मला स्पेस हवी पर्व २ भाग १०
मागील भागात आपण बघीतलं की छकू नेहाला लवकरात लवकर भेटायचे ठरवते.या भागात बघू काय होईल ते.
नेहा आज ऑफिस मध्ये आली तेच प्रसन्न चेहऱ्याने. जवळ जवळ सहा महिन्यांनी ती ऋषीला ऊद्या भेटणार होती त्यामुळे आज तिचा मूड छान होता. तेवढ्यात अपर्णा नेहाच्या केबीबाहेर आली. नेहाचा आनंदी चेहरा बघून म्हणाली,
“ गुड मॉर्निंग मॅडम. आज काही विशेष आहे ?”
“ का ग? काही विशेष नाही.””
नेहा म्हणाली.
“ काही विशेष नाही तर मग तुमचा चेहरा इतका आनंदाने प्रफुल्लीत का झालाय?”
यावर नेहा हसली म्हणाली,
“अगं उद्या सकाळी सुधीर आणि ऋषी येतात आहे. मी जवळजवळ सहा महिन्यांनी ऋषीला भेटणार आहे म्हणून हा चेहरा आनंदित आहे. बस काय म्हणतेस?”
अपर्णा नेहाच्या समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाली,
“ मस्त बातमी दिली. मग आता शनिवार रविवार एन्जॉय करा. ऑफिसच्या कामाचं बघू नका ते होईलच.”
“ ह. तू काय म्हणतेस?”
“ मी आपल्यासाठी नवीन क्रिएटिव्ह रायटर शोधात होते तेव्हा मला एका मुलीचं नाव कळलं.”
“ कोण आहे ती म्हणजे तिला या सगळ्या कामाबद्दल कल्पना आहे का? खूप नवोदित असेल तर आपल्याला तिला ट्रेनिंग देणं वगैरे जमणार नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही.”
“ ती कॉलेजमध्ये आहे पण ती आत्तापासूनच पेपर मध्ये लिहीते त्यामुळे मी तिला विचारलं. कारण युवा मंच हा तरूणाईचा कट्टा आहे शक्ती नावाच्या पेपर मध्ये. त्याच्यात तिचे बरेच लेख मी वाचले आहेत. युवा मंच मध्ये ती खूप पॉप्युलर आहे. तिला मी आपल्या कामाबद्दल कल्पना दिल्यावर ती म्हणाली की मी लिहू शकेन आणि माझ्या करिअर साठी पण एक नवीन दार उघडेल म्हणून मी तिला आज भेटायला बोलवलं आहे.”
“ठीक आहे काही हरकत नाही. ती आली की तिच्याशी आपण सविस्तर बोलू.”
नेहा आणि अपर्णा बोलत असतानाच त्यांच्या केबिनमध्ये आत येऊ का असं कोणी तरी विचारलं कोण आहे म्हणून नेहा आणि अपर्णाने वळून बघितलं. कोणीतरी अनोळखी स्त्री बघून नेहा म्हणाली
“ कोण आपण? कोणाला भेटायचंआहे?”
“ मला तुम्हालाच भेटायचं आहे. मी गीता कोटेचा”
छकूने मुद्दाम आपलं माहेरचं आडनाव सांगीतलं.
“ बसा नं. मी या मॅडमशी कामाचं बोलत होते. दोन मिनिटे तुमच्याकडे वेळ असेल तर मी अर्धवट राहिलेलं बोलणं पूर्ण करते.”
“ हो .आहे माझ्या कडे वेळ.तुम्ही बोलून घ्या.”
खुर्चीवर बसत छकू म्हणाली. छकू पुरेसा वेळ हातात ठेऊनच नेहाकडे आलेली होती. यावर स्मितहास्य करून नेहा अपर्णाशी बोलायला लागली.
छकू बसल्या बसल्या नेहाचं निरीक्षण करायला लागली. निरीक्षण करताना तिच्या लक्षात आलं ही मुलगी आपल्यापेक्षा बरीच सावळी आहे पण नाकी डोळी खूप नीटस आहे आणि बोलण्याची तिची पद्धत छान वाटते. ती खूप क्रिएटिव्ह विचारांची वाटते. बोलताना तिचा आवाज पण छान मार्दवतेकडे झुकणारा आहे. आवाजाला कर्कश किनार नाही. हिचा आवाज ऐकायला गोड वाटतो.
हिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसतय. रोज मंगळसूत्र घालत असेल का? ही विवाहित आहे याची कल्पना रमणला नाही का की मंगळसूत्र बघूनही तो हिच्या प्रेमात पडला आहे? तसं असेल तर वेळीच रमणला मला समज द्यायला हवी कारण हिच्या देहबोलीवरनं तरी ही मुलगी चांगली वाटते. रमणच्या ओळखीतल्या बाकीच्या बायकांसारखी प्लर्ट नाही वाटत.
बहुतेक म्हणूनच रमण हिच्या मागे लागला असावा छकूचं निरीक्षण चालू होतं तोपर्यंत नेहाने अपर्णाशी जाहिराती संबंधीचं बोलणं पूर्ण केलं.
“ठीक आहे मॅडम. मग मी त्या मुलीला बोलवून घेते दुपारी.”
“ हो बोलाव.”
नेहा म्हणाली.अपर्णा केबिन मधून बाहेर पडली. छकु कडे बघत नेहा म्हणाली,
“बोला मॅडम काय काम होतं तुमचं माझ्याकडे. तुम्हाला टूर्सचं प्लॅनिंग हवं असेल तर राजेश सरांना भेटायला हवं. मी प्लॅनिंग आणि जाहिरातीचं काम बघत असले तरी बेसिक बुकिंग वगैरे राजेश सर बघतात.”
यावर छकुला म्हणाली,
“ नाही मला प्लॅन्स वगैरे बघायचं नाही. मला कुठेही टूरला जायचं नाहीये. मला तुमच्याशीच वैयक्तिक काम आहे.”
त्यावर नेहाला आश्चर्य वाटलं ती म्हणाली,
मी बंगलोर मध्ये नवीन आहे. मला कोणीही ओळखत नाही. या बाईचं काय काम असेल माझ्याकडे? हे असं नेहाच्या मनात आलं पण तरी ती म्हणाली,
“ ठीक आहे बोला ना ?”
तेव्हा छकूने विचारलं
“ तुम्ही रमण शहांना ओळखता का?”
हे नाव तिने ऐकताच नेहा चमकली.
“ का हो काय काम आहे त्यांच्याकडे ?त्या व्यक्तींना मी ओळखते पण तुम्ही का विचारताय?”
यावर छकु म्हणाली की
“रमण शहा सत्यम ॲडव्हर्टाईसमेंट एजन्सी मध्ये क्रिएटिव्ह हेड आहेत त्यांना ोळखता का?”
तर नेहा म्हणाली,
“हो त्यांना मी ओळखते कारण आमच्या स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जाहिरातीचं काम त्यांच्याकडे असतं त्यामुळे त्या कामाच्या निमित्ताने मी त्यांना भेटत असते आणि बोलत असते.”
हे नेहा बोलत असताना छकूने निरीक्षण केलं की हे बोलताना नेहाच्या चेहऱ्यावर कुठेही रमणच्या प्रेमात पडल्यासारखे भाव आले नाहीत. जसं वागणं रमणचं दिसतं तसं हीच वाटत नाही. एकतर ही खूप चलाख असेल आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवण्यात हुशार असेल किंवा अगदी साधी असेल की जिला या गोष्टी आवडत नाहीत.
बराच वेळ छकू काही बोलली नाही तर नेहाला प्रश्न पडला नेहा म्हणाली,
‘ तुम्हाला काय हवंय?”
छकू म्हणाली,
“ तुम्ही ज्या रमान शहांना ओळखता त्यांची मी बायको आहे. गीता शहा. मी मुद्दाम तुम्हाला कोटेचा हे माझं माहेरचं आडनाव सांगीतलं. हे ऐकल्यावर नेहा जागच्या जागी उडाली. नेहा आश्चर्याने म्हणाली,
“काय सांगता ? मग तुम्ही मला त्यांच्याबद्दल का विचारताय ?”
“मी तुम्हाला मुद्दाम भेटायला आले आहे. तुम्हाला माहिती असेल गेले महिनाभर रमणना बरं नाहीये. परवा ते बेशुद्ध झाले होते. अर्धवट शुद्धीत आल्यावर ते जे काही बोलले जी काही बडबड केली त्यातून मला तुमच्याबद्दल कळलं.”
नेहा घाबरली तर तिच्या चेहऱ्यावर ते ऊमटलं. तरी पण तिने शांतपणे विचारलं,
“ म्हणजे काय कळलं ?”
तर छकु म्हणाली,
“माझ्या असं लक्षात आलं आहे कि ते तुमच्या प्रेमात पडले आहेत .”
