विचार आपला की Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विचार आपला की

विचार आपला, समाजाचा की विद्यार्थी वर्गाचा

विचार आपला, समाजाचा की विद्यार्थी वर्गाचा? हा एक प्रश्नच आहे. आपल्याला वाटत असते की विद्यार्थी घडला पाहिजे. तो घडायलाच पाहिजे. ही प्रत्येक शिक्षकांची इच्छा असते. तसेच आपला मुलगा घडला पाहिजे ही प्रत्येक मायबापाची इच्छा असते.परंतू समाजाला तो घडला पाहिजे असे वाटत नाही. समाज तो मुलगा जर चांगला सुविचारी असेल, हुशार आणि होतकरु असेल तर त्याचे पाय खिचत असतो. ही वास्तविकता आहे. आज पर्यायानं पाहता आपला मुलगा शिकला पाहिजे. पुढे गेला पाहिजे असं जे प्रत्येकाला वाटतं. ते शेजा-याला वाटत नाही. आपला मुलगा जर हुशार असेल तर तो मुलगा हुशार राहावा. आणखी हुशार व्हावा असं शेजा-याला कधीच वाटत नाही. ते त्या मुलाला हुशारीपासून अडवतात. हे झालं हुशार मुलांच्या बाबतीत. बदमाश मुलांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास बदमाश आपल्या घरात जन्माला येवू नये असं लोकं मानत असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास शिवाजी महाराज जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतं. परंतू तो माझ्या घरात नाही तर तो दुस-याच्या घरात यावा असंच वाटतं. कारण आजच्या काळात लोकं हा विचार करतात की कोण करेल जास्तची मारामारी आणि कोण लढेल आजच्या औरंगजेब आणि अफजलखानाशी. कोण आजच्या काळात आपल्या स्व मुलाला संकटात पाडेल. कारण जिजामातेला माहीत होतं की खान धिप्पाड आहे. कपटीही आहे आणि तो शिवरायांना मारणारच आहे.
विचार आपला, समाजाचा की विद्यार्थी वर्गाचा. जेव्हा आपण आपला विचार करतो, तेव्हा आपल्यात स्वार्थच कूटकूट भरलेला असतो. त्यावेळी आपण आपली पावलं टाकतांना समाजाचा विचार करीत नाही. समाज काय म्हणेल, काय नाही याचीही आपण पर्वा करीत नाही. केवळ आणि केवळ आपण आपला विचार करुन भ्रष्टाचार करीत असतात.
आता समाजाची भुमिका मांडू. माणूस हा सामाजीक प्राणी आहे. तो समाजाचा विचार करीत नाही असे नाही. तर तो समाजात राहात असतांना समाजाचाही विचार करतो. परंतू समाजाचा विचार करीत असतांना माझा समाज पुढे जावा असं त्याला वाटत नाही. त्यासाठी तो प्रयत्नही करीत नाही. उलट समाज पुढे जावू नये म्हणून दूषणे देत बोलत असतो. यामुळे समाज निराश होतो व समाज योग्य दिशेतून न जाता भटकतो. त्याला दिशा सापडत नाही. तेव्हा समाजाची प्रगती होत नाही. हानी होते.
विद्यार्थी.......विद्यार्थी मात्र समाजजीवनाचा आरसा आहे. विद्यार्थी दृष्टीने विचार केल्यावर आपल्याला हे कळते की विद्यार्थी हा मातीचा गोळा असून त्या गोळ्याला आपण कसा आकार द्यायचा हे आपल्याला ठरवता येते. त्यानुसार त्याचे विचार प्रगल्भ होत असतात. विद्यार्थी हे मुळातच हुशार नसतात असे नाही. ते हुशार असतात. परंतू त्यांना योग्य असं वातावरण मिळत नाही. त्यामुळे ते वातावरण चांगलं न मिळाल्याने निराश होतात. त्यानंतर त्यांचं अभ्यासात मन लागत नाही व ते शाळा सोडतात.
विद्यार्थी......विद्यार्थी हा घटक उद्याचा उज्ज्वल देशाच्या भवितव्याचा घटक आहे. त्याला जर सन्मान मिळाला की तोच घटक उद्या देशालाही सन्मान मिळवून देवू शकतो. म्हणून त्याच्यावर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. ते संस्कार चांगले झाले तर उद्या तोच घटक जगही बदलवू शकतो. तशी ताकत त्याच्यात आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
आज देशाचा विचार करीत असतांना केवळ आपला विचार करुन चालत नाही तर समाजाचाही विचार करायला हवा. तोही विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी वर्गाचाही. त्याशिवाय मुख्य फलीत निघणार नाही. जेव्हा असा विचार देशातील प्रत्येक जण करेल, तेव्हाच देश सुजलाम सुफलाम बनेल यात शंका नाही. केवळ आपला स्वतःचा स्वार्थपणा साधून उपयोग नाही. त्याचबरोबर समाजाचाही विचार व्हायला हवा. समाजासाठीही आपले कार्य व्हायला हवे. जेणेकरुन समाज सुधारणा घडून येईल. हे तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०