श्री दत्त महात्म्य गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्री दत्त महात्म्य

दत्त महात्म्य
भाविकांसाठी हा ग्रंथ आहे.
हा ग्रंथ वाचनासाठी ईश्वरभक्ती असणे ही एकच योग्यता आहे. भक्तांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्ती तसेच आत्मसाक्षात्कार हे प्रयोजन आहे. परमेश्वराने अत्रिमुनिंच्या घरी अवतार धारण केला.
श्री स्वामी महाराजांनी लिहिलेला दत्त पुराण हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे, सर्वांना कळावे यासाठी हा ग्रंथ मराठीत लिहिला आहे.
श्री दत्त पुराणाचे तीन भाग आहेत. ज्ञानकांड, उपासनाकांड, कर्मकांड.
या ग्रंथात उपासनाकांडाचे निरुपण आहे. ज्याला मुक्ती हवी आहे त्याने नवविधा भक्तिचा अवलंब करावा असे सांगितले आहे.
श्री दत्त प्रभू
वेद, पुराणे पण त्यांचे गुणगान करतांना थकून गेले तेथे आमच्या स्वल्पबुद्धिने संपूर्ण गुण कसे सांगता येतील.
देवांना आपल्या कवीत्वाने संतोष देणाऱ्या बृहस्पतिंचे कवित्व पण विस्मित होईल, त्यांनाही ते जमणार नाही याची मला जाणीव आहे. सद्गुरू दत्तात्रय प्रेरणा करतील तसे हे लेखन घडत आहे.
येथे कर्तुत्वाचा अभिमान नाही.

सद्‌गुरू महत्व - ब्रह्मदेवानी कलीला सांगितले की, गुरु, इश्वर, साधुसंत, माता पिता यांची भक्ति करणाऱ्यांना तू त्रास देऊ नकोस. गुरुभक्तांकडे तर तू पाहूचं नकोस. सद्‌गुरू भक्ताचे रक्षण करतात.
देवादिकांचा रोष झाल्यास गुरु रक्षण करतात पण गुरुचा रोष झाल्यास त्याचे रक्षण कोणी करू शकत नाही. तेव्हा कलीने सद्‌गुरुंचे महत्व सांगण्याची विनंती केली.
पहिला अध्याय -
१ - महामुनी अत्रि नवविधा भक्ति करून देवपिता झाले.
२ - श्री नारायणांनी विश्वनिर्मितीचा संकल्प केला. प्रथम ब्रह्मदेवाना जागे केले व वेद देउन, ब्रह्मदेवांकरवी भौतिक सृष्टीची निर्मिती केली. ब्रम्हदेवानी मरिची, अत्रि, क्रतु, पुलस्त्य, पुलह, अंगीरस आणि दक्ष हे सप्तर्षी तसेच सनत्कुमार, सनक, सनंदन, सनातन आणि नारद यांना जन्म दिला.
३ - या पुत्रांपैकी दुसरा पुत्र अत्रि यांचा वेदांनी गौरवृ केला आहे. ब्रम्हदेवांच्या निष्कलंक तपाचे सुंदर मुर्तरुप म्हणजे अत्रि ऋषी.
कृतयुगात् अत्रिमुनीच वैद्य झाले व त्यांनी रोगपिडितांना सुखी केले.
वेदांच्या आज्ञा सामान्यांना कळाव्या म्हणून आत्रेय स्मृति रचली.
ब्रम्हदेवांच्या आज्ञेनी अत्रिंनी अनसुयेशी विवाह केला.
सती अनसूया
अनसूया- देवहूती व व कर्दम ऋषीची कन्या. अतिथीला तिने स्वप्नातही कधी विन्मुख पाठवले नाही.
तीन देवी तीच्या कीर्तीने मत्सरग्रस्त झाल्या व तीचे सत्वहरण करण्यासाठी पतींना पाठवले. त्यावेळी अनसूयेने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने त्रिदेवांना बालक बनवले. नंतर तिन्ही देवी शरण आल्या व आपले पती परत मागितले तेव्हा अनसूयेने त्याना तीन बालके दाखवली.
पण त्या ओळखू शकल्या नाहीत.
तेव्हा सती अनसूयेने त्यांचे पति परत दिले. मांडव्य ऋषींनी कौशिक नावाच्या ब्राह्मणाला शाप दिला की तो सूर्योदयाच्या आधी मरण पावेल. तेव्हा त्याच्या पत्निने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने सूर्यालाच थांबवले. सर्व विश्वात अंधार पसरला. अनसूयेने तीला समजावले व सूर्योदय घडवला. शापाच्या प्रभावाने कौशिक मृत्यू पावला तेव्हा अनुसूयेने त्याला परत जिवंत केले. त्रैलोक्य रक्षणाचे हे अलौकीक कार्य केल्यामुळे देवांनी ब्रह्मा, विष्णु, महेश हे तिघही तुझे पुत्र होतील असा आशिर्वाद दिला. भगवान विष्णूना जीने प्रथम भाऊ व नंतर पुत्र केले त्या अनसूयेला कोणतीही उपमा देता येत नाही. अनसूया म्हणजे अनुपम चैतन्य.