त्यावर नेहा म्हणाले,
“माझ्या कडून असे कोणतेही सिग्नल रमण शहांना गेलेले नाहीत.”
छकु म्हणाली,
“आतापर्यंतच्या तुमच्या बोलण्यावरून, वागण्यावर माझ्या लक्षात आलं आहे हे. पण ते फारच वेडे झाले आहेत तुमच्या प्रेमामध्ये. परवा महिना झाला त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नाहीये. परवा तर बेशुद्ध पडले होते आणि का बेशुद्ध झाले हे आम्हाला काहीच कळत नव्हतं पण अर्धवट शुद्धीत जेव्हा ते बडबडले तेव्हा तुमचं नाव कळलं आणि नंतर शुद्ध आल्यावर मी त्यांना विचारलं तर त्यांनी कबूल केलं की ते तुमच्या प्रेमात पडले आहेत. ते म्हणाले की एकदाच मला नेहाला भेटायचं आहे. हे ऐकून मी खूप अस्वस्थ झाले म्हणून मी आज तुम्हाला भेटायला आले. रमण फ्लर्ट आहे हे मला माहिती आहे. त्याचं बऱ्याच बायकांशी मैत्री आहे हेही मला माहिती आहे पण ते असे कधीच वागले नाही जसे या महिन्याभर वागतात आहे. त्यांच्या वागण्या मागचं कारण जेव्हा तुमच्या नावापर्यंत येऊन पोहोचलं तेव्हा मी ठरवून तुम्हाला भेटायला आले आणि तुम्हाला बघायला आले की असं काय तुमच्यात आहे की ज्यामुळे रमण तुमच्यात एवढे गुंतले?”
नेहा हे सगळू ऐकून स्तंभित झालेली होती ती म्हणाली,
“बघा मी तुम्हाला सांगते माझ्याकडून कुठलाही सिग्नल रमण शहांना गेलेला नाही. अगदी नकळतसुद्धा. मी रमण शहांशी जास्त बोलतही नाही. त्यांच्याकडे माझ्या असिस्टंट बरोबरच जाते. जेव्हा त्यांच्या…”
बोलता बोलता नेहाचं लक्ष गेलं अपर्णा केबिनच्या दाराशी येऊन आश्चर्याने थांबली आहे. तिने बहुदा सगळं ऐकलं होतं. दोघींनाही कधी वाटलं नव्हतं की रमम शहाची बायको इथे येईल .
तर नेहा शांतपणे म्हणाली,
“ बघा मी तुम्हाला सांगते मी आजारी असताना ते माझ्या घरी आले होते तिथेच ते खूप अस्वस्थ वाटत होते आणि तिथेच त्यांनी मला त्यांच्या मनातील सगळं सांगितल्यावर मला कळलं की ह्यांच्या मनात असं आहे. तेव्हाच मी त्यांना समजावून सांगितलं की माझ्या मनात असं काही नाही. ते नंतर पुन्हा इथे ऑफिसमध्ये येऊन मला बोलले. तेव्हाही मी त्यांना सांगितलं हे मला मान्य नाही कारण माझे विचार असे नाही माझं लग्न झाले आहे. “
“ अहो नेहा मॅडम तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या ओळखता तसचं तुमचे विचार सुद्धा वेगळे आहेत.म्हणून तुम्ही असं उत्तर रमणला दिलं पण तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या बायका सुद्धा रमणच्या मागे पागल होत्या. त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार होत्या. काहींनी केलं सुद्धा. त्यांना कधी त्यासाठी स्वतःची लाज शरम वाटली नाही. त्यामुळेच रमणला असं वाटलं असेल की तुम्ही सुद्धा त्याच्या देखणेपण वर भाळाल.”
“त्यांना माझ्याबद्दल जे वाटतय तसं मला वाटत नाही. माझं माझ्या नवऱ्याबर प्रेम आहे.”
नेहाच्या आवाजात ठामपणा होता.
“ इथेच तर सगळी गडबड आहे तुमचं तुमच्या नवऱ्याशी चांगलं बाऊंडिंग आहे म्हणून तुम्ही स्थिर राहिला पण इथे आमच्यातलं सगळं संपलेलं आहे त्यामुळे असं घडलं. मी तुम्हाला दोष देत नाही. यात रमणची चूक आहे. एखाद्या व्यक्तीला जर घरी सगळं व्यवस्थित असेल तरी बाहेर छचोरपणा करायची चटक लागली असेल तर आपण काय करू शकतो? मीच तुमची माफी मागते. माझ्या नव-याच्या छचोरपणा मुळे तुम्हाला त्रास झाला.”
