होता. अगदी गुण्यागोविंदानं तो मुलांच्या व आपल्या पत्नीच्या इच्छा पुरवीत असे.
गाव तसं पाहिल्यास जंगलात होतं. सह्यांद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं ते गाव. सह्यांद्रीला वारे अडून दरवर्षी पाऊस यायचा. तो मोजता यायचा नाही. त्यातच दरड कोसळणे व ओढ्याला पूर येणे. त्यातच त्या ओढ्यातून माणसं वाहून जाणे इत्यादी घटना नेहमी होत असायच्या.
आज पाऊस सुरु होता. पावसाची संततधार पाहून शिलाला विचार येत होता. दोन्ही मुलं तिच्या भोवताल तिला चिपकून बसली होती. त्यातच तिला काय करावं सुचत नव्हतं.
आज पोळ्याचा सण होता. सर्व गावातील मंडळी आनंदात होती. ते पोळ्याचा सण साजरा करीत होते. त्यांनी आपल्या बैलाला सजवलं होतं. परंतू पाऊस त्यांच्या आनंदावर विरजण पाडतं की काय अशी चिन्ह दिसत होती.
पाऊस आपलं काम करीत होता. त्यानं कदापिही थांबण्याचा घात घातला नाही. त्यातच पोळा भरला. शेतकरी आपल्या बैलाला घेवून पोळ्यात गेले नव्हे तर ज्या बैलानं त्यांना वर्षभर जपलं. वर्षभर त्रास होवू दिला नाही. त्यांच्यासाठी एक दिवस आपण भिजलोच तर काय झालं असा विचार करुन लोकं आपल्या बैलासाठी पोळा भरवायला तयार झाले. मात्र त्याचा राग पावसालाही आला असेल. त्यानं आपला वेग वाढवला होता.
पोळा भरला खरा. परंतू तो बरोबर भरलाच नाही. तसं पाहता दरवर्षी जी पोळ्यात गर्दी राहायची. ती गर्दी पावसाच्या पाण्यामुळं दिसलीच नाही. जे शेतकरी होते, ज्यांच्याकडे बैलजोडी होती. तेच शेतकरी डोक्यावर छत्री घेवून त्या पावसात आखरावर गोळा झाले. पोळा फुटला तसे ते घरी येवून इकडंतिकडं आपल्या बैलाला न फिरवता बैलं घरीच बांधली. कारण रस्त्यारस्त्यावर पाणीच पाणी चहूबाजूला पसरलं होतं.
पावसानं आज कहरच केला होता. आज रात्रभर पावसानं काही थांबण्याचा विचार केला नसेल कदाचित, पाऊस कोसळतच राहिला. त्यातच शिलाला ते पाहून प्रश्न पडत होता. कारण पावसाचे टपोरे थेंब तिच्या घरातील छतावरुन आत येत होते. त्यामुळं खालची जमीन ओलिचिंब झाली होती. मुलं पावसात तिला बिलगून होती. त्यांनाही भीती वाटत होती त्या पावसाची. कारण पावसासोबत विजाही कडाडत होत्या. त्याचबरोबर मोठमोठ्या आवाजात ढगांचा गडगडाट.
शिलानं मुलांना जेवन दिलं. तिनंही जेवन घेतलं. पण तिच्या काही ते जेवन गळ्यात उतरत नव्हतं. त्याचं कारणही तसंच होतं. तिला ते सर्व आठवत होतं.
आज तिला तिच्या गतकाळातील आठवणी आठवत होत्या. तिचा पती तिला पनीर आणण्याविषयी म्हणत होता दरवर्षी. पण ती त्याला मटन आणा म्हणत असे. परंतू त्यावर तिचा पती म्हणायचा की पनीर खाणे हेही हिंसा करण्यासारखंच नसतं. परंतू ती म्हणत असे की पनीरातही गाईचं रक्तच असतं. जे पनीर दूधापासून बनतं, ते दूध काढतांना गाई, म्हशींनाही वेदना होतातच.
त्याचं बरोबर होतं की नाही ते आज शिलाला समजत नव्हतं. पण ती गतकाळातील आठवण तिला आज येत होती. आज तिचा पती जीवंत नव्हता.
