*पालकांनी सावध राहून मुलांना घडवावं*
*सावधान पालक सुरक्षीत मुलं*
अलिकडं कोण कसा निघेल हे काही सांगता येत नाही. आज आदर्शपण उरलेलं नाही. त्यातच स्वार्थ एवढा बळावला आहे की कोणीही समाजसेवा करायला पाहात नाही. मायबापाचं मुलं तेवढंच ऐकतात. जेवढं त्यांना खपतं.
अलिकडे मुलं एवढी वात्रट झालेली आहेत की ती तसूभरही मायबापाचं ऐकत नाहीत. ती मायबापाच्या तोंडाला तोंड देत असतात. त्यांचं काय करावं तेही सुचत नाही.
मुलांबाबतीत सांगायचं झाल्यास मुलं वात्रट झालेली आहेत असं म्हणण्यापेक्षा ती वात्रट बनवली गेली आहेत असं म्हणणं जास्त सोयीस्कर होईल. ती कोणं बनवली? या प्रश्नाचा शोध घेतांना एक कारण नक्कीच पुढं येते. ते म्हणजे पालक. पालक आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करीत असतात. त्यांचे सर्वच लाड पुरवीत असतात. ते पालक आपल्या पाल्याचे एवढे लाड करतात की त्यांना कळत नाही की आपला मुलगा वाईट लक्षणाला लागत आहे. मुलांचे होणारे एवढे लाड पाहून मुलं स्वतःच वाईट मार्गाला लागतात. मग त्या मुलांना तेही कळत नाही की त्यांच्या पालकांची स्थिती काय?
काही काही पालक हे सुसंपन्न असतात. त्यांची समाजात मोठी इज्जत आणि इभ्रत असते. परंतू ती आपल्या मायबापाची इभ्रत आणि इज्जत मुलांचे अति लाड झाल्यास त्यांना कळते पण वळत नाही. त्यातच अति पैशानं श्रीमंत असलेल्या पालकामुळे अशी मुले गर्वानं दाटतात. त्यांच्या मनात अहंकार वाढीला लागतो. मग गुन्हा घडतो. जो गुन्हा कधीच क्षम्य नसतो.
अलिकडेच असा प्रकार अभिनेते शाहरुख खानच्या बाबतीत घडला तसेच काही वर्षापुर्वी हाच प्रकार अभिनेते संजय दत्तबाबत घडला. त्या सेलिब्रेटींना त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप आहे. पण तो पश्चाताप केव्हा झाला. घटना होवून झाल्यावर.
मुळात मुलांबाबत सांगतांना एक गोष्ट आवर्जून मांडतो. ती म्हणजे पालक सावधान तर मुलं सुरक्षीत. पालक जिथे सावधानच नाही तर मुलंही सुरक्षीत असणार नाही. एक घटना सांगतो. ती दिल्लीच्या गाजीयाबाद शहरातील गुडगावची. बरेच दिवस झाले त्या घटनेला. एक मुलगी बोरवेलमध्ये पडली. तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. ऑक्सीजन पुरवलं गेलं. पण ती जेव्हा बाहेर आली. तेव्हा ती मृत पावलेली होती. मुलीचं नाव माही होतं. ज्या दिवशी माही बोरवेलमध्ये पडली. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. मायबाप वाढदिवस साजरा करीत होते. ते आनंदात होते.,अशा आनंदात की त्यांचं मुलीकडेही लक्ष नव्हतं. अशातच लहानगी माही चालत जात जात बोरवेलमध्ये पडली. ती जेव्हा पडली, त्यावेळी अचानक एक व्यक्तीचं तिकडे लक्ष गेलं. म्हणून ती बालिका लक्षात आली व तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. जर या घटनेत पालक सावधान असते तर माही बोरवेलमध्ये पडलीच नसती व तिचा जीवही गेला नसता.
महत्वपूर्ण गोष्ट ही की आपल्या सभोवताल अशा घटना ब-याच घडत असतात. पण आपण त्या घटनावर दुर्लक्ष करतो. विचार करतो की ती आपली मुलं नाहीत. आपल्याला काय करायचंय. पण ती वेळ आपल्यावरही येते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आणखी एक उदाहरण देतो. असाच एक व्हाट्सअपवर संदेश फिरतो आहे.
एक बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती. एका मुली सोबत तिनं मैत्री केली. बस आली की दोघी बसमध्ये चढायच्या. एकाच सीटवर शेजारी बसायच्या. एक दिवस अशाच त्या बसमध्ये बसल्या. बस थोडी पुढे गेली. बाईने दोन चाॅकलेट काढल्या. एक स्वतः खाल्ले व दुसरे तिला दिले. कोणतीही शंका न येता तिने खाल्ले. काही वेळात चक्कर यायला लागली. ही बाई घाबरली ?
"कंडक्टर साहेब, गाडी थांबवा. हिला दवाखान्यात न्यायचे आहे." गाडी थांबली. ती बेशुद्ध होती. बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या. बस निघून गेली आणि मागून एक चारचाकी आली. आतून तीन तरूण उतरले. बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले. त्या बाईला २० हजार रुपये दिले. गाडी निघून गेली. या नंतर पुढील चार दिवस अत्याचार होत गेले आणि मग तिला वेश्यांच्या बाजारात एका टोळीला विकले. या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली. पण व्यर्थ. ही मुलगी शांत बसणारी नाही आणि वेश्या व्यवसाय करायलाही विरोध करते. मग काय करावे ? त्यांना विचार पडला. ही जीवंत ठेवणे फायद्याची नाही. पण हिच्या किडनी, डोळे व रक्त ह्यातून पैसा मिळवू आणि जिवंतपणीच तिचे डोळे, किडनी, रक्त आणि इतर अवयव काढून घेतले. यातच तिचा मृत्यू झाला.
महत्त्वाचं म्हणजे एक निष्पाप जीव जातो. शिक्षा मात्र कुणाला? आम्ही आपणाला विनंती करतो. एखादी मुलगी चुकीचे वागली याचा अर्थ सगळ्याच मुली चुकीच्या असतात हा आपला भ्रम दुर करा.
बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका. समाजात विकृत लोक भरपूर आहेत. आपण सावध रहा.
आज हजारो मुली गायब होत आहेत, अत्याचारासाठी, घरकामासाठी, परदेशात विकण्यासाठी, आतंकवादा साठी, वेश्याव्यवसायासाठी आणि अवयव विक्रीसाठी मुलींना पळवले जाते आणि ठारही मारले जाते.
महत्वाचं म्हणजे आपल्याला सुधारायची संधी वारंवार मिळते. त्यासाठीच अशा घटना घडत असाव्यात नव्हे तर परमेशा घडवत असतो. आपण सुधरावे. आपण आपल्या मुलांनाही सुधरवावे. आपण सावधान राहावे. आपण सावधान तर मुले सुरक्षीत. नाहीतर मुलंही वाममार्गाला लागल्याशिवाय राहात नाही.
आपल्याला माहित आहे की हा काळ धकाधकीचा आहे. कोण कोणाचा केव्हा फायदा घेईल हे सांगणे कठीण आहे. महागाई वाढलेली आहे. या वाढत्या महागाईवर मात करायची असेल तर धावपळ केल्याशिवाय जमत नाही. परंतू एक मात्र नक्की की अशा धावपळीच्या जगात काही क्षण मुलांसोबतही घालवावे. लक्ष ठेवावे. जेणेकरुन मुलं बिघडणार नाहीत व त्यांनाही सुरक्षीत ठेवता येईल. हे तितकच सत्य आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०