कामीनी ट्रॅव्हल - भाग १२ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग १२

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १२

हर्षवर्धन प्राचीशी काहीतरी बोलायला आलेला असतो हे आपण मागील भागात बघीतलं. या भागात बघू हर्षवर्धन प्राचीला काय सांगतो.

" हर्षवर्धन बोल नं.तू काही तरी सांगायला आला होतास नं?"
" प्राची तू सांगशील तसं मी वागीन.मला तू खूप आवडतेस.पण तू रूसून नकोस माझ्यावर."

एवढं बोलून हर्षवर्धनचा चेहरा गोरामोरा झाला.तो जरा घाबरून एकदा प्राचीकडे एकदा खाली बघू लागला.हाताची चाळवा चाळव करू लागला. त्यांची ती बावरलेली स्थिती बघून प्राचीला हसू आलं पण लगेच तिने स्वतःला सावरलं.तिच्या लक्षात आलं हर्षवर्धनचं गोंधळलेली अवस्था आत्ताच दूर करायला हवी नाही तर दोघांमध्ये नेहमीसाठी अवघडलेपण राहील जे हर्षवर्धनसाठी योग्य नाही.

अशा अवघडलेल्या अवस्थेत हर्षवर्धनची प्रगती होणार नाही तसंच त्या दोघांमधील नातं फुलणार नाही. हे लक्षात घेऊन प्राचीने हळूच हर्षवर्धनचे हात हातात घेतले तसा हर्षवर्धन आत्ता पर्यंत खाली बघत होता तो बावरून प्राचीकडे बघू लागला.

" हर्षवर्धन मी तुझ्यावर उगीचच का रागवेन? आपण नवरा बायको आहोत.नवराबायको म्हणून कधी कधी आपण एकमेकांवर रागाउ पण ते तेवढ्यापुरतं असेल. आपल्यातील प्रेम जास्त फुलायला हवं.आपण एकमेकांना जितकं समजून घेण्याचा प्रयत्न करू तेवढच ते प्रेम हळूहळू वाढेल. हर्षवर्धन मलापण तू खूप आवडतोस. तू मला घाबरू नकोस माझ्यावर प्रेम करायला शीक.माझ्याशी मनातील कोणतीही गोष्ट मोकळेपणाने बोलायला शीक. करशील नं?"

" प्राची मी खरंच तुझं सगळं ऐकेन.मला तुला काही सांगताना घाबरायला होतं.वाटतं मी जे बोलीन ते तुला आवडलं नाही तर? तू मला सोडून गेलीस तर? मी काय करीन? " बोलताना हर्षवर्धनचा आवाज रडवेला झाला.ते ऐकून प्राचीला मनातून वाईट वाटलं.

" हर्षवर्धन मी तुला सोडून जाईन अशी भीती का वाटते तुला? आपलं लग्न झालं आहे.मी तुझी बायको म्हणून देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुझ्या बरोबर सप्तपदी चालले आहे आणि या घरात तांदूळाचं माप ओलांडून आले आहे. लक्षात आहे नं? मग मी कशी तुला सोडून जाईन?"

" प्राची मला आपल्या लग्नातली काहीच आठवत नाही.सतत भय्यासाहेबांचे कडक डोळे मला जरब दाखवत होते आणि आईचे घाबरलेले डोळे माझं मन पिळवटून टाकत होते पण या भावना माझ्या मनात आतपर्यंत खूप टोचल्या नाहीत कारण ड्रग्ज तसं होऊ देत नव्हती. मला काहीच कळत नव्हतं."

" हर्षवर्धन आता ते सगळे वाईट क्षण तुझ्या आयुष्यातून निघून गेले आहेत.त्यांचा विचार आता तू करू नकोस.तू आता ड्र्ग्जच्या जीवघेण्या विळख्यातून बाहेर आला आहेस अगदी सही सलामत.तू आता छान विचार करत जा.मी आणि आई तुझ्या बरोबर आहोत तुला सांभाळून घ्यायला.आता आपण पुढे काय करायचं यावर विचार करू."

" हो. मी जातो." हर्षवर्धन पलंगावरून उठत म्हणाला.

" हर्षवर्धन जातो कधी म्हणू नये.येतो म्हणावं."

" हो."

एवढं बोलून हर्षवर्धन खोलीबाहेर पडला.कितीतरी वेळ प्राची हर्षवर्धनला बघत होती.बघताना विचार करतां करतां तिच्या डोळ्यात पाणी आलं.तिने हळूच ते पुसले.

प्राची राधाला फोनवर हे सगळं सांगण्याऐवजी तिला प्रत्यक्ष भेटायचं ठरवते.त्यानुसार राधाला तिने फोन लावला.

