मायबापाची संपत्ती ; देशाला दान?
परवा मातृदिन साजरा झाला. त्या मातृदिनाला बऱ्याच लोकांनी चांगल्या चांगल्या पोष्ट केल्या. त्यात काहीजण असेही होते की ज्यांनी आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवलं असेल, याची शंका नाकारता येत नाही.
आज काळ बदलला आहे. सासूची जागा सुनेनं घेतलेली आहे. आता आधी मुलगा असलेला व जिचा पती झाला तोही आपल्या पत्नीचं ऐकू लागला आहे व तो विनाकारण, ज्या म्हातारपणात आपल्या आईला मदत करायला हवी, सुख द्यायला हवं, त्याच म्हातारपणात तिला मदत करण्याऐवजी व सुख देण्याऐवजी आपल्या पत्नीशी तिचं पटत नाही. म्हणून तिला वृद्धाश्रमात टाकतो. प्रसंगी तिला घरातून हाकलून देतो. त्यासाठी तिला छळ छळ छळतो.
वृद्धाश्रमात आपल्या आईवडीलांना टाकणारा हा मुलगा विचारही करीत नाही की आपले मायबाप मरण पावल्यानंतर जी संपत्ती त्यांनी कमावलेली आहे. ती संपुर्ण संपत्ती आपलीच होणार. आपल्या संपत्तीत कोणीच वाटेकरी नसणार. तसं पाहिल्यास हीच गोष्ट नेहमीच घडत असते. म्हणूनच मायबाप वृद्धाश्रमात जातात व मुलं घरात सततची भांडणं नको म्हणून मायबापांना वृद्धाश्रमात टाकत असतात.
संपत्ती....... संपत्तीचेही नियम असायलाच हवे. हवं तर ती संपत्ती देशाला, देशाच्या विकासासाठी दान करावी. परंतु मुलाला देवू नये. अशी परिस्थिती आज मुलांनी आपल्या मायबापासमोर आणलेली असून याबाबतीत तसे नियम बनवावेत की काय? असे वाटू लागले आहे. मुलगा मायबापाला वृद्धाश्रमात टाकत असेल किंवा हाकलून देत असेल, तर अशा मायबापाची संपत्ती ही मुलांना देवूच नये. ती सरकारजमा करावी वा त्या मायबापाची जो सेवा करीत असेल, त्याला दिलेली बरी. त्यासाठी मायबापाचाही जीवंतपणी सल्ला घेवू नये. पुरावे जर उपलब्ध असतील तर सरकारनं अगदी जोर जबरदस्तीनं का असेना, ते पाऊल उचलावंच. कारण प्रत्येक मायबाप, जरी त्यांची मुले त्या मायबापाची सेवा करीत नसतील वा हाकलून देत असतील मायबापाला, तरी आपली संपत्ती त्या मुलालाच देत असतात. त्या मायबापाची सेवा इतर कोणतीही व्यक्ती करीत असेल, त्यांच्या स्वतःच्या पुत्राशिवाय. तरी त्याला ती संपत्ती देत नाहीत. अपवाद यात एखादा असतो. मात्र काही मायबाप याविरुद्ध पाऊल उचलत असतात. परंतु त्यांनी तसं पाऊल जरी उचललं तरी सरकार त्यांचं चालू देत नाहीत. याबाबतीत उदाहरण द्यायचं झाल्यास एका जिल्ह्यामध्ये एका शाळेच्या संस्थाचालकानं आपली संपुर्ण संपत्ती त्याचे घरी जेवनाचा जो डबा आणून देत होता, त्याला दिली. परंतु त्यानंतर सर्व मुलांनी न्यायालयात धाव घेतली व याचीका दाखल केली होती की आम्ही त्यांचे वारस आहोत. त्यानंतर न्यायालयात ते उत्तर ऐकून घेत त्यातील अर्धी संपत्ती मुलांना दिली.
