जनता बेहाल व नेते मालामाल? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जनता बेहाल व नेते मालामाल?

*जनता बेहाल, नेते मालामाल;म्हणूनच मतदानाची टक्केवारी गोलमाल?*

*सध्या निवडणुकीचा पहिला चरण संपला. त्यात मतदानाची टक्केवारी कमी झाली व सर्वांना चिंता पडली. मतदारांनी मतदानाकडे पाठ का फिरवली. त्यात बरीच कारणं आहेत. परंतु तशी बरीच कारणं असली तरी एक महत्वपूर्ण कारण आहे. ते म्हणजे बहिष्कार. मतदानाच्या कमी झालेल्या टक्केवारीवरुन कळतं की जनतेला सत्ताधारी व विरोधी पक्ष आवडलेले नसावेत नव्हे तर त्यांचं कार्य आवडलेलं नसावं.*
निवडणुकीबाबत सांगायचं झाल्यास निवडणूक ही अशी प्रक्रिया आहे की जी लोकांचा आत्मा आहे. ती जर नसेल तर लोकांना मोकळा श्वासच घेता येणार नाही. निवडणुकीचा प्रसंग असा असतो की त्याद्वारे लोकं जनप्रतिनीधी जर अत्याचारी निघाला तर त्याला त्याची जागा दाखवू शकतो आपल्या एका मतानं. ते एक मत राजाला रंक व रंकाला राजा अगदी सहजच बनवू शकते. याची प्रचिती मतदान केल्यावर समजते.
मतदान हे आपल्या भागाच्या नव्हे तर देशाच्या विकासासाठी केलं जातं. परंतु हे जरी खरं असलं तरी आज लोकं ज्याला मतदान करतात. तो व्यक्ती निवडून येताच विकास त्याचा होतो. लोकांचा होत नाही. देशाचा तर नाहीच नाही. म्हणूनच लोकं कधीकधी निवडणुकीवर बहिष्कार टाकत असतात. त्यांना वाटते की ह्या नेत्यांपैकी सर्वच नेते हे भ्रष्टाचार करणारे असून त्या नेत्यांना निवडून दिल्यास ते देशाची वाट लावतील. शिवाय आपण मतदार म्हणून मतदान केल्यास फायदा त्यांचा होईल, आपला नाही. असा विचार करुन मतदार हे मतदान करायला अजिबात केंद्रावर जात नाहीत.
सध्याच्या काळात मतदारात उत्साह राहिलेला दिसत नाही. मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते. त्याचं कारण म्हणजे जो ही नेता निवडून येतो. तो नेता आपलाच स्वार्थ पाहात असतो.
मतदानाबाबत विचार केल्यास आलेली उदासीनता ही झाकोळली जात नाही. कारण आजपर्यतचा नेत्यांचा इतिहास पाहिल्यास असं आढळून येतं की आजपर्यंत जेही कोणते नेते होवून गेले. त्यांनी आपला स्वार्थ पाहात गडगंज संपत्ती गोळा केली. ज्या संपत्तीच्या आधारावर त्या नेत्याच्या सात पिढ्या बसून खावू शकतील. काहींनी मोठमोठे महाविद्यालय उघडले. ज्यात प्रवेश घेतांना पंचवीस पंचवीस लाख रुपये केवळ शिक्षणासाठी भरावे लागतात. ही महाविद्यालये रोजगार निर्मीतीची केंद्रे जरी असली तरी प्रत्यक्षात ती त्या नेत्यांनी स्वतःच्या पैशातून उभारलेली नसतात तर तो पैसा हा जनतेचा पैसा असतो. शिवाय हे नेते जोही घोटाळा करतात. त्या घोटाळ्यातूनही त्यांना मिळालेला पैसा हा जनतेचाच असतो. जनतेचा हा पैसा कररुपात जातो, तो नेत्यांच्या खिशात. यात केवळ जनतेचा पैसाच नेत्यांच्या खिशात जात नाही तर नेत्यांच्या खिशात लोकांच्या जमीनीही जातात. कारण नेत्यांजवळ भ्रष्टाचारातून जास्त कमविलेला पैसा असतो. त्या पैशाच्या भरवशावर ही नेतेमंडळी कर्जात सापडलेल्या लोकांच्या जमिनी विकत घेतात व त्यांना भुमीहीनच नाही तर कर्जबाजारीही करतात. जनता बेताल व नेते मालामाल. म्हणूनच देश बुडतो व देशाचा विकास खुंटतो.
मतदान करतांना दोन घटक दृष्टीक्षेपात असतात. पहिला घटक म्हणजे सत्ताधारी पक्ष व दुसरा घटक विरोधी पक्ष. विरोधी पक्ष अर्थात आपण ज्याला निवडणुकीत निवडून देवू ते. शिवाय आताचे निवडणुकीत उभे राहणारे असे एकही उमेदवार नाहीत की आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवता येईल. प्रत्येकजणच आजच्या काळात निवडणुकीला उभा राहतो तो भ्रष्टाचाराचा विचार करुनच. जो तो विचार करतो की मी निवडून आल्यानंतर भरपूर पैसा कमविणार. ज्यानं माझ्या सात पिढ्या बसून खाऊ शकतील. हाच विचार करुन जो तो निवडणुकीला उभा राहतो. त्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करतो. प्रसंगी मतदारांना लुभावण्यासाठी दारु वा पैशाचे वाटप करतो. कारण त्याला माहीत असतं की आपण का एकदा निवडून आलो की बस मालामालाच होणे आहे. जनता तर काहीच बोलू शकत नाही. ती बोलेल पाच वर्षानं. तेव्हापर्यंत तर मला मालामालच होता येईल. मग निवडणुकीत मी निवडून नाही आलो तरी चालेल. शिवाय मलाच तिकीट मिळेल कशावरुन? म्हणूनच जनता काळाही श्वान तोच व गोराही श्वान तोच या म्हणीप्रमाणे विचार करुन अलिकडे मतदानाला जावू पाहात नाही व मतदानाचा टक्का घसरतो. मग ही चिंतेची बाब ठरते. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र येतं की जनतेनं मतदान कमी केलं. खुलासा द्या आणि जिल्हाधिकारी तरी कुठून देणार खुलासे? कारण हे जनतेचं राज्य आहे. जनता म्हणेल तेच होईल. काय जनतेला मतदान करायला ओढत नेणार कोणी.
महत्वपुर्ण बाब ही की ही जनता आहे. या जनतेनं पुर्वीच्याही शासनकर्त्याच्या काळातील काळ पाहिला. जो घटक आज विरोधी पक्ष म्हणून प्रचलीत आहे आणि गतकाळातील सत्ताधारी पक्षांचाही काळ पाहिला. या दोघांचाही काळ जनतेला आवडला नाही. म्हणूनच हा निवडणुकीवर बहिष्कार. तशी इतर बरीच कारणं आहेत. परंतु तुर्तास हे कारण सत्य असेल असं वाटते. तेव्हा विनंती ही की आज निवडणुकीत जरी कमी टक्केवारी पडली असली तरी उद्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी निश्चीतच वाढू शकते. परंतु त्यासाठी जो पक्ष निवडून येईल. त्या पक्षानं चांगलं काम करावं. जनतेचं काम करावं. निव्वळ आपल्याला सत्ता मिळाली म्हणून जनतेचा पैसा आपल्या घरात भरु नये म्हणजे झालं. चांगलं काम केल्यास निश्चीतच मतदानाची टक्केवारी वाढेल. नाहीतर आज तेवढी तरी टक्केवारी आहे. उद्या तिही नसेल यात तिळमात्रही शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०