महासामर्थ्यवान, महान तपोबल असलेले अत्रि यांनी अनसुयेशी विवाह केला. अनसूया म्हणजे जणू आदिमाया.
अत्रि व अनसूया यांचा पुत्र म्हणजे अद्वितीय असे ' दत्त' स्वयंदत्त म्हणजे स्वतःचे दान करणारा असा भगवान दत्तात्रेय नावाने प्रसिद्ध असलेला पुत्र.
नवविधा भक्ति - १- स्मरण २- वंदन ३ - सख्य ४ - सेवन ५ - पूजन ६ – दास्य ७ - श्रवण ८ - कीर्तन ९ - आत्मनिवेदन.
भक्त
कार्तविर्य - स्मरण भक्ति २. अलर्क - वंदन भक्ति. ३.आयुराजा - दास्य भक्ति. ४.परशुराम - सख्य भक्ति.
५. विष्णूदत्त - सेवन भक्ति.
६. यदू - अर्चन भक्ति. ७.वेदधर्मा - कीर्तन ८. दीपक - श्रवण भक्ति. या भक्तांनी वरील प्रमाणे भक्ति करून श्री दत्त प्रभूचा कृपाप्रसाद मिळवला.
वेदधर्मा व संदिपक गोदावरीच्या तीरावर वेदधर्मा नावाचे ऋषी राहत होते. त्यांचे अनेक शिष्य होते. त्यांनी एकदा आपल्या शिष्यांची परिक्षा पाहण्याचे ठरविले.
त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले व म्हणाले, माझे पुर्वजन्माचे पाप माझ्या तपाने बरेच नाहीसे केले आहे परंतु पण अजूनही जे शिल्लक आहे ते मला भोगून संपवावे लागणार आहे.
मला त्यामुळे गलत्कुष्ट होणार आहे व मला अंधत्व प्राप्त होणार आहे. हा रोग मला एकवीस वर्षे भोगावा लागणार असून मला स्वताचे रक्षण करता येणार नाही. या कठीण काळात मी काशी येथे राहणार आहे. तेव्हा मला अन्नपाणी देऊन माझा सांभाळ करण्यासाठी तुमच्यापैकी कोण येईल ते विचार करून सांगा.
ही जबाबदारी घेण्यास संदिपक नावाचा शिष्य त्यांची काळजी घेऊन सांभाळ करण्यासाठी तयार झाला.
त्यांनतर दोघे काशीला आले व आश्रमात राहू लागले.
त्यानंतर वेदधर्मांना रोग झाला . सर्वांग गळत्या व्रणांनी भरले. त्यांची दृष्टी गेली व ते अशक्त झाले. त्यांची सहनशक्ती व विवेकबुद्धी नष्ट झाली. ते तापट व विचित्र वागू लागले. ते दीपकाला बोलत असतं कधी कधी मारत असतं मात्र दीपक त्यांची सेवा करत असे. जेवण देत असे, व्रण स्वच्छ करत असे. वेदधर्मा त्याने आणलेल्या अन्नाला नावे ठेवत, कधी टाकून देत असत तर कधी तो भिक्षेसाठी निघाला की माझे व्रण न धुताचं निघाला, या माशा मला खाउन टाकतील असे म्हणतं. हे सर्व दीपक सहन करत असे. सद्‌गुरु सर्व देवांचे देव आहेत, त्यांची सेवा ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, अशा भावनेने संदीपक स्वताची काळजी न करता सेवा करत राहिला.
वीस वर्षांत तो विश्वेश्वराच्या दर्शनाला गेला नाही. या त्याच्या सेवेंने प्रसन्न होऊन श्री विष्णू व श्री काशी विश्वेश्वरानी त्याला वर मागण्यास सांगितले. पण तो म्हणाला की सद्‌गुरुंचे आज्ञेशिवाय वर घेणार नाही. सद्‌गुरू प्रसन्न झाले व त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला .
तो गुरुकृपेने वेदवेदांगात पारंगत झाल व त्यास ब्रह्मविद्या प्राप्त झाली. वेदधर्मा यांचे शरिर पुर्ववत दिव्य झाले. हे सर्व शिष्याची परिक्षा बघण्यासाठी व काशी क्षेत्राचे महत्त्व प्रकट करण्यासाठी केलेले नाटक होते.
वेदधर्मा संदीपकाला म्हणाले
" तू वर माग ". त्यावर संदीपकाने श्री दत्त चरित्र ऐकण्याची इच्छा सांगितली.
यानंतर वेदधर्मा ऋषींनी त्याला श्री दत्त चरित्र सांगणेस सुरुवात केली.
दुसऱ्या अध्यायापासून श्री दत्त महात्म्य हे गुरु शिष्य संवाद स्वरूपात आहे. श्री गुरुदेव दत्त.