एवढ्या पैशाचा उपयोग काय? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एवढ्या पैशाचा उपयोग काय?

एवढ्या पैशाचा उपयोग काय?

अलिकडील काळ पाहिला तर कोणताच व्यक्ती गरीब असलेला आढळत नाही. महागाई वाढली आहे. परंतु त्याची झळ अजुनपर्यंत तरी कोणाला पोहोचत असेल असे दिसत नाही. त्याचं कारण आहे त्यांचं वागणं. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या घरी एकतरी मोबाईल असतोच. शिवाय प्रत्येकाच्याच घरी एकतरी सिलेंडर दिसतोच. त्यातच बऱ्याच लोकांचं अकाऊंट बँकेत आहे. शिवाय बर्‍याच लोकांच्या घरी एकतरी गाडीही आहे. शिवाय बरेचसे लोकं आज सिमेंटच्या घरात अधिवास करतांना दिसतात.
काही लोकं नक्कीच गरीब आहेत. परंतु भपकेबाजपणा असल्यानं काही काही घरातील वातावरण गरीबीचं दिसत नाही. काही काही लोकांचं दिसतं. तसंच काही काही लोकं त्यांच्यावर कितीही कर्ज असलं तरी त्यांची आणबाण व शान ठरलेली असते.
काही लोकं असेही आहेत की जे गर्भश्रीमंत आहेत. परंतु ते अगदी साधे राहात असल्यानं ते गर्भश्रीमंत वाटतच नाही. ते असा बराचसा पैसा कमवितात. परंतु हा पैसा कुठून येतो? याची साधी चौकशी होत नाही. तो पैसा त्यांनी आयुष्यभर केलेल्या काळ्या कर्मातून आलेला असतो. जसा एखादा सरकारी नोकर, त्याला वेतन असूनही त्यानं नोकरीवर असतांना केलेल्या भ्रष्टाचारातून असा पैसा येतो. तरीही त्याला पेन्शन असतेच. खरं तर अशांना पेन्शनच देवू नये अशी अवस्था. हे तर सरकारलाच लुटणं झालं. उदाहरण द्यायचं झाल्यास एका सरकारी कर्मचाऱ्याचं देतो. एका सरकारी कर्मचाऱ्यांनं भ्रष्टाचार करुन पैसा कमवून शेती घेतली. त्यानंतर तो पेन्शनर बनला. अन् जेव्हा ती शेती विकली. तेव्हा त्याच्याकडे नऊ कोटी आलेत. परंतु तो पैसा देशात जायज नसल्यानं विदेशात राहात असलेल्या मुलांकडे रवाना केला. असे बरेच सरकारी कर्मचारी आहेत की ज्यांच्याकडं भरपूर पैसा आहे आणि पेन्शनही भरपूर आहे. तरीही ते सरकारला लुटत असतात.
ते सरकारला लुटत असतात? असं म्हणणं संयुक्तीक वाटत नाही. परंतु ते शंभर प्रतिशत खरं आहे. हे झालं सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. काही अशीही मंडळी आहेत की ती जरी गर्भश्रीमंत असली तरी सरकारकडून मिळणारे राशन उचलत असतात व ते राशन जे खरंच गरीब असतात, त्यांना विकत असतात व त्यातून पैसा कमवीत असतात.
काल मात्र लोकं एवढे श्रीमंत नव्हते. त्यांना खायला मिळत नव्हतं. लोकांनी एका काळात लालगुंजीही खाल्ली होती. शिवाय कुकूसात असलेले धान्य काढून वा अंबाडीची भाजी उकळून खावून आपलं आयुष्य जगवलं होतं. ना त्या काळात कोणाजवळ मोबाईल दिसत होता. ना त्या काळात कुणाजवळ गाड्या. शेती पिकवायची पद्धत ही पारंपारिक असल्यानं व धान्यावरील किडीचं नियंत्रण करता येत नसल्यानं, तसंच धान्य पिकविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या काळात शोध लागला नसल्यानं जास्त प्रमाणात धान्य पिकवता येत नव्हते. लोकांजवळ सायकलीही नव्हत्या. एखादी सायकल गावात आलीच की नवल वाटायचं. टिव्ही गावात नव्हतीच. शहरातही तुरळक लोकांच्या घरी गाड्या होत्या. सायकली थोड्याफार होत्याच. तशाच टिव्ह्याही. परंतु आजच्यासारखी परिस्थिती त्यावेळेस नसल्यानं लोकं गरीब होते. परंतु आज तसं नाही.
आज लोकं गर्भश्रीमंत असून लोकांजवळचा पैसा वाढलेला आहे. लोकं आणखी श्रीमंत बनत चाललेले आहेत. परंतु माणूसकी संपत चाललेली आहे. पैशाच्या जोरावर लोकांना माजही आलेला आहे. ते आता गरीब असलेल्या लोकांची इज्जत करीत नाहीत. त्यांचा पदोपदी अपमान करीत असतात. त्यातच पाणउतारेही करीत असतात. शिवाय या अति पैसा वाढण्यानं नातं संपलं आहे. काल आठवडाभर राहणारी पाहूणे मंडळी आज घरी आल्यावर त्यांना राहा म्हणावयास कंटाळा येतो. असं चित्र दिसत आहे. त्यातच मी, माझी मुलं व माझा पती किंवा पत्नी एवढंच चित्र दिसत आहे. घराघरात म्हाताऱ्यांना कोणी ठेवायलाही पाहात नाहीत. ते वृद्धाश्रमात अधिवास करतांना दिसतात. त्यांच्याजवळ एवढा पैसा असूनसुद्धा.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आपली जर म्हातारपणात सेवा होत नसेल, वृद्धाश्रमात आपली रवानगी होत असेल, नात्यातील माणसं घरी आल्यावर जड होत असतील, आपल्या मुलाचं मी, माझी पत्नी व माझी मुलं हेच वैभव असेल, आपल्यातील माणुसकी संपली असेल आणि आपल्याला माज आला असेल, तर हा भ्रष्टाचार करुन पैसा कमवला, तो कोणासाठी? शिवाय आपल्याजवळील एवढ्या पैशाचा उपयोग तरी काय? हे एकप्रकारे चिंतेचे प्रश्न आहेत. यावर सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. शिवाय एक विशेष गोष्ट अशी की हाच आपण कमविलेला पैसा, आपण आजारी असतांना आपल्याच कामात पडत असेल वा आपला अपघात झाल्यावर आपला त्या पैशानं जीव वाचत नसेल वा आपल्याला एखाद्या खोट्या गुन्ह्यात तुरुंगात जावं लागत असेल तर या पैशाचा उपयोग काय? त्यापेक्षा आपण गरीबच असलेलं बरं. बिचाऱ्या गरीबांची मुलं त्यांची म्हातारपण आल्यावर सेवा तर करतात. परंतु ते आजारी असतांना रुग्णालयात नेतात. शिवाय त्यांना वृद्धाश्रमातही पाठवत नाहीत. व्यतिरीक्त कोणी एखादा नवीन पाहूणा आल्यास त्यांची सरबराई तर करतात. शिवाय नातंही जपतात. तसाच कोणता माजही आलेला दिसत नाही त्यांना आणि त्यांच्याजवळ माणुसकीही असते. नसतो फक्त पैसा. ज्या पैशातून कुणाचा जीव वाचवला जावू शकत नाही. हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०