कामीनी ट्रॅव्हल - भाग १६ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग १६

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १६
कामीनी ट्रॅव्हल्स सुरू होउन आता काही वर्ष झाली.आता हर्षवर्धन कसा आहे? पुढे काय घडेल बघू या भागात.

कामीनी ट्रॅव्हल्स सुरु होऊन आज आठ वर्ष झालीत. पहिली तीन वर्ष हर्षवर्धनच्या तब्येतीत सुधारणा करण्याकडेच प्राची आणि कामीनी बाईंंचं लक्ष होतं. त्यामुळे ट्रॅव्हलचा व्यवसाय मुंगीच्या पावलानी पुढे सरकत होता. प्राचीच्या बोलण्याने हर्षवर्धनमध्ये खूप फरक पडला. तीन वर्षांत हर्षवर्धनच्या जिद्दीमुळे तसेच प्राची आणि कामीनीबाईंच्या कष्टामुळे हर्षवर्धनमध्ये बरीच सुधारणा झाली. हर्षवर्धन अगदी पूर्वीसारखं व्हायला थोडी वाट बघावी लागणार होती. यासाठी प्राची आणि कामीनी बाईं तयार होत्या.

***

कामीनी ट्रॅव्हल्सचा या टूर्स अँड ट्रॅव्हलच्या व्यवसायात ब-यापैकी जम बसला होता. हर्षवर्धनच्या अश्या केसमुळे सुरवातीपासूनच कामीनी बाई आणि प्राची या व्यवसायात हर्षवर्धनच्या बरोबरीनी मेहनत करत. कारण हर्षवर्धन एकदम खोलवर विचार करू शकत नसे. तसच एकदम निर्णय घेऊ शकत नसे.

आता हर्षवर्धनला फोनवर दुस-याशी कसं बोलावं हे थोडं थोडं कळू लागलं होतं. तरीही काही वेळेला अचानक काही प्रश्न समोरून विचारल्या गेले तर तो गोंधळात असे. असं एकदोनदा झालं तेव्हा प्राचीने हर्षवर्धनला सांगीतलं,

"हर्षवर्धन जर तुला कोणी अचानक वेगळा प्रश्न विचारला आणि तुला उत्तर देता आलं नाही तर घाबरून जाऊ नकोस. अशावेळी तू समोरच्या व्यक्तीला सांगत जा की बाकी गोष्टी तुमच्याशी प्राची मॅडम बोलतील.मी बोलेन त्यांच्याशी. तू घाबरून विषयाला सोडून उत्तरं देऊ नकोस."

प्राचीचं म्हणणं हर्षवर्धनला पटलं पण तरी त्याच्या मनात एक प्रश्न आला तो त्याने प्राचीला विचारला. हल्ली हर्षवर्धन पूर्वीसारखा प्राचीशी बोलायला घाबरत नसे. त्याच्या लक्षात आलं होतं की आपण चुकलो तरी प्राची आपल्यावर न रागावता आपल्याला समजून घेते आणि आपलं कुठे चुकलं ते समजाउन सांगते. त्याच्या मनात प्राची बद्दलची भीती जाऊन तिच्याबद्दल आदर निर्माण झाला होता.

" प्राची मी असं सांगितलं तर समोरच्या व्यक्तीला वाटेल की मला व्यवसायातील काही माहिती नाही तर काय करायचं?"

" तुझा प्रश्न बरोबर आहे.मला वाटतं विषयाला सोडून किंवा चुकीची माहिती देण्यापेक्षा हे बरं. सांग तू त्यांना की या गोष्टी प्राची मॅडम बघतात. त्याच तुम्हाला डिटेल सांगू शकतील. असं तू सांगीतलं तर तुला व्यवसायातील काही माहिती नाही असा अर्थ समोरची व्यक्ती नाही काढणार कारण व्यवसायात कामाचे अनेक विभाग असतात हे तुला माहिती आहे नं?"

" हो." हर्षवर्धनने उत्तर दिलं.