***
राधाशी बोलून झाल्यावर प्राची फोन ठेवून कामीनी बाईंना हे सांगायला खोलीबाहेर पडली.

कामीनी बाईं देवपूजा करत असतात.प्राचीला बघून देव धुता धुता त्यांनी तिला विचारलं," काय ग काही बोलायच आहे का?"

"हो.मी आणि राधा आज संध्याकाळी भेटणार आहोत.हर्षवर्धनने कोणतं काम करावं यावर जरा बोलणार आहोत."

" होका.छान भेटून ये.आल्यावर सांग काय बोलणं झालं."

" हो."

" प्राची हर्षवर्धन काही बोलला तुला?"

" कशाबद्दल?"

" मला माहिती नाही. हर्षवर्धन तुमच्या खोलीत जाताना दिसला नंतर बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा गोंधळलेला दिसला.हाताचे अस्वस्थ चाळे करत होता.सारखा चेहऱ्यावरून हात फिरवत होता म्हणून विचारलं."

" बापरे! एवढा अस्वस्थ झाला तो.आई हर्षवर्धन त्याच्या मनात माझ्या बद्दल असलेलं प्रेम व्यक्त करायला आला होता. मी त्याच्यावर रागाउन निघून जाईन का अशी त्याला भीती वाटत होती."

" बरोबर आहे त्यांचं. इतर मुलांसारखा तो नवरा म्हणून वागत नाही यामुळे त्याला भीती वाटत असेल."

" हो.मी त्याला समजावलं आहे तरी मला वाटतं काही दिवस त्याच्या मनात ही भीती राहील.तुम्ही काळजी करू नका.मी त्यांची काळजी दूर करीन.एकदा तो कामात गुंतला की मग त्याच्यात आत्मविश्वास येईल. आत्मविश्वास आला की त्याच्या मनातून ही भीती जाईल.म्हणूनच लवकरात लवकर त्याला कामात गुंतवायचे आहे. म्हणून मी आणि राधा आज भेटणार आहोत."

" प्राची तू असल्यावर मला कसली काळजी? तू केवढं मोठं काम केलंस. मी हर्षवर्धनला जन्म दिला पण तू त्याला जीवन दान केलस. तेव्हा तू आम्हा दोघांना समजून नसतं घेतलंस तर आज हर्षवर्धन असा दिसला नसता. तुझ्या या ऋणातून कसं मुक्त होऊ कळत नाही."

" आई असं नका बोलू.हर्षवर्धनला सुधारण्यात माझ्या इतका तुमचाही वाटा आहे,तुमचेही कष्ट आहेत. तेव्हा जर तुम्ही भय्यासाहेबांना घाबरून पाय मागे घेतला असता तर मी काहीच करू शकले नसते."

"एकदा मनात आलं होतं नको हे सगळं करायला. हर्षवर्धनला सुधारण्याच्या नादात तुझ्यावर नसता प्रसंग ओढवला असता तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकले नसते."

" आई असं काही नसतं झालं. मी स्वतःला वाचवलं असतं. आई आता तुम्ही मागचं सगळं विसरा.आपल्या तिघांच्या आयुष्यात सुर्योदय झाला आहे.आपण आपलं आयुष्य आता नव्याने जगूया."

"हो.तू म्हणतेस ते खरंय.आपण नव्याने आयुष्य जगूया."

" मग मी संध्याकाळी राधाला भेटीन नंतर तुम्हाला सांगीन. तुम्ही करा पूजा मी राधाशी काय बोलायचं त्याचा विचार करते.येउ?"

" हो ये."

प्राची आपल्या खोलीच्या दिशेने निघाली.कामीनीबाई आता दुप्पट उत्साहाने देवपूजा करू लागल्या.

***

संध्याकाळी प्राची आणि राधा ठरलेल्या ठिकाणी भेटल्या. खाण्याची ऑर्डर देऊन त्या बोलू लागल्या.

" राधा हर्षवर्धन आता बराच सावरायला.काल मला त्याने त्याच्या मनात माझ्या बद्दल जे प्रेम आहे ते सांगीतलं." प्राची किंचीत हसत म्हणाली.

"वाॅव! मस्त.म्हणजे आता लवकरच हर्षवर्धन पूर्वी सारखा होणार.आणखी काय म्हणाला हर्षवर्धन?"

" घाबरला जरा."

" का? घाबरला कशासाठी?"

"अगं त्याला वाटलं की तो नवरा म्हणून वागत नाही.त्याच्यात आत्मविश्वास कमी आहे त्यामुळे मी त्याच्यावर रागाउन त्याच्या आयुष्यातून निघून जाईन की काय."

" खरंय प्राची.त्याला अशी भीती वाटू शकते.पण आपण त्याच्या मनातील ही भीती काढून टाकू."

" राधा, हर्षवर्धन एकदा कामात गुंतला की त्याच्यात आत्मविश्वास येईल.मग त्याला ही भीती वाटणार नाही असं मला वाटतं."

" एकदम करेक्ट बोललीस.प्राची मी आणि शशांक हर्षवर्धनने काय काम करावं या विषयावर बोलत होतो तेव्हा शशांकने हर्षवर्धनने टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस करावा असं म्हणाला. तुला काय वाटतंय?"

"टूर्स अँड ट्रॅव्हल चा बिझनेस झेपेल का हर्षवर्धनला.हा बिझनेस वाटतो तेवढा सोपा नाही."

" माहिती आहे मला प्राची. हा बिझनेस कर म्हणण्याचा उद्देश एवढाच की या वयात हर्षवर्धनला बाहेर चटकन नोकरी मिळणार नाही.त्याला इतर गोष्टी पटकन समजत नाही तेव्हा बाहेर कुठे नोकरी शोधण्यापेक्षा हा बिझनेस केला तर त्यात सुरवातीला तू,मी आणि शशांक हर्षवर्धनच्या बरोबर वेळ देऊ.

त्याचबरोबर शशांकचा एक मित्र हा बिझनेस करतो.तो आपल्याला मदत करणार आहे.शशांक त्यांच्याशी बोलला आहे."
"असं असेल तर आपण हा विचार करू शकतो. शशांकचा मित्र कधी भेटेल?" प्राचीने विचारलं.
" आज सांगते शशांकला म्हणजे तो फोन करून विचारेल."
"ठीक आहे तसं मला कळव.राधा मला वाटतं शशांकच्या मित्राला आमच्या घरी बोलावू. आईंना पण सगळ्या गोष्टी कळतील.हर्षवर्धनही तिथे असेल तर त्यांना हर्षवर्धनला बघून परीस्थितीची कल्पना येईल.त्यावरून ते आपल्याला हा व्यवसाय जमेल की नाही हे सांगू शकतील.मला असं वाटतं.तुला पटतंय माझं म्हणणं?"
प्राचीने कपातील काॅफीला ढवळत राधाला प्रश्न केला.
" प्राची मला तुझ्यासारखे वाटतंय. समोर हर्षवर्धनला बघून त्यांना अंदाज येईल. आपण तुमच्या घरीच भेटूया."
" ठीक आहे. मग तू शशांकला हे सांग आणि तशी त्यांची वेळ घे.त्यांना जेव्हा जमेल तेव्हा आपण भेटू.मी ऑफीसमध्ये वेळेची ॲडजेस्टमेंट करीन.चल.निघूया."

प्राची आणि राधा बील देउन हाॅटेल बाहेर पडल्या.राधाला भेटून प्राचीला आपण आपल्या धेय्याकडे चाललो आहे याची जाणीव झाली आणि तिच्या ओठांवर स्मीतहास्य आलं.

***

इतके दिवस डोक्यावर ताण होता तो आता दूर होणार याची शाश्वती वाटल्याने प्राचीला एक नवी उमेद मिळाली. हर्षवर्धनला फक्त ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढून पुरेसं ठरणार नाही तर त्याला चांगल्या कामामध्ये गुंतवणं आवश्यक आहे हे प्राची जाणून होती.हर्षवर्धन जर रिकामं डोकं घेऊन जगू लागला तर पुन्हा त्याच निसरड्या वाटेवर चालू लागेल. हे व्यसनाधीन व्यक्ती करू शकतो म्हणून काळजी घ्यायला हवी.

घरी पोचेपर्यंत प्राचीच्या डोक्यात अगणीत विचार फेर धरून नाचत होते.हर्षवर्धनला पुन्हा ड्रग्जच्या विळख्यात अडकून द्यायचं नाही हा प्राचीने निश्चय केलेला होता.

प्राचीने घरी पोहोचताच कामीनी बाईंना सगळं सांगितलं.
कामीनी बाईंना पण आनंद झाला.

" प्राची शशांकच्या मित्राला आपल्या घरीच बोलावलं हे बरं केलंस.काही गोष्टी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष बघीतलेल्याच चांगल्या असतात." कामीनी बाईं प्राचीला म्हणाल्या.

"मलासुद्धा असंच वाटलं म्हणूनच मी आपल्या घरीच भेटण्याचा राधाकडे आग्रह धरला."
कामीनी बाईंनी प्राचीच्या पाठीवर शाबासकी देऊन म्हटलं,
" तो परमेश्वर तुझे कष्ट बघतोय.तो नक्की हर्षवर्धनला पूर्वीसारखा करेल."
दोघींच्याही चेहे-यावर आनंद होता.

आता दोघी राधाच्या फोनची वाट बघू लागल्या.

________________________________
क्रमशः रावांचा फोन कधी येईल? शशांकला मित्र प्राचीच्या घरी येईल का? बघू पुढील भागात.