मला स्पेस हवी पर्व २ भाग ५ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग ५

मला स्पेस हवी पर्व २ भाग ५

मागील भागात आपण बघीतलं की नेहा कडे जाण्याचं सुधीर निश्चित करतो आता बघू या भागात काय होईल.


सुधीर अक्षयला म्हणजेच नेहाच्या भावाला फोन करतो.

“ हॅलो”

“अक्षय सुधीर बोलतोय”

“बोल.”

“मी आणि ऋषी या शुक्रवारी बंगलोरला जातोय.”

“अरे व्वा! जाऊन ये. नेहा काय म्हणतेय?”

“आजच मघाशी बोललो.आवाज खूप थकलेला वाटला.”

“तू बंगलोरला यावसं असं तिला वाटतंय का?”

“ते मी विचारलं नाही. मी येतोय हे सांगीतलं. ऋषी पण खूप खूष आहे.”

“असणारच. लहान आहे ऋषी. आई या वयात हवीशी वाटते. पण ऋषी खूप समजूतदार आहे म्हणून इतके दिवस शहाण्या सारखा राहिला.”

“होरे. आजी आजोबांचं वेड असल्याने तो राहिला.”


“आत्ता मग आईबाबांना पण घेऊन जा.”

“मी म्हटलं होतं पण बाबा म्हणाले इतक्या महिन्यांनी तू जातोय तर तुम्ही दोघं आधी जा. तिला मन मोकळं राहता येईल.”

“अरे तिला सवय नाही का सासू सास-यांची?”

“सवय आहे पण बाबांचं म्हणणं तुम्हाला एकांत मिळावा म्हणून तू जा आम्ही ऋषीला उन्हाळ्याची सुट्टी लागेल तेव्हा जाउ.”

“ठिक आहे. त्यांचा पण विचार योग्य आहे. किती दिवस राहणार आहे?”

“शनिवारी पोचेन रविवारी रात्री निघेन. जर वाटलं की नेहाची तब्येत ठीक नाहीये तर एखाद दोन दिवस सुट्टी घेईन.”

“नेहा जाॅईन झाली का?”

“हो आजच जाॅईन झाली म्हणूनच तिचा आवाज जरा थकल्यासारखा वाटत होता.”

“ठीक आहे जाऊन ये.”

“आईंना, प्रणालीला सांग.”

“हो. सांगतो. जा. इतके दिवसांचा विरह संपवून परत ये.”
यावर सुधीर हसत म्हणाला.

“थॅंक्यू.”

“चल ठेवतो.”

अक्षयने फोन ठेवल्यानंतर सुधीर विचाराच्या तंद्रीत हरवला. सुधीरला नेहाची प्रकर्षाने आठवण यायला लागली. तिचा विचार मनात येताच त्याला पूर्वीचे दिवस आठवले. सुधीर आणि नेहा यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं.

नेहाचा पहिला संक्रांतीचा सण होता. त्या दिवशी सुधीरच्या घरी संक्रांतीचे हळदीकुंकू होतं. सुधीर घरी आला तेव्हा नुकतीच नेहा तयार झाली होती. गोऱ्यापान नेहाला काळ्या रंगाची साडी फार सुंदर दिसत होती.

काळा रंगाच्या साडीवर सोनेरी रंगाच्या पानाचं डिझाईन होतं. गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र ,कानात सोन्याचं, हातात सोन्याच्या बाटल्या आणि केसांवर छान गजरा लावलेला होता. नेहा खूपच सुंदर दिसत होती.

तिला पाहिल्यावर सुधीरला मोह आवरला नाही सुधीरने नेहाच्या जवळ जाऊन हळूच तिच्या गालाची पापी घेतली .त्याबरोबर स्नेहा लाजली आणि म्हणाली,

“ हे काय कोणी पाहिल नं!”

त्यावर सुधीर हसत म्हणाला,

“हा फिल्मी डायलॉग कॉमन झालाय बर का! मॅडम आपली बेडरूम आहे आणि इथे कोणी येत नाही समजलं. आपल्या घरातले सगळे शहाणे आहेत.”

आणि हसायला लागला त्यावर नेहा म्हणाली,

“ बस झालं बायका यायला लागतील मला बाहेर जायला हवं”

त्याच वेळेला दारावर टकटक झाली. त्यांनी वाकून पाहिलं तर प्रियंका दारात उभे होती. प्रियंका पण मस्त तयार झाली होती आणि ती म्हणाली

“ सुधीर काय रे मी कशी दिसते सांग? “

सुधीर म्हणाला,
“छान दिसतेस.”

“ हो पण माझ्यापेक्षा नेहा छान दिसते ना! मला माहिती आहे.”