"प्रत्येक विभागातील सगळी माहिती ही एकाच माणसाला असू शकत नाही. जरी आपण मालक असलो तरी. काही विभाग तुझ्याकडे काही माझ्याकडे असं आपण विभागून शकतो. प्रत्यक्षात मालक म्हणून तुला सगळ्या विभागांची अद्ययावत माहिती असणं आवश्यक आहे. ती काही दिवसांनी तुला राहीलच. सध्या तुला जेवढं झेपतय तेवढंच तुझ्याजवळ असू दे. बाहेरच्या लोकांना ही गोष्ट कळणार नाही.तू काळजी करू नकोस. तू आता खूप गोष्टी सांभाळायला लागला आहेस. "

हे बोलून हर्षवर्धनच्या हातावर थोपटत प्राची हसली. तिचं हसणं बघून हर्षवर्धनला खूप छान वाटलं.

***

मंगेशभाईंच्या मदतीने अगदी छान लोकेशनवर कामीनी ट्रॅव्हल्सचं स्वतःचं ऑफीस झालं होतं. ऑफीसची जागा तशी महाग होती पण व्यवसायाचा पुढील विचार करून ती जागा घेण्याचं प्राची आणि कामीनी बाईंनी ठरवलं.

प्राचीच्या वडिलांनी तिला ऑफिस घेण्यासाठी मदत केली. सुरवातील आपल्या आईवडिलांकडून त्यांची गंगाजळी आपल्या व्यवसायासाठी वापरणं प्राचीला योग्य वाटलं नाही तेव्हा अशोक आणि वासंतीने तिला समजावलं.

" प्राची तू न संकोचता मी मदत करतोय ती घे. अग तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. तुझ्या स्वप्नासाठी आमची शिल्लक पुंजी कामाला आली तर आम्हाला किती आनंद आणि समाधान मिळेल याची तू कल्पना नाही करू शकणार."

" हे बघ प्राची. तुझ्या या स्वप्नापाठीमागे आम्हाला उभं राहू दे.अग तुझ्या जागी मुलगा असता तर त्याला नसती का केली मदत. तू मुलगी आहेस, तुझं लग्न झालं म्हणून आईबाबांकडून आर्थिक मदत घ्यायची नाही असं कुठे लिहीलं आहे का? प्राची तू अजीबात संकोच करू नकोस." वासंती म्हणाली.

" प्राची बेटा हर्षवर्धनला तू ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढून त्याला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी धडपड करतेय त्यात आम्हाला तुझी मदत करू दे. या कामात तू यशस्वी झालीस आणि आम्ही तुला या कामात मदत केली तर आईबाबा म्हणून आम्हाला खूप आनंद होईल. तू नाही म्हणू नकोस."

अशोक तळमळीने बोलला. प्राची यावर काहीच बोलू शकली नाही. याला उत्तर म्हणून तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. वासंतीने हळूच प्राचीला आपल्या कुशीत घेतलं. अशोक प्राचीकडे अभीमानाने बघू लागला.

***

हर्षवर्धन आणि प्राचीच्या लग्नाला आता आठ वर्ष झाली होती. त्यातील दोन तीन वर्ष हर्षवर्धनला पाहिल्यासारखं करण्यातच गेली होती. प्राचीला कसली घाई नव्हती. हर्षवर्धन बरा होतो आहे हे महत्वाचं होतं. मेंदू सारख्या हुशार पण नाजूक भागावर उपचार करताना घाई करून चालणार नव्हतं.

***

आत्ता स्वतःच्या केबीनमध्ये बसून प्राची पुढच्या टूरचं सगळं नियोजन कसं केलेलं आहे हे बघत होती. हे बघता बघता प्राचीचं मन भूतकाळात गेलं. तिला हर्षवर्धन,आणि कामीनी बाईबरोबर भय्यासाहेबांचं घर सोडल्यापासूनचे दिवस आठवू लागले.

