पावसात एकदा तरी भिजावे? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पावसात एकदा तरी भिजावे?

पावसात एकदा तरी भिजावे?

पावसाळा. पावसाळा कुणाला आवडतो तर कुणाला अजिबात आवडत नाही. कारण पावसाळ्यात सतत पाऊस पडत असतो. त्यातच लहान मुलं बाहेर निघून पावसात भिजलीच तर आई वडील सारखे ओरडत असतात. म्हणत असतात की बाहेर निघू नकोस. पावसात भिजशील. अन् तेच घडतंही. बाहेर पावसात निघालो आणि भिजलोच तर सर्दी पडलं होतं आणि फालतूचा खर्च मायबापांवर पडतो. जे काबाडकष्ट करुन पैसे मिळवत असतात.
पावसाळ्याबद्दल सांगायचं झाल्यास कालही आम्ही पावसात भिजत होतो. आमचा जन्म ग्रामीण भागातील. आमचं गाव ग्रामीण असल्यानं त्या काळात गावात रस्तेही नव्हतेच. शिवाय गावात एक शाळा होती. ती घरापासून थोडी लांबच होती. तसं पाहिल्यास जास्त रहदारीही नव्हतीच. मधली सुट्टी शाळेला व्हायची. तेव्हा आम्ही घरी जेवायला यायचो. त्यातच दुपारी पाऊस आला तर मग आमची मजाच मजा. आम्हाला पावसाची चिंता वाटायची नाही. उलट मजाच वाटायची. मग आम्ही शाळेत गेलोच आणि मधली सुट्टी झालीच तर आमच्या बाईला न घाबरता चक्कं पावसात घराकडे त्या तेवढ्या पावसात धुम्म पळत सुटायचो. अन् घरी गेल्यावर आई ओरडायची. केसं पुसून द्यायची. म्हणायची की असं येत जावू नकोस. सर्दी होईल. आजारी पडशील. परंतु ते बोलणं मनावर घेत नव्हतो आम्ही. कारण त्यावेळेस आजार आमच्या पाचवीलाही शिवत नव्हताच असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. याचा अर्थ आम्हाला आजार होत नसेल काय? आजार होतच होता. सर्दी सदोदीत राहायची आणि ती सर्वांनाच असायची. त्यामुळंच त्याचा बाऊ वाटायचा नाही. तशी आई नेहमीच म्हणायची. शेंबूड काढून टाकायचा. रुमालानं पुसायचा. परंतु ऐकतो कोण? सारखं सर्वांचं शाळेत फुरक फुरक करणं सुरु असायचं. परंतु तसं असलं तरी डॉक्टरचं तोंड पाहात नव्हतो आम्ही वर्ष न् वर्ष.
शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवणाला घरी आलोच तर आई जेवन झाल्यावर कपडे बदलवून पाऊस येत असेल तर छत्री द्यायची व आम्ही ती छत्री घेवून शाळेत निघायचो. परंतु ती छत्री आईला दाखविण्यापुरतीच असायची. एकदा काय घरातून बाहेर पडलोच की बस. आम्ही ती छत्री बंद करीत असू आणि बंद्या पावसात पावसाची मजा घेत धावत पळत शाळेत जात असू. तशी आमची बाई देखील छानच होती. ती आम्ही भिजलेले शाळेत गेलोच तर आम्हाला सुट्टी द्यायची. मग संपूर्ण दिवस आनंदात जायचा. त्यामुळंच पावसात भिजण्याचा आनंद काही औरच असायचा.
आम्ही पावसात भिजत असू. अलबत पाण्यात उतरत असू आई ओझल होताच. त्यावेळेस आई म्हणायची, "बापू, पाण्यात जळू असते. ती रक्त पिते. ती एकदा का अंगाला चिकटली की पुर्ण रक्त पिल्याशिवाय सोडत नाही." मग माणूस मरतो. तेव्हा थोडीफार भीती वाटायची. परंतु पुढल्याच क्षणी मित्र म्हणायचे, "अरे, जळू काही करीत नाही. ती अंगाला चिकटलीच तर तिच्या तोंडावर मीठ टाकायचं. ती पळते." असं मित्रानं सांगताच आम्ही आमच्या खिशात मीठ ठेवत पावसात फिरत होतो. त्यातच पावसाची आम्हाला अजिबात भीती वाटत नव्हती.
तो पाऊस...... तो पाऊस आलाच तर रस्त्यारस्त्यावर पाणी गोळा व्हायचं. त्यात पाय बुडायचे. परंतु त्या पाण्यातून घोड्यासारखं धावतांना जी मजा येत असे. ती आता येत नाही. भीती वाटायची सापाची. परंतु तिही भीती कालांतरानं लहानपणी नष्ट झाली होती. पावसाळ्यात गावात लपायला येणारी माकडं बंद पावसात हाकलून लावायला मजा यायची. ती आता येत नाही. व्यतिरीक्त अलिकडचे आजार हे लहान मुलांच्या पाचवीलाच पुजलेले दिसत असतात. शिवाय साधी सर्दी जरी झाली तरी आपल्या मुलाचा आजार वाढू नये. म्हणून त्याला ताबडतोब रुग्णालयात नेणारे पालक आहेत. त्याचं कारण म्हणजे आज साधी सर्दीही जीवघेण्या स्वरुपाची ठरु शकते. तसं काल नव्हतं.
आम्हाला पावसाळा आवडायचा. कारण आम्हाला त्या काळात पावसातच खेळायला मजा यायची. आजही पावसाळा आवडतो. कारण आजचा पावसाळा आम्हाला अन्नधान्य पुरवतो. अंगात घालायला कापड देतो. राहायला एक लहानसं घरही देतो. परंतु पाऊस जर आलाच नाही तर झाडं दिसणार नाही. सगळीकडे हिरवळ दिसणार नाही. अन्नधान्य पिकणार नाही. कापूस पिकणार नाही. मग पोटाला अन्न, घालायला कापड आणि राहायला घरही कदाचीत नशिबात नसेल, अशी आपली स्थिती होवून जाईल. यात शंका नाही. तेव्हा सर्वांनाच सांगावेसे वाटते की पावसाला कोणीही हिणवू नये. त्याचं स्वागतच करावे. तो जर आला तर त्याला अलगद ओठावर टिपावं. त्याच्या पडणाऱ्या सरीत स्वतःला न्हाऊन टाकावं. तसेच ते पावसाचे थेंब न् थेंब अलगद गिळावे. ज्यातून आपलीच रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकेल. म्हणतात ना की पाऊस जर अंगावर गेलाच तर शरीरातील उष्णता पुर्णतः निघून जाते व आपण वर्षभर आजारी पडत नाही. अगदी तसंच आपण पावसाची तमा न बाळगता वागावं. एकदा तरी पावसात पुर्ण भिजावं आणि पावसाचा आनंद घ्यावा म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०