हंसगीता गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हंसगीता

हंसगीता

एकदा युधिष्ठिरानी पितामहांना विचारले, जगात सर्व लोक विद्वत्ता, सत्य, इन्द्रियसंयम, क्षमा व उत्तम बुद्धिची स्तुती करत असतात. यावर आपले मत काय आहे.
पितामह म्हणाले, या विषयावर साध्यदेवता आणि हंसामधील संवाद मी तुला सांगतो.
प्रजापती हंसरुप धारण करून विहार करत असतां, साध्यदेवतांची व त्यांची भेट झाली. साध्यदेवता म्हणाले, तुम्ही मोक्षतत्वाचे ज्ञानी आहात, आपण पण्डित व उत्तम वक्ता आहात.
हे पक्षिश्रेष्ठ, आम्हाला सांगा की, आपल्या मते सर्वश्रेष्ठ काय आहे?. मन कशात रमते?. काय केले असता जीवाला सर्व बंधनातून सुटका मिळेल ते आम्हाला सांगा.
हंस म्हणाले, तप, इन्द्रियदमन, सत्य भाषण आणि मनोनिग्रह महत्त्वपूर्ण आहेत.
आपण कोणत्याही गोष्टीने आनंदित अथवा दुःखी होऊ नये. शब्द बाणासारखे असतात आणि त्यामुळे माणूस दुःखी होतो.
त्यामुळे माणसाने बोलताना कुणाला लागणारे शब्द वापरू नयेत.
तसेच आपल्याला कोणी कटु शब्द बोलले तर शांत राहावे.
जो रागावर नियंत्रण ठेवतो, दुसऱ्याची निंदा करत नाही, दुसऱ्याचे दोष बघत नाही, शांत राहतो तो माणूस त्याच्याबद्दल वाईट विचार करणाऱ्या माणसावर विजय मिळवतो.
क्षमा, सत्य, साधेपणा आणि दयावृत्ती असणे चांगले आहे. इन्द्रियसंयमाचे फळ मोक्ष आहे. माणसाचे वाणी, मन, क्रोध, तृष्णा यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.
हंस गीता - २
हंस पुढे म्हणाले, कुणाच्या वर्मावर बोट ठेवू नये. रागाने अथवा तिरस्काराने बोलू नये. अमंगल शब्दांचे उच्चारण करू नये.
जेव्हा आपण शब्दरुपी बाणाचा उपयोग करतो तेव्हा समोरचा माणूस दुःखी होतो म्हणून सुज्ञ माणसाने शब्द जपून वापरावेत.
रागीट माणसापेक्षा शांत माणूस श्रेष्ठ आहे. सहनशील माणूस असहनशील माणसापेक्षा श्रेष्ठ आहे.
प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ आहे
तसेच ज्ञानी माणूस अज्ञानी माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. मी सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे तरीही मी सज्जन व ज्ञानी लोकांच्या संगतीत राहतो.
मी लोभाने धर्माचे उल्लंघन करीत नाही. विषयप्राप्तीसाठी इकडे तिकडे जात नाही. मला कोणी वाईट बोलले तरी प्रत्यूत्तर करत नाही. इंद्रिय संयमालाच मोक्षाचे द्वार मानतो. मी तुम्हाला सांगतो की, मनुष्य योनीपेक्षा कोणतीही योनी श्रेष्ठ नाही.
ज्याप्रमाणे चंद्र ढगाआडून बाहेर आला की प्रकाश देतो तसेच निर्मळ मनाचा, पापमुक्त माणूस धीराने मार्गक्रमण करून सिद्धि प्राप्त करतो असा माणूस सर्वांना आदरणीय वाटतो व लोक त्याच्याबद्दल चांगले शब्द बोलतात. असा माणूस देवांना प्रिय असतो.
ईर्षा करणारा माणूस दुसऱ्याच्या गुणांचे वर्णन करण्याऐवजी त्याचे दोष काढतो.
ज्याची वाणी शुद्ध, चांगली असते व मन भगवंताकडे लागलेले असते त्याला अध्ययन व तपाचे उत्तम फल प्राप्त होते.
हंस गीता ३
सुज्ञ माणसाने आपल्याला वाईट बोलणाऱ्या तसेच आपला अपमान करणाऱ्यास समजावण्याचा प्रयत्न करू नये.
तसेच त्याच्यासमोर दुसऱ्याची स्तुती करू नये. किंवा त्याला उलटसुलट बोलूंन राग येण्यास कारणीभूत ठरू नये.
क्रोधी माणसाने केलेल्या यज्ञाचे फल त्याला मिळत नाही.
ज्या व्यक्ती कडे सत्य, इंद्रिय संयम, सरळपणा, दया, क्षमा, धैर्य हे गुण असतात तसेच ज्या व्यक्ती दुसऱ्याच्या वस्तुंची अपेक्षा करत नाहीत त्याला चांगली गति प्राप्त होत असते.
मी जिथे जिथे जातो तिथे मनुष्य व देवांना सांगत असतो की, समुद्रातून जाण्यासाठी
जहाज हे साधन आहे तसेच सत्य हे स्वर्ग लोकात जाण्याचे साधन आहे.
मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांबरोबर राहतो तसाच तो होतो.
जसे वस्त्राला रंग देतो तसे ते दिसते, तसेच मनुष्य सज्जन, दुर्जन, तपस्वी, चोर, अशा ज्या कुणाबरोबर राहतो त्यांच्यासारखा तो वागू लागतो.
विषयभोगांची क्षणभंगुरता जो जाणतो तो श्रेष्ठ असतो.
जे लोक फक्त पोट भरणे, इंद्रिय भोग या उद्योगात राहतात, चोरी करतात, कटू शब्द बोलतात त्यांच्यावर देवाची कृपा होत नाही.
जे लोक धर्मपरायण असतात, सत्यवचनी, व कृतज्ञ वृत्तिचे असतात त्यांच्यावर देवाची कृपा होते.
वायफळ बोलण्यापेक्षा मौन चांगले ही वाणीची विशेषता आहे, सत्यवचन ही दुसरी विशेषता आहे तर गोड बोलणे ही वाणीची तिसरी विशेषता आहे आणि धर्मसंमत बोलणे ही चौथी विशेषता आहे.
हंस गीता ४
हंस म्हणाले लोकांच्या मनावर अज्ञानाचा पडदा पडला आहे. आपापसातील द्वेषामुळे त्यांचे मुळ स्वरुप प्रगट होत नाही.
हे देवतानो, या जगाला अज्ञानाने बांधले आहे. मनुष्य लोभामुळे मित्रांचा त्याग करतो आणि आसक्ती दोषामुळे तो स्वर्ग प्राप्ती करू शकत नाही. जो ज्ञानी असतो तोच परमसुखाचा अनुभव घेतो.
ज्ञानी माणूस अनेक लोक आसपास असूनही मौन बाळगू शकतो.
ज्ञानी बलवान असतो. ज्ञानी कोणाशीही कलह करीत नाही. दुसऱ्याची निंदा करणे अशोभनीय मानतो.
भीष्म म्हणाले, याप्रमाणे सांगून हंसही देवतांसोबत स्वर्गलोकी गेले.
हे पुण्यमय तत्वज्ञान माणसाला यशदायक आहे आणि स्वर्ग लोकाची प्राप्ती करून देणारे साधन आहे.
हंसगीता समाप्त.