हा देश गरीबांचा की धनीकांचा
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत. अशी प्रतिज्ञा आपण रोजच घेतो शाळेत आणि अशी प्रार्थना म्हणत म्हणत शिकत असतो. त्यावेळेस ती प्रार्थना म्हणतांना आपले बंधूप्रेम उफाळून येते. मग भारत हा धर्मनिरपेक्ष असंही आपण म्हणतो. परंतु खऱ्या अर्थानं या देशाला आपण धर्मनिरपेक्ष समजतो का? याचं उत्तर नाही असंच येईल. त्यानंतर समता, बंधुता हे आपले मुल्य सर्वच बाबतीत वेशीच्या पलीकडे राहतात आणि भेदभाव वाढीस लागतो.
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा आणि संविधान आम्ही लहान राहतो, तेव्हापर्यंत ठीक आहे. परंतु पुढं मोठे झाल्यावर तीच प्रतिज्ञा आपणाला डोईजड जाते. मग ती प्रतिज्ञा डोईजड गेली की भेदभाव निर्माण होतो गरीब श्रीमंतीचा. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. उदा. द्यायचं झाल्यास रेल्वेचं देता येईल. रेल्वेमध्ये प्रवास करतांना धनिकांची रेल्वे व गरीबांची रेल्वे अशीच नावे रेल्वेला देता येतील. त्यातच गरीबांची आणि श्रीमंतांची जाण्याची संख्या सारखी असतांनाही रेल्वेच्या सोयीसुविधा या गरिबांसाठी वेगळ्या व श्रीमंतांसाठी वेगळ्या दिसतात. याचाच अर्थ असा की आम्ही आजही बदललेलो नाही.
रेल्वेचा जन्म मुळात इंग्रजांच्या काळातील. एप्रिल १८ इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर त्यावेळचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर २१ मैल धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली होती. त्यानंतर १८५४ मध्ये बंगाल मध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. १८५४ साली ही गाडी मुंबई, ठाणे रेल्वे कल्याण पर्यंत वाढवली गेली. तेव्हाच देशाचा पहिला पूल, ठाणे व्हायाडक्ट आणि पहिला बोगदा, पारसिक बोगदा बांधण्यात आला. कोलकाता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्गही १८६४ मध्ये पूर्ण केल्या गेला व मुंबई ते कोलकाता रेल्वेमार्ग पूर्ण झाला. १८७० मध्ये त्यावरून गाडी धावली. १८८५ मध्ये भारतीय बनावटीचे रेल्वे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली. त्यात प्रसाधनगृहांची सुविधा होती, १८९१ मध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांत ही सुविधा केली गेली व १९०७ साली खालच्या वर्गाच्या डब्यांत ही सुविधा केली गेली. पहिली विद्युत रेल्वे, मुंबई व्हीटी ते कुर्ला दरम्यान, ३ फेब्रुवारी १९२५ रोजी धावली. इ.स. १९४७ पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. इ.स. १९५१ मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. पहिली भूमिगत रेल्वे, कोलकाता मेट्रो, २४ ऑक्टोबर १९८४ रोजी धावली.
हा भारतातील रेल्वेचा इतिहास आहे. यात सांगीतलेल्या रेल्वेच्या सुविधेनुसार त्यावेळेस सर्वात आधी म्हणजेच १८९१ मध्ये ब्रिटीशांनी प्रथम दर्जाच्या डब्यात प्रसाधनगृहाची सुविधा केली. त्याचं कारण काय असावं? याबाबत थोडासा विचार केल्यास हे जाणवते की त्या काळात रेलेवेच्या या डब्यातून ब्रिटिश अधिकारी वा लोकंही प्रवास करीत असत. ते अंगाने गोरे होते व त्यांना ऊन्हं भावत नसे नव्हे तर उन्हाचा त्यांना भयंकर त्रास होत असे. म्हणून त्यांच्यासाठी प्रथम दर्जाचे असे वेगळे डबे रेल्वेगाडीला जोडण्यात आले होते. त्या डब्यातून काळ्या अर्थात भारतीयांना प्रवास करणे वर्ज्य समजण्यात येत असे. त्यांना खालच्या डब्यांत अर्थात आताच्या जनरल डब्यांत प्रवास करावा लागत असे. ज्यात आता गरीब लोकं प्रवास करतात आणि श्रीमंत लोकं आज वातानुकूलीत रेल्वेडब्यात प्रवास करतात. जणू त्यावेळचे ब्रिटिश म्हणजे हेच धनीक आहेत. अशा प्रकारची वागणूक आज रेल्वेडब्यातून प्रवास करतांना पाहायला मिळते. परंतु हे जे चित्र आज प्रत्येक भारतीयांना पाहायला मिळते. हे चित्र आजच्या भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानुसार विसंगत वाटते. कारण आज आपण स्वतंत्र झालो आहोत व एका स्वतंत्र देशात वास्तव्य करीत आहोत. शिवाय असं वास्तव्य करीत असतांना प्रत्येक नागरीकांना समानतेनं प्रवास करण्याचा अधिकार आहे. मग तो गरीब का असेना. असे असतांना कालच्या उन्हं न भावणाऱ्या ब्रिटीशांसारखे धनीक लोकं वातानुकूलीत डब्यांत आणि गरीब लोकं जनरल वा खालच्या डब्यात असा भेदभाव का केल्या जावा.