अर्धी संपत्ती...... तिही मायबाप मरण पावल्यानंतर. ती मुलांना देणे. तेही न्यायालयामार्फत. यात न्यायालयाचा निकाल रास्त जरी असला तरी या निकालानुसार एक प्रश्न मनात असा उभा राहतो की ज्या मुलाला लहानपणी ज्या मायबापानं जपलं. त्याला न्हाऊपिवू घातलं. उन्हातून सावलीत नेलं. शिक्षण शिकवलं. त्यानंतर ती मुलं मोठी झाली. विचार करण्यालायक झाली. तेव्हा ती बालपणीची गोष्ट मुलं जर विसरुन जात असेल आणि त्यावरच मायबापानं निर्णय घेतला असेल की माझी ही संपत्ती मी अजिबात मुलांना देणार नाही. माझी जो व्यक्ती सेवा करेल, तोच खाईल आणि त्यांनी आपल्या बक्षीस पत्रात तसं लिहून दिलं असेल, तर त्यानंतर जर तो व्यक्ती मरण पावला आणि न्यायालयात तो व्यक्ती मरण पावताच मुलांनी दावा केलाच आणि म्हटलं की आम्ही त्यांचे वारस. आम्हालाही हवी अर्धी संपत्ती. तर न्यायालयामार्फत तो दावा स्विकारुच नये. फेटाळूनच लावावेत असे दावे की जेणेकरुन प्रत्येक मुलांना अक्कल येईल. संपत्ती हवी आहे ना. मग मायबापाची सेवा करावीच लागेल. असं धोरण ठेवावं व तेच धोरण राबवावं. शिवाय जे मायबापाची सेवा करीत नसतील, अशा लोकांना सरकारी सुविधा वा सरकारी नोकऱ्याही देवूच नये. कारण मायबाप हे अतिशय मोलाचे असतात की जे घासातून घास काढून आपल्या मुलांना भरवीत असतात. प्रसंगी ते उपाशी राहतात. परंतु आपल्या मुलांना अन्न देतात. ते प्रसंगी फाटके कपडे घालतात. परंतु मुलांना चांगले वस्त्र देतात. ते आयुष्यभर तुटक्या झोपडीत राहतात. परंतु आयुष्याच्या उतारावर ते आपल्या लेकरांसाठी कर्ज काढून महाल बांधून देतात. मायबाप पोटाला चिमटा लावतात. परंतु आपल्या मुलांच्या संपुर्ण गरजा पुर्ण करतात. तसेच बरेचसे असे मायबाप आहेत की जे म्हातारे असूनही कामं करतात. त्यांना काम होत नाही, असं त्यांचं वय असते तरीही ते कामं करतात. कारण मुलं त्यांची सेवा करीत नाहीत म्हणून. शिवाय त्याही वयात त्या कामातील बराचसा काही भाग पोटाला न खाता मुलांसाठी गोळा करुन ठेवतात. अन् मुलं काय देतात. काहीच नाही. उलट काही दारुडे मुलं त्या म्हाताऱ्या मायबापांना मारुन पैसा उकळतात व त्या पैशाची दारु पिवून मौज करतात.
मायबापांना मुलं मारतात. तरी त्या मायबापाची अपेक्षा असते की माझ्या मरणानंतर माझ्या मुलालाच माझी संपत्ती मिळावी. इतरांना मिळू नये वा सरकारजमा होवू नये. यासाठी बरेचसे मायबाप जीवंत असतांनाच बक्षीस पत्र बनवून ठेवतात.
विशेष सांगायचं म्हणजे आज मायबाप मरण पावल्यावर वारसदार म्हणून त्यांची संपत्ती मुलांनाच मिळत असल्यामुळे व मुलांनाही ती गोष्ट पक्की माहीत असल्यानं, मुलं आपल्या मायबापाच्या वृद्धापकाळी त्यांची सेवा करीत नाहीत. त्यांना आधाराच्या वेळेस आधार देत नाही. त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतात. एकदंरीत सांगायचं झाल्यास त्यांचे हालहाल करीत असतात. हे सर्व टाळायचे असेल तर जी मुलं त्या वृद्ध दांपत्याच्या म्हातारपणात त्यांची सेवा करायची सोडून त्यांना हाकलून देत असतील वा त्यांना वृद्धाश्रमात पाठवीत असतील तर अशांना धडा शिकविण्याची गरज आहे. त्याशिवाय मुलांची अक्कल ठिकाणावर येणार नाही. तसे जर झाले तर प्रत्येकच मुलगा आपल्या मायबापाची जीवंतपणी सेवा करतील. परंतु हे जरी खरं असलं तरी आजचा काळ बेबनावाचा काळ आहे. आज लोकं मायबापाची सेवा करणं सोडतात. मदर्स डे फादर्स डे हिरीरीनं साजरा करतात. व्हाट्सअप व फेसबुकवर फोटो अपलोड करतात. मात्र वास्तविकता ही असते की तो फक्त दिखावा असतो. सेवेचं मोल अजिबात नसतं. हेच चित्र दिसत असतं प्रत्यक्षात. ही वास्तविकता लपवताच येत नाही.
खरं तर ज्या लोकांची मुलं त्यांची सेवा करीत नाहीत. अशांची संपत्ती गोठवायलाच हवी. तसे नियम सरकारनं बनवावेत की जेणेकरुन देशाचा विकास त्या संपत्तीतून करता येईल. तसंच पाऊल जर सरकारनं उचललंच. तर सर्व मायबापांची सर्व मुलं सुधारतील. ती मायबापाची सेवा करतील. त्यांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही आणि तसं केल्याशिवाय कोणत्याही मुलांची अक्कल ठिकाणावर येणार नाही. हे तेवढंच खरं आहे. यात तीळमात्रही शंका नाहीच.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०