मुलगी पळून गेली? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुलगी पळून गेली?

*मुलगी पळून गेली काय? मुलीच्या बाजूनं उभी राहा.*

*अमूकांची मुलगी पळाली, तमूकांची मुलगी पळाली. समाजात नेहमी असे ताणे ऐकायला मिळत असतात. यात काही मुलींची तिच्या मायबापाची चक्कं हयात निघून जाते. परंतु जे गालबोट लागतं. ते गालबोट काही केल्या पुसलं जात नाही. लोकं दुषणे देवू शकतात. मोठमोठे नावबोटं ठेवू शकतात. परंतु त्या पळून जाण्यापुर्वी त्या का पळून गेल्या? याची साधी शहानिशा करीत नाहीत. हं, दुषणे द्यायला काय जातं? तोंड दिलं आहे विधात्यानं. म्हणूनच आपण कधीकधी विचार न करताही बोलत असतो काहीबाही. परंतु जी मुलगी पळून गेली. तिच्या पळून जाण्यामागे तिची काय मजबुरी होती. ते आपण कधीच समजून घेत नाही वा पळून जाण्यापुर्वी तिला वा तिच्या परीवाराला कोणतीच मदत करीत नाही. विचार करा की तिला वा तिच्या परीवाराला जर आपण तिच्या पळून जाण्यापुर्वी मदत केली तर ती मुलगी कदाचीत पळूनही गेली नसती. हेच वास्तविक सत्य आहे. अमूकांची मुलगी पळाली? असं लोकं बोलतात. मात्र ही मानसिकता बदलणे काळाची गरज आहे. कारण आजच्या काळात विवाह संस्काराला भरपूर पैसा लागतो. शिवाय हुंडा पद्धती अमाप असल्यानं तेवढा पैसा मुलीच्या बापाजवळ नसतो. त्यातच दोनचार मुली असल्यास जे कर्ज होतं. त्या कर्जापायी बापाची आत्महत्या होते. असं चित्र प्रत्येक घरातील मुलगी अनुभवते. मग तिही विचार करते की माझा बाप आमच्या विवाहाच्या कर्जानं मरण पावू नये. वाटल्यास आम्ही पळून गेलो तरी चालेल. परंतु बाप जीवंत असावा. तद्नंतर त्या पळून जातात. मग त्या मुलींना बापही शिव्या घालतो आणि समाजही. परंतु हा फुटकळ समाज त्या विवाह सोहळ्यासाठी वाढलेल्या पैशाला वा हुंड्याच्या पद्धतीला शिव्या हासडत नाही.*
अलिकडील काळात पाश्चात्य विचारसरणी आली. विदेशी लोकं आपल्या भारतात यायला लागले आहेत. आपल्या देशातीलही लोकंही विदेशात जायला लागले आहेत. नवा काळ आला आहे व या नव्या काळात एकंदरीत हा बदलाव झाला आहे.
आपल्या देशात जसे विदेशी आले. तसेच विदेशी वारेही आपल्या देशात वाहू लागले. त्यातच विदेशी वारे हे विचारांचे वारे ठरले. ती पाश्चात्य विचारसरणी ठरली की त्या पाश्चात्य विचारसरणीनं सर्वच गोष्टी बदलल्या. त्या गोष्टी एवढ्या बदलल्या की त्या विचारसरणीनं बरेच प्रेमीयुगल प्रेम करायला लागले. मग विवाह, संस्कार आणि इतर साऱ्याच गोष्टी गौण ठरल्या व आश्वासनंच मोठी ठरु लागली. ते आश्वासन एवढं जबरदस्त व प्रभावशाली ठरलं गेलं की त्या आश्वासनाचे बळी ठरुन मुली भाळल्या. त्यानंतर त्या पळून गेल्या.
मुली पळून जातात. त्याचं कारण असतं त्यांच्या मायबापाचं रागावणं. मायबाप हे जुन्या पुरातन विचारांचे असतात व ते जुन्या पुरातन विचारांचे असल्याकारणाने मुलींचं एखाद्या मुलांवर प्रेम असलं तर ते आपल्या मायबापांना सांगू शकत नाहीत. त्या मुलींना आपल्या मायबापाची भीती वाटते. कदाचीत ते आपल्या विवाहाला मंजूरी देणार नाहीत असा त्यांचा विचार असतो. प्रेम हे भारी पडतं मायबापापेक्षाही. तो तरुण व्यक्ती आवडायला लागतो मायबापापेक्षाही. तोच हवाहवासा वाटतो मायबापापेक्षाही. त्याच विचारांच्या चक्रव्युहात फसून मुली पळून जायला लागतात. शिवाय दुसरं कारण असतं. ते म्हणजे अल्प वय. त्या अल्पवयात त्याची परियंती काय होते, हे त्यांनाही कळेनासं असतं.