भारत हा सन १९४७ ला स्वतंत्र झाल्यानंतर व या भारतातील सर्वच नागरीकांना भारतीय संविधानानुसार समानता प्रदान केल्या गेल्यानंतर हा असा भेदभाव काय दर्शवतो? खरंच या भारतातील गरीब खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालाय का? की या गरीबांना पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार?
विशेष सांगायचं म्हणजे आज देश स्वतंत्र जरी झाला असला तरी देशात कुठेही वावरतांना हाच देशातील श्रीमंत वर्ग गरीबांकडे पाहतांना अशा हीन दृष्टीकोनातून पाहात असतो. जणू त्या गरीबांनी फार मोठा गुन्हाच केलाय. त्यावेळेस असं वाटायला लागतं की काल काळे म्हणून गणले जाणारे व उकीरड्यावर राहणारे भारतीय असे नामोल्लेख ब्रिटीशांच्या तोंडून ऐकणारे भारतीय आज अचानक त्यांच्यात असं परीवर्तन का व्हावं की ते स्वतःला ब्रिटिश समजू लागावे व देशातीलच या गरीब बांधवांना तेच काळे भारतीय. खरंच आज जे श्रीमंत बनलेही असतील, ते कुणामुळं? याच गरीबांच्या श्रमामुळंच की नाही. हे गरीब राब राब राबतात. कोणी शेतात राबतो. कोणी कारखान्यात राबतो. कोणी दुकानात नोकर म्हणून राबतो. कोणी रिक्षा चालवून आपलीच कामं करतो. कोणी आपल्याच घरी मोलकरणीची कामं करतो. म्हणून हा मुठभर गणला जाणारा श्रीमंत वर्ग सुखी असतो. तो आपल्याला पैसा कमवून देतो आणि त्यातच ते सरकारी नोकर. ज्यांचे वेतन व भत्ते या गरीबांच्या रक्त आणि कष्ट या दोन्हीच्या मिश्रणातून मिळालेल्या पैशातून कररुपात भरणा केल्यावर मिळतात. खरं तर त्यांनी करच भरला नसता तर....... तर ना या सरकारी नोकरांना वेतन मिळालं असतं, ना भत्ते. तसेच जे राजकारणी स्वतःला मात्तबर राजकारणी समजतात. त्या राजकारण्यांचेही वेतन हीच गरीब मंडळी आपल्या भरणा केलेल्या करातून करतात.
महत्वपुर्ण बाब ही की आज उद्योगपती जरी मोठमोठ्या उद्योगातून जास्तीत जास्त पैसा जरी कमवीत असतील तरी त्यांना उद्योग उभारणीसाठी दिल्या जाणारा कर्ज रुपातील पैसा हा गरीबांच्या फुल नाही फुलाची पाकळी असलेल्या बँकेतील ठेवीतून. तेव्हाच हे उद्योजक अगदी श्रीमंत होतात. सरकारी नोकर श्रीमंत वाटतात आणि नेतेही स्वतःला श्रीमंत समजतात. परंतु ते समजण्याचं कारण नसावंच. कारण खऱ्या अर्थानं श्रीमंत शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे धंदेवाले असतात परंतु ते स्वतःला श्रीमंत समजत नाहीत. कसेही राहतात. कसेही वावरतात. कारण त्यांना गर्व नसतोच. म्हणूनच आपल्याला त्यांची किळस येते. त्यांनी हात धुतले नसतील वा ते स्वच्छता पाळत नसतील तर आपल्याला किळस येते. परंतु ज्या मोठ्या हॉटेलात स्वच्छ वेटरच्या हातानं आपण जेवन जेवतो ना. तो आपल्या पाठीमागं काय करतो, याची कल्पनाही नसेल आपल्याला. ज्या ठिकाणी जेवन बनवलं जातं. त्या ठिकाणी माशा अन्नावर बसलेल्या असतात. कधी मच्छरं अन्नात पडून मरण पावलेले असतात. कधी एखादे किडेही. परंतु अन्न हे ग्रेव्हीचं असल्यानं आपल्याला लक्षात येत नाही. कधी दुधातून मेलेली उदरं वा एखादे जीव काढून टाकून ते दूध वापरलं जातं. मग आपल्याला विषबाधा होते. परंतु आपण त्या उच्चभ्रू हॉटेलाला दोष देत नाही. पटकन फुडपायझन झालं म्हणून दवाखान्यात जातो.