त्यावर सुधीर हसला नाही राहिले पूर्ण वेळ सुधीरची नजर नेहा वर खिळली होती. संध्याकाळी सगळ्या बायका यायला लागल्या. हळदीकुंकू झालं हळदी कुंकू नेहाला उखाणा घ्यायला सांगितला नेहाने खूप छान उखाणा घेतला


“हळद आणि कुंकू रंगसंगती छान जमली,
कपाळावर लावल्यावर प्रसन्नता झळकली.
हळदीकुंकूचा ऊत्साह भरलाय घरी,
लगबगीने करते आहे साग्रसंगीत तयारी.
आज संक्रांतीचं वाण मी आनंदाने देते,
सुधीरचं नाव घेऊन हळदी कुंकू लावते.”

“वा! किती छान उखाणा घेतलास ग!”

पाध्ये काकू म्हणाल्या.

सुधीरची आई ,
“अहो हल्ली मुलींना उखाणा म्हणजे काय ते माहीत नसतं. “

“खरय हो तुम्ही म्हणता ते. उखाणा कशाला म्हणतात ते माहित नाही तर उखाणा घेणार कशा?”

कुळकर्णी काकू लगेच म्हणाल्या. तशी एक हास्याची लकेर जमलेल्या बायकांमध्ये उमटली.

हळदी कुंकू समारंभाला आलेल्या सगळ्या बायका नेहाचं कौतुक करून गेल्या. सगळ्या बायका गेल्यावर सुधीर खोलीबाहेर आला आणि म्हणाला

“आज काय बाॅ एका माणसावर कौतुकाची फुलं उधळल्या गेली आहेत.मजा आहे.”

“माझी सून आहेच गुणी.”

“बघ प्रियंका आपल्या आईने पार्टी बदलली बरका !”

“सुधीर काहीतरी काय बोलतोस?”

नेहा खोट्या रागाने म्हणाली.

“आईने आज पार्टी नाही बदलली. तुझं लग्न ठरल्यापासूनच बदलली आहे.”

“ऐ प्रियंका तुझे कुठले लाड कमी केले ग?”
आई ने डोळे वटारून विचारलं.

“आई असं नाही मला म्हणायचं”


असं म्हणत प्रियंका ने आईला मिठी मारली. आईने सुद्धा प्रेमाने प्रियंकाच्या पाठीवरून हात फिरवला.

नेहा बाजूला उभी होती मायलेकीचं प्रेम बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं ते पाणी ती अलगद पुसत असताना सुधीरच्या आईचं तिच्या कडे लक्ष गेलं.

“अगं तू का रडतेस ये इकडे. तूपण माझी मुलगीच आहेस. “

असं म्हणत सुधीरच्या आईने हात समोर केला तशी नेहा चटकन सासूच्या कुशीत शिरली. हे बघून सुधीर म्हणाला


“हे बरंय नेहा आली तर माझा पत्ता कट झाला. बाबा मी एकटा पडलो हो!”

“एकटा कसला रे? मी आहे नं”

यावर दोघंही हसले. आपल्या आईची आणि आपल्या बायकोची छान जोडी जमली याचा आनंद सुधीरच्या डोळ्यात झळकला तर सासू सून नातं चांगलं रूजतय ही सकारात्मक भावना सुधीरच्या बाबांच्या मनात आली. दोघंही हसत बाहेरच्या खोलीत गेले.

त्या दिवशी नेहाची सुधीरच्या आईने दृष्ट काढली. नंतर सुधीरने ही काढली. हे आठवताच सुधीरच्या अंगावर रोमांच उठले. नेहाला कधी भेटतो असं सुधीरला झालं.


ऋषीच्या गदगदा हलवण्याने सुधीर तंद्रीतून बाहेर आला.

“ बाबा मी तिची वेल झाला हाता मातोय!”

“कायरे एवढ्या हाका का मारत होतास?”

“आपन तधी जायचं आईतडे?”

“अरे परवा रात्री जायचं. “असं म्हणत सुधीरने ऋषीला जवळ घेतलं.

ऋषीची बडबड सुरु झाली. आईकडे गेल्यावर काय काय करायचं? मी आईला खूप गोष्टी सांगणार आहे वगैरे वगैरे.

त्याचं बोलणं ऐकून सुधीरला हसायला आलं. आम्ही दोघंही किती एक्साईट झालो आहोत नेहाला भेटायला हे त्याच्या मनात आलं.

बडबड करता करता कधीतरी ऋषीला झोप लागली. तो झोपलेला बघून सुधीरने हळूच त्यांचं डोकं आपल्या हातावरून खाली गादीवर ठेवलं. त्याच्या गालाची हळुवारपणे पापी घेतली. त्याच्या अंगावर पांघरूण घातलं आणि सुधीर गादीवर झोपला खरा पण त्याच्या डोळ्यात झोप यायलाच तयार नव्हती.