लग्नानंतर हर्षवर्धनची स्थिती बघता चिडून घटस्फोट घेण्याऐवजी तसंच भय्यासाहेबांनी दिलेली ऑफर स्विकारण्या ऐवजी तिनी हर्षवर्धनला सुधारण्याचं धाडस दाखवलं. ते दाखवताना ती भय्यासाहेबांबरोबर गनिमी कावा खेळली. प्राचीला प्राप्त करण्याच्या विकृत लालसेपायी त्यांना तिचा कावा कळलाच नाही. ही त्यांच्या दृष्टीनी एक शोकांतिका होती.

आठ वर्षांपूर्वी कामीनी ट्रॅव्हल्स सुरू केलं होतं. सुरवातीला भाड्यावर बसेस घेऊन मंगेशभाईंच्या मार्गदर्शनाखाली छोटे टूर आखल्या गेले. शशांकचा मित्र मंगेशभाई ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रातील बारकावे प्राचीला समजाऊन सांगत असे. व्यवसायाची सुरुवात होती पण त्याबरोबरच हर्षवर्धनमधील सुधारणेकडे पण तेवढंच लक्ष देणं आवश्यक होतं.

सुरवातीला हर्षवर्धनला प्रवासात एकटं न पाठवता एकटी प्राचीच जात असे. राधा आणि शशांक मधून मधून तिच्याबरोबर जात. संपूर्ण प्रवास एकट्यानी नियोजीत करून पूर्ण करण्या इतका हर्षवर्धनच्या मेंदूची कृती तत्परता वाढली नव्हती. बरेच वर्षांच्या व्यसनामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी झालेली होती. ती वाढवणं आधी गरजेचं होतं. तोपर्यंत प्राची राधा, शशांक आणि मंगेशभय्या यांच्या मदतीनं ट्रॅव्हल्स सारखा व्यवसाय नेटानी पुढे नेत होती.

सुरवातीला हर्षवर्धन बरा झाल्यावर प्राचीने त्याला काही बौध्दीक कसरती करायला दिल्या होत्या. रोज पेपरमधे येणारे शब्दकोडे सोडवायला लावा असं तिथल्या डाॅक्टरांनी सांगीतलं होतं. शब्द कोडं सोडवताना योग्य शब्द आठवण्यासाठी त्याच्या मेंदूवर ताण येईल,त्यातून हळुहळू त्याची विचार करण्याची शक्ती वाढेल तशी त्याला एक दिशापण मिळेल असं तिथले डाॅक्टर म्हणाले. हे लक्षात ठेऊन प्राची हर्षवर्धनला शब्दकोडे सोडवायला लावत असे.

कामीनी बाईंंचं त्याच्याकडे लक्ष असे.त्याला कोणता शब्द अडला तर कामीनी बाईं वेगवेगळ्या हिंट देउन हर्षवर्धनला त्या शब्दाजवळ पोचवत असतं.

पहिले काही दिवस तर तास न तास बसूनही त्याला एकही शब्द आठवायचा नाही. कामीनीबाईंनी त्याला वेगवेगळ्या हिंट देऊनही कधी कधी हर्षवर्धला तो योग्य शब्द सुचत नसे.

हळुहळू त्याच्या मेंदूकडून तसा अभ्यास करवून घ्यायला सुरुवात करायला हवा हे प्राचीच्या लक्षात आलं.तेव्हा विचार करतांना तिला तिच्या मैत्रीणीची आठवण झाली.

प्राचीची एक मैत्रीण आशू मतीमंद मुला़ंच्या शाळेत शिकवायची. तिला प्राची नी विचारलं,

" आशू तू याबाबतीत माझी काही मदत करू शकशील का?" असं प्राचीने आशूला फोन करून विचारलं.

तर आशू म्हणाली,

" हो प्राची मी तुला मदत करू शकेन."

