एकतेत ताकद नसते काहो? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एकतेत ताकद नसते काहो?

एकतेत ताकद नसते काहो?

*निवडणूक....... निवडणूक म्हटलं तर निवडणुकीत स्वातंत्र्य असल्यानं भरपूर उभे राहणारे आहेत. विशेषतः आंबेडकरी समुदायात स्वातंत्र्य असल्यानं व संविधानानुसार प्रत्येकाला निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार असल्यानं जो तो निवडणुकीत उभा राहात असलेला निदर्शनास येतो. तसं अमेरिकेत नाही. अमेरिकेत दोनच पक्ष आहेत. म्हणूनच अमेरिका महासत्ता बनत चाललाय. कारण तिथं दोनच पक्ष असल्यानं इतर कोणत्याही पक्षासाठी निवडणुकीच्या माध्यमातून खर्च होत नाही. तो पैसा वाचतो व त्या वाचलेल्या पैशातून देशातील इतर कोणत्याही गोष्टीसाठी वा विकासासाठी खर्च करता येतो व देशाचा विकास करता येतो. तसं भारतात नसल्यानं भारत आजही विकासाच्या बाबतीत मागं आहे आणि जेव्हापर्यंत असं सुरु असेल, तेव्हापर्यंत आपला देश मागंच राहणार असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.*
'ते तसे उभे का राहतात, निवडणुकीत निवडून येण्याची शाश्वती नसते तरीही.' असं काही लोकांचं म्हणणं. यावर चिंतन आणि मनन करण्याची गरज आहे. याबाबतीत आंबेडकरी समाजातील आपल्याच बिरादरीतील एका व्यक्तीला विचारलं असता तो म्हणाला,
"तेच तर खरं स्वातंत्र्य की ती मंडळी निवडणुकीत उभी राहून आपले आपले विचार मांडू शकतात नव्हे तर मांडत असतात. कारण जसं मत देण्याचं स्वातंत्र्य आहे. तसंच मत मागण्याचंही स्वातंत्र्य आहे. ते तर संविधानानं दिलेल्या खऱ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतात. ज्यांची अस्मिता जागी होते, तोच निवडणुकीला उभा राहतो व संविधानानुसार त्याला असलेल्या निवडणुकीत उभे राहण्याच्या अधिकाराचा पुरेपूर फायदा घेतो. त्यामुळं खरंच तेच सिंहाचे वारस आहेत. म्हणूनच एकाच जातीतील अनेक लोकं निवडणुकीला उभे राहून आपलं मत व्यक्त करीत असतात. अन् बाकी मेंढराचे वारस असतात की ज्याला स्वतःचं मत असतं की ज्या जातीतील फक्त एकच व्यक्ती उभा राहतो व बाकी मेंढरासारखे त्याला मतदान करतात."
त्याचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. ज्या जातीतील अनेकजण निवडणुकीत उभे राहतात. ती मंडळी सिंहासारखी असतात व ज्या जातीतील अनेकजण उभे राहात नाहीत. ती मंडळी मेंढरांसारखी असतात. परंतु डॉ. बाबासाहेबांनी म्हटलं की शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा. हे एकाच जातीतील अनेकांनी निवडणुकीत उभं राहणाऱ्या लोकांना समजत नाही. म्हणूनच ते उभे राहात असतात, मग ते निवडणुकीत निवडून येवो अगर न येवो. उदाहरण द्यायचं झाल्यास सिंहाचंच द्यावं लागेल. कारण सिंह हा खुंखार असुनही देखील एकटा कोणत्याच प्राण्यांची शिकार करु शकत नाही. मग त्या शेळ्या, मेंढ्या का असेना.
एकतेत फार ताकद असते. तशी एकत्र येण्यातही. आपण मुंगीचं उदाहरण पाहू. एका मुंगीला मारता येते तेही अगदी सहजपणानं. परंतु अनेक मुंग्यांना मारायला ताकद लागते. हीच गोष्ट आपल्याला एकतेची ताकद शिकवून जाते. परंतु आजचा काळ असा आला आहे की आपलीच बिरादरी आपले पाय खेचण्याचे काम करीत असते. ती बिरादरी आपणही स्वतः वर जात नाही. तसंच आपल्या बिरादरीतील कोणालाही वर जावू देत नाही. प्रत्येकच गोष्टीत आपली बिरादरी आपले पाय खेचत असते. बाजूचा मुलगा जर पुढं जात असेल, तर त्याचा द्वेषच करीत शेजारचा व्यक्ती त्याचे पाय खेचत असतो. बाजूचा व्यक्ती मोठं घर बांधत असेल, तर तो व्यक्ती त्याला आपल्या घरावर पाणीही मारु देत नाही. सतत भांडण करीत असतो. विचार हा की त्यानं माझ्यापेक्षा मोठं घर बांधू नये.