त्याच्या डोळ्यांनी नेहाचं जप सुरू केला होता. इतक्या वर्षातील नेहाच्या वेगवेगळ्या आठवणी मोत्याच्या माळेसारख्या त्याच्या मनाभवती लगडत होत्या .तिचं प्रतिबिंब त्याच्या उघड्या डोळ्यात पडत होतं. सुधीर नेहाच्या आठवणीने झोप येत नसल्याने सारखी कूस बदलत होता.

एकदा त्याला वाटलं नेहाला फोन करावा. मला जशी तिची आठवण येतेय तशी तिला येत असेल का? हा प्रश्न विचारावा असं वाटलं पण लगेच त्याने मनाला रोखलं कारण नेहाची तब्येत आत्ता कुठे सुधरते आहे त्यात तिला रात्रीचं जागरण नको व्हायला. खूप प्रयासाने सुधीरने स्वतःला सावरलं.


केव्हातरी सुधीरला झोप लागली.


****

इकडे अक्षयने फोन ठेवल्यानंतर त्याच्या आईने विचारलंं की

“कायरे काय म्हणतोय सुधीर?”

“अगं सुधीर आणि ऋषी या शुक्रवारी बंगलोरला चालले आहेत.”

“होका. बरं होईल जाऊन आले दोघं तर. पण या महामायेला चालणार आहे का?”

आईने जरा रागातच विचारलं.

“आई अहो महामाया काय म्हणता?”

“मग काय म्हणू? सहा महिने झाले तिकडे गेली. एकदाही तिला इथे यावसं वाटलं नाही?”

“आई ते सोडून दे आता. सुधीर जातोय नं?”

“एवढ्या लहान मुलाला टाकून गेली. कसली दगडाची स्पेस हवी होती तिला? तुम्हाला दोघांना तरी कळलं का?”

“अगं आई झालं गेलं गंगेला मिळालं.आता जातात आहे नं दोघं.”

“उपकार करतेय का? आई असून मला एवढा राग आला आहे. सासूला नसेल आला! त्या बिचाऱ्या शांत आहेत म्हणून बोलत नाहीत. प्रियंका गेल्यावर त्यांना हिचाच आधार नाही का?”

“होआई. मला कळतोय तुझा राग.”

“तुला कळून काय उपयोग? “

“आई आता नको जास्त चिडू. सुधीर चालला आहेनेहाकडे. निघेल काहीतरी उपाय. बदलली असेल ती. “

“लग्न करायचं, संसाराच्या जबाबदा-या आल्या की पळायचं.”

आईने बोलता बोलता भांडं आपटलं.हे बघून प्रणालीला राग आला.

“आई तुम्ही नेहमी नेहा मध्ये का चूक शोधता? तिच्या जागी स्वतःला ठेऊन बघा ती का कंटाळली? का तिला स्पेस हवीशी वाटली?

“का? मी नाही संसार केला? नातेवाईकांच्या ऊस्तवाऱ्या मीपण केल्या.

“आई तुमचा काळ वेगळा होता.”

“काळ कसला वेगळा होता? आपण सगळे याच युगात जगतोय. “

“तसं म्हणायचं नाहीमला.”

“मग कसं म्हणायचं आहे?”

“आता नोकरी करणं तिथली जबाबदारी सांभाळत घरही सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यात प्रियंकाच्या जाण्यानंतर जे नातेवाईक नेहा कडे आले, राहिले, वेगवेगळ्या फर्माईशी केल्या त्यामुळे नेहा कंटाळली.”

“मीपण केल सगळं”

“आई तुम्ही नोकरी करत नव्हतात. नोकरीतील जबाबदारी वेगळी, संसारातील जबाबदारी वेगळी असते. आम्हाला ऑफिसमध्ये टार्गेट असतं. ते पूर्ण करत असताना घर संसारातील टार्गेट पण आम्हाला बघावं लागतं. ही दुहेरी जबाबदारी खूप कठीण आहे.”


“कठीण कामं जमत नाही तर करता कशाला नोक-या? बसावं घरी.”

यावर काय ऊत्तर द्यायचं आणि सासूला कसं समजवावं हे प्रणालीला कळेना. अक्षयने प्रणालीची कोंडी ओळखली. त्याने डोळ्यांनीच खूण करून खोलीत जायला सांगितलं. प्रणाली गुपचूप आपल्या खोलीत गेली.मान झटकून अक्षयपण निघाला.

नेहाच्या आईचा राग अजून शांत झाला नव्हता.नेहाच्या आईच्या तोफखान्यापुढे ते नेहमीच शांत बसायचे. तसेच आजही शांत बसले.
______________________________
क्रमशः
वाचकहो सुधीर इतकीच नेहा पण सुधीरला भेटायला उत्सुक आहे का? नेहाने सुधीरला रमणबद्दल सांगावं का? सुधीर नेहाला समजून घेईल का?
तुम्हाला काय वाटतं? पुढे काय होईल? तुमचे विचार मला कमेंट मधून कळु द्या.
धन्यवाद.