मुली पळून जातात. त्याची कारणं बरीच आहेत. पाश्चात्य धोरण, अल्प वय, प्रेमाची आस, जोडीदारांचं आकर्षण, त्यातच त्याचं आश्वासन. मी चंद्र, तारे आणीन. मात्र पळून गेल्यावर साधारणतः तीन चार महिने झाले की ना चंद्र आणता येत त्यांना. ना तारे आणता येत. त्यांना जगातील वास्तविक परिस्थिती माहीत पडते. ज्याच्यावर विश्वास ठेवला, तो निकम्मा निघतो. पळून जाण्यापुर्वी व्यसनं नसतात त्याला आणि पळून गेल्यावर कित्येक व्यसनं. कधीकधी हा पळून नेणारा तरुण तिला मोलभावातही वेश्येच्या अंगणी विकून टाकतो. काय मिळतं प्रेमात? माणूसकीची हार. काही मुलींना तर संपुर्ण जीवनभर वेश्या म्हणून जगावं लागतं. काही मुलींना तर पळालेली मुलगी असे ताणे पडतात आणि त्यांच्या मायबापांना? अमूक अमूक व्यक्तींची मुलगी पळाली अमूक अमूकांच्या मुलासोबत. असे ताणे कित्येक पिढीपर्यंत पडत असतात.
काही काही मुली पळून जातात. ते मायबापांना न विचारुन. त्यात काही मुलींच्या मजबुऱ्या असतात. त्यातील एक कारण म्हणजे मुली ह्या मायबापांनी जन्माला घातलेल्या जास्त मुली व त्या मुलींवर खर्च करणारा बाप. कधी हा बाप विचार करीत असतो की मुलींचं लग्न करायचंय. मंडप, जेवन, ऐर, हळद. असा किती पैसा लागणार........मुली एवढ्या....... कसं करणार. पैसा कुठून आणणार. कर्ज काढावं लागणार.
त्या जास्त मुली. त्यांच्या विवाहाचा प्रश्न. त्यातच त्यांचं वाढणारं वय. मग घरातील वडीलधारी मुलीला चिंता वाटणार नाही तर काय? मग ती पळून जाणार नाही तर काय? काही मोठ्या मुली तर विवाहच करीत नाहीत. त्या विवाह न करता लहान बहिणीचे विवाह करतात. असे बरेच ठिकाणी चित्र दिसते.
मुली पळून जातात. यात त्यांचा गुन्हा नसतो. गुन्हा असतो त्यांच्या परिस्थितीचा. कधी एखाद्या मुलीला आई नसते तर कधी बाप नसतो. कधी त्यांच्या समाजात बराचसा हुंडा असतो तर कधी विवाहाचा पैसा जास्त असतो. तसं पाहिल्यास अलिकडे विवाह करतो जर म्हटलं तर एका साधारण विवाहात कितीही कमी प्रमाणात खर्च होतो, कमीतकमी एका लाखापेक्षा वर रुपये लागतात. हा पैसा काही काही मायबापाजवळ नसतो. मग मुली काय करणार? त्यांना मजबुरीनं पळून जावंच लागतं. त्यात त्या मुली आपल्या प्रारब्धाचा विचार करीत नाहीत आणि एखाद्या मुलांवर विश्वास ठेवून पळून जातात. त्यांना पळून गेल्यावर काय होवू शकतं? याचीही कल्पना असते. तरीही त्या पळून जात असतात.
आपला समाज फक्त नावबोटं ठेवू शकतो की अमुकांची मुलगी पळाली. जीवनभर त्याच गोष्टीचा नांदाडा लावत असतो. म्हणत असतो की अशाच मुलींच्या पळून जाण्यानं संस्कार तुटतो. परंतु विवाहात होत असलेल्या खर्चाबाबत कोणी बोलत नाही. बोलत नाही समाजातील उच्च शिकूनही घेत असलेल्या हुंड्याबाबत. आमच्या समाजात जो जेवढा शिकेल, त्याचा हुंडा मागतांना तेवढा दर. अशांनी उच्च शिक्षण घेवून काय उपयोग. मग मुली पळून जावून लग्न करणार नाही तर काय? त्याला मुळीच खर्च येत नाही. ना मायबापाची कटकट लागत. ना कोणाची? मुली पळून जातात. मायबापांचाच ओझं हलका करतात परंतु मायबाप काय करतात. मायबाप आपल्याच डोक्यावरील ओझे कमी करणाऱ्या त्या मुलींना शिव्या हासडत असतात. ज्या मुलींनी पळून जावून त्यांचे पैसे वाचवले व त्यांचाच फायदा केला.