आज तिचा पती जीवंत नव्हता. तो तर मागील वर्षीच पोळ्याच्या दिवशीच मरण पावला होता. ज्या दिवशी पाऊस येत होता. ज्या दिवशी पनीरचीच भाजी बनवली होती. जी भाजी त्याला आवडत असल्यानं पोळ्यात जाण्यापुर्वी ती खावून जातील म्हणून तिनं बनवली होती.
गतवर्षीचाही पाऊस तिच्यासाठी धोकादायक ठरला होता. गतवर्षीही सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. त्यातच घरी बैल बांधून ठेवण्यापेक्षा थोडं बैलाला चारुन आणावे म्हणून तिच्या पतीनं बैलं सोडले. ते बैलं रानात नेले. तसं पाहता त्याचं शेत हे त्या ओढ्यापलिकडं होतं.
दुपारी शेतात जातांना ओढ्याला पूर नव्हता. पण तो जेव्हा परत फिरला. तेव्हा मात्र ओढ्याला पूर होता. त्यातच त्यानं बराच वेळ वाट पाहिली पूर ओसरण्याची. पण पूर ओसरायला तयार नव्हता. त्यातच आपल्याला बैलं पोळ्यात न्यायला वेळ होईल. आपल्या बैलाचा अपमान होईल. पोळ्याचा एकच दिवस बैलासाठी मिळतो. आजनंतर वर्षभर हा दिवस बैलासाठी उजळणार नाही असा विचार करुन त्यानं बैलाचं शेपूट पकडली व तो ओढा पार करु लागला.
ओढ्याला भयंकर पूर होता. तसं पाहता त्या ओढ्यातील पाण्याला वेगही होता. त्यातच ओढ्याच्या अर्ध्या पाण्यात गेल्यावर त्याच्या हातून बैलाचं शेपूट सुटलं व वाहत्या ओढ्याच्या धारेनं तो त्या ओढ्याच्या पाण्यात वाहात गेला.
सायंकाळी बैलं घरी परत आली. मात्र त्यांच्या मालकाचा पत्ता नव्हता. तो मालक केव्हाचाच ओढ्याच्या पाण्यातून वाहात गेला होता.
बैलं घरी येताच व त्याचा मालक घरी आला नाही हे कळल्यावर शिला त्याला शोधायला शेताकडं निघाली. आज तिनं बैलं सजवली नाही. त्यांना पोळ्यातही नेलं नाही. सगळं लक्ष तिचं आपल्या पतीमध्ये शिरलं होतं. तो कुठं गेला असेल? हाच प्रश्न तिला सातत्याने सतावत होता.
महादेव काही तिला खुप शोधूनही भेटला नाही. तसे दोनचार दिवस निघून गेले. महादेव कसा गायब झाला याचा थांगपत्ता नव्हता. तो ओढ्यात वाहून गेला की त्याला कोणत्या जंगली श्वापदानं खाल्लं की कोणी मारुन टाकलं याबद्दल काहीही कल्पना नव्हती. तशी तिनं त्याच्या अदृश्य होण्याची तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनला टाकली. तसे दोन तीन दिवस झाले होते.
दोन तीन दिवस झाले होते. एक पोलिस अचानक घरी आला. त्यानं सांगीतलं की ओढ्याच्या खालच्या भागात एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. आपण पोलिसस्टेशनला येवून त्या मृतदेहाची शहानिशा करुन घ्यावी.
पोलिसानं सुचना दिल्यानुसार शिलानं पोलिसस्टेशन गाठलं. मृतदेह पाहिलं. तसं तिला कळून चुकलं की तो मृतदेह तिच्या पतीचाच म्हणजे महादेवचाच आहे. त्यानुसार आता पक्की खात्री पटली.
आज तिला सगळं आठवत होतं. तिचा पती, त्या पतीचं ते प्रेमळ बोलणं, त्याच्या प्रेमळ आठवणी सारंकाही आठवत होतं. तिला पोळा आवडत नव्हता. कारण पोळ्याच्याच दिवशी नियतीनं तिचा पती हिरावला होता. त्याच पोळ्याचा दोष नव्हता. दोष पावसाचा होता नव्हे तर दोष होता निसर्गचक्राचा. पण ती पोळ्यालाच दोष देत देत आज त्या आठवणी आठवत होती. जणू त्या आठवणीनेच तिच्या पोळ्याच्या खुशीवर विरजण पाडलं होतं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय