समान आहेत का सर्व Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समान आहेत का सर्व

सर्व समान आहेत?

आज सर्व समान आहेत. संविधानानं सर्वांना समानता प्रदान केलेली आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मग ते अस्पृश्य असो की आदिवासी. उच्चवर्णीय असो की स्वतःला कनिष्ठ समजणारे कनिष्ठ.
गेवराई तालुक्यातील घटना तुम्ही हलक्या जातीच्या बाया. गोदापात्रात कपडे धुवायचा तुम्हाला अधिकार नाही असं ते भांडण. यात गावगुंडांनी केला दलितावर अत्याचार. बातमी वाचून अक्षरशः मनामध्ये धडकी भरेल आणि आजही जातीभेद आहे असे वाटेल. तसं पाहता जातीयता ही किडच आहे. मनामनातून पोखरलेली. आज ती किड उजेडात येत आहे.
पुर्वी अशी किड नव्हती का? असा जर प्रश्न केल्यास, नव्हती आणि आजही नाही असं उत्तर काही अंशी देता येईल. कारण जातीच्या आधारावर किस काढणं कुठंतरी अस्पृश्य लोकांना हिनवणं आहे आणि हा अस्पृश्य समाज स्वतः मी अमूक अमूक जातीचा आहे व माझी अमूक अमूक जात असून माझ्यावर नव्हे तर आज माझ्या जातीवर अन्याय झाला असं म्हणणं कुठंतरी आंधळ्याच्या हातात काठी देण्यासारखं आहे व स्वतःला कमजोर वा लाचार समजण्यासारखं आहे. जातीभेद आहे. परंतु आपण अस्पृश्यांनी जातीभेद का पाळावा? पाळूच नये. आपण संघर्ष करावा. कारण संघर्षाचं अमृत प्यायला आपल्याला बाबासाहेबांनीच शिकवलं. परंतु आपण ते विसरलो आहोत. असं म्हणायला काहीही हरकत नाही.
महत्वपुर्ण बाबीचा विचार केल्यास जो कमजोर असतो. तोच मदत मागतो. मी अस्पृश्य आहे. माझ्यावर अत्याचार झाला नव्हे तर माझी जात पाहून अत्याचार झाला. असं म्हणणं स्वतःला व स्वतःच्या जातीला कमजोर समजण्यासारखं आहे. खरंच अस्पृश्य कमजोर आहेत का? असा जर विचार केला तर त्याचंही उत्तर नाही असंच येईल. मुळात आज ज्या जाती जमाती आहेत. या जातीजमाती कमजोर नाहीत. उदाहरण द्यायचं झाल्यास भिल्लं समुदायातील एकलव्याचं देता येईल. त्यावेळेस भिल्ल जातीला अस्पृश्य समजलं जाई. त्या काळात जातीभेद केल्या गेला असं म्हटलं जातं. परंतु राजपरीवाराशिवाय इतर कोणत्याही जातीला शिकवायचं नाही हा राजपरीवाराचा नियम होता. मग इतर जातींमध्ये अस्पृश्यच नाही तर तत्सम जाती होत्या. त्यामुळं द्रोणाचार्यनं केवळ राजपरीवाराशिवाय इतर कोणत्याच जातीच्या मुलांना शिकवलं नाही. गावाल्गनचा पुत्र संजयलाही नाही. तरीही एकलव्यासारखा विद्यार्थी शिकला. संजयही शिकला. याचं कारण त्यावेळेसचा अस्पृश्य असणारा समाज हाही कमजोर नव्हता असं निश्चीतच म्हणता येईल. महात्मा बसवेश्वराच्या काळात ककैय्या हा कल्याण राजाचा सेनापती होता आणि संत हरळ्या अनुभव मंटपाचा सदस्य. त्यांच्या विचारांचे त्याकाळात स्वागतच होत होते. चांभार जातीत जातीभेदाला पहिला सुरुंग संत हराळेनं लावला. तसाच दुसरा सुरुंग संत रविदासानं. शिवाजी व संभाजीच्या काळात रायप्पा नावाचा महार जातीचा जो विरपुरुष होवून गेला. त्या एकट्या रायप्पानं कोणाची मदत न घेता संभाजीला कैदेत पाहून कित्येक मुघली सैनिक कापून काढले. त्यांनी विरमरण पत्करलं. परंतु कोणाची गुलामी स्विकारली नाही आणि त्याचाच वंशज असलेल्या गोविंदानं संभाजीच्या देहाचे तुकडे गोळा केले व औरंगजेबाची एवढी दहशत असतांनाही आपल्याच अंगणात त्या देहाला अग्नी दिला. आज त्या अग्नीसंस्कारावरुन वाद आहेत. एवढंच नाही तर अस्पृश्यांची ही ताकद पाहून त्यांना कायम स्वरुपात बंदीस्त करु पाहणा-या पेशव्यांनी जेव्हा अस्पृश्यांच्या गळ्यात जबरदस्तीनं गाडगा टाकला व कमरेला झाडू दिला. तसेच विटाळाचे बंध टाकले. तेव्हा इंग्रजांशी करार करुन भीमा कोरेगाव इथं रायनाक नावाच्या अस्पृश्य विरानं पाचशेच अस्पृश्यांना सोबत घेवून शेकडो पेशव्यांचे सैनिक कापून काढले. ही ताकद आहे अस्पृश्यात रक्तात आणि हीच ताकद आजही अस्पृश्यांच्या रक्तात सळसळत आहे. त्यानंतर आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानंच अस्पृश्यतेची लढाई लढली. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण त्यावेळेस त्यांच्यासोबत बरेचसे बिरादरीतील लोकं नव्हते की जे आज मोठमोठ्या गोष्टी सांगतात. त्यावेळेस त्यांना हरविण्यासाठी भंडा-याच्या निवडणुकीत अस्पृश्यांनी आपलाच व्यक्ती उभा केला व बाबासाहेबांना हरवलं. एवढंच नाही तर महाडच्या आंदोलनात महाडातील लोकं बाबासाहेबांना म्हणाले,
"बाबासाहेब, आम्ही तुमच्या आंदोलनात भाग घेवू शकत नाही. आम्ही जर आंदोलनात भाग घेतला तर उद्या हे लोकं आम्हाला या गावात राहू देणार नाहीत."
बाबासाहेबांच्या महाड आंदोलनात इतर भागातील अस्पृश्यच नाही तर इतर जातीतील लोकं होते. महाडातील भाऊराव जर सोडले तर कोणीच अस्पृश्य आंदोलनात नव्हते. त्याचंही नंतर बरंवाईट झालंच. तशी चवदार तळ्याची केस अकरा वर्ष चालली. ती एकटे पडलेल्या बाबासाहेबांनीच लढली. एकट्या बाबासाहेबांनी शिवधनुष्य पेलवला. त्यांनी इतर जातीची व धर्माची मदत घेवून ही लढाई लढली. हीच ताकद.......हीच ताकद आहे अस्पृश्यात. ती ताकद आजही आहे. अस्पृश्य कमजोर नाहीत. परंतु ते आपली ताकद विसरले आहेत हनुमानासारखे. हनुमानाला आकाशात उडण्याची शक्ती होती. परंतु ते ती शक्ती विसरले होते. वेळीच जेव्हा जांबवंतानं त्याची आठवण करुन दिली. तेव्हा त्याला पुर्वशक्तीची आठवण झाली व ते एवढा विशाल समुद्र पार करुन गेले.
अस्पृश्यात ताकद आहे. सक्षम नेतृत्व आहे. परंतु काही संधीसाधू लोकांमुळं ती ताकद विसरले आहेत. अशावेळेस जाबवंत हवा. परंतु आज जाबवंत सापडतच नाही. म्हणूनच अस्पृश्य आजच्या काळात अनेक गटात विखूरले आहेत. आरक्षणानं तर आणखी कमजोर केलं आहे त्यांना. याबाबत एक हिटलरची कथा प्रसिद्ध आहे. त्यानं एका कोंबडीचे पुर्ण पंख छाटले व नंतर तिला जमीनीवर सोडून एक एक दाणा टाकत तो चालत होता. त्यानंतर ती कोंबडीही त्याच्या मागं मागं दाणा टिपत चालत होती. तीच गत आज अस्पृश्य समाजाची झाली आहे. आरक्षण हे त्या दाण्यासारखेच आहे आणि अस्पृश्य हे त्या कोंबडीसारखे. बाबासाहेबांनी अस्पृश्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी फक्त दहा वर्षच आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. परंतु हिटलरसारख्या काही मुत्सद्दी व संधीसाधू लोकांनी हे आरक्षण आजतागायत सुरुच ठेवलं. आरक्षण घ्या. पण बोलू नका. मग या आरक्षणाच्या गर्दीत जो तो हात धुवू लागला व स्वतःला कमजोर समजत जातीयतेचा आधार घेवू लागला.
बाबासाहेबांनी केवळ दहा वर्षाच्या आरक्षणाचाच मुद्दा मांडला नव्हता तर म्हटलं होतं की पिढीजात असलेले धंदे सोडा. विटाळ आपोआपच जाईल. पण आम्ही अस्पृश्यांनी तेही केलं नाही. उलट आजही खाटीक लोकं बकरे कापण्याला रोजीरोटी समजतात. चांभार लोकं पिढीजात धंदे करण्यासाठी टप-या मागतात. मातंग मंडळी झाडू बनवतात. बँड वाजविण्याला प्राधान्य देतात. कशाला हवे असे पिढीजात धंदे? बाबासाहेबांनी सत्ता हातात घ्या असं म्हटलं होतं. तेवढं आम्ही करतो. आम्ही बाबासाहेबांचं ऐकून सत्ता हातात घेण्याचा प्रयत्न करतो. जो नेहमीच फसतो. कारण सत्ता हातात घेतांना आम्ही एवढे पक्ष व संघटना बनवल्या आहेत की प्रत्येक व्यक्तीच निवडणुकीत उभा राहतो व सपशेल पडतो. तो पडणारच. कारण आमचं एकत्रीकरण नाही. मात्र एक गोष्ट नेहमीच करतो आम्ही. आम्ही आमच्याच बंधूचे पाय मात्र अवश्य खेचतो. तो पुढे जावू नये म्हणून. अन् वादही आमचे इतर जातीशी जातीच्या आधारावर जरी झाले नसले तरी त्याला जातीचा रंग देतो. असा मुलामा चढवतो की आमच्या वादाचा मुद्दा हा जागतीक प्रश्न बनतो. ही झाली आमची अस्पृश्य जात. आदिवासी जमातीचंही तसंच आहे. कालचे राजे असलेले हे आदिवासी आज मात्र परागंदा झालेले दिसत आहेत. कालचे आपले राजेपण विसरलेले आहेत असे दिसते.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आज ना अस्पृश्य कमजोर आहेत ना आदिवासी कमजोर आहेत. त्यांनी तसं कधीच समजूही नये. त्यासाठी त्यांनी आपला पुर्वइतिहास पडताळून पाहावा. ती शक्ती आठवून पाहावी. जी शक्ती हनुमंत विसरले होते. स्वंतःचं आत्मपरीक्षण करावं. त्यानंतर एकत्रीकरण करावं. असा आरक्षणाचा पल्लू आपल्या डोक्यावर घेवून पिढीजात असलेले धंदे करु नयेत म्हणजे झालं. जातीचा आधार घेवून स्वतःचा लाचारपणा सिद्ध करु नये म्हणजे झालं आणि भ्याडसारखे कोणतेही विचारपरीवर्तन करु नये म्हणजे झालं. असे कोणतेही विचारपरीवर्तन करणे म्हणजे जे मायबाप आपल्या बाळाला लहानाचे मोठे करतात. त्याच मायबापाला मोठे झाल्यावर सोडून जाणं होय. बाबासाहेबांनी धर्मपरीवर्तन केलं. कारण त्यावेळेस त्याची गरज होती म्हणून. मात्र कोणतेही अभद्र विचारपरीवर्तन केलेले नव्हते हे कदापिही विसरु नये. एवढंच सांगणं आहे. तसंच शिकावं, संघटीत व्हावं व संघर्षरत राहावं हेही विसरु नये.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३४५९४५०