मुली पळून जातात, त्यांना शौक होता पळण्याचा म्हणून नाही तर ते त्यांच्या मजबुरीनं. परंतु जेव्हा अशा मजबुऱ्या त्यांची वाट लावून जातात. तेव्हा मात्र मुलींना विचार येतो. तसाच तेव्हा विचार येतो की त्यांनी आपल्या मायबापांसाठी त्याग केला. आपल्या पळून गेल्यानं आपल्या मायबापांचा फायदाच केला. परंतु ते मायबाप बोलत नाहीत. खरं तर अशा मायबापानं आपला हेका सोडून आपल्या पळून गेलेल्या मुलीला जवळ केलं पाहिजे. समाजाचा विचार करुन ते आपल्याच अंगच्या तुकड्यांना दूर लोटवतात ना. खरंच याचाही विचार करायला हवा की तोच समाज त्यांच्या उताराच्या काळात त्यांना मदत करतो काय की ती मुलगी मदत करेल? कदाचीत एखाद्या वेळेस तशी समाजाची मदत घेवून परीक्षा घ्यायला हवी प्रत्येक मायबापानं. मगच पळून गेलेल्या आपल्या मुलींवर दुषणे उगाळायला हवीत.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आज काळ बदलला आहे. पाश्चात्य विचारसरणीचे वारे देशात वाहू लागले आहेत. संस्कार बदलले आहेत. सुसंस्कार आहेत अजुनही. परंतु त्या सुसंस्कारावर काही ठिकाणी विवाह संस्काराचे वाढलेले पैसे गालबोट लावत आहेत. शिवाय हुंडापद्धतीचाही परिणाम त्यावर होत आहे. त्यामुळंच मुली जर पळून गेल्या तर त्याचा कोणत्याच आईवडीलानं बाऊ करु नये. त्या गोष्टीचं स्वागतच करावं. आपली मुलगी आपलं अंग आहे ना. मग आपल्या मुलीला जवळ करावं. मग समाजाचा कितीही रोष असला तरी आपल्या मुलीला टाकून देवू नये म्हणजे झालं. कारण समाज काहीही देत नाही. देते ते आपलीच मुलगी. तीच मुलगी आपली आपल्या उतारवयात आधारस्तंभ ठरत असते. परंतु समाज नाही. हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं. अन् समाजानंही त्यावर दुषणे देवू नये. अन् दुषणे द्यायचेच असेल तर समाजानं स्वतःच अशा मुलींना दत्तक घ्यावं. त्यांचे विवाहाचे प्रश्न सोडवावेत. त्यांच्या विवाहाला पैसा द्यावा. त्यांच्या हुंड्याचा प्रश्न सोडवावा. त्यांच्या मायबापावर विवाहासाठी होत असलेल्या कर्जाचा ओझे सांभाळावे. मग मुली पळूनच जाणार नाहीत. त्या मुली समाजाचंच ऐकतील व समाजाच्या मतानुसारच विवाह करतील. पळून जाण्याचाही अजिबात विचार करणार नाहीत. अन् समाज जर तसं करु शकत नसेल तर समाजाला त्या पळून गेलेल्या मुलींबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही. हे समाजानं लक्षात घ्यावे. जर समाजानं त्या मुलींना दत्तक घेतल्यावरही मुली पळून गेल्याच तर त्यात दोष मुलींचा असेल. परंतु समाज प्रत्येक मुलीला दत्तक घेईल तेव्हा ना. समाजाच्या अशा दत्तक घेण्यानं सामाजीक बदलावही होवू शकतो. शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकतात आणि मुलींचं उध्वस्त होणारं आयुष्य. परंतु तशी दत्तक घेण्याची मानसिकता समाजाची निर्माण होणे गरजेचे आहे. तशी मानसिकता जेव्हा निर्माण होईल. तेव्हाच खऱ्या अर्थानं समाज सुधारला असं म्हणता येईल. असे जर झाले तर मग कोणाच्याच मुली पळून जाणार नाहीत व समाजही कोणाच्याच मुलीला पळून गेली असे कोणीही म्हणणार नाही हे तेवढंच खरं आहे.
समाज बदलाव होणे काळाची गरज आहे. तसंच मुलगी पळून गेली. ही मानसिकता बदलणे काळाची गरज आहे. जर समाजानं विवाह पद्धतीतील खर्च बंद केला आणि हुंडा पद्धती बंद केली तर कदाचीत मुलींच्या पळून जाण्याचे प्रमाण कमी होईल. त्यातच बऱ्याचशा मुलींचे उध्वस्त होणारे आयुष्य वाचवता येईल यात शंका नाही. त्यादृष्टीनेच समाजानं पावले उचललेली बरी यातही शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०