" आशू मला माहिती आहे की हर्षवर्धनमध्ये सुधारणा व्हायला वेळ लागेल. साधारण किती वेळ लागेल तुझा अंदाज?" प्राचीने विचारलं त्यावर आशू म्हणाली,

"प्राची हर्षवर्धन मतीमंद नाही पण नशेचं सतत इतकी वर्ष सेवन केल्यामुळे त्याचा मेंदू आळसावला आहे. त्यामुळेच कुठलीही कृती सामान्य माणूस जसा पटकन करतो तसा हर्षवर्धन करू शकत नाही. हर्षवर्धनचा मेंदू हा विचार करून हुकूम सोडण्यासाठी एवढा चंट नाही राहीला. त्याला तसा चंट करावा लागेल.

त्याच्या मेंदूवरचा नशेच्या ताबा निघायला थोडा वेळ लागेल. कारण इतकी वर्ष त्याच्या मेंदूला मेहनत घेण्याचीच सवय नव्हती. तो फक्त आराम करत होता. प्राची याला वेळ लागेल पण हे अशक्य नाही. तू काळजी करू नकोस आपण हे करू.तू ज्या पद्धतींनी हर्षवर्धनला यातून बाहेर काढलं आणि आताही तुझा प्रयत्न चालूच आहे. तुला हॅट्स ऑफ."

आशू प्राचीला मदत करायला तयार झाली.

"आशू हर्षवर्धनला पूर्वीसारखं करण्याचा माझा आणि आईंचा प्रयत्न चालू असतो.आज हर्षवर्धन मला आपली बायको म्हणून ओळखतो यांचा आनंद आहे पण मला एवढ्यावरच थांबायचं नाही. कामीनी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय त्याने समर्थपणे सांभाळला पाहिजे हे माझं स्वप्नं आहे. आमचं वैवाहिक जीवन इतर नाॅर्मल लोकांसारखे व्हायला वेळ लागेल पण माझी वाट बघायची तयारी आहे. हर्षवर्धन आधी नाॅर्मल व्यक्ती होणं आवश्यक आहे. आशू तू आलीस त्यामुळे मला धीर आला. थॅंक्स मी हाक मारली आणि तू लगेच आलीस.""

"ऐ बाई फार सेंटी करू नको मला. आपण करू प्रयत्नं. ऊद्यापासून मी येते."

प्राचीला आता खूप शांत वाटत होतं. लवकरच हर्षवर्धन पहिलेसारखा होईल याची तिला खात्री वाटली.

आशू म्हणाली तसा हर्षवर्धन मतीमंद नव्हता पण खूप वर्ष ड्रग्ज घेतल्याने त्याच्या मेंदूला शिथीलता आली होती. कुठलीही भावना असो मग ती रागाची असेल किंवा प्रेमाची त्यात आत्यंतिक वरची पातळी तो गाठत असे. जेव्हा तो असा वागायचा तेव्हा त्याचं वागणं बघून प्राची मनातून घाबरायची.

त्या भावना इतक्या तीव्र पातळीवर व्यक्त होऊ नये म्हणून शारीरीक व्यायाम त्याच्यासाठी आवश्यक होता तसंच मेंदूला ही व्यायाम आवश्यक होता. हळुहळू या व्यायामामुळे त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढेल. मेंदू कार्यक्षम झाला की मेंदूची सदसद्विवेकबुद्धी वाढेल.ती वाढली की कुठलीही भावना इतक्या तीव्र पद्धतीने हर्षवर्धन व्यक्त करणार नाही. तो पूर्वीसारखा होण्यासाठी धीर धरावा लागेल असं रिहॅबसेंटरचे डाॅक्टर म्हणाले होते.

शारीरिक आणि बौद्धिक व्यायाम सुरू केल्यावर लगेच त्याचा परीणाम अपेक्षीत करू नका. हे डाॅक्टरचं म्हणणं प्राची आणि कामीनी बाई दोघींनी लक्षात ठेवलं होतं.

आशू हर्षवर्धनमध्ये कशी प्रगती घडवेल याची प्राची आणि कामीनी बाईं दोघी वाट बघू लागल्या.
__________________________________
क्रमशः हर्षवर्धनमध्ये आता आणखी जास्त सुधारणा कशी होईल.ते पुढे बघू. आशूची ट्रिटमेंट किती काम करते बघू.
लेखिका.. मीनाक्षी वैद्य.