ते विषारी अन्न आपल्याला चालतं. कारण सुटबुटात वाढणारे असतात. त्या अन्नात विष जरी असलं तरी आपल्याला ते अन्न, वाढणारी मंडळी स्वच्छ व नीटनेटके आणि भारदस्त कपडे परिधान केलेले असल्यानं चालतं आणि जे तसे कपडे घालून अन्न वाढत नाहीत. त्यांच्याबाबत आपल्या मनात तेवढाच तिटकारा असतो.
खरंच भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा आम्ही दररोज म्हणतो. सारे भारतीय आमचे बांधव आहेत. असेही रोजच म्हणतो. संविधान म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतो. परंतु त्यानुसार आपण एकमेकांशी वागतो का? आणि वागत नसेल तर का वागत नाहीत तसे? हे दोन्ही प्रश्न विचार करायला भाग पाडणारे आहेत. खरंच आज जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तरी खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला काय? की पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढण्याची गरज आहे? गरीब हा देखील घटक श्रीमंतांसारखाच स्वतंत्र झाला असतांनाही रेल्वेगाडीत किंवा इतर ठिकाणी का त्याला तुच्छतेची वागणूक मिळते? अन् आईच्याच गर्भात नवही महिने प्रत्येक जण घाणीतच राहिलेला असतांना आज जन्मानंतर स्वतःला स्वच्छ तरी का समजतात? शिवाय जो कोणी श्रीमंत गरीब असा भेदभाव करीत असेल, स्वतःला स्वच्छ समजत असेल, तो तरी आईच्या गर्भात नव महिन्याच्या ऐवजी बारा महिने राहिला असेल काय? त्याला रक्त, मांस वा हाडाऐवजी एखादा वेगळाच अवयव असतो का की त्याची एकंदर ठेवणच वेगळी असते? हे सर्व प्रश्न विचार करायला लावणारेच आहेत.
महत्वाचं म्हणजे प्रत्येकालाच रक्त, मांस व हाड असून ते सारखेच आहेत. प्रत्येकच जीव आईच्या गर्भात नवच महिने राहतो. कुणीच विशेष असा व्यक्तीही बारा महिने आईच्या गर्भात राहात नाही. मग हा गरीब श्रीमंत असा भेदभाव का असावा? हं नशीबानं प्रत्येक माणसांचा जन्म हा गरीब श्रीमंतीत होतो. याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्या जन्माची शिक्षा म्हणून त्यांची हेळसांड करावी? आपण अशि हेळसांड करु नये. प्रत्येकालाच आपला भाऊ समजावे. त्याला बांधवांसारखेच वागवावे. कारण आपण लेकरं आहोत. त्याही एका आईची. जी आपली आई आपल्याला पोषते. विसावा देते व आपल्या सर्व इच्छा पुर्ण करते. ती आई म्हणजे आपली भारतमाता होय आणि तिची सर्व लेकरं मग त्यात गरीब, श्रीमंत, हिंदू, मुसलमान, काळा, गोरा, उच्च, नीच, स्पृश्य अस्पृश्य. हे देखील आपले बांधवच आहेत. ज्यात सर्व धर्माची, सर्व जातीची, सर्व स्तराची, सर्व वर्णाची, सर्व रंगाची मंडळी येतात. तो गेला ब्रिटीशांचा काळ कारण तेव्हा आपण गुलाम होतो व ती मंडळी आपल्याला रेल्वेच नाही तर इतर सर्व ठिकाणाहून आपली हेळसांड करीत आपल्याला गुलाम अशी वागणूक देत होती. आज स्वतंत्र आहोत. म्हणूनच आपल्याला रेल्वे असो की इतर कोणतेही विभाग असो, त्यात अतिशय सौहार्दपुर्ण वागणूक मिळावी. स्वतंत्रपणे वावरता यावं. भेदभाव नसावा. तशीच रेल्वेचीही उभारणी तशाच पद्धतीनं व्हावी. त्यात गरीबांसाठी जनरल व श्रीमंतांसाठी वातानुकूलीत अशी व्यवस्था असू नये हे तेवढंच खरं. कारण आपण सर्व स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरीक आहोत व प्रत्येकालाच स्वतंत्रपणे वागण्याचे व मुक्त विहार करण्याचे स्वातंत्र्य आहे यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०