छकूने दोन्ही हात जोडून माफी मागितली.
“ अहो तुम्ही का हात जोडतात? यात तुमचा काय दोष?”
“ पूर्ण नाही पण रमणची बायको म्हणून अर्धा दोष आहेच. कुठे आणि कधी आमच्या नात्याचा बंध विसविशीत झाला मला कळलंच नाही. मी त्याच्या या वागण्याची कल्पना असूनही कधीतरी वाट चुकलेला नवरा घरी येईल या आशेवर होते पण हे सगळं फार विचित्र झालंय. मी याला नीट करीन. तुम्ही काळजी नका करू.”
“ तुम्ही या सगळ्या प्रकरणात खूप समजूतीने वागलात नाही तर बरेचदा बायकोला आपल्या नव-याची चूक दिसतच नाही. थॅंक्यू तुम्ही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं नाही.”
“ आपलंच नाणं खोटं असताना दुसऱ्याला आरोपी म्हणून सिद्ध करण्याचा खटाटोप करणारी मी नाही. माझे विचार खूप स्पष्ट आहेत म्हणूनच तुम्हाला भेटायला आले. तुम्हाला भेटल्याशिवाय या गोष्टीचं अनुमान काढायचं नाही असं मी ठरवलं होतं.”.
अपर्णा दारातच स्तंभित होऊन उभी होती जणूकाही एखादा पुतळाच असावा.
नेहाला साॅरी म्हणून छकू नेहाच्या केबीनबाहेर पडली. बाहेर पडताना तिचा चेहरा प्रसन्न होता कारण तिने आज एका स्त्रीला समजून घेण्याची हिंमत दाखवली होती. जे खूप कमी वेळा घडतं. आता रमणचं काय करायचं हे ठरवायला तिला निश्चित दिशा सापडेल हा विश्वास तिला आला. छकू अपर्णा समोरून केबीनबाहेर पडली पण तिचं अपर्णाकडे अजीबात लक्षं नव्हतं नाही तर तिला अपर्णाच्या चेहे- यावरचे भाव दिसले असते.
“ अपर्णा”
नेहाने हाक मारली तरी अपर्णा अजून धक्क्यात पुतळा होऊन उभी होती.
“अपर्णा “
नेहाने पुन्हा हाक मारली. तेव्हा अपर्णा भानावर आली.
“ मॅडम हे काय होतं?”
“ मलापण कळत नाही. तो रमण असा विचित्र माणूस आहे आणि त्याची बायको एवढी समजूतदार असावी आश्चर्य आहे. हे खरंय की मला पडलेलं स्वप्न आहे?”
“ मॅडम हे खरंय.मीपण इथेच होते नं. सगळं खरय .”
“ अपर्णा मी इतके दिवस खूप तणावपूर्ण मनस्थितीत होते. माझ्या डोक्यात सतत हेच यायचं की रमणच्या बायकोला हे सगळं कळलं तर तिला काय वाटेल? ती मलाच दोषी धरणार माझी काहीही चूक नसताना. पण आज मनावरचा ताण उतरला. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीवर विश्वास दाखवून तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला.”
नेहाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं.
“ खरय मॅडम तुमचं. आज ती येऊन गेली बरं झालं. तुमच्या मनावरचा ताण उतरल्यामुळे आता तुमचे अहो आणि लेक आल्यावर छान एन्जॉय करा.
यावर दोघी हसल्या.
“ मग काय ठरवलंय?”
अपर्णाने हसत विचारलं.
“ कशाचं?”
“ एन्जॉय कसं करायचं याचं प्लॅनिंग केलंय की नाही “
“ अगं प्लॅनिंग नाही केलं. आत्ता पर्यंत ताणाचं तांडव नृत्य डोक्यात चालू होतं आता जरा निवांत झाले.”
“ चहा बोलावू का? फ्रेश वाटेल.”
“ हो.”
अपर्णाने नेहाच्या केबीनमधूनच कॅंटीनमध्ये चहा सांगितला.
छकू नेहाकडून निघाल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक ठाम पणा दिसू लागला. रमणचं काय करायचं याबद्दल तिच्या डोक्यात विचार सुरू झाले.
काय करेल छकू ?
__________________________________