तुझ्याविना जिंदगी जणू सुनी मैफिल,
तुझ्यासवे जिंदगी भासे सप्तसुरांचे ताल
तुझ्याविना प्रेमाची परिभाषा उमजली,
तुझ्यासवे प्रेमात मी न्हाऊन निघाली
तुझ्याविना जिंदगी ही अर्थहीन झाली,
तुझ्यासवे जिंदगीची गोडी चाखली
तुझ्याविना मी ना माझी राहिली,
तुझ्यासवे मी एकरूप झाली
तुझ्याविना जगण्याचे भान हरपून गेली,
तुझ्यासवे हृदयाची स्पंदने मुग्ध झाली
तुझ्याविना श्वास माझा गुंतून राहिला,
तुझ्यासवे श्वासात माझ्या तुझा गंध दरवळला
तुझ्याविना मी माझे अस्तित्व विसरली,
तुझ्यासवे जगताना जीवनाची मजा कळली
तुझ्याविना मी तुझी वाट पाहत राहिली,
तुझ्यासवे जगण्याची सारी स्वप्नं पाहिली...
सारी स्वप्नं पाहिली...
-प्रियांका कुंभार (वाघ).
प्रिय सखा,
तुझ्याशिवाय आयुष्य अगदी ओसाड रान आहे. जिथे ना गर्द हिरवळ झाडांची सावली आहे ना सुगंधी फुलांचा सुवास आहे.
तुझ्याशिवाय आकाश मोकळे वाटत आहे. अथांग सागराला किनाऱ्याची आस लागली आहे. तुझ्याशिवाय मातीला ही गंध नसल्यासारखे असे माझे जीवन भासत आहे.
तुझ्याशिवाय जगण्याची मजाच निघून गेली आहे की काय असे वाटते. एखाद्या सुन्या मैफिलीत जणू मी एकटी एकाकी पडले असावे असे जाणवते.
तुझ्याशिवाय प्रेम हा शब्दच अर्थहीन झाल्यासारखे वाटते. तुझ्याशिवाय मी स्वतःवर प्रेम करणं ही विसरले की काय असे वाटते. तुझ्याशिवाय हे मन रात्रंदिवस झुरत असते. माझे अंतर्मन केवळ तुझ्याचसाठी रडते आणि तू नसताना फक्त तुझीच वाट पाहते.
तुझ्याशिवाय तुझा त्याग आणि समर्पण मला समजला. तुझ्या आठवणीत माझा देह तुला मी समर्पित केला. तुझ्याशिवाय तुला मिळवण्याचा मी एकटीने संघर्ष केला.
तुझ्याशिवाय स्वतःच्या अस्तित्वाचे भान विसरून गेले. तुझ्याशिवाय सख्या जगायचे कसे हेच ध्यानात नाही राहिले. तुझ्याशिवाय देहांत या श्वास फक्त उरला. श्वासात या माझ्या गंध तुझाच पसरला.
तुझ्या येण्याची चाहूल म्हणजे हर्ष. तू क्षणोक्षणी समीप असण्याचा भास म्हणजे परमानंद. तू माझ्या मनाचा धीर सख्या. तुला पाहण्यास मन झाले होते माझे अधीर. तुझ्या डोळ्यांच्या दर्पणात माझे बिंब पाहण्यास मी आतुर . तू माझ्या नयनांचा प्रकाश प्रिया, मोहून जाई माझ्या मनास. तुझ्यातच गुंतला हा सारा श्वास.
तुझ्या कोमल स्पर्शाने हृदयाची स्पंदने वाढली. तू सोबत असताना मी तुझ्यात एकरूप झाली. तुझी साथ लाभणे भाग्यच माझे. नाते तुझे आणि माझे जणू भासे मला साता - जन्माचे.
तुझ्यासोबत काटेरी वाट सुद्धा मृदू मुलायम वाटे. तुझ्यासोबत सप्तसुरांचे ताल छेडित जावे असे वाटते. तुझ्यासोबत प्रेमाचे मधुर गीत गात रहावे असे असावे जीवन तुझे आणि माझे.
तुझी साथ असता स्वप्नांस माझ्या नवे अर्थ मिळाले. तुझी साथ असता मी माझे भान हरपून गेले. तू सोबत असताना वेदना ही दूर पळून गेल्या. तू सोबत असताना अजून हवे काय मला जगायला.
तू सोबत असताना आयुष्य सुंदर झाले. तुझी साथ लाभली अन् मी धन्य झाले. तुझ्या हसण्याने माझे जीवन फुलले. तुझ्या असण्याने सगळे क्षण बहरले. तुझा हात सदैव राहूदे असाच हाती माझ्या. दुःखही पळून जातील आणि सुखाचा होईल वर्षाव. तू सोबत असताना सुख म्हणजे नक्की काय असतं हे कळले.
(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )
(All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed, or transmitted in any from by any means, including photocopying, recording, or other electronic methods without the written permission of the author, except in the case of brief quotations embodied in reviews and certain other non commercial uses permitted by copyright law.)