ही साधी आपल्या घरातीलच गोष्ट आहे तर राजकारणातील निवडणुकीत उभं राहण्याची गोष्ट का करावी आपण? तिथं तर सारेच जण निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार आहे म्हणून प्रत्येकजण उभा राहणारच. ही वास्तविकताच आहे व त्या वास्तविकतेत सत्यता आहे. याबाबतीत एक गोष्ट सांगतो. जी गोष्ट व्हाट्सअप माध्यमातून गाजत आहे.
एकदा गाढव व कुत्र्याची शर्यत लागली. कोण जिंकणार. त्यावेळेस गाढवाला माहीत होतं की आपणच जिंकणार आहोत शर्यतीत. कारण कुत्र्याची बिरादरी, नवीन कुत्रा दिसताच त्याच्यावर भुंकत असतं. त्याच्याशी लढाई करीत असतं. त्याला लढाईत गुंतवत असतं. ज्यात शर्यत लावणाऱ्या कुत्र्याचा वेळ जावू शकतो व आपण जिंकू शकतो.
गाढवानं तसा विचार करुन ते तयार झालं शर्यत लावायला. त्यानंतर तसंच घडलं. प्रत्येक ठिकाणी कुत्र्याच्या बिरादरीतील कुत्रे त्याला अडवत होते प्रत्येक स्थानावर. म्हणूनच गाढव ती शर्यत जिंकून गेले. निवडणुकीतही असंच होतं. याची झळ खुद्द डॉ. बाबासाहेबांनी अनुभवली. आज बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा समाज, काल बाबासाहेब जेव्हा भंडाऱ्यात निवडणुकीत उभे होते. तेव्हा त्या निवडणुकीत विजयाची अहंम भुमिका असलेल्या बाबासाहेबांना त्यांच्याच बिरादरीतील भाऊराव उकेनं त्यांच्या विरोधात उभं राहून पाडलं आणि बाबासाहेब एवढे कायदेपंडीत असुनही त्यांचा पराभव केला. हा इतिहास विसरता येत नाही. आजही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते. ही गोष्ट कुणाच्या लक्षात येत नाही. आज बाबासाहेबांचं नाव घेवून वा छायाचित्र लावून प्रत्येक पक्ष व प्रत्येकच जण निवडणुक लढतो. परंतु ही निवडणूकच त्यावेळच्या बाबासाहेबांच्या पराभवाची पुनरावृत्ती करते. म्हणूनच प्रत्येकवेळाच पराभव होतो आंबेडकरवादी निवडणुकीत उभं राहणाऱ्या वा इतर जातीतील निवडणुकीत उभे राहणाऱ्या अनुयायांचा. कारण आपल्याला एकतेची ताकद वा एकता आज एवढे वर्ष झाले तरी कळलेली नाही. याबाबतीत प्राणी हुशार असतात. परंतु आपण प्राण्यांपासूनही काहीच शिकलेलो नाही. कारण आपण प्राण्यांनाही तुच्छच समजत आलोय.
महत्वपुर्ण बाब ही की एकतेत ताकद आहे. मग ती निवडणूक का असेना. जेव्हापर्यंत कोणताही समाज वा समाजसमुदाय एकत्र येवून निवडणूक लढणार नाही. तेव्हापर्यंत निवडणूकीचं महत्व कळणार नाही व कोणताच पक्ष निवडून आल्यानंतर व्यवस्थीत कामे करणार नाही हे तेवढंच खरं. निदान निवडणुकीत तरी भाराभर निवडणुकीत उभे राहून भारतीय राजकारणाच्या चिंधड्या उडवू नये व निवडणुकीला चिल्लर बनवू नये म्हणजे झालं. दोन चार मोजकेच पक्ष असावेत. तसंच दोनचार लोकांनाच त्यांनी निवडून यावं म्हणून सहाय्य करावे. जेणेकरुन देशासाठी घेतलेले कोणतेही निर्णय हे रास्तपणे घेता येतील आणि निवडणुकीलाही जास्त खर्च येणार नाही. तसंच त्या वाचलेल्या पैशातून देशाच्या विकासासाठी कोणताही खर्च करता येईल. यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०